तिरुपती मंदिराला 121 किलो सोनं आणि हिऱ्यांचे दागिने असं मोठं दान देणारे वर्धमान जैन कोण आहेत?

फोटो स्रोत, TTD
- Author, गरिकिपाती उमाकांत आणि विजयानंद अरुमुगम
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामींना गुरुवारी (26 नोव्हेंबर) 121 किलो सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने अर्पण करण्यात आले. या दागिन्यांची किंमत सुमारे 207.6 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चेन्नई येथील व्यावसायिक वर्धमान जैन आणि राधिका जैन यांनी हे दागिणे अर्पण केले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत तिरुमला मंदिरात हे दागिने अर्पण करण्यात आले.
तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (टीटीडी) जनसंपर्क अधिकारी रवी यांनी बीबीसीला सांगितलं की, भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूळ मूर्तीला डोक्यापासून पायापर्यंत सजवण्यासाठी सोन्याचे आणि हिऱ्यांचे 46 प्रकारचे दागिने भेट म्हणून देण्यात आले आहेत.
त्यांनी सांगितलं की, यापैकी 106 किलो सोन्यापासून तिरुमला येथील देवीसाठी दागिने तयार करण्यात आले आहेत. तर उर्वरित 15 किलो सोन्यापासून तिरुचनूर येथील श्री पद्मावती देवीसाठी सुवर्णवस्त्रे तयार केले जाणार आहेत.

फोटो स्रोत, TTD
टीटीडीचे जनसंपर्क अधिकारी रवी, टीटीडीचे माजी कार्यकारी अधिकारी (ईओ) एल. व्ही. सुब्रमण्यम आणि माजी मुख्य पुजारी डॉ. ए. व्ही. रमण दीक्षितुलू यांनी बीबीसीला सांगितलं की, 1933 मध्ये ब्रिटिश राजवटीत तिरुमला तिरुपती देवस्थानमची (टीटीडी) स्थापना झाली. त्यानंतरच्या गेल्या 9 दशकांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं दान स्वरुपात मिळालं आहे.
रमण दीक्षितुलू यांनी म्हटलं की, श्रीकृष्णदेवराय यांच्या काळानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने दान करण्यात आले आहेत.
ते म्हणाले की, आधुनिक इतिहासात एकाच वेळी सर्वाधिक सोन्याचे दागिने दान करणारी व्यक्ती म्हणून वर्धमान जैन यांची नोंद होईल.
कोण आहेत वर्धमान जैन?

फोटो स्रोत, VARDHMAN JAIN
वर्धमान जैन हे चेन्नई येथील एशिया इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक आहेत.
ते हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांना बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) सेवा देणाऱ्या ॲक्सेस हेल्थकेअर या कंपनीचे संस्थापक आणि संचालक मंडळाचे उपाध्यक्षही आहेत.
टीटीडीचे जनसंपर्क अधिकारी रवी यांनी बीबीसीला सांगितले, "वर्धमान जैन हे तिरुमला श्रीवारीचे मोठे भक्त आहेत. साधारण 15 महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स विकून काही हजार कोटी रुपये कमावले होते. त्याच वेळी त्यांनी देवाला मोठी भेट अर्पण करण्याचा संकल्प केला होता."
याच संकल्पानुसार त्यांनी देवासाठी 106 किलो सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने, तर देवीसाठी 15 किलो सोन्याचे दागिने तयार करण्याचे नियोजन केले.
हे दागिने चेन्नईतील एका नामांकित कंपनीने तयार केले आहेत.
टीटीडीचे जनसंपर्क अधिकारी रवी यांनी बीबीसीला सांगितले, "हे 46 दागिने लाकडाच्या 46 पेट्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते ट्रकमधून चेन्नईहून तिरुमला येथील श्रीवारी मंदिरात आणण्यात आले. टीटीडीच्या अधिकाऱ्यांनी या दागिन्यांची तपासणी करून त्यांची यादी तयार केली."
वर्धमान जैन यांनी यापूर्वीही दिलंय टीटीडीला दान

