भारत-अमेरिका व्यापार करार : ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफमुळे असं बदलणार गणित, तज्ज्ञांची माहिती

Caption- भारतासोबत व्यापार करार झाला तर टॅरिफ कमी करून 17 टक्के केला जाईल, असं नवीन टॅरिफच्या प्रस्तावात म्हटलं आहे.
फोटो कॅप्शन, भारतासोबत व्यापार करार झाला तर टॅरिफ कमी करून 17 टक्के केला जाईल, असं नवीन टॅरिफच्या प्रस्तावात म्हटलं आहे.
Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर नवीन टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टॅरिफ वॉर सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.

उत्पादन गरजेपेक्षा जास्त होत असल्याच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (यूएसटीआर) कलम 301 अंतर्गत चौकशी केली. या चौकशीनंतर टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

अमेरिकेने भारताच्या प्रमुख उत्पादन योजनांनाही लक्ष्य केलं आहे. या प्रस्तावानुसार, भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवर 25 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावला जाण्याची शक्यता आहे.

परंतु, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाल्यास हा टॅरिफ कमी करून 17 टक्के करण्याचाही प्रस्ताव आहे. दरम्यान, भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अमेरिकेच्या चौकशीत करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे, की या नोटिशीचा सध्या विचार सुरू आहे. चौकशी सुरू करण्याच्या नोटिशीला उत्तर देताना आणि त्यानंतर झालेल्या चर्चेतही भारताच्या वाणिज्य विभागाने स्पष्ट केलं होतं की, भारतातील कोणत्याही क्षेत्रात गरजेपेक्षा जास्त उत्पादन करण्याची क्षमता नाही.

मंत्रालयाने म्हटलं आहे की, भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. व्यापाराबाबतचे कोणतेही प्रश्न या चर्चेतूनच सोडवले पाहिजेत, अशी भारताची भूमिका आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, भारत-अमेरिका व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी भारत सरकार अमेरिकेसोबत काम करण्यास कटिबद्ध आहे.

यूएसटीआरने म्हटलं आहे की, भारताच्या उत्पादन योजनांमुळे देशातील उद्योगांची क्षमता वाढली आहे. परंतु, अमेरिकेनं या वाढीला 'अनुचित' ठरवले असून, त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होत असल्याचा दावा केला आहे.

यूएसटीआरने भारतावर मुख्यतः 5 आरोप केले आहेत.

1. उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजना.

2. कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष.

3. आर्थिक क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप.

4. भारतीय बाजारपेठेत प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी.

5. जागतिक स्तरावर गरजेपेक्षा जास्त उत्पादन होत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश.

भारतीय उद्योगांवर काय परिणाम होणार?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेने नवीन टॅरिफची घोषणा केल्यानंतर फिक्की-सीएमएसएमईच्या अध्यक्षा हरजिंदर कौर तलवार यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, हा निर्णय भारतीय उद्योगांसाठी चिंतेचा विषय आहे.

हरजिंदर कौर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "भारत आणि अमेरिका हे महत्त्वाचे धोरणात्मक आणि व्यावसायिक भागीदार आहेत. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. भारताला अमेरिकेसोबत व्यापार करार हवा आहे, पण तो कोणत्याही किंमतीवर किंवा अटीवर नको.

दोन्ही देशांसाठी योग्य आणि न्याय्य करार व्हावा, अशी भारताची इच्छा आहे. 25 टक्के टॅरिफमुळे भारतातील लहान आणि मध्यम उद्योगांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतील. कारण हे उद्योग आधीच खूप कमी नफ्यावर काम करतात."

"अमेरिकेसोबत व्यापार करार झाला तर आम्ही त्याचे स्वागतच करू. पण, हा करार दोन्ही देशांसाठी योग्य आणि न्याय्य अटींवर आधारित असावा. फिक्की-सीएमएसएमईच्या अध्यक्ष म्हणून भारतातील लहान आणि मध्यम उद्योग तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगातील इतर देशांशी स्पर्धा करू शकतील, यासाठीही मी प्रयत्न करेन. त्यामुळे त्यांना इतर देशांसोबतही व्यापार करता येईल."

Caption- व्यापारी संघटनांच्या मते, टॅरिफचे नवीन प्रस्ताव लहान आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) मोठ्या अडचणीचे ठरू शकतात.
फोटो कॅप्शन, व्यापारी संघटनांच्या मते, टॅरिफचे नवीन प्रस्ताव लहान आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) मोठ्या अडचणीचे ठरू शकतात.

भारत व्यापार कराराचे स्वागत करतो, पण तो फक्त योग्य आणि न्याय्य अटींवरच झाला पाहिजे. 25 टक्के टॅरिफसह हा करार निश्चितपणे होऊ शकत नाही. भारतातील लहान आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) हा टॅरिफ सहन करू शकणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं

'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने (जीटीआरआय) भारताला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. टॅरिफमध्ये बदल करण्याच्या बदल्यात भारताने अमेरिकेला एकतर्फी सवलती देऊ नयेत, असेही जीटीआरआयने म्हटले आहे.

