तूप, खोबऱ्याचे तेल की शेंगदाणा तेल; तज्ज्ञांच्या मते आरोग्यासाठी कोणता सर्वोत्तम पर्याय?

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या किचनमध्ये स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरावं, हा तसा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा आणि वादाचा विषय! हल्ली तर 'स्वयंपाकासाठी खोबरेल तेल हेच आरोग्यासाठी उत्तम', असा ट्रेंडच सुरू झालाय.
'कीटो' आणि 'पॅलिओ' डाएट करणाऱ्यांच्या यादीत तर खोबरेल तेल आता टॉपवर आहे.
पण या सगळ्यांत आता ICMR म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या एका अभ्यासाने खोबरेल तेल आणि तुपाच्या वापरावरून एक नवीच चर्चा सुरू केली आहे.
या अभ्यासानुसार, शेंगदाणा तेलाच्या तुलनेत खोबरेल तेल आणि तूप वापरणाऱ्या लोकांमध्ये 'एलडीएल' (LDL) कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असण्याची शक्यता असते.
एलडीएल (लो-डेंसिटी लिपोप्रोटीन) कोलेस्ट्रॉलला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच 'वाईट कोलेस्ट्रॉल' असंही म्हटलं जातं.
ICMR चा अभ्यास नेमकं काय सांगतो?
ICMR च्या भारतीय मधुमेह संशोधन कार्यक्रमातील 'ICMR-INDIAB' या अभ्यासात सहभागी झालेल्या 18,090 लोकांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं.
या अभ्यासात सहभागी लोकांकडून ते स्वयंपाकासाठी कोणत्या प्रकारचं तेल वापरतात, याची माहिती घेण्यात आली.
यानंतर या माहितीची तुलना त्यांच्या कोलेस्ट्रॉल आणि मेटाबॉलिझमशी (चयापचय क्रियेशी) संबंधित इतर आरोग्य मापदंडांशी करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
शेंगदाणा तेल वापरणाऱ्यांच्या तुलनेत इतर तेलं वापरणाऱ्यांमध्ये 'एलडीएल' (LDL) कोलेस्ट्रॉल जास्त असण्याची शक्यता खालीलप्रमाणे दिसून आली:
- खोबरेल तेल: 2.89 पट जास्त शक्यता
- तूप किंवा लोणी: 3.45 पट जास्त शक्यता
- सूर्यफूल तेल: 1.49 पट जास्त शक्यता
- सोयाबीन तेल: 1.81 पट जास्त शक्यता
- पाम ऑईल: 1.77 पट जास्त शक्यता
या अभ्यासाबद्दल माहिती देताना मधुमेह रोगतज्ज्ञ डॉ. मोहन सांगतात, "खोबरेल तेल खूप चांगलं असतं आणि त्यामुळे आयुष्य वाढतं, असं अनेक जण म्हणतात. पण या दाव्याला दुजोरा देणारी कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नाही."
ते पुढे सांगतात, "अलीकडेच झालेल्या ICMR-INDIAB अभ्यासाकडे पाहिलं तर तामिळनाडूमध्ये खोबरेल तेलाचा वापर खूप कमी होतो. तर केरळ आणि गोव्यासारख्या राज्यांमध्ये याचा वापर जास्त केला जातो. तिथल्या लोकांचं सरासरी कोलेस्ट्रॉल तामिळनाडूमधील लोकांच्या तुलनेत 40 ते 50 मिलिग्रॅमने जास्त आहे. यामागे खोबरेल तेल हे एक साधं आणि स्पष्ट कारण असू शकतं."
मात्र, डॉ. मोहन असंही स्पष्ट करतात की, "तुम्ही खोबरेल तेल अजिबात खाऊ नये किंवा ते खूप धोकादायक आहे, असं मी मुळीच म्हणणार नाही. जर तुम्हाला खोबरेल तेलच आवडत असेल तर त्याचा वापर थोड्या कमी प्रमाणात करा."
तूप आणि खोबरेल तेलामुळे हार्ट अटॅक येतो का?
हा अभ्यास एका ठराविक काळात लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यांच्या आरोग्याच्या निकषांची तुलना करतो.
या अभ्यासातून त्यांच्यातील परस्परसंबंधाकडे इशारा मिळतो. मात्र, एखादं विशिष्ट तेल थेट हार्ट अटॅकचं कारण ठरतं हे यातून सिद्ध होत नाही.