फोटो स्रोत, TTD
End of podcast promotion
वर्धमान जैन यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमला (टीटीडी) इतकी मोठी देणगी देण्याची ही पहिलीच वेळ नाही.
जैन यांनी यापूर्वीही अनेक वेळा टीटीडीला देणग्या दिल्या आहेत, असं टीटीडीचे जनसंपर्क अधिकारी रवी यांनी सांगितलं.
रवी यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी 2025 मध्ये वर्धमान जैन यांनी टीटीडीच्या वेगवेगळ्या ट्रस्टना 6 कोटी रुपयांची देणगी दिली होती.
यापैकी 5 कोटी रुपये टीटीडीच्या गोशाळेत जनावरांसाठी चारा तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी देण्यात आले होते.
याव्यतिरिक्त, श्रीवारी हुंडीत भाविकांकडून जमा होणाऱ्या नाण्यांची मोजणी लवकर व्हावी, यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचे नाणी वेगळी करणारे आणि मोजणारे मशीनही दान केले होते.
याच वर्षी मे महिन्यात त्यांनी तिरुमला येथे भाविकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी टीटीडीला 'ओलेक्ट्रा' कंपनीची एक इलेक्ट्रिक बसही दान केली होती.
श्री व्यंकटेश्वर भक्ती चॅनेलच्या विकासासाठीही त्यांनी 7 कोटी रुपयांची देणगी दिली होती.
2020 मध्येही त्यांनी वेगवेगळ्या वेळी 2.10 कोटी आणि 1.11 कोटी रुपयांची देणगी दिली होती.
टीटीडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वर्धमान जैन यांनी चेन्नईतील टीटीडीच्या मंदिरालाही मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे.
वर्धमान जैन यांच्याआधी मोठी देणगी कोणी दिली होती?

फोटो स्रोत, TTD
बीबीसीबरोबर संवाद साधलेल्या टीटीडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धमान जैन हे आतापर्यंत सर्वाधिक वजनाचे सोन्याचे दागिने दान करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत.
वर्धमान जैन यांच्यानंतर कर्नाटकचे गली जनार्दन रेड्डी, अमेरिकेत राहणारे आंध्र प्रदेशचे मंटेना रामाराजू, कोलकात्याचे उद्योगपती संजीव गोयंका, विशाखापट्टणमचे पुव्वाडा मस्तान राव आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा क्रमांक लागतो.
पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत अनेक राजे, उद्योगपती आणि सामान्य भाविकांनी तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वरांना मोठ्या प्रमाणात सोनं अर्पण केलं आहे.
आधुनिक काळात श्रीवारींना 206 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने इतक्या मोठ्या प्रमाणात दान करणारे जैन हे पहिलेच व्यक्ती आहेत.
यानंतर कर्नाटकचे माजी मंत्री गली जनार्दन रेड्डी यांचं नाव येतं. त्यांनी जून 2009 मध्ये 31 किलो वजनाचा दिव्य वज्रमुकुट दान केला होता. या मुकुटात 9 प्रकारची रत्ने (नवरत्न) जडवण्यात आली होती.
यानंतर अमेरिकेत राहणारे भारतीय नागरिक मंटेना रामराजू यांनी 2017 मध्ये श्रीवारींना 28 किलो वजनाचा सहस्रनाम कासुला हार दान केला होता. त्यावेळी त्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये होती.
2025 मध्ये कोलकात्याचे उद्योगपती संजीव गोयंका यांनी सुमारे 5 कोटी रुपये किमतीचे हिऱ्यांनी जडवलेले सोन्याचे लॉकेट, बाहू अलंकार (बाध हस्त) आणि इतर सोन्याचे दागिने दान केले होते.
याच वर्षी विशाखापट्टणम येथील पती-पत्नी पुव्वाडा मस्तान राव आणि कुंकमारिका यांनी भगवान व्यंकटेश्वरांना 3.8 कोटी रुपये किमतीचं सोनं अर्पण केलं होतं.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी 1.5 कोटी रुपये किमतीचा 2 किलो वजनाचा सोन्याचा शंख आणि सोन्याची कासवाची मूर्ती दान केली होती. या वस्तूंचा वापर भगवान व्यंकटेश्वरांच्या अभिषेकासाठी केला जातो.
राजांनीही सोन्याचे दागिने अर्पण केले
माजी मुख्य पुजारी डॉ. ए. व्ही. रमण दीक्षितुलू यांनी बीबीसीला सांगितलं की, 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याचे राजे श्रीकृष्णदेवराय यांनी 7 वेळा तिरुमला मंदिराला भेट दिली होती.
त्यांनी आनंद निलय विमानमवर सोन्याचा मुलामा चढवला होता. याशिवाय, हिरे आणि 9 प्रकारची रत्ने जडवलेले अनेक मुकुट, हार आणि सोन्याची नाणीही भगवान व्यंकटेश्वरांना अर्पण केली होती.
रमण दीक्षितुलू यांनी सांगितलं की, पल्लव, चोल आणि पांड्य राजांनी मंदिराच्या भिंती, ध्वजस्तंभ आणि मुख्य गाभारा सजवण्यासाठी शेकडो किलो सोनं आणि सोन्याचे कलश दान केले होते.
त्यांनी सांगितलं की, 18व्या शतकात मराठा सेनापती रघोजी भोसले यांनी भगवान व्यंकटेश्वरांना पाचू आणि हिरे जडवलेले अतिशय मौल्यवान सोन्याचे दागिने अर्पण केले होते. या दागिन्यांची नोंद टीटीडीच्या दागिन्यांसंबंधीच्या नोंदवहीत आहे.
ते म्हणाले की, म्हैसूरचे महाराज आणि गडवालच्या राजांनीही भगवानांच्या उत्सवांसाठी सोन्याचे रथ, सोन्याचे कवच आणि मौल्यवान दागिने अर्पण केल्याचा इतिहास आहे.
दान केलेलं सोनं कसं जपून ठेवलं जातं?

