मेंढपाळाला सापडलं सोनं; हजारो लोकांनी जमीन खोदायला केली सुरुवात, असं आहे प्रकरण

केनियातील एका गावात सोन्याचा शोध घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केनियातील एका गावात सोन्याचा शोध घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा होत आहेत.
    • Author, अकिसा वांडेरा
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

गेल्या काही आठवड्यांपासून पश्चिम केनियातील दुर्गम अशा चेपोरोर या गावामध्ये हजारो लोक सोन्याच्या शोध घेताना दिसत आहेत.

खरंतर, या सोन्याच्या शोधाची सुरुवात (गोल्ड रश) 33 वर्षीय मेंढपाळ मानसे लोमाचारने सोनं शोधून काढल्यानंतर झाली, असं सांगितलं जात आहे.

काही आठवड्यांपूर्वी लोमाचारला साधारण 3 ग्रॅम सोनं सापडलं होतं. त्याने ते 36 हजार केनियन शिलिंग म्हणजेच सुमारे 26600 रुपयांना विकले होते.

आता परिस्थिती अशी झाली आहे की, पूर्वी जिथे झाडं-झुडपं आणि कुरणं दिसायची, तिथे आता खड्डे आणि मातीचे ढिगारे दिसून येत आहेत.

मला सोनं सापडलं आणि त्यातून पैसे मिळाल्याची बातमी पसरल्यानंतर मोठ्या संख्येने लोक चेपोरोर गावात येऊ लागले, असं लोमाचारचं म्हणणं आहे.

मात्र, लोकांची ही गर्दी केवळ लोमाचारला सोनं सापडल्यामुळे झाली की या परिसरात अलीकडील काळात लागलेल्या शोधांचाही त्यात काही वाटा होता, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, एकदा तर इथे इतकी गर्दी वाढली होती की सुमारे 10 हजार लोक गावात आले होते.

थोडंसं सोनं मिळालं तरी आपलं आयुष्य बदलू शकतं, अशी आशा या लोकांना आहे. यातील अनेक लोक शेतीतून मिळणाऱ्या अनिश्चित उत्पन्नावर अवलंबून आहेत.

'इतकं सोनं मिळावं की, शाळेची फी भरता यावी'

या भागांत लोक कधीकधी सोन्याच्या शोधात नदीची वाळू चाळतात, परंतु त्यांच्या हाती फारच कमीवेळा काही सापडतं.

लोमाचार सांगतो की, त्याला हे सोनं योगायोगाने सापडलं. हरवलेल्या बकरीचा शोध घेत असताना त्याला नदीकाठी सोनं शोधणाऱ्या काही महिला दिसल्या.

"मीही त्यांच्यासोबत सोनं शोधू लागलो. अशाप्रकारे मला या भागात सोनं असल्याचं समजलं," असं तो म्हणाला.

शेजारच्या नापावोई गावातील शेतकरी आणि गुराखी पॅट्रिक लोकोलिया हाही आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करता यावी म्हणून थोडे जास्तीचे पैसे मिळवण्याच्या आशेनं सोन्याच्या शोधात सहभागी झाला आहे.

Caption- मोठ्या संख्येने लोक जमीन आणि दगडांमध्ये सोन्याचा शोध घेताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Edwin Naitale / BBC

फोटो कॅप्शन, मोठ्या संख्येने लोक जमीन आणि दगडांमध्ये सोन्याचा शोध घेताना दिसत आहेत.

"माझी मुलं शाळेत शिकतात. त्यांची फी भरणं माझ्यासाठी नेहमीच मोठी अडचण राहिली आहे," असं त्यानं बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.

तो चेल्सी फुटबॉल संघाचा जुना टी-शर्ट घालून सोनं शोधण्याच्या ठिकाणी उभा आहे.

18 वर्षांची अबीगेल चेलेंगट सांगते की, चेपोरोरला येण्यापूर्वी तिने कधीही सोन्यासाठी खोदकाम केलं नव्हतं.

ती जवळच्याच एका जिल्ह्यातून इथे आली आहे. तिला इतकं सोनं मिळावं, की स्वतःची शाळेची फी भरता यावी आणि लहान भावंडांचं शिक्षणही सुरू ठेवता यावं, अशी आशा आहे.

Caption- अबीगेल चेलेंगटला सोनं मिळावं आणि त्यातून तिला तिच्या शिक्षणाचा खर्च भागवता यावा, अशी आशा आहे.

फोटो स्रोत, Edwin Naitale / BBC

फोटो कॅप्शन, अबीगेल चेलेंगटला सोनं मिळावं आणि त्यातून तिला तिच्या शिक्षणाचा खर्च भागवता यावा, अशी आशा आहे.

तिच्या मागे शेकडो लोक एकत्र काम करत आहेत. ते कुदळ आणि फावड्याने दगड-मातीची जमीन खोदत आहेत.

