'कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म मीम मधून झाला असला तरी ही मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते' : योगेंद्र यादव

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

भारतीय राजकारणाला एक वेगळं आणि विचित्र प्रतीक मिळालं आहे, झुरळ किंवा सध्या चर्चेत असलेल्या भाषेत कॉक्रोच. गेल्या आठवड्यात भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर अचानक कॉक्रोच चर्चेत आलं.

एका सुनावणीदरम्यान त्यांनी पत्रकारिता आणि सामाजिक कार्याकडे वळणाऱ्या बेरोजगार तरुणांची तुलना झुरळ आणि परजीवींशी केली.

पण नंतर त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांचं हे वक्तव्य भारतातील सर्वच तरुणांबद्दल नव्हे तर प्रामुख्याने 'बनावट आणि निरर्थक डिग्री' असलेल्या लोकांसाठी होतं.

पण तोपर्यंत हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं होतं. त्यामुळे लोकांमध्ये राग, विनोद आणि एक मजेशीर राजकीय कल्पना असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचा (सीजेपी) जन्म झाला होता.

सीजेपी कोणताही अधिकृत राजकीय पक्ष नाही, तर राजकारणावर उपहास करणारी ही एक ऑनलाइन चळवळ आहे.

या पक्षाचा सदस्य होण्यासाठी काही अटी आहेत. बेरोजगार असणे, आळशी असणे, सतत ऑनलाइन राहणे आणि 'व्यावसायिक पद्धतीने आपला राग व्यक्त करता येणे' यांचा समावेश आहे.

इन्स्टाग्रामवर 5 दिवसांत याचे 1.7 कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले. ही कल्पना अभिजीत दीपके यांनी सुरू केली आहे. ते राजकीय संवाद रणनीतीकार असून बोस्टन युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत.

अभिजीत यांच्या मते ही कल्पना सुरुवातीला केवळ एक विनोद म्हणून समोर आली होती. परंतु, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांना मात्र हा निव्वळ विनोद वाटत नाही.

'हुकूमशाही राजवटींना विनोदांची भीती असते'

योगेंद्र यादव म्हणाले की, "'कॉक्रोच जनता पार्टी' सोशल मीडियावर मीम म्हणून सुरू झाली, पण तो फक्त विनोद किंवा राग नाही. देशात एक अस्वस्थता आणि संताप जाणवत आहे, कारण व्यवस्थेतील अनेक संधी आणि मार्ग बंद झाले आहेत."

"अनेक वेळा विनोद हे खोलवरच्या वेदनांशी जोडलेले असतात, त्यामुळे याकडे फक्त विनोद म्हणून त्याचे विश्लेषण करता येत नाही. सरकारने यावर बंदी घातली, तर ते एक मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते."

ते असं म्हणतात की, जेव्हा एखादे सरकार संस्थांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवते आणि आपली पूर्ण सत्ता स्थापन करते, तेव्हा बंड किंवा विरोध अनपेक्षित ठिकाणांहून उभा राहतो.

"1971 मध्ये इंदिरा गांधींच्या प्रचंड विजयानंतर 1974 मध्ये जयप्रकाश आंदोलन सुरू झालं. 1980 मध्ये राजीव गांधींना प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर 1983 मध्ये आसाम आंदोलन उभं राहिलं."

"2009 च्या विजयानंतर 2011 मध्ये अण्णा आंदोलन झालं आणि 2019 नंतर दोन वर्षांनी शेतकरी आंदोलन सुरू झालं. जेव्हा व्यवस्थेचे मार्ग बंद होतात, तेव्हा जनता एखादा नवा मार्ग शोधतेच."

सीजेपीच्या एक्स अकाउंटवर बंदी घालण्यात आली, याबाबत योगेंद्र यादव म्हणतात, "हुकूमशाही सरकारांना सर्वात जास्त भीती विनोदांची वाटते. जे सरकार विनोद सहन करू शकत नाही, ते स्वतःच एक विनोद बनतात. जर बंदी घातली नसती, तर कदाचित हा राग हळूहळू शांत झाला असता, पण आता ही गोष्ट अधिक दूरपर्यंत पसरत जाईल."

त्यांना असंही वाटतं की, ही विरोधी पक्षासाठी एक धोक्याची घंटा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तरुणांचे एका मिम अकाउंटशी जोडलं जाणं म्हणजे विरोधी पक्ष त्यांना आकर्षक पर्याय देण्यात अपयशी ठरला आहे.

ते असंही सांगतात की, विरोधी पक्षातील नेत्यांनी हे समजून घ्यायला हवं की तरुण स्वतः त्यांच्याकडे येणार नाहीत, तर नेत्यांनाच तरुणांपर्यंत जावं लागेल.

अनेकदा असं होतं की, सोशल मीडियावर लिहून लोक आपला राग व्यक्त करतात. पण, प्रत्यक्ष जीवनात काहीही बदल होत नाही. हा रागही तसाच आहे का, आणि एकदा हा राग व्यक्त झाला की सगळं पुन्हा सामान्य होईल का?

या प्रश्नाच्या उत्तरावर योगेंद्र यादव म्हणतात की, "जर यावर बंदी घातली नसती, तर हे सर्व खरं ठरलं असतं की राग होता, तो व्यक्त झाला आणि संपला. पण जेव्हा तुम्हाला तुमचा राग व्यक्त करण्यापासून रोखलं जातं, जेव्हा सांगितलं जातं की तुम्ही एक्सवरील एखाद्या विनोदाचा भाग होऊ शकत नाही… याचा अर्थ हा विषय गंभीर आहे."

