काही मिनिटांच्या अंतराने जन्मलेल्या जुळ्या बहिणींचे वडील मात्र वेगळे; जाणून घ्या यामागचे कारण

    • Author, जेनी क्लीमन
    • Role, 'द गिफ्ट' शोच्या सूत्रसंचालक
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

मिशेल आणि लविनिया ओसबोर्न या जुळ्या बहिणींमध्ये नेहमीच एक खास नातं राहिलं आहे. परंतु सप्टेंबर 2022 मध्ये जेव्हा लविनियाने डीएनए (DNA) चाचणीच्या निकालाचा ईमेल उघडला तेव्हा ती प्रचंड घाबरली.

"कदाचित मला मनाला ही गोष्ट आधीपासूनच ठाऊक होती," असं लविनिया सांगते.

डीएनए टेस्टच्या रिपोर्टमधून एक थक्क करणारा खुलासा झाला. एकसारख्या न दिसणाऱ्या तरी जुळ्या असलेल्या लविनिया आणि मिशेल यांचे वडील वेगवेगळे होते.

त्यांची गर्भधारणा नैसर्गिक रितीने झाली होती. त्या नऊ महिने एकाच गर्भाशयात एकत्र वाढल्या आणि काही मिनिटांच्या फरकाने एकाच आईच्या पोटी जन्माला आल्या. पण प्रत्यक्षात त्या सावत्र बहिणी आहेत.

मिशेल आणि लविनिया आज 49 वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म विज्ञानातील एका अत्यंत दुर्मिळ जैविक प्रक्रियेमुळे झाला. त्याला 'हेटरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन' म्हणतात.

जेव्हा एका महिलेच्या शरीरात एकाच मासिक पाळीच्या चक्रादरम्यान एकापेक्षा जास्त अंडी तयार होतात, तेव्हा हे शक्य होतं.

नंतर अगदी कमी वेळेच्या अंतराने दोन वेगवेगळ्या पुरुषांच्या शुक्राणूंमुळं ही अंडी फर्टिलाईज होतात आणि दोन्ही गर्भ सुरक्षितपणे नऊ महिने गर्भाशयात वाढतात.

जगभरात आतापर्यंत अशा प्रकारची अवघी 20 प्रकरणे समोर आली आहेत.

'बीबीसी रेडिओ 4' च्या 'द गिफ्ट' या मालिकेसाठी त्यांच्या कथेवर अनेक महिने संशोधन केल्यानंतर मला असे आढळले की, युके (UK) मध्ये नोंद झालेली वेगवेगळ्या वडिलांची जुळी मुले असणारी लविनिया आणि मिशेल ही एकमेव जोडी होती.

हा खुलासा समोर आल्यावर लविनिया पूर्णपणे कोलमडून गेली. तिचं आणि मिशेलचं बालपण खूप संघर्षात गेलं होतं.

त्यांना सतत एका घरातून दुसऱ्या घरात आणि वेगवेगळ्या केअरटेकर्सकडे राहावं लागलं होतं. अशा परिस्थितीत या जुळ्या बहिणींसाठी एकमेकींशिवाय दुसरा कोणताही हक्काचा आधार नव्हता.

लविनिया सांगते, "ती एकच अशी व्यक्ती होती जी फक्त माझी होती. जिच्याबद्दल माझ्या मनात पूर्ण खात्री आणि विश्वास होता. पण अचानक सर्वकाही बदललं."

परंतु जेव्हा लविनियाने ही बातमी सांगण्यासाठी तिच्या जुळ्या बहिणीला फोन केला तेव्हा मिशेलची प्रतिक्रिया मात्र पूर्णपणे वेगळी होती.

मिशेल म्हणते, "मला याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. अशी गोष्ट प्रत्यक्षात घडू शकते यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. हे खूपच विचित्र, वेगळं आणि अतिशय दुर्मिळ आहे. पण यामुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो."

