अनेक अपूर्ण कामांमुळे तुमचा मेंदू थकला आहे; या 5 सोप्या उपायांनी मिळेल दिलासा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मेलिसा होगेंबुम
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
कामाचा दिवस संपल्यानंतरही डोक्यातून कामाचे विचार काढणं कठीण जातंय का? कदाचित तुम्हालाही 'झिगारनिक इफेक्ट'चा (Zeigarnik effect) त्रास होत असावा. पण काळजी करू नका… या काही खास टिप्स तुम्हाला काम बाजूला ठेवून निवांत व्हायला नक्कीच मदत करतील.
माझ्या कॉम्प्युटरवर कोणत्याही क्षणी ब्राउजरचे डझनभर टॅब्स उघडे असतात ज्यामध्ये सहसा मी याच कॉलमसाठी केलेल्या संशोधनाची माहिती असते.. आज मी मोजलं तर एकाच विंडोमध्ये तब्बल 61 टॅब्स उघडे होते.
जेव्हा एखादं काम किंवा प्रोजेक्ट पूर्ण होतो, तेव्हा त्याच्याशी संबंधित ते टॅब्स बंद करताना मनावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं. याचं कारण म्हणजे प्रत्येक उघडा टॅब हे एका 'अपूर्ण राहिलेल्या कामाचं' प्रतीक असतं. आणि संशोधनातून असं समोर आलं आहे की, अशी अपूर्ण कामं आपल्या मेंदूवर ताण आणतात आणि आपली एकाग्रता कमकुवत करतात.
पण कामाच्या बाबतीत अनेकदा असं होतं की, एक प्रोजेक्ट संपतो न संपतो तोच दुसरा सुरू होतो. किंवा माझ्या बाबतीत सांगायचं तर अनेक प्रोजेक्ट्स एकाच वेळी सुरू असतात.
जेव्हा कामं पूर्ण झालेली नसतात तेव्हा होणारा मानसिक थकवा कसा कमी करता येईल याबद्दल मी तज्ज्ञांशी संवाद साधला. यातून मला समजलं की, कामातून पूर्णपणे 'स्विच ऑफ' होता येण्याचे म्हणजे कामाचे विचार बाजूला ठेवण्याचे खूप मोठे मानसिक फायदे आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काही पावलं उचलावी लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
'आपल्याला कामं पूर्ण करायची असतात'
अपूर्ण राहिलेल्या कामांना आपल्या स्मृतीमध्ये एक विशेष स्थान असतं, ही कल्पना जवळपास 100 वर्षे जुनी आहे.
1927 मध्ये रशियन मानसशास्त्रज्ञ ब्लुमा झिगारनिक यांनी एक शोधनिबंध प्रकाशित केला. यातून त्यांनी असं दाखवून दिलं की, जी कामं पूर्ण होऊ शकली नाही त्यापेक्षा जी कामं अर्धवट राहिली आहेत किंवा त्यापेक्षा ज्या कामांमध्ये मध्येच अडथळा आला, ती कामं लोकांच्या लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते.

फोटो स्रोत, Getty Images
असं म्हटलं जातं की, झिगारनिक यांना या प्रयोगांची प्रेरणा त्यांचे मार्गदर्शक कर्ट लेविन यांच्या एका निरीक्षणातून मिळाली. लेविन यांनी एका गजबजलेल्या रेस्टॉरंटमधील वेटर्सचं बारकाईने निरीक्षण केलं होतं.
त्यांच्या असं लक्षात आलं की, जोपर्यंत ग्राहकांकडून बिल चुकतं केलं जात नाही तोपर्यंत वेटर्सच्या लक्षात त्या मोठ्या ऑर्डर्स अगदी अचूक राहतात. पण एकदा का पैसे दिले गेले की ते ती ऑर्डर लगेच विसरून जातात.
हे वाचून मला टीव्ही मालिका पाहण्याची आठवण येते जिथे एखादं कथानक अपूर्ण किंवा गूढ राहिलं की, पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता वाढते आणि त्या पात्रांचा प्रवास आपल्या मनात ताजा राहतो.