"आतापर्यंत विनोद आपल्या मध्ये होता. आता विनोदात सरकार सामील झाले आहे. आता विनोदाचं बोट सरकारकडे वळलं आहे. आणि आता ही गोष्ट खूप दूरपर्यंत जाईल."

ही बदलत्या काळातील भाषा आहे

लोक खूप वेगाने या अकाउंटशी जोडले जात आहेत आणि आता इथे गंभीर राजकीय चर्चा देखील होत आहेत. पुढे हा विषय कुठे जातो आणि येणाऱ्या आठवड्यात काय घडतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

योगेंद्र यादव म्हणतात, "पहिली गोष्ट ही बंदी हटवण्याची मागणी वाढेल. मला वाटतं की फक्त सव्वा-एक कोटी नाही, तर कोट्यवधी लोक आवाज उठवतील की तुम्ही बंदी का घालत आहात? अरे हा तर विनोद आहे."

"मी तर पुढच्या काही तासांचाही विचार करतो की, ही बंदी घालून सरकार याचं समर्थन कसं करेल किंवा हे योग्य होतं हे कसं पटवून देईल? काहीतरी आहे जे घडण्यासाठी उत्सुक आहे. जमिनीखाली काहीतरी हलत आहे. ते कोणत्या रूपात समोर येईल, हे अजून आपल्याला माहिती नाही."

"पण मला असं नक्की वाटतं की हे बंद करून सरकारने मोठी चूक केली आहे आणि जे प्रकरण फक्त राग आणि विनोदापुरतं मर्यादित राहिलं असतं, ते आता कदाचित मोठ्या दिशेनं जाऊ शकतं."

याबाबत अनेक मिम्स तयार होत आहेत. आता प्रश्न असा आहे की, मिम्स हेच जणू एखाद्या जाहीरनाम्याची (मॅनिफेस्टो) जागा घेत आहेत का, की आजच्या तरुणांसाठी हे मिम्सच एक मॅनिफेस्टो बनू शकतात का?

ही बदलत्या काळाची नवीन भाषा आहे, असं योगेंद्र यादव यांना वाटतं. ते म्हणतात, "माझ्या काळात लोक जाहीरनामा वाचायचे. हल्ली लोक यूट्यूब पाहतात. आधी लोक पोस्टर बनवायचे, आता मिम्स बनवतात."

"त्यामुळे प्रत्येक पिढीची नवीन भाषा, व्याकरण आपण शिकलं पाहिजे. या उपहासामागे खूप खोल राजकीय संदेश आहे, आणि सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्ष दोघांनीही यातून काही धडा घेतला नाही, तर ते आपला जनाधार गमावतील."

"एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर भारतातील तरुण स्वतःला 'झुरळा'शी जोडत असतील, तर हा फक्त राग व्यक्त करण्याचा प्रकार आहे का, की आपल्या लोकशाही व्यवस्थेबद्दल तीव्र निराशा दाखवतो?"

"हो, यात निराशा आणि असंतोष आहे, पण या रागासोबत एक आशा आणि अपेक्षाही जोडलेली आहे. कुठेतरी अशी भावना आहे की, काहीतरी करा, आम्हाला हे स्वतः करता येत नाही. त्यामुळे याकडे फक्त नकारात्मक अर्थाने पाहू नका. त्या 'कॉक्रोच'च्या मागे दडलेली अपेक्षा आणि आशा, की कोणी तरी पुढे येऊन आधार देईल, ती व्यवस्थित समजून घ्या."

राजकीय नेत्यांनी काय म्हटलं?

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी 'एक्स'वर लिहिलं, "कॉक्रोच जनता पार्टीच्या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे मी खूप व्यथित झालो आहे, ज्यांनी अवघ्या पाच दिवसांत इंस्टाग्रामवर 1.5 कोटींहून अधिक फॉलोवर्स मिळवले आहेत."

त्यांनी पुढे लिहिलं, "मी तरुणांची निराशा समजू शकतो आणि त्यांना या पक्षाशी का जोडले गेल्यासारखे वाटते हे मी समजू शकतो. म्हणूनच 'एक्स'वरील हे खाते निलंबित करणे अत्यंत हानिकारक आणि अविवेकी पाऊल आहे."

थरूर यांनी पुढे म्हटलं आहे, "तरुणांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ मिळायला हवे, त्यामुळे सीजेपीचे खाते बंद करण्याऐवजी ते चालू ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे. लोकशाहीमध्ये मतभेद, विनोद, उपहास आणि अगदी संतापालाही वाव असला पाहिजे."

शिवसेना (उबाठा)च्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी 'एक्स'वर लिहिलं, "सीजेपीसारख्या सोशल मीडियाने तयार केलेल्या एका काल्पनिक पक्षाने 'जनरेशन झेड'च्या (Gen Z) कल्पना आणि भावनांवर ताबा मिळवला आहे, ही एक दुःखद बाब आहे की तरुण पिढी सध्याच्या विरोधी पक्षांवरील आशा गमावू लागली आहे."

"भाजपविरोधात नाराजी आहे हे स्पष्ट आहे, पण ही खेदाची गोष्ट आहे की मतदार प्रस्थापित विरोधी पक्षांऐवजी एका नवीन, काल्पनिक पक्षावर विश्वास ठेवणे पसंत करत आहेत."

कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, लोक त्यावर अजूनही प्रतिक्रिया देत आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.