काही लोक ती माती जवळच्या नदीकाठी घेऊन जातात. तिथे बहुतेक महिला गढूळ पाण्यात बसून माती चाळतात. त्यातून सोन्याचा एखादा छोटासा तरी कण मिळेल, अशी त्यांना आशा असते.

काही अनुभवी लोक खोल खड्ड्यांमध्ये उतरून माती खोदत आहेत, दगड फोडत आहेत. त्यांचाही उद्देश सोनं शोधणं हाच आहे.

वेस्ट पोकोट काउंटीचे डेप्युटी कमिश्नर सॅम्युअल कियारी यांच्या मते, दोन मोठ्या सोन्याच्या शोधांनंतर इथे सोनं शोधण्यासाठी लोकांची गर्दी सुरू झाली.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "काही तरुणांना तिथे मोठ्या प्रमाणात सोनं सापडलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच परिसरांत काही महिलांनाही मोठ्या प्रमाणात सोनं मिळालं."

कियारी सांगतात की, या नदीकाठी महिला अनेक वर्षांपासून थोडं-थोडं सोनं शोधत आहेत. यातून त्यांना आठवड्याला साधारण 8 ते 23 डॉलर (सुमारे 750 ते 2200 रुपये) मिळतात.

Caption- इथे आलेल्या काही लोकांनी याआधी कधीच सोनं शोधण्याचं काम केलं नव्हतं.
फोटो कॅप्शन, इथे आलेल्या काही लोकांनी याआधी कधीच सोनं शोधण्याचं काम केलं नव्हतं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

परंतु, ऑगस्टच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याचे वृत्त पसरल्यानंतर अनेक लोकांचं लक्ष या भागाकडे वेधलं गेलं.

कियारी यांचं असं मानणं आहे की, अफवा पसरत गेल्या तसं सोनं सापडल्याची बातमी आणि त्याचं प्रमाणही वाढवून सांगितलं जाऊ लागलं.

यामुळे जास्तीत जास्त लोक तिथे येऊ लागले. यातील अनेकांना सोनं शोधण्याचा फारसा अनुभव नव्हता, काहींना तर अजिबात अनुभव नव्हता. सोनं मिळेल या आशेनं ते तिथे आले होते.

सुरुवातीला मोठी गर्दी झाली होती. पण आता मात्र सोनं शोधणाऱ्यांची संख्या कमी होऊन सुमारे 2500 राहिली आहे. काही लोकांनी सोन्याचा शोध घेणं सोडून दिलं आहे.

या परिसरांत काही प्रमाणात सोनं सापडलं आहे, यात शंका नाही. परंतु, जमिनीखाली नेमकं किती सोनं आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय करता येईल का, याबाबत अजूनही प्रश्न कायम आहे.

डेप्युटी कमिश्नर सांगतात, "छोट्या प्रमाणावर सोन्याचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की, त्यांना दररोज सरासरी सुमारे 100 लोक भेटत होते."

परंतु, सापडलेली वस्तू खरंच सोनं होती की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही.

वेगवेगळ्या लोकांना सापडलेल्या सोन्याची किंमत काहीशे केनियन शिलिंगपासून सुमारे 78 हजार शिलिंग म्हणजेच साधारण 57 हजार 600 रुपयांपर्यंत होती, असं सांगितलं जातं.

Caption- मानसे लोमाचारला काही आठवड्यांपूर्वी साधारण 3 ग्रॅम सोनं सापडलं होतं. त्याने ते 36 हजार केनियन शिलिंग म्हणजेच सुमारे 26600 रुपयांना विकले होते.
फोटो कॅप्शन, मानसे लोमाचारला काही आठवड्यांपूर्वी साधारण 3 ग्रॅम सोनं सापडलं होतं. त्याने ते 36 हजार केनियन शिलिंग म्हणजेच सुमारे 26600 रुपयांना विकले होते.

वेस्ट पोकोट काउंटीची सीमा युगांडाला लागून आहे. दोन्ही देशांच्या सीमेवरील लोकांचे एकमेकांशी अनेक वर्षांपासून सामाजिक आणि कौटुंबिक संबंध आहेत.

पूर्व युगांडातील बुसिया येथे राहणारे मुगिशा गॉडफ्रे हा लहान प्रमाणावर खाणकाम करतो. मित्राकडून सोनं सापडल्याचं ऐकल्यानंतर तो चेपोरोरला आला.

त्याने लगेच चेपोरोर गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचण्यासाठी त्याला सुमारे 1 लाख युगांडाई शिलिंग म्हणजेच 2500 रुपये इतका खर्च आला.

पण, चेपोरोरमध्ये राहण्याची परिस्थिती चांगली नाही, असं त्याचं म्हणणं आहे.

गॉडफ्रेने बीबीसीला सांगितलं, "आम्ही झाडांखाली झोपतो आणि सकाळ होताच कामाला लागतो. कधी-कधी आम्ही रात्रंदिवस काम करतो."

अजूनपर्यंत त्याला काहीही सोनं सापडलेलं नाही. पण, त्याने अजूनही आशा सोडलेली नाही.