जीटीआरआयच्या हवाल्याने वृत्तपत्राने म्हटलं आहे की, इतर देशांच्या औद्योगिक क्षेत्रांत गरजेपेक्षा जास्त उत्पादन होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी अमेरिका जे निकष वापरत आहे, त्यातील काही निकष अमेरिकेच्या शेती क्षेत्राला लावले, तर तिथेही अनेक कृषी उत्पादनांचे गरजेपेक्षा जास्त उत्पादन होत असल्याचे दिसून येईल.

'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, केवळ टॅरिफ कमी होईल म्हणून व्यापार करार करू नये, असा सल्ला जीटीआरआयने भारत सरकारला दिला आहे. कारण, या नवीन टॅरिफचा हेतू हा अमेरिकेच्या व्यापारी भागीदार देशांकडून एकतर्फी सवलती मिळवणे हा आहे.

व्यापार कराराबाबत तज्ज्ञांचं मत काय?

इंजिनिअरिंग एक्सपोर्ट्स प्रमोशन काऊन्सिल (ईईपीसी) इंडियाचे अध्यक्ष पंकज चड्ढा यांनी कमी टॅरिफच्या प्रस्तावामुळे भारताला खरोखर फायदा होईल का, याबद्दल शंका व्यक्त केली आहे.

"माझ्या माहितीनुसार, भारताचे शेजारी देश बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड यांच्यावर साधारण 18 टक्के टॅरिफ आहे. या देशांवर 18 टक्के आणि व्यापार करारानंतर भारतावर 17 टक्के टॅरिफ असेल, तर त्यातून भारताला फार मोठा फायदा होईल, असं मला वाटत नाही. त्यामुळे केवळ एवढ्यासाठी व्यापार करार करावा का, याबाबत मला शंका आहे," असं त्यांनी एएनआयला म्हटलं.

"आताच याबाबत कोणताही निष्कर्ष काढणं किंवा निर्णय घेणं घाईचं ठरेल. कारण, हे टॅरिफ जानेवारीमध्ये लागू होणार आहेत. तसेच, भारतासोबतच इतर देशांशीही याबाबत चर्चा होणार आहे," असंही ते म्हणाले.

व्यापार कराराबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे?

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सीईओ आणि सरचिटणीस डॉ. रणजीत मेहता यांनीही नवीन टॅरिफ लगेच लागू होणार नाहीत, असं म्हटलं आहे.

"अमेरिकेसोबत व्यापार करार झाला नाही, तरच भारतावर 25 टक्के शुल्क लावले जाईल. पण, दोन्ही देशांमध्ये करार झाला, तर भारतावर 17 टक्के टॅरिफ आकारलं जाईल," असं त्यांनी सांगितलं.

"व्हिएतनाम, चीन आणि बांगलादेशसारख्या स्पर्धक देशांवर आपल्यापेक्षा जास्त टॅरिफ आहे. माझ्या मते, चर्चेदरम्यान दबाव आणण्यासाठी या टॅरिफचा वापर केला जात आहे."

डॉ. मेहता म्हणाले, "सध्या भारत मजबूत स्थितीतून व्यापार कराराबाबत चर्चा करेल. अमेरिका हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. त्यामुळे 17 टक्के टॅरिफचा फायदा मिळवण्यासाठी भारताने हा व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे."

"सध्या या व्यापार कराराबाबत चर्चा करून तो लवकरात लवकर पूर्ण करणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."

परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक रॉबिंदर सचदेव यांनी याबाबत म्हटलं की, "टॅरिफ लावण्याचा धोका अजूनही कायम आहे. कलम 301 अंतर्गत अशाच प्रकारचे आणखी 5 ते 6 धोके आहेत. त्याबाबत सध्या चौकशी सुरू आहे किंवा लवकरच ती सुरू होऊ शकते."

"यातील पहिली चौकशी जबरदस्तीने म्हणजे सक्तीने काम करून घेण्याच्या मुद्द्यावर होती. याच कारणामुळे भारतासह अनेक देशांवर 10 ते 12.5 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्यात आला आहे."

"दुसरी चौकशी अतिरिक्त उत्पादन आणि सरकारकडून स्थानिक उद्योगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाबाबत आहे. अशा अनुदानामुळं हे उद्योग अमेरिकन उत्पादनांच्या तुलनेत अधिक स्पर्धाक्षम बनतात."

