'सर्वेक्षण करणारे आमच्या इथे आले असते, तर पुरस्कार दिला नसता'; नवी मुंबईतील स्वच्छतेचं वास्तव - ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
"सर्वेक्षण करणारे आमच्या इथे आले असते, तर स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला नसता. आम्हीही नवी मुंबईतच राहतो. मात्र, आमच्या भागात अस्वच्छता, डम्पिंग, कचरा, गटारं आणि शौचालयांच्या अनेक समस्या आहेत."
ही प्रतिक्रिया आहे नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर परिसरात राहणाऱ्या बबीता राठोड यांची.
2025-26 च्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मात्र, शहरातील काही गावठाणं, वस्त्या, रेल्वे स्थानक परिसर आणि इतर ठिकाणी अस्वच्छता, तुंबलेली गटारं, सांडपाणी, डम्पिंग ग्राउंड आणि दुर्गंधीच्या समस्या कायम असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
नेरूळ, वाशी, घणसोली, ऐरोली, तुर्भे, रबाळे आणि दिघा या भागांतील काही वस्त्यांमध्ये अस्वच्छतेची परिस्थिती असल्याचं नागरिक सांगतात. स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक मिळालेल्या शहरातील या भागांची स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान पाहणी झाली होती का आणि तरीही या समस्या कायम का आहेत, असा प्रश्न नवी मुंबईकर उपस्थित करत आहेत.
दुसरीकडे, स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान गावठाणं आणि वस्त्यांचीही पाहणी करण्यात आली होती. तक्रारी असलेल्या भागांमध्ये अतिरिक्त 400 सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले असून, नागरिकांच्या सध्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार का आणि कसा मिळाला?
केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत मिशन – शहरी' अंतर्गत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक पटकावला. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय, कचरामुक्त शहराचं सर्वोच्च 7 स्टार मानांकन आणि हागणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीतील सर्वोच्च 'वॉटर प्लस' मानांकनही महापालिकेने कायम राखलं.
महापालिकेच्या दाव्यानुसार, शहरात दररोज निर्माण होणाऱ्या 100 टक्के कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यासाठी दररोज 350 टन, तर सुक्या कचऱ्यासाठी 400 टन क्षमतेच्या प्रक्रिया सुविधा उभारण्यात आल्या आहेत. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत, तर सुक्या कचऱ्यापासून सिमेंट कारखान्यांसाठी RDF तयार केलं जातं.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
याशिवाय, जुन्या क्षेपणभूमीवर कोपरखैरणे येथे 11.4 एकर परिसरात निसर्ग उद्यान विकसित करण्यात आलं असून, तिथे 1.3 लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. कपड्यांचा कचरा, बांधकामाचा कचरा आणि प्लास्टिक यांचाही पुनर्वापर करून त्यापासून विविध वस्तू तयार करण्याचे उपक्रम राबवले जातात.
शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून 30 टक्क्यांहून अधिक पाण्याचा पुनर्वापर केला जातो. GPS प्रणालीद्वारे कचरा संकलन करणाऱ्या 246 वाहनांवर देखरेख ठेवली जाते. नागरिकांच्या तक्रारींसाठी मोबाइल ॲप, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि AI आधारित यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. या विविध उपाययोजनांमुळे नवी मुंबईला हा पुरस्कार मिळाल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.
नवी मुंबईकर नागरिकांच्या तक्रारी काय?
End of podcast promotion
नवी मुंबईतील स्वच्छतेबाबत परिस्थिती तपासण्यासाठी बीबीसी मराठीची टीम नवी मुंबईतील विविध परिसरात फिरली. दरम्यान नवी मुंबईतील उच्चभ्रू आणि वसाहती असलेल्या परिसरामध्ये स्वच्छतेबाबत चांगली परिस्थिती पाहायला मिळाली.
मात्र, वाशी जुहू गाव, स्थानक परिसर, नेरूळ स्थानक परिसर व गाव, तुर्भे स्टोअर आणि श्रमिक नगर परिसर, घनसोली, ऐरोली, रबाळे आणि दिघा आदी परिसरात अस्वच्छतेचा वास्तव पाहायला मिळालं आणि नागरिक तक्रारी करत होते.
तुर्भे स्टोअर परिसरातील रहिवासी बबीता राठोड यांच्या मते, त्यांच्या भागात नियमितपणे स्वच्छता केली जात नाही. सर्वेक्षणाच्या काळात काही दिवस सफाई कर्मचारी येऊन स्वच्छता करतात; मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते. विशेषतः गरीब वस्त्यांमधील स्वच्छतेकडे पुरेसं लक्ष दिलं जात नसल्याचं त्या सांगतात.
