जगापासून अलिप्त राहणारे ॲमेझॉनचे 'आवा' आदिवासी अचानक जंगलातून आले बाहेर

दशकानुदशकं सुरू असलेली बेसुमार जंगलतोड आणि खाणकामामुळे ब्राझीलच्या 'आवा' आदिवासींवर आपला हक्काचा परिसर सोडण्याची वेळ आली आहे.
फोटो कॅप्शन, दशकानुदशकं सुरू असलेली बेसुमार जंगलतोड आणि खाणकामामुळे ब्राझीलच्या 'आवा' आदिवासींवर आपला हक्काचा परिसर सोडण्याची वेळ आली आहे.
    • Author, व्हॅलेंटिना ओरोपेसा
    • Role, बीबीसी न्यूज मुंडो
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

बाह्य जगाशी कोणताही संबंध नसलेल्या, ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलातील एका अलिप्त आदिवासी समूहाचा ते भाग होते. अमाकारिया, जकारेविज आणि इराहोवा हे तिघे ईशान्य ॲमेझॉनमधील त्यांच्या मूळ परिसरात शिकार, मासेमारी आणि जंगलातील फळं आणि मध गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवायचे.

मात्र एक दिवस जंगलात झाडं कापणाऱ्या मशीन्सचा आवाज घुमला आणि हे तिघे घाबरून जंगलाच्या आतील भागात पळून गेले. अमाकारिया आणि जकारेविज या सख्या बहिणी होत्या, तर इराहोवा हा जकारेविज यांचा मुलगा आहे. यानंतर कित्येक वर्षं ते बाह्य जगापासून पूर्णपणे तुटलेले राहिले. पण इकडे जंगलात लाकूडतोड करणारे, बाहेरून येऊन स्थायिक होणारे लोक आणि पशुपालकांचा वावर आणि घुसखोरी दिवसेंदिवस वाढतच गेली.

हळूहळू या तिघांना जंगलात एकट्याने राहणं अशक्य होऊ लागलं. नाईलाजाने अखेर त्यांना बाह्य जगाच्या संपर्कात असलेल्या एका दुसऱ्या आदिवासी समूहाचा आधार घ्यावा लागला.

आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या 'सर्व्हायव्हल ब्राझील' या संस्थेच्या संचालिका सारा शेंकर सांगतात की, जंगलात राहत असतानाच अमाकारिया, जकारेविज आणि इराहोवा यांना श्वसनाचे आजार, ताप आणि टीबीने ग्रासलं होतं. ते इतके अशक्त झाले होते की त्यांच्यात शिकार करण्याचं त्राणही उरलं नव्हतं. ज्या समूहाने या तिघांना आपल्यात सामावून घेतलं होतं तिथे जाऊन शेंकर यांनी 2015 च्या अखेरीस त्यांची भेट घेतली होती.

त्या दिवसांची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, "ते तिघे एकटेच होते. त्यांच्यासाठी शिकार करून आणायला किंवा त्यांना खायला-प्यायला मदत करायला तिथे दुसरं कोणीच नव्हतं."

जंगल का सोडावं लागलं?

अमाकारिया, जकारेविज आणि इराहोवा यांना आपलं मूळ ठिकाण का सोडावं लागलं, याचं उत्तर 'ग्रेट कराजास' प्रकल्पात दडलं आहे.

या प्रकल्पाअंतर्गत 'आवा' आदिवासींच्या जमिनीच्या अगदी मध्यभागी जगातील सर्वात मोठ्या खाण प्रकल्पांपैकी एक प्रकल्प उभारला जाणार होता.

1980 च्या दशकात सुरू झालेल्या या प्रकल्पात जगातील सर्वात मोठी लोहखनिजाची खाण सुरू होणार होती. तसेच खाणीतील खनिज बाहेर वाहून नेण्यासाठी तिथे रेल्वे मार्ग टाकणं आणि घनदाट जंगलातून रस्त्यांचं जाळं उभारणं अशा मोठ्या कामांची आखणी करण्यात आली होती.

