दहा वर्षापासून करत होता रेल्वेत चोरी; एका एअरपॉडमुळं चोर असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

फोटो स्रोत, DADAR RAILWAY POLICE
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती वापरत असतात. मात्र, कधी कधी गुन्हेगारानं चोरलेली वस्तूच त्याला पकडण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरते.
तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबई पोलिसांनी अशाच एका गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
जवळपास दहा वर्षांपासून लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या झोपलेल्या प्रवाशांच्या बॅग, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरणारा एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.
मुंबईच्या एका महिलेची बॅग रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेली होती. पोलीस तपासादरम्यान त्या बॅगेतील एअरपॉड्सच्या लोकेशनमुळे पोलिसांना त्याचा शोध घेता आला.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी थेट आरोपीचं लोकेशन गाठलं. सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या शमशेर फहीम खान (32) याला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या तपासानुसार, शमशेरनं किमान दहा वर्षांपासून रेल्वे प्रवाशांच्या सामानाची चोरी केली असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्याच्या नावावर विविध राज्यात 32 हून अधिक एफआयआर नोंद आहेत.
नेमकं हे प्रकरण काय आहे? एअरपॉड्सच्या लोकेशनमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत कसं पोहोचता आलं? आणि गेल्या दहा वर्षांपासून तो रेल्वे प्रवाशांना कशा प्रकारे लक्ष्य करत होता? हे जाणून घेऊयात.
नेमकी चोरी कशी झाली?
या प्रकरणाची सुरुवात झाली ती 12 नोव्हेंबरला दादर रेल्वे पोलिसांकडे दाखल झालेल्या एका चोरीच्या तक्रारीपासून.
भोपाळच्या रहिवाशी असलेल्या एक 27 वर्षीय महिला दिवाळी साजरी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या मुंबईत एका खासगी कंपनीत काम करतात. पंजाब मेल रेल्वेने भोपाळहून मुंबईला परतताना त्यांची बॅग चोरीला गेली.
त्या रेल्वेच्या एसी टू-टियर डब्यातून प्रवास करत होत्या. त्यांनी बॅग डोक्याजवळ ठेवली होती. मात्र झोपलेल्या असताना त्यांची बॅग कोणीतरी चोरून नेली.
सकाळी बॅग चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी कल्याणमध्ये रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली.
या बॅगेत Dell कंपनीचा 82 हजार 600 रुपयांचा लॅपटॉप, 16 हजार 110 रुपयांचे Apple AirPod आणि 27 हजार रुपयांचे दुसऱ्या एका कंपनीचे हेडफोन आणि काही रक्कम होती.
महिलेने सुरुवातीला कल्याण रेल्वे पोलिसांकडे चोरीची तक्रार दिली होती. मात्र, ही घटना दादर रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळं प्रकरण दादर GRP कडे वर्ग करण्यात आलं.
एअरपॉड्सच्या लोकेशनमुळे लागला सुगावा
दादर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी 771/2016 कलम 305 (c) आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला.
दादर जीआरपी पोलिसांनी महिलेकडून सगळी माहिती घेतल्यानंतर विविध अंगाने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