'आम्ही दोघीच आमचं जग होतो'

मिशेल आणि लविनिया यांच्या आईने 1976 मध्ये नॉटिंगहॅम येथे जेव्हा त्यांना जन्म दिला तेव्हा ती केवळ 19 वर्षांची एक असहाय्य आणि असुरक्षित मुलगी होती.

मिशेलने सांगितलं की, त्यांना सावत्र वडिलांकडून अत्याचाराचा सामना करावा लागला होता.

"माझ्या आईचं संपूर्ण बालपण वेगवेगळ्या फॉस्टर केअर (तात्पुरते संगोपन केंद्र) आणि बालगृहांमध्ये फेऱ्या मारण्यातच गेलं."

जेव्हा आम्ही बहिणी आईला आमचे वडील कोण आहेत असं विचारायचो तेव्हा ती नेहमी जेम्स नाव सांगायची. पण ते आमच्या आयुष्यात कधीच नव्हते, असंही मिशेलने सांगितलं.

त्यांच्या आईची सोबतही त्यांना फार काळ लाभली नाही. जेव्हा त्या दोघी 5 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईला लंडन येथील विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आणि ती आपल्या मुलांना नॉटिंगहॅममध्येच तिच्या एका जवळच्या मैत्रिणीच्या आईकडे सोडून निघून गेली. या जुळ्या बहिणी त्यांना 'आजी' (ग्रँडमा) म्हणायच्या.

लविनिया सांगते की, "आजी खूप कडक शिस्तीच्या होत्या. त्या फारशा प्रेमळ किंवा जवळ घेणाऱ्या नव्हत्या. अशा वातावरणात माझ्यासाठी मिशेल हाच एकमेव खंबीर आधार होता."

मिशेल सांगते की, जोपर्यंत तिच्यासोबत जुळी बहीण होती तोपर्यंत तिला नेहमी सुरक्षित वाटायचे. आमच्यासाठी आम्ही दोघीच आमचं जग होतो आणि जगाशी लढायला खंबीर होतो.

त्या दोघी 10 वर्षांच्या झाल्यावर आईसोबत राहण्यासाठी लंडनला गेल्या. परंतु अवघ्या काही वर्षांतच लविनिया आणि मिशेलला पुन्हा एकदा आईच्या जुन्या फॉस्टर होममध्ये राहायला पाठवण्यात आलं. त्यांची आई त्यांच्यापासून अशी दूर का राहू इच्छित होती हे त्या मुलींना समजत नव्हते.

लविनिया सांगते, "शारीरिक आणि भावनिक दोन्ही पातळीवर ती आमच्यापासून नेहमीच खूप दूर राहिली."

डीएनए चाचणी करण्याचा निर्णय

लहानपणी कधीच सोबत नसलेले जेम्स या दोघी बहिणी साधारण 15-16 वर्षांच्या असताना अचानक त्यांच्या आयुष्यात परत आले. लविनियानेच त्यांचा पत्ता शोधून काढला होता.

जेम्सला पाहिल्यावर आपल्याला त्यांचेच रूप मिळाले आहे असे लविनियाला वाटत होते.पण मिशेलला मात्र जेम्स आपले वडील आहेत यावर कधीच विश्वास बसला नाही. तिच्या मनात कुठेतरी एक शंका होती.

2021 च्या उत्तरार्धापर्यंत त्यांच्या आईला 'अर्ली-ऑन्सेट डिमेंशिया' (कमी वयात स्मृतीभ्रंश होणे) चा त्रास सुरू झाला होता ज्यामुळे ती त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याच्या स्थितीत नव्हती.

मिशेलने जेव्हा जेम्सचा एक फोटो पाहिला तेव्हा ते तिचे वडील असूच शकत नाही याबद्दल तिची खात्री अधिकच पक्की झाली.

मिशेल सांगते, "माझ्या मनात विचार आला की, ते माझ्यासारखे थोडेसुद्धा दिसत नाही. म्हणूनच मी स्वतःसाठी एक डीएनए (DNA) टेस्ट किट खरेदी केली."