'लाकूडतोड करणारे त्यांचा जीव घेतील'

आवा आदिवासींचा अभ्यास करणारे संशोधक शक्यतो त्यांच्याशी थेट संपर्क साधणं टाळतात. शेंकर यांच्या मते, बाह्य जगापासून दूर राहणं हा या आदिवासींचा स्वतःचा निर्णय आहे. त्यामुळे त्यांच्या या इच्छेचा आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याच्या त्यांच्या अधिकाराचा मान राखला जातो.

पण या वेळी इराहोवा यांनी स्वतः पुढे येऊन त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं. 'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल'ने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या 'रेझिस्टिंग टू एक्झिस्ट: द ग्लोबल स्ट्रगल ऑफ इंडिजिनस पीपल्स इन आयसोलेशन' या अहवालात त्यांचं हे म्हणणं समाविष्ट करण्यात आलं आहे.

"आम्ही खूप घाबरलो होतो. आम्ही अशा एका ठिकाणी अडकलो होतो जिथून कुठेच बाहेर पडता येत नव्हतं," असं इराहोवा म्हणाले.

अखेर दुसऱ्या एका आदिवासी समूहातील लोकांनी अमाकारिया, जकारेविज आणि इराहोवा यांना शोधून काढलं.

आगीमुळे बेचिराख झालेल्या आपल्याच जंगलात उभा असलेला 'आवा' समुदायातील हेमोकोमाआ हा तरुण.
फोटो कॅप्शन, आगीमुळे बेचिराख झालेल्या आपल्याच जंगलात उभा असलेला 'आवा' समुदायातील हेमोकोमाआ हा तरुण.

त्या समूहातील एका व्यक्तीने 'सर्व्हायव्हल'च्या तज्ज्ञांना तेव्हाची परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, "लाकूडतोड करणाऱ्यांनी त्यांना सगळ्या बाजूंनी घेरलं होतं. आसपास झाडं कापणाऱ्या मशीन्सचा मोठा आवाज येत होता."

"लाकूड बाहेर नेण्यासाठी ट्रॅक्टरने वाटा तयार केल्या जात होत्या. जी झाडं तोडायची होती, त्यावर खुणा करून ठेवल्या होत्या. आम्ही त्यांना म्हटलं, 'आमच्याबरोबर चला, नाहीतर लाकूडतोड करणारे तुमचा जीव घेतील.' हे ऐकल्यानंतर ते आमच्यासोबत निघून आले."

हत्या आणि नरसंहारातून वाचलेले लोक

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमाकारिया, जकारेविज आणि इराहोवा यांची त्या आदिवासी समुदायाशी भेट होऊन 11 वर्षं उलटल्यानंतर ब्राझीलच्या मारान्याव भागातून अशीच आणखी एक घटना समोर आली.

16 नोव्हेंबरला 'आवा' समुदायातील 20 जण अरारिबोया आदिवासी क्षेत्रातील एका सुरक्षा छावणीत दाखल झाले. ही छावणी ब्राझीलच्या राष्ट्रीय आदिवासी संस्था 'फुनाई'कडून चालवली जाते.

आतापर्यंत जंगलात बाहेरच्या जगापासून दूर राहिलेले हे 'आवा' आदिवासी तवारी गावातील 'गुआजाजारा' म्हणजेच टेनेटेहार समुदायाच्या संपर्कात आले आहेत.

गुआजाजारा समुदायातील लोकांनी त्यांना खाण्यासाठी कंदमुळे दिल्याचं 'सर्व्हायव्हल' संस्थेने म्हटलं आहे. ही बातमी चिंता वाढवणारी असल्याचं मत शेंकर यांनी व्यक्त केलं आहे.

"हे चित्र खूप चिंताजनक आहे. आम्हाला अशी वेळ कधीच आलेली नको होती," असं त्या म्हणाल्या.