तो म्हणतो, "काहीतरी सापडल्याशिवाय आम्ही परत जाऊ शकत नाही. आम्हाला आवश्यक असलेली गोष्ट मिळाल्यावरच आम्ही घरी परतू."

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, लैंगिक हिंसाचाराची भीती

सोन्याच्या शोधासाठी जमलेल्या गर्दीमुळे काही लोकांना खोदकाम न करताही पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भागात 200 हून अधिक दुकाने आणि छोटे व्यवसाय सुरू झाले आहेत. या दुकानांतून गावात आलेल्या लोकांना अन्न, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू विकल्या जात आहेत.

शेजारच्या बारिंगो काउंटीमधून आलेल्या आयरीन अमेजा ही लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू विकत आहेत. ती बाटलीबंद पाणी, थंड पेये, ब्रेड, दूध आणि इतर खाद्यपदार्थ विकते.

ती म्हणते, "मला आशा आहे की, मी इथून निघताना इतके पैसे कमावलेले असेन, की मी माझा व्यवसाय पुढे सुरू ठेवू शकेन आणि तो वाढवू शकेन."

पण, या परिसरात आवश्यक सुविधांची कमतरता असल्याचंही समोर आलं आहे.

Caption- सप्टेंबरमध्ये शाळा सुरू झाल्यावर मुलं इथे राहू नयेत, हा अधिकाऱ्यांचा उद्देश आहे.

फोटो स्रोत, Edwin Naitale / BBC

फोटो कॅप्शन, सप्टेंबरमध्ये शाळा सुरू झाल्यावर मुलं इथे राहू नयेत, हा अधिकाऱ्यांचा उद्देश आहे.

आयरीन म्हणते, "हे जंगल आहे आणि आम्ही डोंगराळ भागात आहोत. आमच्याकडे पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, अगदी आंघोळीसाठीही पाणी नाही."

ती पुढे सांगते की, अंधार पडल्यानंतर महिलांसाठी अडचणी आणखी वाढतात. "राहण्यासाठी सुरक्षित जागा शोधावी लागते, कारण इथे बहुतांश लोक पुरुष आहेत."

स्थानिक अधिकारी मान्य करतात की, इतक्या मोठ्या संख्येनं लोक आल्यामुळे या भागावर मोठा ताण पडला आहे. इथे सोयीसुविधा कमी आहेत, नळाचं पाणी नाही आणि स्वच्छतेची व्यवस्थाही मर्यादित आहे.

लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

लैंगिक हिंसाचाराची शक्यता आणि महिला-मुलींच्या सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन सुरक्षा गस्तही वाढवण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Caption- सोन्याचा शोध सुरू असतानाच काही लोक आणखी खोल खड्डे खोदत आहेत.

फोटो स्रोत, Edwin Naitale / BBC

फोटो कॅप्शन, सोन्याचा शोध सुरू असतानाच काही लोक आणखी खोल खड्डे खोदत आहेत.

अधिकारी याबाबतही चिंतेत आहेत की, सप्टेंबरमध्ये शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. पण, येणाऱ्या दिवसांत मुलंही सोन्यासाठी खोदकामात गुंतली जाऊ शकतात.

शाळा सुरू झाल्यानंतर मुलांनी या ठिकाणी थांबू नये, यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत.

जे लोक अजूनही सोनं शोधत आहेत, ते आता आणखी खोल खड्डे खोदू लागले आहेत.

खोदकामातून निघालेली माती आणि दगड भरलेले अनेक ट्रक जवळच्या ओर्टुम शहरात पाठवण्यात आले आहेत. तिथे त्यांची तपासणी केली जाणार आहे. अधिकारी या तपासणीच्या निकालाची वाट पाहत आहेत.

तोपर्यंत इथे नेमकं किती सोनं आहे आणि त्यातून किती कमाई होऊ शकते, हे स्पष्ट होणार नाही.

लोमाचारच्या मते, सोन्याचं खोदकाम बंद करणं हा उपाय नाही. त्याऐवजी ते योग्य आणि अधिक चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे.

त्याला वाटतं की, सरकारने स्थानिक खाणकाम करणाऱ्या लोकांना मदत करावी, जेणेकरून ते सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने सोनं शोधून काढू शकतील.

तो म्हणतो, "आम्ही मेटल डिटेक्टरसारख्या साधनांसाठी सरकारकडे मदत मागू. त्यामुळे इथे आणखी काही खनिजं आहेत का, हे शोधता येईल आणि आम्हाला पुढे काम करता येईल."

जवळच्या घरांकडे बोट दाखवत तो या परिसरातील गरिबी अधोरेखित करतो.

तो म्हणतो, "आजूबाजूला पाहिलं तर क्वचितच एखाद्या घरावर लोखंडी पत्र्याचं छप्पर दिसेल. बहुतांश घरं केवळ गवताची छपरं असलेल्या झोपड्याच आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)