त्यांच्या मते, "अतिरिक्त उत्पादन क्षमतेच्या मुद्द्यावरून लावलं जाणारं टॅरिफ हे भारत, चीन, जपान आणि युरोपीय संघावरही लागू होऊ शकतात. याव्यतिरिक्त, डिजिटल टॅक्स, सागरी व्यापार आणि तांदळाच्या उत्पादनांबाबतही टॅरिफ लावण्यावर चर्चा सुरू आहे. या मुद्द्यांवर चौकशीही केली जात आहे. अशा प्रकारे आणखी किमान 3 ते 4 मुद्दे असे आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे."

"भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार 99 टक्के पूर्ण झाला, असं कसं म्हणता येईल, हे मला समजत नाही. कारण, अमेरिकेच्या बाजूने या करारातील एक महत्त्वाचा मुद्दा अजूनही स्पष्ट नाही. याशिवाय, आणखी 3 ते 4 मुद्दे आहेत, ज्यावर अतिरिक्त टॅरिफ लावला जाऊ शकतो," असंही त्यांनी चिंता व्यक्त करत म्हटलं.

"जोपर्यंत हे टॅरिफ लावले जात राहतील किंवा या मुद्द्यांवर चौकशी सुरू असेल, तोपर्यंत संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार नाही. हे असं आहे की, आपण बीजगणिताचं समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, तर प्रत्यक्षात ती भूमितीची समस्या आहे. सध्या या कराराबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे," असं भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत वाणिज्य मंत्रालयातील परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक बिपिन मेनन यांनी सांगितलं.

भारतावर दबाव आणण्याची रणनीती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावले होते. आता मात्र व्यापार करारासाठी अमेरिकेने कमी टॅरिफचा पर्याय दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी भारतावर सर्वाधिक टॅरिफ लावले होते.

ज्येष्ठ पत्रकार सुहासिनी हैदर यांनी 'एक्स'वर लिहिले, "आधी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून दबाव आणण्यात आला. आता मात्र भारताच्या शेजारी देशांपेक्षा आणि निर्यातीत स्पर्धा करणाऱ्या देशांपेक्षा 1 टक्का कमी टॅरिफ लावण्याची ऑफर अमेरिका देत आहे. परंतु, यासाठी भारताला मुक्त व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी करावी लागेल. हा करार केला नाही, तर भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली जात आहे."

भारताने आता हा व्यापार करार स्वीकारावा का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Caption- मनिला येथे झालेल्या क्वाड शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, पंतप्रधान मोदी, जपानच्या पंतप्रधान ताकाइची आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज हेही सहभागी झाले होते.
फोटो कॅप्शन, मनिला येथे झालेल्या क्वाड शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, पंतप्रधान मोदी, जपानच्या पंतप्रधान ताकाइची आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज हेही सहभागी झाले होते.

भारताचे माजी वरिष्ठ मुत्सद्दी अशोक सज्जनहार यांनी म्हटलं "अमेरिकेबाबत आता अनिश्चितता आणि कधीही बदलू शकणारे निर्णय हीच तिची ओळख बनली आहे. त्यामुळे व्यापार करार झाला किंवा नाही झाला, तरी त्याला फारसा अर्थ उरत नाही. ज्या 16 देशांचा उल्लेख केला जात आहे, त्यात जपान आणि युरोपसारख्या आणखी काही देशांचाही समावेश आहे. या देशांचे अमेरिकेसोबत आधीपासूनच व्यापार करार झालेले आहेत."

"अमेरिका सरकार कोणताही निर्णय घेऊ शकते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल. त्यामुळेच भारत आपले पर्याय वाढवत आहे आणि धोका किंवा जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हा बदल आता स्पष्टपणे दिसून येत आहे."

मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांमुळे केवळ ज्या देशांवर टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव आहे, तेच देश अस्वस्थ नाहीत, तर अमेरिकेतही अशीच अस्वस्थता आहे.

नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर चक शूमर यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधल आहे.

त्यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवर लिहिलं, "डोनाल्ड ट्रम्प कधीच धडा शिकत नाहीत. खरी समस्या चीनमुळे निर्माण झाली आहे. पण त्यावर उपाय करण्याऐवजी ते चीनला अटी ठरवू देत आहेत. त्याच वेळी ते अमेरिकेच्या मित्रदेशांनाही दूर करत आहेत. याचा आर्थिक भार अमेरिकेतील कुटुंबांवर पडत आहे. त्यांच्या या धोरणाचा अमेरिकेतील कामगारांना फारसा फायदा होणार नाही."

त्यांनी पुढे लिहिलं, "जानेवारीमध्ये बदल होणार आहे."

वास्तविक, त्यांचा रोख मध्यावधी निवडणुकीनंतर अमेरिकेच्या सिनेट आणि प्रतिनिधीगृहातील बदललेल्या संख्याबळाकडे होता. या निवडणुकीतील विजयानंतर दोन्ही सभागृहांत ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असणार आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.