नवजात बाळाला कावीळ का होते? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' धोक्याचे संकेत; दुर्लक्ष केल्यास मेंदूवर होऊ शकतो परिणाम

अतिदक्षता विभागात देखरेखीखाली असलेले नवजात बाळ
फोटो कॅप्शन, मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांमध्ये गंभीर कावीळ होण्याचा धोका अधिक असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते. (प्रातिनिधिक छायाचित्र)
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

'बाळ झालं. डिलिव्हरी व्यवस्थित झाली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत'. असा मेसेज किंवा फोनवर कळवलं जातं. पण कधीकधी त्यापाठोपाठ बाळाला कावीळ झाली आहे, असंही कळवलं जातं. यामुळे आनंदाबरोबर ती बातमी देणारा आणि ऐकणारा थोडासा काळजीत पडतो. इतक्या लहान बाळाला कावीळ कशी झाली असा प्रश्न सगळ्यांना पडतो. बाळाच्या पालकांसह सगळेच घाबरुन जातात.. पण प्रत्येक कावीळ धोकादायक असते का? आणि नेमकं कधी सावध होण्याची गरज असते? याची माहिती असणं आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, नवजात बाळांमध्ये कावीळ होणं ही अत्यंत सामान्य बाब आहे. जगभरातील अनेक बाळांना जन्मानंतरच्या पहिल्या आठवड्यात कावीळ होते. बहुतेक वेळा ती शरीरात होत असलेल्या नैसर्गिक बदलांचा भाग असते आणि काही दिवसांत कमी होते. मात्र काही प्रकरणांमध्ये रक्तातील बिलिरुबिनचं प्रमाण इतकं वाढू शकतं की त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. उपचार करायला उशीर झाल्यास मेंदू आणि मज्जासंस्थेवरही परिणाम होण्याचा धोका असतो.

अनेकदा सुरुवातीची लक्षणं अनेकदा सामान्य वाटू शकतात. त्यामुळे कोणती कावीळ केवळ निरीक्षणाची गरज असलेली आहे आणि कोणत्या काविळीवर तातडीच्या उपचारांची गरज आहे, हे पालकांना समजणं महत्त्वाचं ठरतं.

नवजात बाळांना कावीळ नेमकी का होते, कोणत्या बाळांना तिचा अधिक धोका असतो, सूर्यप्रकाशाबाबतचे समज-गैरसमज काय आहेत आणि फोटोथेरपीची गरज कधी भासते, याविषयी बालरोगतज्ज्ञ काय सांगतात? हे इथं पाहू

कावीळ 'सामान्य' आहे की धोक्याची घंटा?

नवजात कावीळबाबतची सर्वात मोठी अडचण म्हणजे ती एकाच वेळी सामान्यही असू शकते आणि काही प्रसंगी धोकादायकही. त्यामुळे बाळाचा पिवळसर रंग पाहून अनावश्यक घाबरण्याची गरज नसली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूकही महागात पडू शकते.

बाळाला वारंवार दूध पाजल्याने शरीरातील बिलिरुबिन शौचावाटे बाहेर पडण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.
फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

कावीळ सुरुवातीला चेहरा आणि डोळ्यांपासून दिसू लागते. मात्र पिवळेपणा छाती, पोट आणि हात-पायांपर्यंत झपाट्याने पसरू लागला, बाळ दूध पिणं कमी करू लागलं, खूप सुस्त झालं किंवा जागं करणं कठीण जाऊ लागलं, तर ते धोक्याचे संकेत असू शकतात. विशेषतः अकाली जन्मलेली बाळं, कमी वजनाची बाळं आणि आई-बाळाच्या रक्तगटात विसंगती असलेली प्रकरणं यांच्यावर अधिक बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं, असं तज्ज्ञ सांगतात.

अनेक कुटुंबांमध्ये अजूनही सूर्यप्रकाश हा काविळीवरचा घरगुती उपाय मानला जातो. मात्र तज्ज्ञ सांगतात की गंभीर कावीळ ओळखण्यासाठी आणि योग्य उपचार सुरू करण्यासाठी वैद्यकीय तपासणीला पर्याय नाही. कारण बहुतांश बाळं काविळीतून कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बाहेर पडतात, पण काही वेळा वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचे परिणाम कायमस्वरूपी ठरू शकतात. म्हणूनच नवजात कावीळ ही केवळ पिवळसर त्वचेची गोष्ट नसून, वेळेवर ओळख आणि योग्य उपचार करणं आवश्यक आहे.