फोटो स्रोत, DrArunkumar/Facebook
याबद्दल बोलताना डॉक्टर आणि पोषण सल्लागार अरुण कुमार सांगतात, "या अभ्यासात सहभागी झालेल्या सगळ्यांचा 14 प्रश्नांचा एक सर्व्हे घेण्यात आला.. त्यांना विचारलं गेलं की ते कोणतं तेल वापरतात, साधारण किती प्रमाणात वापरतात आणि ते बाहेरचे पदार्थ खातात का? अशा प्रकारचे काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांची एकदा कोलेस्ट्रॉल चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या उत्तरांच्या आधारे या आकडेवारीची तुलना केली गेली."
ते म्हणतात, "या अभ्यासाचा पाया फक्त इतकाच आहे की, ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यातले किती लोक कोणतं तेल वापरतात. खरंतर, या संशोधनात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही तपासायला हवी होती की, यामुळे हार्ट अटॅकच्या घटना कमी होतात की नाही. पण या अभ्यासात त्याची तपासणीच केलेली नाही."
खोबऱ्याचं तेल आणि तुपातही अनसॅच्युरेटेड फॅट
आपण आपल्या आहारात असलेल्या फॅट्सचं साधारणपणे दोन गटांत वर्गीकरण करू शकतो - 'सॅच्युरेटेड फॅट' आणि 'अनसॅच्युरेटेड फॅट'.
अनसॅच्युरेटेड फॅटचेही पुन्हा दोन प्रकार आहेत :
- मोनोअनसॅच्युरेटेड फॅट
- पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट
खोबरेल तेल, तूप, लोणी आणि पाम ऑईलमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं.
उदाहरणार्थ - तुपामध्ये 60-65% सॅच्युरेटेड फॅट, 20-25% मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, 3-4% पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि काही जीवनसत्त्वं असतात.
तर खोबरेल तेल 100% फॅटने बनलेलं असतं ज्यामध्ये 80-90% सॅच्युरेटेड फॅट असतं.
काही अभ्यासांतून हे स्पष्ट झालं आहे की, 'सॅच्युरेटेड फॅट'चं जास्त प्रमाणात सेवन केल्यास एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.

डॉ. मोहन सांगतात, "या सॅच्युरेटेड फॅट्समध्ये कोलेस्ट्रॉल वाढवण्याची क्षमता नक्कीच असते."
त्याऐवजी ते शेंगदाणा तेल आणि तिळाच्या तेलात असलेलं 'मोनोअनसॅच्युरेटेड फॅट' हा एक उत्तम पर्याय असल्याचं सांगतात.
ते पुढे म्हणतात, "यामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर शेंगदाण्याचं तेल आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तिळाचं तेल येतं. या दोन्ही तेलांमध्ये प्रामुख्याने मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असतं. हे फॅट शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल वाढवतं."
ते पुढे सांगतात, "जर तुम्ही भारताच्या उत्तर आणि पूर्व भागांत गेलात, तर तिथे मोहरीचं तेल वापरलं जातं. यामध्येही जवळपास शेंगदाणा तेलाइतक्याच प्रमाणात 'मोनोअनसॅच्युरेटेड फॅट' असतं. तिथले लोक हेच तेल वापरतात."
तसंच "सूर्यफूल तेल आणि करडईचं तेल हे 'पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट'च्या गटात येतात. या तेलांमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं, यात कोणतीही शंका नाही."
'खोबरेल तेल चांगलं कोलेस्ट्रॉलही वाढवतं'
डॉ. अरुण कुमार सांगतात, "सॅच्युरेटेड फॅटमुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल थोडं वाढू शकतं. पण त्यासोबतच शरीरात इतर काही सकारात्मक बदलही घडू शकतात. ते कोलेस्ट्रॉल थोडं वाढवत असलं तरी एचडीएल म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉलही वाढवतं."
ते पुढे सांगतात, "त्याचप्रमाणे तुपात असलेले 'शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड्स' पोटात शोषले जातात आणि त्यातून आरोग्याला काही फायदेही मिळतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलमध्ये किंचित वाढ झाली या एकाच आधारावर, यामुळे थेट हार्ट अटॅकचा धोका वाढतो असा निष्कर्ष काढू नये."
2020 मध्ये 'सर्कुलेशन' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात खोबरेल तेलाशी संबंधित 16 क्लिनिकल अभ्यासांच्या निकालांचं एकत्रित विश्लेषण करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
यामध्ये असं आढळून आलं की, इतर वनस्पती तेलांच्या तुलनेत खोबरेल तेल वापरणाऱ्यांमध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी सरासरी 10.47 mg/dL ने वाढली होती. तर एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी 4 mg/dL ने वाढली होती.