फोटो स्रोत, Getty Images
मानसशास्त्रज्ञ आजही याला 'झिगारनिक इफेक्ट' असंच म्हणतात. अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे स्मरणशक्तीला चालना मिळते हा सिद्धांत प्रत्येक वेळी तंतोतंत सिद्ध करणं कठीण गेलं असलं तरी या इफेक्टने अनेक नव्या संशोधनांना प्रेरणा दिली आहे. या अभ्यासांमधून हेच दिसून आलं आहे की, अपूर्ण राहिलेली कामं सतत आपल्या डोक्यात घर करून राहतात.
"आपल्या मेंदूला कोणत्याही गोष्टीचा शेवट किंवा पूर्णत्व हवं असतं आणि आपल्याला कामं पूर्ण करण्याची स्वाभाविक ओढ असते," असं जर्मनीतील 'युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस बॉन-ऱ्हाइन-सीग'मधील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका ख्रिस्तीन सायरेक सांगतात.
जेव्हा कामं पूर्ण झालेली नसतात, तेव्हा त्यासंबंधीची माहिती डोक्यात ताजी ठेवणं फायदेशीर ठरतं. "हे आपल्यासाठी उपयुक्त असतं, कारण जेव्हा आपण ते काम पुन्हा सुरू करतो, तेव्हा सगळे संदर्भ आपल्या डोक्यात आधीच स्पष्ट असतात," असं सायरेक सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण मनात सातत्याने सुरू असलेली ही विचारांची साखळी कधीकधी महागातही पडू शकते. सायरेक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं आढळून आलं आहे की, आठवड्याच्या शेवटी अपूर्ण राहिलेल्या कामांचा थेट संबंध ताणतणाव, शांत झोप न लागणं आणि सतत कामाचेच विचार डोक्यात घोळत राहण्याशी असतो.
याच गोष्टी लक्षात घेऊन, कामाचे विचार बाजूला ठेवून मन निवांत करण्याचे हे तीन सोपे उपाय पाहूया:
1. वेळेवर आधारित ध्येय निश्चित करा
सतत सुरू असलेल्या अपूर्ण कामांमुळे आपल्या क्षमतेबद्दलच आपल्या मनात कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते. एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, जेव्हा कामं अर्धवट राहतात तेव्हा कर्मचाऱ्यांना कामातून मानसिकदृष्ट्या 'स्विच ऑफ' होणं कठीण जातं आणि त्यांच्या डोक्यात नकारात्मक विचार घोळू लागतात.
याउलट जर त्यांना असं वाटलं की आपण कामात काहीतरी ठोस प्रगती केली आहे तर त्यांचा आत्मविश्वास आणि परिस्थितीवरील नियंत्रण वाढतं ज्यामुळे ताण आपोआप कमी होतो.
याचा अर्थ असा नाही की आपण सगळीच कामं पूर्ण केली पाहिजेत, असं सायरेक सांगतात. त्याऐवजी आपल्या कामांची यादी नेमकी कशी आणि केव्हा पूर्ण करायची याचा एक स्पष्ट आराखडा तयार करणं पुरेसं ठरू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा लोक आधीच नियोजन करतात, ध्येय निश्चित करतात आणि येणाऱ्या अडचणींचा अंदाज बांधतात तेव्हा त्यांना कामाचे विचार मनातून बाजूला करणं सोपं जातं. "आपण आपल्या मनाला असं सांगून शांत करायला हवं की, 'मी हे विसरणार नाही. कारण मी ते लिहून ठेवलं आहे'," असं सायरेक सांगतात.
कामाच्या दिवसाच्या सुरुवातीला नियोजन करणं देखील खूप फायदेशीर ठरतं. एका अभ्यासात असं दिसून आलं की, जेव्हा कर्मचाऱ्यांनी सकाळीच आपल्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवला तेव्हा त्यांना कामाच्या दिवसात सहजपणे रुळायला मदत झाली.
