पाकिस्तानी मालिका 'दर-ए-निजात'वरून भारतात वाद पेटल्याचे नेमके प्रकरण काय?

पाकिस्तानी ड्रामा ‘दर-ए-निजात’वरून भारतात वाद का?
    • Author, झोया मतीन
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

बुधवारपर्यंत बंगळुरूमधील काही टीव्ही शोप्रेमींच्या वीकेंडच्या प्लॅनमध्ये एका गोष्टीचा समावेश होता. उत्तम डिनरसह पाकिस्तानी टीव्हीवरील एका अत्यंत लोकप्रिय जोडीच्या (रील लाइफमधील) आयुष्यात पुढे काय घडणार आहे, हे जाणून घेण्यासाठी ते एकत्र येणार होते.

पण मग जिओ पॉलिटिक्स आडवं आलं.

पाकिस्तानी टीव्ही ड्रामा 'दर-ए-निजात' (मुक्तीचं दार) यांच्या दोन खासगी स्क्रीनिंग्ज रद्द करण्यात आले. भारतात हा शो सोशल मीडियावर मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. ऑनलाइन विरोध आणि पोलिसांच्या चौकशीनंतर हे कार्यक्रम रद्द करण्यात आले.

ही मालिका पाकिस्तानमधील एआरवाय डिजिटल वाहिनीवर प्रसारित होते. भारतातील प्रेक्षक काही यूट्यूब चॅनेलवर ती पाहू शकतात, मात्र वाहिनीचं अधिकृत यूट्यूब चॅनेल भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे.

भारतात पाकिस्तानी मालिकांची मागणी पुन्हा वाढताना दिसत आहे, अशावेळी हा वाद पुढे आला आहे.

मात्र, गेल्या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या तीव्र लष्करी संघर्षानंतर सांस्कृतिक देवाणघेवाण अजूनही संवेदनशील विषय मानली जाते.

गेल्या आठवड्यात दिल्लीतही असाच एक कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये मालिकेशी संबंधित प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आणि दिग्दर्शकाशी ऑनलाइन संवादाचाही समावेश होता. या कार्यक्रमावरून सोशल मीडियावर आधीच चर्चा सुरू झाली होती.

बंगळुरूमध्ये एक स्क्रीनिंग शनिवारी एका रेस्टॉरंटमध्ये होणार होतं. त्यासाठी माफक शुल्क आकारण्यात येणार होतं आणि फारसी व अरबी जेवणासोबत मालिकेचे दोन भाग दाखवले जाणार होते.

दुसरं स्क्रीनिंग एका खासगी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. ते फक्त कुटुंबीयांसाठी होतं. त्यामध्ये पाहुण्यांना त्यांच्या "सर्वात आकर्षक पाकिस्तानी पोशाखात" येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

कार्यक्रमाची जाहिरात करणारे पोस्टर्स सोशल मीडियावर पसरू लागल्यानंतर अनेक यूझर्सने अशा कार्यक्रमांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही केली. त्यानंतर हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले.

पाकिस्तानी ड्रामा ‘दर-ए-निजात’वरून भारतात वाद का?
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशन (AICWA) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नेटफ्लिक्सच्या आगामी पाकिस्तानी मालिकेचं, 'जो बचे हैं संग समेट लो', भारतातील प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे.

या मालिकेत फवाद खान, माहिरा खान, सनम सईद आणि भारतात मोठा चाहता वर्ग असलेले इतर कलाकार आहेत. ही पाकिस्तानची पहिली नेटफ्लिक्स ओरिजिनल मालिका आहे. तिचा जागतिक प्रीमियर 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

मंगळवारी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात AICWA ने म्हटलं की, ही मालिका भारतात प्रदर्शित करणं म्हणजे दहशतवादी हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं ठरेल.

भारत दीर्घकाळापासून पाकिस्तानवर सीमेपार दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत आला आहे. पाकिस्तान हे आरोप फेटाळत आला आहे.

AICWA ने भारतात पाकिस्तानी मनोरंजनविषयक सामग्रीवर बंदी घालण्यासाठी कायमस्वरूपी कायदा करण्याची मागणीही केली आहे. ही मालिका भारतातील सदस्यांसाठी उपलब्ध होईल की नाही, याबद्दल नेटफ्लिक्सने अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.

या घडामोडींमुळे भारतातील एक जुनी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पाकिस्तानसोबतचे सांस्कृतिक संबंध आणि राजकीय मतभेद हे वेगळे ठेवता येऊ शकतात का, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

पाकिस्तानातही भारतीय कंटेंटवर बंदी

भारत आणि पाकिस्तान यांचा सामायिक सांस्कृतिक वारसा अतिशय समृद्ध आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अनेकदा तणावपूर्ण राहिले आहेत.

आणि राजकीय तणावाचा परिणाम सर्वप्रथम सांस्कृतिक देवाणघेवाणीवरच झाला आहे. अनेक पाकिस्तानी गझलगायकांना भारतात मोठा चाहता वर्ग लाभला आहे, पण अनेकदा त्यांना येथे कार्यक्रम करता आले नाहीत.

दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले भारतीय चित्रपट तेथील चित्रपटगृहांतून गायब झाले. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काहीशी सुधारणा झाली, तेव्हा कलाकारांनी एकत्र काम केलं. मात्र तणाव वाढला की हे सहकार्य पुन्हा खंडित झालं.