डीएनए (DNA) चाचणी केली तर स्वतःसोबतच कुटुंबाबद्दलची माहिती देखील समोर येते. परंतु मिशेलने जेव्हा तिचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले. तेव्हा तिच्या या चाचणीचा लविनियावर काय परिणाम होऊ शकतो याचा तिनं विचार केला नव्हता. या चाचणीचे निकाल 14 फेब्रुवारी 2022 रोजी आले. नेमकं त्याच दिवशी मिशेल आणि लविनिया यांच्या आईचं निधन झालं.

रिपोर्टमध्ये मिशेलचे वडील म्हणून जेम्सच्या नावाचा किंवा आडनावाचा कोणताही उल्लेख नव्हता. म्हणजेच जेम्स तिचे खरे वडील नव्हते.

अनेक आठवड्यांच्या तपासानंतर मिशेलला शोध लागला की तिचे वडील ॲलेक्स होते, जे तिच्या आईच्या एका मैत्रिणीचे भाऊ होते.

मिशेलने ॲलेक्सच्या काही नातेवाईकांशी संपर्क साधला. तेव्हा ॲलेक्स अनेक वर्षांपासून दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनामुळं रस्त्यावर राहत असल्याचं समजलं.

मिशेल आणि लविनिया 'ऑलिव्हिन' नावाच्या एका महिलेला भेटायला गेल्या. मिशेलला वाटत होतं की ती दोघींची चुलत बहीण आहे. ऑलिव्हिनला पाहताच मिशेलला तिच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी वाटली.

मिशेल सांगते, "मला लगेच खात्री पटली की ती आमच्याच रक्ताची आहे." पण लविनियाला मात्र तसे अजिबात वाटले नाही. ऑलिव्हिनने तिच्या कुटुंबाचे फोटो दाखवले पण त्या फोटोंमधील लोकांचे चेहरे पाहिल्यावर लविनियाला त्यांच्यात आणि स्वतःमध्ये कोणतंही साम्य जाणवलं नाही.

शेवटी लविनियानेही स्वतःची डीएनए चाचणी करायचं ठरवलं. मिशेलपेक्षा आपला रिपोर्ट काही वेगळा येईल असं तिला वाटत नव्हतं. पण ॲलेक्सची फॅमिली ही आपली फॅमिली नाही ही जी एक अस्वस्थता तिच्या मनात सतत घर करत होती त्यातून मार्ग काढण्यासाठी तिला हे करणं भाग होतं.

लविनिया म्हणते, "मला फक्त मनाची खात्री करायची होती." पण जेव्हा तिने स्वतःचा रिपोर्ट पाहिला तेव्हा आपली जुळी बहीण ही आपली सावत्र बहीण आहे हे कळल्यावर लविनिया प्रचंड अस्वस्थ होत संतापली.

लविनिया पुढे सांगते, "मिशेलमुळे मला या सगळ्या धक्क्यातून जावं लागलं. याचा मला खूप राग आला होता. कारण हे असं काहीतरी सत्य मला कधीच नको होतं."

अजून काही खुलासे होणे बाकी होते. जेव्हा लविनियाने तिच्या टेस्टच्या निकालांचे बारीक निरीक्षण केले. तेव्हा जेम्स हा तिचाही वडील नसल्याचे तिच्या समोर आले.

खऱ्या वडिलांचा शोध

आपले खरे वडील कोण आहेत हे जाणून घेण्यात लविनियाला रस नव्हता. पण मिशेल मात्र कशामधूनही मार्ग काढायला तयार होती.

बहिणीच्या रिपोर्टचा बारकाईने अभ्यास करून मिशेलने अखेर लविनियाचे खरे वडील आर्थर यांचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर या दोघी बहिणी त्यांना भेटायला वेस्ट लंडनमधल्या त्यांच्या घरी गेल्या.