नवजात बाळांना होणारी कावीळ काय असते?

नवजात बाळांना होणारी कावीळ म्हणजे काय हे आधी समजून घेणं आवश्यक आहे. या काविळीला वैद्यकीय भाषेत निओनॅटल हायपरबिलिरुबिनिमिया (neonatal hyperbilirubinemia) म्हणतात. यात रक्तातील बिलिरुबिनची पातळी वाढल्यामुळे बाळाची त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर होतो.

ही एक अतिशय सामान्य स्थिती असून, सुमारे 60% पूर्ण-मुदतीच्या नवजात बाळांना आणि मुदतीआधी जन्मलेल्या सुमारे 80% बाळांना याचा त्रास होतो.

नवजात बाळांमध्ये लाल रक्तपेशींची संख्या जास्त असते आणि जन्मानंतर त्यांचे वेगानं विघटन होतं. दुसरीकडे, बाळाचे यकृत अजून अपरिपक्व असल्यामुळे तयार झालेल्या बिलिरुबिनवर प्रक्रिया करण्याची आणि ते शरीराबाहेर टाकण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते.

बहुतेक नवजात बाळांमध्ये, ही शारीरिक कावीळ (physiological jaundice) तात्पुरती असते आणि बाळाचं यकृत परिपक्व झाल्यावर बरी होते.

ग्राफिक्स

बिलीरुबिन हे एक पिवळं रंगद्रव्य आहे, ते जुन्या लाल रक्तपेशींच्या विघटनानंतर नैसर्गिकरित्या तयार होते.

सामान्यतः, यकृत बिलिरुबिनवर प्रक्रिया करून त्याचे अशा स्वरूपात रूपांतर करते, ते पित्ताद्वारे शरीराबाहेर टाकलं जाऊ शकतं आणि शौचावाटे शरीराबाहेर टाकलं जातं.

नवजात बालकांमध्ये यकृत तुलनेनं अपरिपक्व असते आणि बिलिरुबिन शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक मंद असते. हे बिलीरुबिन रक्तप्रवाहात जमा होते, तेव्हा ते त्वचेत आणि इतर ऊतींमध्ये जमा होते, आणि तेव्हा वैशिष्ट्यपूर्ण असा पिवळा रंग दिसायला लागतो.

जरी बिलिरुबिनची सौम्य वाढ सहसा निरुपद्रवी असली तरी, अनकंजुगेटेड बिलीरुबिनची अत्यधिक उच्च पातळी रक्त-मेंदू अडथळा (blood-brain barrier) ओलांडू शकते आणि मज्जासंस्थेचे नुकसान करू शकते, या स्थितीला केर्निक्टेरस (kernicterus) म्हणतात.

यामुळेच बिलिरुबिनची वेळेवर तपासणी आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ही कावीळ का होते?

या काविळीच्या संभाव्य कारणांबद्दल आम्ही डॉ. शेहला काझी यांच्याशी चर्चा केली. त्या मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथं बालरोग आणि नवजात शिशु आरोग्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "आई आणि बाळाच्या रक्तगटातील विसंगती (एबीओ किंवा आरएच विसंगती), लाल रक्तपेशींचा वाढलेला नाश (हिमोलिसिस), जी6पीडीची कमतरता, नवजात अर्भकातील सेप्सिससारखे संसर्ग, प्रसूतीनंतर टाळूखाली जखम असणं किंवा रक्तस्त्राव होणं अशी कारणं यामागे असू शकतात. याचं लवकर निदान होणं आवश्यक आहे कारण यापैकी काही परिस्थितींमुळे बिलिरुबिनची पातळी वेगाने वाढू शकते."

नवजात बाळाला कावीळ का होते? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' धोक्याचे संकेत; दुर्लक्ष केल्यास मेंदूवर होऊ शकतो परिणाम
फोटो कॅप्शन, संकल्पनात्मक चित्र

मुदतीपूर्वी जन्मलेली बाळं म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीना याचा त्रास जास्त होऊ शकतो का असं विचारल्यावर डॉ. काझी म्हणाल्या, मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांना ही कावीळ होण्याचा धोका लक्षणीयरीत्या जास्त असतो.