शेंकर सांगतात की, आज जंगलात बाह्य जगापासून दूर राहणारे हे आवा आदिवासी म्हणजे दशकानुदशकं आपल्याच समुदायावर झालेल्या हल्ल्यांतून आणि नरसंहारातून कसेबसे बचावलेले लोक आहेत.

"त्यांचं रोजचं जगणं आणि हे जंगल यांचा थेट संबंध आहे. हा जिव्हाळा समजून घेतल्याशिवाय त्यांच्या समस्या कळू शकत नाहीत. कारण त्यांचं संपूर्ण अस्तित्वच या जंगलावर टिकून आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"त्यांचं अन्न, पाणी, औषधं आणि आध्यात्मिक जीवन, सगळंच या जंगलावर अवलंबून आहे. ते एकाच ठिकाणी कायमचे राहत नाहीत. जंगलात फिरत राहून शिकार करणं आणि खाण्यायोग्य गोष्टी गोळा करणं, यावर त्यांचं जगणं सुरू असतं."

पण जंगलं सातत्याने कापली जात आहेत. शेंकर यांच्या सांगण्यानुसार, झाडं तोडल्यामुळे जंगलात कोरडे भाग तयार होत आहेत आणि त्यामुळे तिथे आग लागण्याचा धोका वाढला आहे.

सारा शेंकर ब्राझीलमध्ये कार्यरत असलेल्या 'सर्व्हायव्हल' संस्थेच्या संचालक आहेत.
फोटो कॅप्शन, सारा शेंकर ब्राझीलमध्ये कार्यरत असलेल्या 'सर्व्हायव्हल' संस्थेच्या संचालक आहेत.

अलीकडच्या वर्षांत ॲमेझॉनच्या जंगलात कोरड्या ऋतूमध्ये अशा आगीच्या घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं.

या आगीचा फटका फक्त झाडांनाच बसत नाही, तर आवा आदिवासींच्या शिकारीवरही याचा मोठा परिणाम होतो.

शेंकर सांगतात, "आवा आदिवासी ज्या प्राण्यांची शिकार करतात ते प्राणी झाडं उरली नसल्यामुळे एकतर मरून जातात किंवा दुसरीकडे निघून जातात."

"ज्या भागांत मोठ्या प्रमाणावर बांधकामं सुरू आहेत तिथे शिकार करणं तर आणखीनच अवघड होऊन जातं."

या संकटाबद्दल आवा समुदायातील एका व्यक्तीने 20 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं.

2002 साली 'सर्व्हायव्हल' संस्थेने आवा समुदायातील 'टूओ' नावाच्या एका व्यक्तीचं म्हणणं नोंदवून घेतलं होतं.

ते म्हणाले होते, "पूर्वी आम्ही खूप प्राण्यांची शिकार करायचो. इथे मोठ्या प्रमाणात माकडं आणि हरणं होती. पण आता जंगलं कापली गेल्यामुळे खूपच कमी प्राणी शिल्लक राहिले आहेत."

"जर आमचा हा भागच शिल्लक राहिला नाही, तर जगणं खूप अवघड होऊन जाईल. आम्ही ज्या प्राण्यांची शिकार करतो, ते रोज आमच्यापासून आणखी लांब जात आहेत. त्यामुळे आमचं पुढे काय होणार, हेच मला कळत नाहीये."

"आम्ही आमच्या जमिनीसाठी नक्की लढू. आमची जमीन कोणालाही उद्ध्वस्त करू देणार नाही."

आजारी जकारेविज आराम करत असताना सारा शेंकर यांनी हा फोटो काढला होता. यानंतर जकारेविज यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
फोटो कॅप्शन, आजारी जकारेविज आराम करत असताना सारा शेंकर यांनी हा फोटो काढला होता. यानंतर जकारेविज यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

शेंकर यांनी असा इशारा दिला आहे की, शिकार मिळवण्यात येणाऱ्या या संकटाचा फटका फक्त आवा आदिवासींनाच बसतोय असं नाही, तर ज्या गुआजाजारा समुदायाने त्यांना आसरा दिला आहे त्यांच्यावरही हीच वेळ आली आहे. इतकंच नाही तर या दोन्ही समुदायांसमोर शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या टोळ्यांचा धोकाही उभा ठाकला आहे.