त्या पुढे म्हणाल्या, "आमच्याकडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा दिला जातो. मात्र, तो एकाच गाडीत टाकला जातो. घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. आमच्या समोरच डम्पिंग ग्राउंड आहे. तिथे दिवसेंदिवस कचऱ्याचे डोंगर वाढत आहेत, त्यामुळे अनेक समस्या आहेत."
नवी मुंबईतील सीवूड परिसरात राहणारे मोहन धोंडीबा यांचाही अनुभव काहीसा असाच आहे. महापालिकेला स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला; मात्र त्यांच्या परिसरात अपेक्षित स्वच्छता नसल्याचं ते सांगतात.
"नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेसाठी पहिला क्रमांक मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. पण आमच्याकडे इतकी स्वच्छता नाही. सीवूड गावठाणात अस्वच्छतेचं वातावरण आहे," असं मोहन धोंडीबा म्हणतात.
नेरूळमधील रहिवासी रूपाली महिंद्रकर यांनीही स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील सर्व भागांचा विचार झाला होता का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, चांगल्या आणि विकसित परिसरांचं सर्वेक्षण झालं; मात्र गावठाणांमधील परिस्थिती वेगळी आहे. स्वच्छतेबरोबरच त्यांच्या परिसरात पाणीपुरवठ्याची समस्याही आहे.
"चांगल्या एरियाचं सर्वेक्षण केलं; पण गावठाणात अस्वच्छता, कचराकुंड्या ओव्हरलोड होणं, सांडपाणी अशा अनेक समस्या आहेत. आम्हाला पाणीही व्यवस्थित येत नाही," असं रूपाली महिंद्रकर सांगतात.

फोटो स्रोत, Kevhalal Maury
गावठाणं आणि वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि तुंबलेल्या गटारांची समस्या
नवी मुंबईतील तुर्भे, रबाळे, कोपरखैरणे, घणसोली, नेरूळ, वाशी आणि दिघा या भागांतील काही गावठाणं आणि वस्त्यांमध्ये अस्वच्छतेच्या तक्रारी केल्या जात आहेत.
तुर्भे, घणसोली, कोपरखैरणे या वस्त्यांमध्ये कचराकुंड्या भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचं दिसतं. गटारांमधील सांडपाणी आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिकांना त्रास होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
काही रहिवाशांनी आपल्या भागातील या परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत. त्यातून परिसरातील कचरा, सांडपाणी आणि स्वच्छतेच्या अभावाकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.
तुर्भे स्टोअर आणि श्रमिक नगर परिसरातील नागरिकांनीही अस्वच्छतेबरोबरच डम्पिंग ग्राउंडच्या समस्येबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
तुर्भे येथील रहिवासी मालन चव्हाण यांच्या मते, परिसरात कचरा उघड्यावर ठेवला जातो. सकाळी कचरा उचलण्यासाठी कर्मचारी येतात; मात्र त्यानंतर नियमितपणे कचरा उचलला जातो की नाही, याबाबत निश्चितता नसते. जवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळेही नागरिकांना त्रास होत असल्याचं त्या सांगतात.
"कचरा अशा प्रकारे उघड्यावर ठेवून जातात. कचरा उचलायला सकाळी येतात, नंतर येतात की नाही माहीत नाही. पण आम्हाला डम्पिंगचा खूप त्रास आहे. त्यामुळे आमच्या भागामध्ये आजार पसरत आहेत," असं मालन चव्हाण सांगतात.
करावे परिसरातील रहिवासी लक्ष्मण यांच्या मते, त्यांच्या परिसरात अपेक्षित स्वच्छता राखली जात नाही. शहरातील विकसित भागांमध्ये चांगली स्वच्छता असल्याचं नाकारता येत नाही; मात्र कष्टकरी आणि सर्वसामान्य कामगार राहतात त्या वस्त्यांमध्ये अस्वच्छतेचं चित्र आहे. काही ठिकाणी तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याचं ते सांगतात.
स्वच्छ सर्वेक्षणात नेमकं काय तपासलं जातं?
स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे केवळ शहरातील रस्ते झाडले जातात की नाही, एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत देशातील शहरे आणि महानगरपालिकांच्या स्वच्छतेच्या कामगिरीचं दरवर्षी विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केलं जातं.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
या मूल्यांकनात घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो का, कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होते का आणि जुन्या कचरा डेपोचं निर्मूलन झालं आहे का, याला महत्त्व दिलं जातं. कचरामुक्त शहरासाठी स्टार रेटिंगचाही विचार केला जातो.
याशिवाय, सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांची स्वच्छता व उपलब्धता, हागणदारीमुक्त शहरासाठी ODF/ODF+ मानांकन, सांडपाण्याचा पुनर्वापर, रस्ते आणि बाजारपेठांमधील प्रत्यक्ष स्वच्छता, सफाई कर्मचाऱ्यांचं कल्याण व सुरक्षितता, नागरिकांचा अभिप्राय आणि तक्रार निवारण यंत्रणा अशा विविध बाबी तपासल्या जातात. त्यानुसार गुणांकन करून शहरांची अंतिम क्रमवारी जाहीर केली जाते.