माझ्या बाबतीत बोलायचं तर मी दररोज सकाळी माझी डायरी पाहते जेणेकरून संशोधन आणि लेखनासाठी मला कोणताही व्यत्यय न येणारा निवांत वेळ बाजूला काढता येतो. यामुळे हा लेख नक्कीच पूर्ण होईल असा एक आत्मविश्वास आणि निश्चिंतपणा मला मिळतो.
2. नोटिफिकेशन्स बंद करा
आपल्या फोनमधील ॲप्समुळे आपण 24 तास कामासाठी उपलब्ध असावं असा मोह आपल्याला होऊ शकतो.
"मोकळ्या वेळेतही आपला मेंदू सतत वेगवेगळ्या समस्या सोडवण्याच्याच विचारात गुंतलेला असतो," असं 'युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया मधील कॉग्निटिव्ह सायन्सच्या साहाय्यक प्राध्यापिका जोआन ओंगचोको सांगतात. त्या पुढे म्हणतात, "गेल्या आठवड्यात माझ्या लेक्चरची इतकी तयारी डोक्यात सुरू होती की, मी चक्क स्वप्नातही शिकवत होते."

फोटो स्रोत, Getty Images
एका अभ्यासानुसार, कामाच्या वेळेनंतरही सतत ईमेल्स तपासत राहिल्यामुळे ऑफिस आणि कुटुंब यांच्यातील संघर्ष वाढू शकतो कारण या सवयीमुळे ऑफिसचं काम थेट आपल्या घरात आणि वैयक्तिक आयुष्यात शिरतं.
यामुळे ताण कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ईमेल्स वारंवार न तपासणं. तुम्ही कामाची वेळ सुरू होईपर्यंत थांबू शकता किंवा ईमेल्स तपासण्यासाठी दिवसभरातील काही ठराविक वेळा ठरवून घेऊ शकता. कामासाठी वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सनाही हाच नियम लागू होतो.
तसेच सुट्टीच्या दिवशी स्वतःला कामापासून पूर्णपणे अलिप्त ठेवल्यास आपण आपल्या सुट्टीचा आनंद अधिक काळ आणि मनसोक्तपणे घेऊ शकतो.
3. शक्य असेल तिथे एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्स एकत्र करू नका
दररोज कामाची सुरुवात करताना समोर दिसणारे ब्राउझरचे असंख्य उघडे टॅब्स कदाचित 'माहितीच्या भडिमारात' भर घालत असावेत.
याचं कारण असं की, जेव्हा आपण एका कामातून दुसऱ्या कामाकडे वळतो तेव्हा आपल्या मेंदूवर मोठा मानसिक ताण येतो.
ओंगचोको सांगतात की, आपल्या स्मृतीवरचा ताण हलका करण्यासाठी शक्य असेल तेव्हा एक काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काम हातात घेऊ नये. "प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखादी फाईल बंद करता तेव्हा मेंदूची ऊर्जा मोकळी होते आणि म्हणूनच तुम्हाला पुन्हा ताजंतवानं वाटायला लागतं," असं त्या म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
4. सुट्ट्यांच्या आसपास डेडलाईन्सचं योग्य नियोजन करा
विशेषतः सणासुदीचे दिवस अनेकांसाठी तणावपूर्ण ठरू शकतात. पण नाताळच्या सुट्ट्यांच्या आधी आणि नंतर केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, ज्या लोकांकडे अपूर्ण कामं कमी होती ते सुट्टीवरून परतल्यावर मानसिकदृष्ट्या अधिक प्रसन्न आणि ताजेतवाने होते.
कर्मचाऱ्यांना आधीच नियोजन करण्यासाठी प्रोत्साहित करून मॅनेजर्स यात मोठी मदत करू शकतात.
"सुट्टीवर जाण्यापूर्वी तुम्हाला सगळीच कामं पूर्ण करण्याची गरज नसते," असा सल्ला सायरेक देतात. त्याऐवजी तुमचं काम अशा स्थितीत ठेवून जा की, सुट्टीवरून परतल्यावर तुम्हाला ते पुन्हा सहज सुरू करता येईल जेणेकरून सुट्टीच्या काळात सतत कामाचाच विचार डोक्यात घोळत राहणार नाही किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट विसरण्याची भीतीही वाटणार नाही.