शेंकर सांगतात, "जर लाकूडतोड करणारे आणि बाहेरच्या जगापासून दूर राहणारे आवा आदिवासी जंगलाच्या एकाच भागात एकत्र आले, तर हे लाकूडतोडे त्यांच्याकडील हत्यारांनी आवा लोकांवर हल्ला करू शकतात."

"सध्या अशी कोणतीही घटना घडत आहे असं मी म्हणत नाही. पण लाकूडतोडीतून पैसे कमावणाऱ्या या टोळ्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आहेत. त्यामुळे हा धोका नक्कीच नाकारता येत नाही," असं त्या नमूद करतात.

बाहेरच्या लोकांच्या संपर्कामुळे आजारांचा धोका

जंगलाबाहेरच्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आता आवा आदिवासींना विविध आजारांची लागण होण्याचाही मोठा धोका आहे.

शेंकर सांगतात की, खूप वर्षं बाहेरच्या जगापासून दूर राहिल्यामुळे ज्या विषाणू किंवा जंतूंचा त्यांनी यापूर्वी कधीही सामना केलेला नाही, त्यांच्याशी लढण्याची ताकद त्यांच्या शरीरात नाही.

त्या सांगतात, "घुसखोरांना आवर घालण्यासाठी ठोस आणि सतत कारवाई होणं गरजेचं आहे. तसं झालं नाही, तर आवा आदिवासींना जिवंत राहणं कठीण होऊन बसेल."

ब्राझीलच्या प्रशासनानेही यावर काय म्हटलं?

ब्राझीलच्या प्रशासनानेही यावर आपली बाजू स्पष्ट केली आहे.

बाहेरच्या जगापासून दूर राहणाऱ्या आवा आदिवासींचं आयुष्य, आरोग्य आणि त्यांना स्वतःच्या जीवनशैलीचे निर्णय स्वतः घेण्याचा असलेला हक्क अबाधित ठेवणं, हीच आमची प्राथमिक जबाबदारी असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, सुरक्षेची पावलं उचलताना 3 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जाईल.

यामध्ये 'आवा' आदिवासींची जमीन वाचवणं, आरोग्याचे धोके टाळणं आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच्या त्यांच्या अधिकाराचा मान राखणं यांचा समावेश आहे.

जंगलात परतताना पावलांचे ठसेही पुसून टाकले

अमाकारिया आणि जकारेविज यांची प्रकृती खूपच खालावली होती, त्या दिवसांची आठवणही शेंकर सांगतात.

दोघींची अवस्था इतकी गंभीर झाली होती की, त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने मारान्याव राज्याच्या राजधानीत, म्हणजेच 'साओ लुइस'ला हलवावं लागलं.

तिथल्या रुग्णालयात उपचार घेऊन त्या बऱ्या झाल्या. यानंतर दोघींनी पुन्हा एकदा आपल्या जंगलात परत जाण्याचं ठरवलं तर इराहोवा मात्र त्यांना आसरा देणाऱ्या आदिवासी समूहासोबतच थांबले.

जंगलात परत जाताना कोणीही आपला शोध घेऊ नये यासाठी अमाकारिया आणि जकारेविज यांनी वाटेतील स्वतःच्या पावलांचे ठसेही मिटवून टाकले.

"जंगलात काही महिने काढल्यानंतर जकारेविज यांचा मृत्यू झाला आणि अमाकारिया पूर्णपणे एकट्या पडल्या. अखेर नाईलाजाने त्या पुन्हा त्याच आदिवासी समूहाकडे परतल्या," असं शेंकर यांनी सांगितलं. यानंतर मात्र एकट्याने राहण्यासाठी अमाकारिया पुन्हा कधीच जंगलात गेल्या नाहीत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)