कारण त्यांचे यकृत पूर्ण-मुदतीच्या बाळांपेक्षाही अधिक अपरिपक्व असते. या बाळांमध्ये लाल रक्तपेशींचं विघटन वाढलेलं असू शकतं, ते दूध कमी प्रमाणात पित असतील तर, ही बाळं कमी वेळा शौचास जाऊ शकतात, ज्यामुळे आतड्यांमधून बिलिरुबिनचं पुनर्शोषण वाढतं, तसंच त्यांना संसर्ग आणि इतर वैद्यकीय गुंतागुंतीचा धोका जास्त असतो. याव्यतिरिक्त, वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांना वाढलेल्या बिलिरुबिनमुळे होणाऱ्या मज्जासंस्थेवर होणाऱ्या हानिकारक परिणामांचा अधिक धोका असतो."

मेंदूचं नुकसान होतं का?

मुदतीआधी जन्मलेल्या बाळांमध्ये गंभीर कावीळ होण्याची शक्यता अधिक असते. तसंच, जर आईचा रक्तगट 'Rh-negative' (Rh -ve) असेल आणि बाळाचा रक्तगट 'Rh-positive' (Rh +ve) असेल, तर अशा परिस्थितीतही गंभीर कावीळ होऊ शकते. याबद्दल आम्ही मुलुंड इथल्या फोर्टिस रुग्णालयात बालरोग विभागात वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. प्रकाश वैद्य यांच्याकडून अधिक माहिती घेतली.

नवजात बाळाला कावीळ का होते? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' धोक्याचे संकेत; दुर्लक्ष केल्यास मेंदूवर होऊ शकतो परिणाम
फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

आई आणि बाळ यांच्यातील रक्तगटाची विसंगती (blood group incompatibility) काविळीचा धोका वाढवू शकते का? असं विचारल्यावर डॉ. वैद्य म्हणाले, "नक्कीच. सर्वात सामान्य विसंगती म्हणजे जेव्हा 'Rh-negative' (Rh -ve) रक्तगट असलेली आई 'Rh-positive' (Rh +ve) रक्तगट असलेल्या बाळाला जन्म देते तेव्हा असते. याव्यतिरिक्त, कधीकधी A, B, O रक्तगटांमधील विसंगतीमुळे (Blood group incompatibility) नवजात बालकामध्ये तीव्र कावीळ होऊ शकते. तसेच, जन्माच्या वेळी झालेली दुखापत, जसे की कवटीच्या हाडांच्या बाहेर रक्ताची गाठ (collection of blood) जमा होणे, यामुळेही कावीळ अधिक तीव्र होऊ शकते; कारण या गाठीतील रक्तपेशींचं विघटन होऊन शरीरातील 'बिलिरुबिन'चे (Bilirubin) प्रमाण वाढते. याशिवाय, चयापचय क्रियेशी संबंधित काही समस्या, जशी की थायरॉईडच्या समस्या किंवा G6PD ची कमतरता असल्यासही नवजात बालकाला तीव्र कावीळ होऊ शकते."

नवजात बाळाला कावीळ का होते? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' धोक्याचे संकेत; दुर्लक्ष केल्यास मेंदूवर होऊ शकतो परिणाम
फोटो कॅप्शन, संकल्पनात्मक चित्र

ही कावीळ बाळाच्या मेंदूवर किंवा मज्जासंस्थेवर परिणाम करत असल्याचं दर्शवणारी काही विशिष्ट धोक्याची लक्षणं आहेत का? असं विचारल्यावर डॉ. वैद्य म्हणाले, "कावीळ एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त वाढल्यास ती धोकादायक ठरू शकते, कारण बिलिरुबिन मेंदूत प्रवेश करून नुकसान पोहोचवू शकते. अशा स्थितीची सुरुवातीची लक्षणं म्हणजे बाळ खूप जास्त सुस्त होणे किंवा याच्या अगदी उलट, खूप जास्त चिडचिड होणं. अशी बालकं दूध कमी पिऊ शकतात किंवा कधीकधी ती अतिशय निस्तेज (limp) वाटू शकतात. जर मेंदूचं नुकसान वाढत गेलं, तर या स्थितीला 'कर्नीक्टेरस' (kernicterus) म्हणतात. यामध्ये बाळ अतिशय तीव्र आवाजात रडणं, फिट्स येणं, शरीर ताठ होणं अशी लक्षणे दाखवतं आणि हळूहळू बाळ प्रतिसाद देणं बंद करतं."