5. 'द डोअरवे इफेक्ट' म्हणजे कामातून बाहेर पडण्याचे छोटे नियम तयार करा
End of podcast promotion
कामाचे विचार मनातून बाजूला सारण्यासाठी 'ट्रान्झिशन रिच्युअल्स' म्हणजेच कामाच्या मूडमधून बाहेर पडण्याच्या काही ठराविक सवयी खूप मदत करू शकतात, असं 'युनिव्हर्सिटी ऑफ ग्रोनिंगेन'मधील ऑर्गनायझेशनल सायकोलॉजीचे साहाय्यक प्राध्यापक ऑलिव्हर वीगेल्ट सांगतात.
याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमचं आजूबाजूचं वातावरण बदलणं ज्यामुळे आपल्या मेंदूला असा स्पष्ट संकेत मिळतो की आता काम संपलं आहे. जर तुम्ही घरून काम करत असाल तर जवळच्या बागेत किंवा दुकानात चक्कर मारून येणं किंवा अगदी एका खोलीच्या दरवाजातून दुसऱ्या खोलीत जाणं इतकं साधं पाऊलही खूप प्रभावी ठरू शकतं.
"जेव्हा आपण एका दरवाजातून पलीकडे जातो तेव्हा आपली यंत्रणा म्हणजे मेंदू जुन्या आठवणी बाजूला सारून मोकळी होते जेणेकरून पुढे घडणाऱ्या नव्या गोष्टींसाठी मेंदूत जागा तयार होऊ शकेल," असं ओंगचोको सांगतात.
दुसरा एक सोपा पर्याय म्हणजे तुमचा लॅपटॉप दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवणं. यामुळे ज्या कामांमुळे आपल्याला एरवी ताण येऊ शकतो त्या कामांपासून मानसिकदृष्ट्या अंतर राखायलाही मदत होते, असं वीगेल्ट सांगतात.
या सगळ्या युक्त्या एकत्रितपणे वापरल्यास कामाच्या ठिकाणी होणाऱ्या तणावाकडे एका वेगळ्या आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहता येऊ शकतं. "जर तुम्ही थोडं मागे जाऊन फक्त झाडांचा विचार करण्याऐवजी संपूर्ण जंगलाचा विचार करू शकलात तर तुम्ही अपूर्ण राहिलेल्या कामांच्या विचारांपासून अंतर राखू शकता किंवा त्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकता," असं वीगेल्ट सांगतात.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कामाच्या वेळेनंतर ईमेल्स न तपासण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे आणि मी माझ्या दिवसाचं नियोजनही अधिक काळजीपूर्वक करायला सुरुवात केली आहे.
याशिवाय 'झिगारनिक इफेक्ट'सोबतच मी 'ओव्हसियानकिना इफेक्ट'चाही सकारात्मक वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. झिगारनिक यांच्या संशोधनानंतर एका वर्षाने प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात असं दिसून आलं की, कोणत्याही गोष्टीला पूर्णत्व देण्याची आपली मानसिक गरज भागवण्यासाठी लोक अपूर्ण राहिलेल्या कामांकडे पुन्हा वळतात.
त्यामुळे उघड्या असलेल्या टॅब्सकडे पाहून भांबावून जाण्याऐवजी मी त्यांचा वापर पुन्हा जोमाने एखाद्या प्रोजेक्टमध्ये गुंतून जाण्यासाठी आणि तो अखेर पूर्णत्वास नेण्यासाठी एक प्रेरणा म्हणून करत आहे.
कारण ओंगचोको सांगतात त्याप्रमाणे, अपूर्ण राहिलेली कामं आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत म्हणजे ती पूर्ण करण्याचा मोह आपल्याला आवरताच येत नाही. फक्त त्यामुळे आपल्यावर अनावश्यक ताण कधी येतोय, हे आपण वेळीच ओळखायला हवं, इतकंच.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)




