फोटो स्रोत, TTD
एल. व्ही. सुब्रह्मण्यम यांनी सांगितलं की, भाविकांनी देवाला अर्पण केलेल्या सोन्यामध्ये वापरलेले दागिने, अलंकार आणि इतर सोन्याच्या वस्तूंचाही समावेश आहे.
अशा प्रकारे मिळालेलं सोनं वितळवून त्याचे सोन्याचे बिस्किट तयार केले जातात. त्यानंतर हे सोनं सरकारी बँकांमध्ये जमा केलं जातं.
हे सोनं भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि मिनरल्स अँड मेटल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एमएमटीसी) यांच्या देखरेखीखालीही ठेवलं जातं, असं ते म्हणाले.
तर भाविकांनी खास देवासाठी तयार करून दिलेले दागिने तिरुमला येथील बोक्कासम म्हणजेच मंदिराच्या खजिन्यात सुरक्षित ठेवले जातात.
एल. व्ही. सुब्रमण्यम यांनी सांगितलं की, या दागिन्यांच्या सुरक्षेबाबत शंका घेण्याचे कारण नाही. ते अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षित ठेवले जातात.
त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत टीटीडीच्या इतिहासात 2 वेळा मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं, "यापूर्वी वागडा आयोग आणि जगन्नाथ राव आयोगाने टीटीडीच्या दागिन्यांची सविस्तर तपासणी केली होती. दोन्ही आयोगांनी आपल्या अहवालात टीटीडी हे दागिने काळजीपूर्वक सुरक्षित ठेवत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणालाही शंका घेण्याची गरज नसल्याचेही आयोगांनी स्पष्ट केले होते."
देवाच्या मूर्तीवर 106 किलो सोन्याचे दागिने
टीटीडीचे माजी विशेष कार्याधिकारी (ओएसडी) नागेश यांनी बीबीसीला सांगितलं की, तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वरांच्या मूर्तीला दर शुक्रवारी ते बुधवारपर्यंत 106 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं जातं.
त्यांनी सांगितलं की, गुरुवारीच भाविकांना भगवान व्यंकटेश्वरांच्या मूळ स्वरूपाचं दर्शन घेता येतं.
आठवड्यातील उर्वरित 6 दिवस भगवान व्यंकटेश्वरांच्या मूर्तीला 106 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं जातं.
त्यांनी सांगितलं की, याच कारणामुळे देणगीदार वर्धमान जैन यांनी आता भगवान व्यंकटेश्वरांना 106 किलो वजनाचे दागिने अर्पण केले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






