फोटो स्रोत, Getty Images
बॅगेमध्ये काय होतं याची चौकशी करून पोलिसांनी ते तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधता येईल का याचा अंदाज घेतला.
चोरीचा तपास करताना दादर रेल्वे पोलिसांच्या सायबर क्राइम टीमनं चोरी गेलेल्या एअरपॉड्सच्या लोकेशनचा माग काढण्याचा निर्णय घेतला.
या तपासासाठी यासाठी दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम, पो.निरीक्षक प्रकाश होवाळ आणि सायबर टीम पो.हवालदार लक्ष्मण हटकर सुनिल चव्हाण , गणेश जगदाळे, पोलीस शिपाई विशाल राठोड आणि अतुल काकड यांच्या टीमने तपास सुरू केला.
यासाठी सायबर पोलिसांनी सुरुवातीला महिलेच्या मोबाईलशी जोडलेल्या एअरपॉड्सचं लोकेशन तपासलं. हे एअरपॉड्स सक्रिय असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांचं लोकेशन गुजरातमधील वडोदराच्या छानी गावात दाखवत होतं.
पोलिसांनी या लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर हे एअरपॉड्स गुजरात मधील वडोदरा या एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी असल्याचं समोर आलं.
सुरक्षा रक्षक म्हणून करायचा काम
End of podcast promotion
पोलिसांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाशी संपर्क साधला. त्यावेळी दोन दिवसांपूर्वीच एक नवीन सुरक्षारक्षक तिथे रुजू झाल्याची माहिती मिळाली. हा व्यक्ती तुम्ही सांगत असलेली अशी एक बॅग ही घेऊन फिरत असल्याचंही पोलिसांना सांगण्यात आलं.
त्यानुसार दादर जीआरपी पोलीस त्या परिसरात आरोपीचा शोध घेण्यास पोहचले. मात्र तो त्यादिवशी कामावर आला नव्हता.
अखेर एअरपॉडवरच्या थेट लोकेशनवर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. संबंधित बांधकामाच्या ठिकाणापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आरोपीला पकडण्यात आलं. त्यानंतर मुंबईत त्याला रेल्वे कोर्टात हजर करण्यात आले.
शमशेर फहीम खान असं आरोपीचं नाव असल्याचं समोर आलं.
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांचं पथक आपल्यापर्यंत कसं पोहोचलं, याबाबत त्याने आश्चर्य व्यक्त केलं.
दादर जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने या गुन्ह्याची कबुली दिली, तसेच तो इथे कसा पोहोचला याबाबतही सांगितलं. इंटरनेटवर सुरक्षा एजन्सीचा शोध घेतल्यानंतर त्याला वडोदरा येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळाली, असं त्यानं सांगितलं.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षकाची नोकरी करणं त्याला पसंत होतं. अशा ठिकाणी नोकरीच्या संधी, पगार आणि राहण्याची सोय उपलब्ध होते, असं त्यानं पोलिसांना सांगितलं.
दहा वर्षांपासून करायचा चोरी
शमशेर फहीम खान बिहारमधील भोजपूरचा रहिवासी आहे. तो रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तो लक्ष्य करायचा, अशी माहिती पोलिसांना चौकशीत मिळाली.
विशेषतः एसी टू-टियर आणि थ्री-टियर डब्यांमध्ये रात्री प्रवासी झोपल्यानंतर त्यांच्या बॅगा आणि मोबाईल फोन चोरण्याची त्याची पद्धत होती.
प्रवाशांच्या डोक्याजवळ किंवा सीटजवळ ठेवलेल्या सामानावर तो हात साफ करायचा. त्यानंतर चोरी केलेल्या सामानासह दुसऱ्या ट्रेनमध्ये चढून पसार व्हायचा.
पोलिसांच्या तपासानुसार, जनरल तिकीट काढून नियमित प्रवाशाप्रमाणे ट्रेनमध्ये प्रवास करायचा.
अटकेनंतर झालेल्या चौकशीत त्यानं, किमान दहा वर्षांपासून चोरी करत असल्याची माहिती दिली.
इतर चोरीच्या घटनांचीही माहिती
पोलिसांच्या चौकशीदरम्यान शमशेरनं आणखी दोन चोरीच्या घटनांची माहिती दिली आहे.
दादर येथील एका एसी टू-टियर डब्यातून मोबाईल फोन आणि चार्जर चोरल्याचं त्यानं सांगितलं. तसंच पुणे-पनवेल मार्गावरील लोकलमधून लॅपटॉप चोरल्याची माहितीही त्याने दिली.
आजवर अनेक चोरीच्या घटना विविध राज्यात केल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्याच्यावर 32 पेक्षा अधिक गुन्हे विविध राज्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, खानला यापूर्वीही अटक झाली होती. गेल्यावर्षी त्याला झांशी येथील एका चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. यावर्षी मार्च महिन्यामध्ये त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा चोरी सुरू केल्याचा आरोप आहे.
त्याने बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पश्चिम बंगालमध्ये या आरोपीवर दोन गुन्हे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तीन , बिहार तीन, रांचीमध्ये चार असे विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे.
या प्रकरणांमध्ये तो अटक झाल्यानंतर नियमानुसार जी शिक्षा आहे, ती पूर्ण करून पुन्हा अशा प्रकारे कृत्य करतो असंही पोलिसांनी सांगितलं.
तंत्रज्ञानामुळे गुन्ह्याचा उलगडा
या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एअरपॉड्सच्या लोकेशन ट्रॅकिंग सुविधेमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आलं.

फोटो स्रोत, Getty Images
एखादी वस्तू चोरीला गेल्यानंतर तिचं लोकेशन शोधण्याची सुविधा उपलब्ध असल्यास तपासात मदत होऊ शकते, हे या प्रकरणातून समोर आलं आहे.
मात्र, या प्रकरणात आरोपीने चोरी केलेली वस्तूच त्याच्यापर्यंत पोलिसांना घेऊन गेली.
दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम या प्रकरणाबाबत म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे गुन्ह्याचा उलगडा आमच्या टीमने केला आणि आरोपीला पकडले आहे. आरोपीने पकडल्यानंतर सर्व गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या अनुषंगाने आम्ही आरोपीला रेल्वे कोर्टात हजर केलं, सध्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवस आरोपी आहे. या प्रकरणाबरोबरच इतर गुन्ह्याबाबत देखील आरोपीने कबुली दली आहे. या आरोपी बाबत अधिक तपास सुरू आहे.
आरोपी समशेर याची बाजू जाणून घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला. मात्र तो न्यायालयीन कोठडीत त्याची थेट बाजू कळू शकली नाही. कोर्टात त्याच्यावतीने वकील संदीप पाटील उपस्थित झाले होते. त्यांनी अशिलावर होणारे आरोप फेटाळले आणि पोलीस कोठडी देण्याला विरोध केला होता. पुढील तारखेस योग्य भूमिका आम्ही मांडू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






























