विधवांची काळ्या पाण्याची शिक्षा टाळण्यासाठी महात्मा फुलेंनी काय उपाय शोधला होता?

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले
    • Author, रामदास भोंग
    • Role, इतिहास अभ्यासक व संशोधक
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

आज आपण महात्मा जोतिराव फुले (1827–1890) यांना सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, शिक्षणाचे प्रणेते, जातिव्यवस्थेचे कठोर टीकाकार, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, उद्योजक, लेखक आणि संपादक अशा विविध भूमिकांमधून ओळखतो.

मात्र, स्त्रियांच्या विशेषतः विधवा महिलांच्या मुक्तीसाठी त्यांनी केलेले कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे.

या कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी स्थापन केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह.

या गृहामुळे अनेक असहाय्य महिलांना सामाजिक छळ, अनिच्छित गर्भधारणा आणि त्यातून उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांपासून संरक्षण मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला.

ब्रिटिशकालीन काळ्या पाण्याची शिक्षा

काळे पाणी म्हणजे भारतीय कैद्यांना समुद्र ओलांडून अंदमान-निकोबार बेटांवर पाठवून जन्मठेप किंवा दीर्घकाळ कारावासाची शिक्षा भोगायला लावणे. त्या काळात समुद्र ओलांडणे म्हणजे जात, कुटुंब आणि आपल्या समाजाशी असलेले संबंध गमावणे, अशी धारणा होती. त्यामुळे या शिक्षेला 'काळे पाणी' असे म्हटले जाई.

1857 च्या उठावानंतर पोर्ट ब्लेअर येथे ब्रिटिशांनी दंडवसाहत सुरू केली. या वसाहतीत कैद्यांना अत्यंत अमानुष परिस्थितीत राहावे लागायचे.

तेलघाणीतून दररोज सुमारे 30 पौंड तेल काढण्याची सक्ती, नारळाच्या काथ्या कुटणे, चाबकाचे फटके, बेड्या, हातकड्या घालून उभे ठेवणे, एकांतवास आणि जंगलतोड अशा कठोर शिक्षांचा त्यांना सामना करावा लागत होता.

दंडवसाहत सुरू झाल्यानंतर 1860 च्या सुमारास महिला कैद्यांनाही अंदमानला पाठवले जाऊ लागले. यातील बहुतेक महिला सामान्य गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या होत्या.

खून (अनेकदा पती किंवा सासरच्या व्यक्तींचा), अर्भकहत्या, व्यभिचाराशी संबंधित गुन्हे, चोरी आणि दरोडा हे त्यांच्यावरील प्रमुख आरोप होते. यातील अनेक प्रकरणांच्या मुळाशी कौटुंबिक अत्याचार आणि सामाजिक दबाव असल्याचे दिसून येते.

या महिला कैद्यांना सेल्युलर जेलमध्ये न ठेवता स्वतंत्र महिला बराकींमध्ये ठेवले जात असे. त्यांच्याकडून शिवणकाम, धुणीभांडी आणि इतर श्रम करून घेतले जात असत.

दंडवसाहत स्थिर करण्यासाठी पुरुष आणि महिला कैद्यांचे विवाह लावण्याचे धोरणही होते. अनेकदा हे विवाह महिलांच्या इच्छेविरुद्ध होत असत. महिला कैद्यांचे लैंगिक शोषण आणि त्यांच्यातील उच्च मृत्युदर यांचाही इतिहासकारांनी उल्लेख केला आहे.

अशा अमानुष परिस्थितीत महिलांना अंदमानला जाण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांना सामाजिक संरक्षण मिळवून देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी पुण्यात 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

आम्ही पाहिलेले फुले
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या गृहाची गरज का निर्माण झाली, हे समजून घेण्यासाठी त्या काळातील पुण्यासह संपूर्ण भारतातील महिलांची, विशेषतः विधवा स्त्रियांची परिस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

त्या काळात स्त्रियांची सामाजिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांना सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय स्वातंत्र्य नव्हते.

राजघराण्यांतील काही स्त्रियांचा अपवाद वगळता, बहुसंख्य महिलांना शिक्षणाचा अधिकारही नव्हता. बालविवाह आणि जरठ-कुमारी विवाह यांसारख्या प्रथांमुळे अनेक मुली अगदी लहान वयातच विधवा होत होते. विधवा झाल्यानंतर त्यांना नरकापेक्षाही हीन जीवन जगावे लागत असे.