नवी मुंबईच्या मूल्यांकनाबाबत प्रश्न का उपस्थित होत आहेत?
2025-26 च्या स्वच्छ सर्वेक्षणात या विविध निकषांच्या आधारे नवी मुंबईचं मूल्यांकन करण्यात आलं. मात्र, शहरातील अंतर्गत वस्त्या, गावठाणं आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या यांचाही या सर्वेक्षणात पुरेसा विचार झाला होता का, असा प्रश्न नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित करत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणात शहराला मिळालेल्या क्रमांकाबरोबरच प्रत्यक्ष नागरिकांना मिळणाऱ्या स्वच्छतेच्या सुविधांचाही विचार होणं महत्त्वाचं आहे. काही भागांमध्ये कचरा आणि सांडपाण्याच्या समस्या कायम असल्याच्या तक्रारी येत असताना सर्वेक्षणाच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तुर्भेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी कचरा व्यवस्थापनावरून महापालिकेवर टीका केली आहे. त्यांच्या मते, तुर्भे परिसरात कचऱ्याचे मोठे ढीग आणि डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे डोंगर असताना नवी मुंबई कचरामुक्त असल्याचा दावा केला जात आहे.
"तुम्ही बक्षीस घेता, पण लोक डम्पिंग ग्राउंडच्या समस्येमुळे त्रस्त आहेत, त्यांचं बघत नाही का? आज तुम्ही म्हणता नवी मुंबई कचरामुक्त आहे; पण इथे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. या गोष्टींची महापालिकेला काही पडली नाही. लोक आजारी पडत आहेत," असं सुरेश कुलकर्णी म्हणतात.
कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याच्या महापालिकेच्या दाव्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कचऱ्याचे डोंगर तयार होत असताना अत्यल्प कचरा शिल्लक राहत असल्याचे आकडे कसे दाखवले जातात, हे स्पष्ट होण्याची गरज असल्याचं ते सांगतात.
"डोंगरावर डोंगर उभारले कचऱ्याचे आणि तुम्ही म्हणता झिरो कचरा. वेस्टेज एक किंवा दोन टक्के दाखवता. मग हा कचरा कुठून येतो? तिथे काहीच प्रक्रिया केल्या जात नाहीत," असा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे.

फोटो स्रोत, Kevhalal Maury
सामाजिक कार्यकर्ते सुनील अगरवाल यांनीही शहरातील काही भागांमध्ये कचऱ्याची समस्या असल्याचं सांगितलं. रेल्वे स्थानक परिसर आणि वस्त्यांमध्ये कचरा पडलेला दिसतो. काही ठिकाणी रस्त्यांवर लोक तंबू बांधून राहत असल्याचंही ते सांगतात. या परिस्थितीची स्वच्छ सर्वेक्षण करणाऱ्या समितीने दखल घेतली होती का, असा त्यांचा प्रश्न आहे.
"स्टेशन किंवा वस्त्यांमध्ये गेलो तर तिथे खूप कचरा आहे. लोक कचरा टाकत आहेत. सुधारणा होण्याची गरज आहे. रस्त्यावर लोक तंबू बांधून राहतात. हे सगळं सर्वेक्षण करणाऱ्या मॅनेजिंग कमिटीने पाहिलं की नाही, माहीत नाही. पुढील काही वर्षांत यात सुधारणा झाली पाहिजे," असं सुनील अगरवाल सांगतात.
माजी नगरसेवक प्रल्हाद शीलागर यांनीही स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाहणीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, शहरातील चांगल्या परिसरांमध्ये सर्वेक्षण झालं; मात्र वस्त्यांमधील परिस्थितीकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही.
"सर्वे फक्त चांगल्या ठिकाणी झाला, वस्ती परिसरात सर्वेक्षण झालं नाही. जर इथली परिस्थिती पाहिली असती, तर नंबर मिळाला नसता. इथे अनेक समस्या आहेत. वारंवार आम्ही अस्वच्छता आणि डम्पिंग ग्राउंडबाबत पालिकेकडे तक्रारी करूनही काहीही दाद दिली जात नाही. स्वच्छतेसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं जातं; मात्र प्रत्यक्षात त्या उपक्रमांची परिस्थिती वाईट आहे," असं प्रल्हाद शीलागर म्हणाले.
अस्वच्छतेला प्रशासनाबरोबर नागरिकही जबाबदार?