त्याचप्रमाणे 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका 'कोक्रेन रिव्ह्यू'मध्ये सॅच्युरेटेड फॅटचं सेवन कमी केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो का, याची तपासणी करण्यात आली.
या समीक्षेत 15 अभ्यासांतील 56,000 हून अधिक लोकांच्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं.
यामध्ये असं दिसून आलं की, सॅच्युरेटेड फॅटचं सेवन कमी केल्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकसह हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित एकूण आजारांच्या घटनांमध्ये 17 टक्क्यांनी घट झाली. मात्र एकूण मृत्युदरात कोणताही लक्षणीय बदल दिसून आला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
एलडीएल कोलेस्ट्रॉलचं महत्त्व काय आहे?
एलडीएल हा रक्तातील कोलेस्ट्रॉल शरीराच्या विविध पेशींपर्यंत पोहोचवणारा एक प्रकारचा 'लिपोप्रोटीन' कण आहे.
आपल्या शरीरातील पेशींचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी कोलेस्ट्रॉल गरजेचं असतं. पेशींचं बाह्य आवरण तयार करण्यासाठी आणि काही हार्मोन्सच्या निर्मितीसाठी याची आवश्यकता असते.
मात्र जेव्हा रक्तामध्ये एलडीएल कणांचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं तेव्हा ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर चरबी जमा होण्यास (प्लेक तयार होण्यास) कारणीभूत ठरू शकतात. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयाकडे होणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो.
यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
2017 मध्ये 'युरोपियन हार्ट जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'युरोपियन एथेरोस्क्लेरोसिस सोसायटी'च्या एका शोधनिबंधाने विविध पुराव्यांच्या आधारे एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकारांमध्ये संबंध असल्याचं स्पष्ट केलं होतं.
स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरणं सगळ्यात चांगलं?
जागतिक आरोग्य संघटनेने 2023 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही व्यक्तीच्या रोजच्या एकूण कॅलरीजमध्ये 'सॅच्युरेटेड फॅट'चं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावं.

फोटो स्रोत, Getty Images
WHO च्या मते, चरबीयुक्त मांस, लोणी, खोबरेल तेल, तूप आणि प्राणिजन्य चरबीमध्ये असलेल्या 'सॅच्युरेटेड फॅट'च्या तुलनेत मासे, ॲव्होकाडो, सुका मेवा तसंच सूर्यफूल, सोयाबीन, कॅनोला आणि ऑलिव्ह ऑईलमध्ये असलेलं 'अनसॅच्युरेटेड फॅट' खाणं जास्त चांगलं असतं.
डॉ. मोहन सांगतात, "तेल खरेदी करताना 'मोनोअनसॅच्युरेटेड फॅट' असलेल्या शेंगदाणा आणि तिळाच्या तेलाचा पर्याय निवडता येऊ शकतो. त्यासोबतच तेलाचा वापर कमी प्रमाणात करणंही तितकंच महत्त्वाचं आहे."
ते पुढे सांगतात, "पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असलेल्या सूर्यफूल तेलाचाही गरजेनुसार वापर केला जाऊ शकतो. जिथवर शक्य असेल तिथे पाम ऑईलसारख्या तेलांऐवजी इतर पर्याय निवडणं जास्त चांगलं ठरतं."
तेल वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या
डॉ. मोहन असाही सल्ला देतात की, तेलात तळलेले किंवा जास्त तेलकट पदार्थ अतिप्रमाणात खाणं आणि एकच तेल वारंवार गरम करून वापरणं टाळलं पाहिजे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय पोषण संस्थेनेही आपल्या आहाराविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या गोष्टीवर विशेष भर दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "तेल वारंवार गरम केल्याने त्यामध्ये 'ऑक्सिडेशन'ची प्रक्रिया होते आणि त्यातून असे घटक तयार होऊ शकतात जे शरीरासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे गरजेपुरतंच तेल वापरा आणि जर तेल उरलं तर ते पुन्हा वापरण्याऐवजी टाकून द्या."
डॉ. अरुण कुमार यांचं म्हणणं आहे की, तेलाच्या निवडीसोबतच आपण आपल्या एकूणच आहारपद्धतीवर आणि जीवनशैलीवरही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























