जेन्सेन हुआंग यांची पुन्हा एनव्हिडियाच्या सीईओपदी नियुक्ती, संचालक मंडळानं काय म्हटलं?

फोटो स्रोत, Reuters
एनव्हिडियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार संचालक मंडळाने एकमताने जेन्सेन हुआंग यांची पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
संचालक मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटले, "जेन्सेन हे एनव्हिडियाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत आणि त्यांची पुनर्नियुक्ती ही आमच्या भागधारक, कर्मचारी, भागीदार आणि ग्राहकांच्या सर्वोत्तम हिताची आहे, असा संचालक मंडळाचा विश्वास आहे."
एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने तत्काळ प्रभावाने जेन्सेन हुआंग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे.
'माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ', हुआंग यांनी जारी केले निवेदन
एनव्हिडियाच्या संकेतस्थळावरून जेन्सेन हुआंग यांचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे, "नव्या औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एका कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी एनव्हिडियामध्ये परत येणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. मी ही जबाबदारी अत्यंत नम्रतेने आणि नव्या बांधिलकीसह स्वीकारत आहे."

फोटो स्रोत, AFP
"या प्रक्रियेदरम्यान दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि सखोल विचारांबद्दल मी एनव्हिडियाच्या संचालक मंडळाचे आभार मानतो. विशेषतः अध्यक्ष हार्वी जोन्स यांच्या नेतृत्वाबद्दल, या काळात एनव्हिडियाचे नेतृत्व करणाऱ्या कोलेट क्रेस आणि आमच्या कार्यकारी मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानतो."
"आमचे कर्मचारी, भागधारक, उद्योगक्षेत्रातील नेते आणि जगभरातील भागीदार यांनी दिलेल्या असामान्य पाठिंब्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी मी उत्सुक आहे", असंही त्यांनी नमूद केलं.
ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेन्सन हुआंग यांच्या एनव्हिडियामधील पुनरागमनाचे स्वागत केले आणि याला 'योग्य आणि रास्त निर्णय' म्हटले आहे.
'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प म्हणाले, "कंपनीचे यश आणि समृद्धी, तसेच अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी देशाला एनव्हिडियामध्ये जेन्सन यांच्या नेतृत्वाची गरज आहे."

फोटो स्रोत, Reuters
हुआंगच्या परतण्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होईल असे मानण्याचे अमेरिकन सरकारकडे कारण नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
ट्रम्प यांनी हुआंग यांना 'देशभक्त आणि राष्ट्रीय संपत्ती' म्हटलं.
एनव्हिडियाने यापूर्वी हुआंग यांच्या पुनरागमनाची शक्यता फेटाळली होती
गेल्या आठवड्यात एनव्हिडियाने जेन्सेन हुआंग यांना पुन्हा पदावर आणण्याची शक्यता ठामपणे नाकारली होती.
हुआंग यांच्या नाट्यमय राजीनाम्यानंतरच्या कंपनीच्या पहिल्याच आर्थिक निकालांमध्ये अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी कोलेट क्रेस यांनी सांगितलं होतं की, कंपनीचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले होते, "आम्ही हे सांभाळू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
हुआंग यांनी असे म्हटले होते की, एनव्हिडियामध्ये परत येऊन कंपनीचे नेतृत्व करणे हा त्यांच्यासाठी सन्मान असेल. कथित विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांनंतर त्यांनी पद सोडले होते. या आरोपांमध्ये चीनसाठी हेरगिरीचा संशय असलेल्या एका महिलेबरोबरच्या संबंधांचाही समावेश होता.
त्यावेळी एनव्हिडियाचे अध्यक्ष हार्वी जोन्स यांनी म्हटले होते, "त्यांना पुन्हा पदावर नियुक्त करण्याचा संचालक मंडळाचा कोणताही विचार नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























