म्हशीने दिला 2 डोक्यांच्या रेडक्याला जन्म; काही लोक म्हणतात 'चमत्कार', पण विज्ञान काय सांगतं?

बनासकांठा येथे म्हशीने दोन डोक्यांच्या रेडक्याला जन्म दिला.
फोटो कॅप्शन, बनासकांठा येथे म्हशीने दोन डोक्यांच्या रेडक्याला जन्म दिला.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम तालुक्यात असलेल्या डालवाणा गावात एक अनोखी आणि अचंबित करणारी घटना घडली आहे.

'बीबीसी गुजराती'चे बनासकांठा येथील प्रतिनिधी परेश पधियार यांच्या माहितीनुसार, इथल्या एका म्हशीने अशा रेडक्याला जन्म दिलाय ज्याचं शरीर एकच आहे, पण त्याला 2 डोकं आहेत.

गावात सगळीकडे या रेडक्यांची चर्चा असून याबाबत कुतूहल व्यक्त केलं जात आहे. ज्या घरात हे रेडके जन्माला आलेय, ते लोक याची अगदी जीवापाड काळजी घेत आहेत.

पण पशुवैद्यकीय शास्त्राच्या मते, हा काही चमत्कार नाही. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पेशींचं विभाजन योग्य प्रकारे झाले नाही, तर एकाच शरीराला दोन तोंडं किंवा दोन डोकं असलेलं पिल्लू जन्माला येऊ शकतं.

पशुवैद्यकीय अधिकारी याला जन्मतःच झालेली एक खूप दुर्मिळ शारीरिक कमतरता मानतं.

ही खरंच एक अजब घटना आहे का?

2 डोकं असलेल्या म्हशीच्या या रेडक्यांना पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी उसळली आहे.
फोटो कॅप्शन, 2 डोकं असलेल्या म्हशीच्या या रेडक्यांना पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी उसळली आहे.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आसपासच्या गावांमधूनही लोक या दोन तोंडांच्या वासराला पाहण्यासाठी डालवाणा गावात येत आहेत.

स्थानिक पातळीवर काही जण या घटनेला थेट 'निसर्गाचा चमत्कार' मानत आहेत. मात्र पशुवैद्यकीय तज्ज्ञ यामागचं गूढ उकलून खरं वैज्ञानिक कारण स्पष्ट करतात.

पशुवैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात?

बनासकांठा: 2 डोकी असलेल्या म्हशीच्या रेडक्याचा जन्म; काहींना हा चमत्कार वाटतो, पण विज्ञान काय सांगते?

यावर पशुवैद्यकीय अधिकारी रमेश पटेल म्हणतात, "अशा गोष्टींवरून कोणतीही अंधश्रद्धा बाळगण्याची किंवा उगाच अफवा पसरवण्याची गरज नाही."

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याची शास्त्रीय बाजू सांगताना ते पुढे म्हणतात, "विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, गाय किंवा म्हशीच्या पोटात गर्भाची वाढ होताना 13 व्या किंवा 14 व्या दिवशी पेशींचं विभाजन सुरू असतं. एका पेशीचं विभाजन झाल्यावर जर ही प्रक्रिया अर्धवट थांबली तर असं दोन तोंडं असलेलं पिल्लू जन्माला येऊ शकतं."

डॉ. पटेल याबद्दल सांगतात, "पेशींची ही विभागणी अर्धवट थांबल्यास प्राण्याला एकापेक्षा जास्त डोकं किंवा तोंडं येऊ शकतात. इतकंच नाही तर 4 ऐवजी 5 पाय, 2 शेपट्या किंवा पाठीचे 2 कणेही तयार होऊ शकतात. म्हणजेच काय तर पेशींचं विभाजन अर्धवट थांबल्याने शरीराचा कोणता ना कोणता भाग पूर्णपणे तयार होऊ शकत नाही."

"या वासराच्या बाबतीतही पेशींचं विभाजन मध्येच थांबल्यामुळे 2 पिल्लं स्वतंत्र होण्याऐवजी ती आपसात जोडली गेली आणि त्यांना 2 तोंडं आली. जर हे विभाजन नीट पूर्ण झालं असतं तर 2 वेगळी वासरं जन्माला आली असती," असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे यामागे कोणताही 'दैवी चमत्कार' नसून हे केवळ एक वैज्ञानिक कारण आहे, असं डॉक्टरांचं स्पष्ट म्हणणं आहे.

ते म्हणतात, "प्राण्यांमध्ये अशा घटना अनेकदा पाहायला मिळतात. इतकंच काय माणसांमध्येही असे प्रकार समोर येतात. जेव्हा जुळी मुलं एकमेकांना जोडलेली जन्माला येतात."