फोटोथेरपीबद्दल माहिती असणं आवश्यक

बाळाचं वय, गर्भावस्थेचा कालावधी (पूर्ण मुदतीचे की मुदतीआधीचे) आणि जोखीम वाढवणारे इतर घटक यांचा विचार करून बिलिरुबिनची पातळी ठरवून उपचार निश्चित केले जातात.

फोटोथेरपी बद्दल डॉ. प्रीथा जोशी यांनी अधिक माहिती दिली. त्या मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय इथं नवजात शिशु, बालरोग आणि हृदयरोग अतिदक्षता विभागात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

नवजात बाळाच्या काविळीवर रुग्णालयात सुरू असलेले फोटोथेरपी उपचार
फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

त्या म्हणाल्या, " यात विशेष निळ्या-स्पेक्ट्रम प्रकाशाचा वापर केला जातो, तो बाळ लघवी आणि शौचावाटे अधिक सहजपणे बाहेर टाकू शकेल अशा स्वरुपात बिलिरुबीनमध्ये बदल करतो. जेव्हा बाळ प्रकाशाखाली असतं, तेव्हा त्याचे डोळे आणि जननेंद्रियं संरक्षित असतात. तज्ज्ञांची टीम बाळाच्या तापमानावर आणि हायड्रेशनवरही लक्ष ठेवते, आणि बाळ कसा प्रतिसाद देत आहे हे पाहण्यासाठी बिलीरुबिनच्या पातळीची नियमितपणे तपासणी केली जाते. कधीकधी, जेव्हा आरएच आयसोइम्युनायझेशन हे कारण असतं, तेव्हा काही विशिष्ट वैद्यकीय उपचार देखील सुरू केले जाऊ शकतात. क्वचितच, जर योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर गंभीर प्रकरणांमध्ये एक्सचेंज ब्लड ट्रान्सफ्यूजनची (रक्त बदलण्याची) आवश्यकता भासू शकते."

नवजात बाळाची कावीळ आणि फोटोथेरपी उपचार)
फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या म्हणाल्या, "बाळाला वारंवार, आदर्शपणे 24 तासांत 8 ते 12 वेळा दूध पाजल्यानं त्याला पुरेसे द्रव आणि कॅलरीज मिळतात याची खात्री होते. यामुळे शौचास नियमित होते, आणि याचद्वारे बिलिरुबिन शौचावाटे शरीराबाहेर टाकले जाते. नीट दूध न प्यायल्यास कावीळ होण्याची शक्यता वाढू शकते. जर बाळाला स्तनपान करताना किंवा दूध पिण्यास अडचण येत असेल, तर मातांनी स्तनपानासाठी मदत मागावी. डॉक्टर वेगळा सल्ला देत नाहीत तोपर्यंत, काविळीच्या उपचारादरम्यान स्तनपान सामान्यतः सुरू ठेवलं जातं."

याबरोबरच डॉ. जोशी एक विशेष सल्ला देतात. त्या सांगतात, "पालकांनी उपचारासाठी थेट सूर्यप्रकाशाचा वापर करू नये, तसंच साखरेचं पाणी, हर्बल औषधं किंवा डॉक्टरांनी न सांगितलेली कोणतीही औषधं देणं टाळावं. यापैकी कोणताही उपाय काविळीवर प्रभावी असल्याचे सिद्ध झालेलं नाही, आणि ते प्रत्यक्षात हानिकारक असू शकतात. सूर्यप्रकाशामुळे बाळाचे शरीर जास्त गरम होऊ शकते किंवा त्याला सनबर्न होऊ शकतो. काविळीची तपासणी नेहमी आरोग्य व्यावसायिकाकडूनच करून घ्यावी. पालकांनी डॉक्टरांनी शिफारस केलेल्या आहार, देखरेख आणि उपचार योजनेचं पालन करावं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)