या परिस्थितीतून महिलांची मुक्तता करण्यासाठी महात्मा फुले यांनी विधवांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले. तत्कालीन काळातील अनेक नोंदींमधून त्यांच्या या कार्याची माहिती मिळते.

विशेषतः पंढरीनाथ पाटील यांनी महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्यापूर्वी त्यांचे समकालीन आणि सहकारी यांच्याकडून मिळवलेली माहिती महत्त्वाची आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या 'महात्मा फुले समग्र वाङ्मय' या ग्रंथातूनही त्यांच्या विधवा महिलांच्या मुक्तीसाठी केलेल्या कार्याविषयी अनेक महत्त्वपूर्ण नोंदी मिळतात.

19 व्या शतकात विधवा स्त्रियांची स्थिती

भारतात ब्रिटिशांचे शासन स्थापन झाल्यानंतर काही सामाजिक सुधारणांच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी विविध कायदेही करण्यात आले.

यामध्ये 1856 मध्ये संमत झालेला विधवा पुनर्विवाह कायदा महत्त्वाचा होता. मात्र, कायदा झाल्यानंतरही विधवा महिलांच्या सामाजिक स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही.

बहुसंख्य समाजाला विधवा पुनर्विवाहाची कल्पना मान्य नव्हती. त्यामुळे बालविवाह आणि जरठ-कुमारी विवाह यांसारख्या प्रथा सुरूच होत्या.

यामध्ये जरठ-कुमारी विवाहाची प्रथा विशेषतः धोकादायक होती. या प्रथेत लहान वयातील मुलींचे लग्न त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने मोठ्या वयाच्या पुरुषांशी लावले जात असे.

मुलगी वयात येईपर्यंत अनेकदा त्या पुरुषाचे वृद्धापकाळाने निधन होत असे. परिणामी, कोणताही दोष नसताना त्या अल्पवयीन मुलीला वैधव्य स्वीकारावे लागे.

अशा परिस्थितीत काही वेळा तिच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जात असे. तर काही वेळा निसर्गनियमानुसार निर्माण होणाऱ्या शारीरिक इच्छांमधून त्यांची गर्भधारणाही होत असे.

मात्र, विधवा महिलेने गर्भवती होणे हा त्या काळातील समाजाच्या दृष्टीने मोठा अपराध मानला जात असे. गर्भधारणा झाल्यानंतर या महिलांसमोर आत्महत्या करणे किंवा गर्भपात करणे याशिवाय दुसरा पर्याय उरत नसे. काही वेळा नवजात बालकांची हत्या करण्यासारख्या टोकाच्या घटनाही घडत असत.

अशा महिलांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना जगण्याची संधी मिळावी यासाठी महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.

काळ्या पाण्याच्या शिक्षेपासून मुक्ती

महात्मा फुले यांना बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करण्याची गरज का वाटली, याविषयीची महत्त्वाची माहिती बेहरामजी मेरवानजी मलबारी या समाजसुधारकांच्या एका उपक्रमातून मिळते.

मलबारी यांनी बालविवाह आणि लादलेले वैधव्य या विषयांवर दोन टिपणे मे-जून 1884 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांच्याकडे पाठवली होती.

11 नोव्हेंबर 1884 रोजी ही टिपणे काही नामवंत समाजसुधारकांकडे त्यांची मते जाणून घेण्यासाठी पाठवण्यात आली. त्यावर आपले मत व्यक्त करताना महात्मा जोतिराव फुले यांनी विधवा महिलांच्या दुर्दशेचे वर्णन केले.

मलबारी यांनी बालविवाह आणि लादलेले वैधव्य या विषयांवर दोन टिपणे मे-जून 1884 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांच्याकडे पाठवली होती.
फोटो कॅप्शन, मलबारी यांनी बालविवाह आणि लादलेले वैधव्य या विषयांवर दोन टिपणे मे-जून 1884 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांच्याकडे पाठवली होती.

यावेळी त्यांनी आपले मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या काशीबाई या ब्राह्मण बालविधवेची कहाणी सांगितली.

काशीबाईने नवजात बालकाची हत्या केल्याच्या आरोपावरून सत्र न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणूनही संबोधले जात असे.