"इतकंच नाही तर झाडाझुडपांमध्येही असंच घडतं. दोन बटाटे किंवा दोन फळं एकमेकांना चिकटलेली आपण अनेकदा पाहतो. विज्ञानाच्या दृष्टीने ही अगदीच सामान्य बाब आहे. यामागे कोणताही चमत्कार वगैरे नाही."

जेनेटिक तज्ज्ञ काय सांगतात?

गांधीनगरच्या सरकारी पशु रुग्णालयातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जिगर कंसारा यांनी 'बीबीसी गुजराती'ला दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे पेशींची विभागणी होताना सुरुवातीला एक गर्भ तयार होतो. पुढे फर्टिलायझेशनची म्हणजे फलनाची प्रक्रिया पूर्ण झाली की त्यातून संपूर्ण शरीराची जडणघडण होते.

"माणूस असो किंवा प्राणी प्रत्येक जीवामध्ये गर्भाच्या विकासाची ही पद्धत एकसारखीच असते," असं डॉ. कंसारा म्हणतात.

ते पुढे सांगतात, "अनेकदा माणसांमध्ये जुळी मुलं जन्माला येताना आपण पाहतो. त्यांना विज्ञानात 'मोनोजायगोटिक ट्विन्स' म्हणतात. पेशींची विभागणी होताना एकाच गर्भाचे 2 स्वतंत्र भाग झाले की, अशी जुळी मुलं होतात."

"प्राण्यांमध्येही हाच प्रकार घडतो. मात्र काही वेळा या प्रक्रियेदरम्यान पेशी पूर्णपणे वेगळ्या होत नाहीत. हे विभाजन अर्धवट राहिल्यामुळे 2 तोंडाचे किंवा 2 डोक्यांचे प्राणी जन्माला येतात. विज्ञानाच्या भाषेत या स्थितीला 'डायसेफेलिक हेड' म्हणतात."

पेशींचं विभाजन नीट न झाल्यास शरीरात इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दोष किंवा विसंगती निर्माण होऊ शकतात.

ते पुढे म्हणतात, "पेशींची विभागणी अर्धवट राहिल्याने काही वेळा जनावरांची शरीरं पोटाजवळ एकमेकांना जोडलेली राहतात. तर कधी त्यांचं डोकं विचित्र आणि खूपच मोठं होतं. जनुकीय स्तरावर गुणसूत्रांच्या विभागणीत बिघाड झाल्याने असं घडतं. पण यामागे कोणता एक विशिष्ट जीन कारणीभूत असल्याचं आजवर तरी समोर आलेलं नाही."

नव्याने जन्मलेल्या या पिल्लाच्या जगण्याबद्दल पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात, "अशा अनेक घटनांमध्ये 2 तोंडं असलेली पिल्लं जन्मानंतर काही तासांतच किंवा थोड्याच वेळातच दगावतात. अपवादाने एखादं पिल्लू जगलंच, तरी त्याची शारीरिक वाढ अपूर्ण राहते आणि त्याला सामान्य आयुष्य जगता येत नाही."

रेडक्याच्या मालकाने काय सांगितलं?

दोन तोंडाच्या या रेडक्याचे मालक चंदाजी बाबूजी ठाकोर
फोटो कॅप्शन, दोन तोंडाच्या या रेडक्याचे मालक चंदाजी बाबूजी ठाकोर

पशुपालक आणि दोन डोकं असलेल्या या रेडक्याचे मालक चंदाजी बाबूजी ठाकोर यांनी 'बीबीसी गुजराती'चे प्रतिनिधी परेश पधियार यांच्याशी बोलताना सांगितलं, "आमच्या म्हशीने एका रेडक्याला जन्म दिला आहे."

अभिमानाने आणि आश्चर्याने ते म्हणाले, "या पिल्लाचा जन्म अगदी नॉर्मल पद्धतीनेच झाला होता. पण समोर पाहिलं हे नेमकं काय याचा धक्काच बसला! याचं शरीर तर एकच आहे पण याला दोन तोंडं आहेत."

चंदाजी ठाकोर यांनी पुढे सांगितलं, "अशा अजब गोष्टींबद्दल आम्ही याआधी फक्त इतरांकडून ऐकलं होतं. पण जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहिलं, तेव्हा आम्हाला नवल वाटलं."

"ही बातमी सगळीकडे पसरल्यामुळे आजूबाजूच्या गावांतीलच नाही, तर खेरालू, विसनगर आणि पालनपूर अशा लांबच्या ठिकाणांहूनही बरेच लोक हे पिल्लू बघायला आमच्या घरी येत आहेत," असं त्यांनी सांगितलं.

"असं काही घडू शकतं यावर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसणं कठीण आहे. माझ्या मते तर हा निसर्गाचाच एक चमत्कार आहे, जो आमच्या घरी घडलाय. इतके लोक आमच्या घरी येताना बघून आम्हालाही नवल वाटतंय," असंही चंदाजी ठाकोर नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)