मोहम्मद सिराज दुसऱ्या कसोटीतही संघाबाहेर, माजी क्रिकेटपटू, अभ्यासक काय म्हणाले?

मोहम्मद सिराज दुसऱ्या कसोटीतही संघाबाहेर, माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ काय म्हणाले?
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पहिल्या कसोटीत अंतिम 11 मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघात मिळालं नव्हतं. त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

दुसऱ्या कसोटीतही त्याचा समावेश करण्याची मागणी झाली. पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही मोहम्मद सिराज संघाबाहेरच ठेवण्यात आलं आहे.

मालिकेतल्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या डावात संधी असूनही न्यूझीलंडला सर्वबाद करण्यात अपयश आलं होतं. पाहुण्या संघाने भारतीय गोलंदाजीचा खंबीरपणे सामना केला आणि सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

त्यानंतर सिराजला संघात स्थान मिळण्याची आशा होती. पण आता त्याला सलग दुसऱ्या कसोटीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयावर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या वर्षी ओव्हलवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सिराजनं उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्यामुळं भारताला सहा धावांनी अविश्वसनीय विजय मिळवता आला होता. त्या सामन्यानंतर सिराजनं सात कसोटी सामन्यांमध्ये 21 बळी घेतले.

न्यूझीलंडविरोधातील सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठीच्या संघात सिराजचाही समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतर संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

आता दुसऱ्या कसोटीसाठी भारताने संघात केवळ एक बदल केला आहे. गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला वगळण्यात आलं असून त्याच्या जागी गुरनूर ब्रारला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

या कसोटीतून एखाद्या गोलंदाजाला वगळल्यास सिराजला संघात स्थान मिळेल, असं चाहत्यांना वाटत होतं. पण तसं झालेलं नाही.

सिराजला वगळण्याबद्दल माजी क्रिकेटपटू काय म्हणाले?

भारताच्या माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञांनी संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक असलेल्या मोहम्मद कैफनंही सिराजला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यानं लिहिलं की, "भारताच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मोहम्मद सिराजला पुन्हा संघातून वगळण्यात आलं आहे, यावर विश्वास बसत नाही."

"परदेशात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजी आक्रमणात जसप्रीत बुमराहबरोबर सिराजचं नावही आघाडीवर असलं पाहिजे. विशेष म्हणजे, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी स्वतः सिराजला जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हटलं होतं. तसंच सिराज चांगली गोलंदाजी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं."

मोहम्मद सिराज दुसऱ्या कसोटीतही संघाबाहेर, माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ काय म्हणाले?
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. सिराज आता भारताचा सहाव्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याला संघातून वगळणे योग्य वाटत नाही, असं ते म्हणाले.

"जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या हंगामातील कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक बळी घेणाऱ्या पाच गोलंदाजांपैकी भारतीय संघात सध्या फक्त बुमराहला संधी मिळाली आहे. त्याला गोलंदाजीसाठी सामन्यात चांगली परिस्थिती मिळेल अशी आशा आहे. पण जेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा त्याला त्यासाठी फार वेळ मिळणार नाही, हेही त्याला माहिती असेल," असंही भोगले यांनी म्हटलं.

सिराजला पहिल्या कसोटीत संघात स्थान न दिल्याबद्दलही भोगले यांनीही प्रश्न उपस्थित केले होते.

"भारताने सिराजला संघातून वगळले हे पाहून आश्चर्य आणि निराशा वाटली. संघासाठी त्याला दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं खूप चांगल्या प्रकारे पार पाडली. बुमराहच्या अनुपस्थितीत त्यानं गोलंदाजीचं नेतृत्व केलं असून तो एक सकारात्मक आणि उत्कृष्ट टीम प्लेयर आहे. कंबोजला शुभेच्छा दिल्या पाहिजेत, पण अशी आशा आहे की सिराज या निर्णयावर अत्यंत प्रामाणिकपणे चर्चा करेल," असं त्यांनी लिहिलं होतं.

गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला वगळण्यात आलं असून त्याच्या जागी गुरनूर ब्रारला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
फोटो कॅप्शन, गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला वगळण्यात आलं असून त्याच्या जागी गुरनूर ब्रारला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनीही पहिल्या कसोटीसाठी संघात सिराजचा समावेश न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं.

"जेव्हा तो कसोटी संघात लवकर सहभागी झाला नाही, तेव्हाच त्याचे संकेत मिळत होते. तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला, तेव्हा मला वाटले होते की ते त्याला कसोटीत खेळवतील. पण हे आश्चर्यकारक आहे. त्याने भारताला निराश केलं आहे, असं मला वाटत नाही. त्याने भारताला कधीच निराश केले नाही," असं ते एका वाहिनीच्या चर्चेदरम्यान म्हणाले होते.

गावस्कर काय म्हणाले?

शुक्रवारी गावस्कर यांनी यावेळच्या संघ निवडीवर पुन्हा एकदा आश्चर्य व्यक्त केले. सिराजसोबतच रवींद्र जडेजाला न खेळवण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

सिराज आणि जडेजा या दोघांनाही संघातून वगळणं हा एक कठीण निर्णय होता. त्यांनी जडेजाला वगळणं ही चूक असल्याचं म्हटलं.

विशेषतः सामना जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

"तुम्ही सिराजबद्दल बोलत आहात. पण जडेजाचं काय? तो 33 बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मला वाटतं, चौथ्या आणि पाचव्या दिवशी त्याची फिरकी गोलंदाजी खूप उपयुक्त ठरली असती, कारण तो चेंडू चांगला वळवतो. चेंडूला पकड मिळवून देण्यासाठी आणि वळवण्यासाठी तो ओळखला जातो. सपाट खेळपट्ट्यांवरही तो हे करू शकतो," असं गावस्कर यांनी सामना सुरू होण्यापूर्वी म्हटलं.

टीव्ही अँकर सुमंत रमण यांनीही 'X' वर सिराजला संघातून बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली.

"हा मोहम्मद सिराजवर अन्याय आहे. पहिल्या कसोटीच्या चौथ्या डावात न्यूझीलंडला जवळपास दोन दिवस बाद करू न शकलेल्या त्याच वेगवान गोलंदाजांची पुन्हा संघात निवड झाली आहे. संघात केवळ एकच बदल करण्यात आला आहे. हे आश्चर्यकारक आहे," असं त्यानं लिहिलं.

भारताचा माजी गोलंदाज मुनाफ पटेल यांनंही 'एक्स'वर या विषयावर पोस्ट केली.

"जर तुम्ही सिराज, शमी आणि जडेजा यांच्याकडं पाहत नसाल, तर तुमच्या संघातील गोलंदाजी विभागात हा सामना कोण जिंकू शकतो?", असं त्यानं लिहिलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.