लविनिया म्हणते, "ते सुरुवातीला थोडे गोंधळले होते पण ते खूप उत्साही आणि मनमोकळ्या स्वभावाचे आहेत. अगदी माझ्यासारखेच."

त्या पहिल्या भेटीनंतर लविनिया आणि आर्थर यांच्यातलं नातं खूप घट्ट झालं. आता ते महिन्यातून अनेक वेळा एकमेकांना भेटतात आणि अनेकदा मिशेलही त्यांच्यासोबत असते.

लविनिया म्हणते, "मला असं वाटतं की मला माझं हक्काचं घर मिळालं आणि ते माझ्या बाबांजवळ आहे." आर्थर यांनी मिशेललाही इतकं आपलंसं केलं की, त्यांनी तिलाही आपल्याला 'बाबा' म्हणायला सांगितलं आहे.

पुढे एका भेटीत या दोघी बहिणींनी आर्थर यांना विचारलं की त्यांच्या जन्माच्या वेळी नक्की काय घडलं होतं?

मिशेल सांगते, "त्यांनी आम्हाला सांगितलं की, 'तुमची आई माझ्या घरी आली होती. ती खूप रडत होती आणि प्रचंड अस्वस्थ होती. ती सुरक्षित नव्हती आणि खूप घाबरलेली असल्यामुळेच मदत मागण्यासाठी माझ्याकडे आली होती."

त्या वेळी नक्की काय घडलं होतं हे सांगायला आज त्यांची आई जिवंत नाही. पण आर्थर यांच्या म्हणण्यानुसार ती अत्यंत अडचणीत असताना त्यांच्याकडे मदतीसाठी आली होती.

दुसरीकडे मिशेलला सुद्धा नवीन नातेवाईकांमुळे तिचे खरे वडील ॲलेक्स यांचा शोध लागला आणि ती त्यांना भेटली.

मिशेल म्हणते, "मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा ते ड्रग्जच्या नशेत होते."

पण त्यांचा चेहरा मिशेलशी इतका मिळत-जुळता होता की त्यांच्यातलं नातं नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.

मिशेल म्हणते, "ते माझे बाबा आहेत आणि मी त्यांची मुलगी हे सत्य आहे. पण आयुष्यात पुढे त्यांना सोबत घेऊन चालावं असं मला कधी वाटलं नाही. मला फक्त खरी गोष्ट काय आहे ते माहिती करून घ्यायचं होतं."

त्यांच्या आईला आपल्या दोन्ही मुलींचे वडील वेगवेगळे आहेत याची शंका होती की नाही हे या जुळ्या बहिणींना कधीच समजणार नाही. लविनिया म्हणते, "या विचाराने ती नक्कीच वेडी झाली असणार. तिने काहीतरी पाहिले असेल किंवा तिला काहीतरी जाणवले असणार.

मिशेल सांगते, "मला वाटते आईच्या मनात कुठेतरी तिला हे ठाऊक होतं पण ती हे सत्य स्वीकारायला तयार नव्हती."

जुळ्या बहिणी एकसारख्या दिसत नसल्यामुळे लविनिया आणि मिशेल यांना त्यांच्यातील फरकांची नेहमीच जाणीव होती. त्यांच्या डीएनए (DNA) चाचणीतून समोर आलेल्या सत्यामुळे सुरुवातीला हा फरक अधिकच ठळकपणे जाणवू लागला होता. परंतु त्यांच्यातील अनोखे नाते नेहमीच कायम राहील.

लविनिया सांगते, "आम्ही एक चमत्कार आहोत. आमच्यामध्ये नेहमीच असे एक घट्ट नाते असेल जे कधीही तुटू शकत नाही."

"हो ती माझी जुळी बहीण आहे," मिशेलने मान डोलवत सांगितलं. कोणतीही गोष्ट आमच्यातील हे नातं हिरावून घेऊ शकत नाही."

फोटो- एम्मा लिंच/बीबीसी

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)