काशीबाईच्या या प्रसंगाने महात्मा फुले व्यथित झाले. विधवा महिलांनी समाजाच्या भीतीपोटी आपल्या मुलांची हत्या करू नये, तर नवजात बालकांना आपल्या स्वाधीन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या घटनेतूनच बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करण्याची गरज अधिक प्रकर्षाने त्यांच्या लक्षात आली.

बालहत्या प्रतिबंधक गृहाचा प्रचार

गोवंडे यांच्या घरी घडलेल्या काशीबाईच्या प्रसंगानंतर महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात स्वखर्चाने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या कार्यात सावित्रीबाई फुले यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. किंबहुना, या गृहाचे संपूर्ण कामकाज सावित्रीबाई फुले यांनीच सांभाळले.

या गृहाची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावी, यासाठी फुले दाम्पत्याने विशेष प्रयत्न केले. पुण्यासह मुंबई, नाशिक, पंढरपूर, वाई, काशी अशा अनेक ठिकाणी या गृहाच्या जाहिराती लावण्यात आल्या.

याविषयी महात्मा फुले यांच्या पुतणी ठकुबाई यांचा मोठा मुलगा महादू सहादू वाघोले यांनी आपल्या आठवणींमध्ये महत्त्वाची नोंद केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनाथ बालकाश्रमाच्या मोठ्या अक्षरांतील जाहिराती जोतिरावांनी छापल्या होत्या. त्यांपैकी काही जाहिराती बरेच दिवस त्यांच्याकडे होत्या.

या जाहिरातींवरील मजकुरात 'काळे पाणी टाळण्याचा उपाय' असे शीर्षक होते. त्याखाली पुढील आवाहन करण्यात आले होते :

"ज्या बायांचे आडमार्गाने पाऊल पडून गर्भ राहिले आहेत त्यांनी जोतिराव गोविंदराव फुले यांचे घरी येऊन बाळंत होऊन जावे. बाळंतनीचे नाव गुप्त राखण्यात येईल."

या जाहिरातीतील 'काळे पाणी टाळण्याचा उपाय' हे शीर्षक विशेष अर्थपूर्ण आहे. ज्या सामाजिक परिस्थितीमुळे काशीबाईसारख्या महिलांना आपल्या नवजात बालकांची हत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत होते आणि त्यानंतर त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेला सामोरे जावे लागत होते, त्या परिस्थितीतून महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी या गृहाच्या माध्यमातून केला.

जाहिरात

विधवा महिलांना सुरक्षितपणे बाळंत होण्याची संधी देणे, त्यांच्या मुलांना जगण्याचा अधिकार मिळवून देणे आणि त्यांची ओळख गुप्त ठेवणे, या माध्यमातून फुले यांनी त्या काळातील सामाजिक व्यवस्थेला थेट आव्हान दिले.

त्यामुळे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ही केवळ अनाथ मुलांच्या संगोपनापुरती मर्यादित नव्हती, तर ती विधवा महिलांना सामाजिक अन्यायातून बाहेर काढण्याची एक महत्त्वाची चळवळ होती.

या अनाथ बालकाश्रमात एकूण 35 मुले होती. यातील काही मुले 10 ते 12 वर्षांपर्यंत जगली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद वाघोले यांनी केली आहे. यामध्ये शांताराम बाबुराव, लक्ष्मीबाई आणि यशवंत यांचा उल्लेख आढळतो. या मुलांपैकी यशवंत हेच जिवंत राहिले, असेही वाघोले यांनी नमूद केले आहे.

यशवंतराव यांच्या आईविषयी महात्मा फुले यांचे सहकारी आणि त्यांचे सासरे ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांनीही आपल्या नोंदींमध्ये माहिती दिली आहे. त्यांच्या नोंदीनुसार, "यशवंतची आई काशीबाई ही कल्याण भिवंडीकडील एका ब्राह्मण मामलेदाराची बहीण होती. तिचे बाळंतपण या अनाथ बालकाश्रमात झाले."

या नोंदीमुळे यशवंतराव यांची आई काशीबाई आणि सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या घरी घरकाम करणारी काशीबाई या दोन वेगवेगळ्या महिला असल्याचे स्पष्ट होते.