2010 च्या सुरुवातीच्या दशकात परिस्थिती तुलनेने चांगली होती. पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम आणि राहत फतेह अली खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आवाजांपैकी होते.

2014 मध्ये झिंदगी वाहिनी सुरू झाली. तिच्या माध्यमातून पाकिस्तानी मालिका भारतीय घरांपर्यंत पोहोचल्या. या मालिकांमधील भाषा आणि भावविश्व भारतीय प्रेक्षकांना आपलंसं वाटलं. मात्र दैनंदिन आयुष्य दाखवण्याची त्यांची शैली वेगळी आणि ताजी वाटली.

2016 पर्यंत फवाद खान बॉलिवूडमधील काही मोठ्या चित्रपटांमध्ये झळकू लागले होते. मात्र त्याचवर्षी उरी येथे भारतीय सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यानंतर आणि 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर सांस्कृतिक सहकार्यासाठीची जागा कमी होत गेली.

या दोन्ही हल्ल्यांसाठी भारताने पाकिस्तानस्थित अतिरेकी संघटनांना जबाबदार धरलं होतं. पाकिस्तानने त्याच्याशी कोणताही संबंध असल्याचं सातत्याने नाकारलं आहे. पाकिस्ताननंही भारतीय मनोरंजन सामग्रीवर बंदी घातली.

फवाद खान
फोटो कॅप्शन, फवाद खान

अधिकृत सांस्कृतिक देवाणघेवाण कमी झाली असली तरी यूट्यूबच्या माध्यमातून पाकिस्तानी मालिका भारतातील नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहिल्या. त्याचवेळी म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममुळे दोन्ही देशांमधील संगीताचा प्रवासही सुरू राहिला.

मात्र गेल्या वर्षी घडलेल्या घटनांमुळे या अनौपचारिक नात्यावरही परिणाम झाला.

22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी 26 जणांची हत्या केली होती. यामध्ये बहुतेक पर्यटक होते. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानशी संबंधित अतिरेक्यांना जबाबदार धरलं. पाकिस्तानने हल्ल्यातील कोणतीही भूमिका नाकारली.

मे महिन्यात भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील अनेक ठिकाणांवर लष्करी हल्ले केले. भारताने दावा केला की तेथे दहशतवादी पायाभूत सुविधा होत्या.

त्यानंतर चार दिवस दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला. नंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.

या हल्ल्याबद्दल भारतात मोठा संताप व्यक्त होत होता. त्याच काळात सरकारने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना मूळची पाकिस्तानी असलेली सामग्री हटवण्यास सांगितलं. अनेक पाकिस्तानी कलाकारांची सोशल मीडिया खातीही ब्लॉक करण्यात आली.

फवाद खानच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित पुनरागमनाचाही प्रयत्न अयशस्वी ठरला. त्याचा 'अबीर गुलाल' हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली नाही. भारताच्या लष्करी कारवाईवर काही पाकिस्तानी कलाकारांनी केलेल्या टीकेमुळेही संताप आणखी वाढला.

'पाकिस्तानबाबतची उत्सुकता'

गेल्या वर्षातील बहुतांश काळात भारतीय प्रेक्षकांनी पडद्यावर पाकिस्तानकडे मुख्यतः राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं.

डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला आदित्य धर यांचा हेरगिरीवर आधारित थ्रिलर चित्रपट 'धुरंधर' ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर कराचीतील गँगस्टर, हेर आणि राजकीय घडामोडींबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली.

मात्र गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानबाबतची एक वेगळी उत्सुकता पुन्हा दिसू लागली आहे.

'अल्फाझ' सारखी पाकिस्तानी गाणी भारतीय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहेत. तर लग्न, प्रेमभंग आणि कौटुंबिक आयुष्याची कथा मांडणारा 'दर-ए-निजात' भारतीय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

प्रख्यात उर्दू कादंबरीकार उमेरा अहमद यांनी या मालिकेची कथा लिहिली आहे. यात जरयाब (दुरेफिशान सलीम) आणि अबू बकर (शेहेरयार मुनव्वर) यांच्या वैवाहिक आयुष्याची कथा दाखवली आहे. जरयाब ही प्रेमातील फसवणुकीतून सावरण्याचा प्रयत्न करणारी तरुणी आहे. तर अबू बकर हा अतिशय धार्मिक स्वभावाचा व्यक्ती आहे.

या मालिकेत श्रद्धा आणि पश्चात्ताप यांसारखे प्रश्नही उपस्थित केले गेले आहेत. मात्र अबू बकरचं आपल्या पत्नीवरील प्रेम आणि त्याचा संवेदनशील स्वभाव प्रेक्षकांना विशेष आवडला आहे. आजकाल प्रेम आणि नातेसंबंधांच्या भाषेत याला मोठी प्रशंसा मानली जाते. लोक त्याला 'ग्रीन फ्लॅग' म्हणतात.

याच ड्रामाबद्दलच्या उत्सुकतेमुळे बंगळुरूमधील एका स्क्रीनिंगच्या आयोजकाला त्यांच्या अपार्टमेंट संकुलातील खासगी थिएटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत छोटेखानी स्क्रीनिंग करण्याची त्यांची योजना होती. मात्र त्याचं निमंत्रण एक्सवर पोहोचल्यानंतर लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला.

त्या म्हणाल्या, "माझ्या कुटुंबातील सदस्य विचारत होते की, आपण हा कार्यक्रम रद्द का करावा?"

मात्र अखेरीस त्यांनी तो कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.