शहरातील काही भागांमध्ये अस्वच्छतेच्या तक्रारी असल्या, तरी त्यासाठी केवळ महापालिकेच्या यंत्रणेला जबाबदार धरता येणार नाही, असं काही नागरिक आणि सफाई कर्मचारी सांगतात.
नियमितपणे कचरा उचलला जात असतानाही काही नागरिकांकडून पुन्हा रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतर शहरांपेक्षा नवी मुंबई अधिक स्वच्छ असल्याचा देखील काही नागरिक सांगतात. मात्र पूर्णपणे स्वच्छ शहर असावं यासाठी प्रशासना सहित नागरिकांनी देखील प्रयत्न केले पाहिजे असा नागरिक सांगतात.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
नेरूळमधील रहिवासी बाबा गायकवाड यांनीही या समस्येकडे लक्ष वेधलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नेरूळ, सीवूड आणि गावठाण परिसरात महापालिकेकडून दर तासाने कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक ठरावीक वेळेची वाट न पाहता उघड्यावर कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात स्वच्छ होत आहेत.
नेरूळ भागात काम करणारे सफाई कर्मचारी शुभम बनसोडे यांच्या मते, कर्मचारी नियमितपणे स्वच्छता करतात; मात्र नागरिकांकडून पुन्हा कचरा टाकला जात असल्यामुळे काही परिसरांमध्ये अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांप्रमाणेच नागरिकांनीही स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक असल्याचं ते सांगतात.
निखिल पारखे या नवी मुंबईकरांनीही याबाबत आपलं मत मांडलं आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेबरोबरच नागरिकांचीही आहे. काही नागरिक चालता-बोलता कुठेही कचरा टाकतात. अशा परिस्थितीत महापालिका कुठे कुठे लक्ष देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेने काय स्पष्टीकरण दिलं?
शहरातील अस्वच्छतेच्या तक्रारी आणि स्वच्छ सर्वेक्षणाच्या प्रक्रियेबाबत बीबीसी मराठीने नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याशी संवाद साधला.
महापालिकेला स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता, कचरा संकलन आणि वर्गीकरण, कचऱ्यावर प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयं, रस्त्यांची सफाई आणि नागरिकांच्या तक्रारींचं निवारण अशा विविध निकषांवर हा पुरस्कार मिळाल्याचं आरदवाड यांनी सांगितलं.
महापालिका हद्दीत येणाऱ्या काही भागांमध्ये इतर प्राधिकरणंही काम करतात. त्यामुळे त्या भागांमधील स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न निर्माण होतो. उदाहरणार्थ, रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर आणि तेथील शौचालयं रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येतात. या भागांतील स्वच्छतेची जबाबदारीही महापालिकेला देण्यात यावी, अशी मागणी केल्याचं आरदवाड यांनी सांगितलं.
गावठाणं आणि वस्त्यांमधील स्वच्छतेच्या तक्रारींबाबत बोलताना त्यांनी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केल्याची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारी असलेल्या वस्त्या आणि गावठाणांमध्ये अतिरिक्त 400 सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांना कचरा टाकण्यासाठी सोसायट्यांमध्ये आणि रस्त्यांवर कचरापेट्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
गटारांच्या स्वच्छतेबाबतही महापालिकेकडून नियमित काम केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पावसाळ्यापूर्वी गटारांची स्वच्छता केली जाते आणि त्यानंतरही नियमितपणे हे काम सुरू असतं.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाहणीमध्ये गावठाणं आणि वस्त्यांचाही समावेश होता, असं आरदवाड यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे केवळ विकसित किंवा चांगल्या परिसरांचंच सर्वेक्षण झालं, हा दावा त्यांनी मान्य केलेला नाही.
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या इतर तक्रारींचीही दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
स्वच्छतेचा क्रमांक टिकवण्याचं आव्हान
नवी मुंबईला स्वच्छतेसाठी देशात पहिला क्रमांक मिळणं ही महापालिकेसाठी महत्त्वाची कामगिरी आहे. शहरातील अनेक भागांमध्ये इतर शहरांच्या तुलनेत स्वच्छतेची चांगली परिस्थिती असल्याचंही दिसतं. मात्र, शहरातील सर्वच भागांमध्ये स्वच्छतेची समान पातळी निर्माण करणं तितकंच महत्त्वाचं आहे, असं नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सांगतात.
एका बाजूला स्वच्छ सर्वेक्षणातील पुरस्काराचं कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला काही वस्त्यांमधील नागरिकांना कचरा, सांडपाणी आणि दुर्गंधीच्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींचं निराकरण करणं आणि स्वच्छतेचा दर्जा कायम ठेवणं हे महापालिकेसमोरचं आव्हान आहे.
स्वच्छ शहर ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रशासन, नागरिक आणि लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सहभागातूनच शहर स्वच्छ राहू शकतं, असं महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