बालकाश्रमाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची नोंद तुकाराम हनुमंत पिंजर यांनी केली आहे. ते देवराम ठोसर यांचे जावई आणि महात्मा फुले यांचे शेजारी होते. त्यांनी आपल्या नोंदीत म्हटले आहे की, "ब्राह्मणात पुनर्विवाहाची चाल महात्मा फुले यांच्यापासून सुरू झाली."

पुढे ते एका चार-पाच वर्षांच्या शांताराम नावाच्या मुलाचाही उल्लेख करतात. हा मुलगा ब्राह्मण विधवेपासून जन्माला आला होता आणि महात्मा फुले यांच्याकडे राहत होता. या नोंदींवरून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी यशवंतरावांप्रमाणेच इतर मुलांचीही स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतल्याचे दिसून येते.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याप्रती कृतज्ञता

महात्मा फुले यांच्या या कार्यातून पुढे अनेकांनी प्रेरणा घेतली. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याच्या नोंदीही उपलब्ध आहेत. याविषयी महात्मा फुले यांचे सहकारी तुकाराम हनुमंत पिंजर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

त्यांच्या नोंदीनुसार, महात्मा फुले यांच्या प्रेरणेने मुंबईतील लालशंकर उमाशंकर याज्ञिक यांनी पंढरपूर येथे अनाथाश्रम (सूतिका गृह) सुरू केले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंना लुगडे आणि जरीच्या काठीचा खण, तसेच मुलांना कपडे भेट दिले.

याच बालहत्या प्रतिबंधक गृहात जन्मलेल्या यशवंतराव यांना पुढे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतले. यशवंतराव पुढे फौजेत डॉक्टर म्हणून मोठ्या हुद्द्यावर कार्यरत झाले. नोकरीच्या निमित्ताने ते चीन आणि काबूल येथेही गेले.

पुढे पुण्यात प्लेगची साथ पसरली तेव्हा ते पुन्हा पुण्यात परतले. या काळात त्यांनी आणि सावित्रीबाईंनी प्लेगग्रस्त जनतेची मोठी सेवा केली.

यशवंतराव यांच्याविषयी महात्मा जोतिराव फुले यांचे लेखनिक गोविंद गणपत काळे यांनीही एक महत्त्वाची आठवण नोंदवली आहे. त्यांच्या नोंदीनुसार, एकदा यशवंतरावांनी कोल्हापूरचे तरुण महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर पुण्यातील त्यांच्या बंगल्यात सामाजिक विषयावर एक निबंध वाचला होता.

हा निबंध महाराजांना इतका आवडला की त्यांनी यशवंतरावांना आपल्या पदरी नोकरी करण्याचा आग्रह केला. मात्र, यशवंतरावांनी तो आग्रह स्वीकारला नाही.

महात्मा फुले यांचे स्त्रियांसाठीचे कार्य केवळ बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या स्थापनेपुरते किंवा महिलांना काळ्या पाण्याच्या शिक्षेपासून वाचवण्यापुरते मर्यादित नव्हते. त्या काळातील सामाजिक व्यवस्थेमुळे महिलांना ज्या अमानुष परिस्थितीला सामोरे जावे लागत होते, त्यातून त्यांची सुटका करण्याचा व्यापक प्रयत्न या कार्यातून झाला.

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले
फोटो कॅप्शन, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले

आतापर्यंत काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे प्रामुख्याने राजकीय किंवा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या पुरुषांना दिली जाणारी शिक्षा, अशीच सर्वसाधारण समजूत होती.

मात्र, ब्रिटिशकालीन दंडवसाहतींमध्ये महिला कैद्यांनाही पाठवले जात होते, ही बाब या इतिहासातून समोर येते. महात्मा फुले यांच्या कार्याकडे या व्यापक सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भातून पाहणे आवश्यक आहे.

महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या मुक्तीसाठी सुरू केलेले कार्य पुढे राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानाच्या माध्यमातून पुढे नेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्त्रियांना समानतेचे आणि अधिकारांचे कायदेशीर संरक्षण मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे योगदान दिले.

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या माध्यमातून विधवा आणि असहाय्य महिलांना दिलेला आधार हा भारतीय सामाजिक सुधारणांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे.

सामाजिक बंधने, जातीय उतरंड आणि स्त्रियांवरील अन्याय यांना आव्हान देत त्यांनी महिलांना जगण्याचा आणि त्यांच्या मुलांना जन्म घेण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेले कार्य आजही महत्त्वाचे ठरते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.