You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मान्सून कधी येणार? महाराष्ट्रात उष्णतेसाठी इथे रेड अलर्ट; पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज
मान्सूनच्या प्रवासाला अंदमानमध्ये सुरुवात झाली असली, तरी इकडे महाराष्ट्रासह मध्य भारतात उष्णतेच्या लाटा आल्या आहेत.
विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट आहे तर कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
पुढचे काही दिवस हवामान कसं असेल आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय अलर्ट दिले आहेत, जाणून घेऊयात.
महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी गेले दोन दिवस 40 अंश सेल्सियसहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
विदर्भात इथे तापमान 44 ते 46 अंशांपेक्षाही वर पोहोचलं असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
पुढचे काही दिवसही विदर्भात तुरळक ठिकाणी तापमान 45 अंशांच्या आसपास जाऊ शकतं, जे या काळात इथल्या नेहमीच्या सरासरीपेक्षा थोडं जास्त आहे.
तसंच मराठवाड्यातही अनेक ठिकाणी तापमान 40 ते 42 अंशांच्या आसपास राहील. पण विदर्भात काही भागांमध्ये रात्रीचं तापमानही वर राहील.
त्यामुळेच 21 मेच्या रात्रीसाठीही अकोला, अमरावती, वर्धा इथे रेड अलर्ट दिला आहे. तर नागपूर आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. तर चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीत यलो अलर्ट दिला आहे. त्याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे.
22 मे रोजीही अकोला, अमरावती, वर्धा इथे उष्णतेसाठी रेड अलर्ट दिला आहे. तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट तसंच गोंदिया आणि गडचिरोलीत यलो अलर्ट आहे. 22 मे रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तसंच लगतच्या भागात वादळी पावसाचा इशारा आहे.
त्यानंतरचे तीन दिवस विदर्भातलं तापमान हळूहळू कमी होईल अशी अपेक्षा आहे.
मान्सून कुठवर पोहोचला?
राज्यात उष्णता वाढली आहे, पण मग मान्सून कुठे आहे? तर, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या उत्तरेकडील सीमेत आज कुठलाही बदल झालेला नाही, 18 तारखेपासून मान्सून याच निळ्या रेषेच्या खालच्या भागात रेंगाळला आहे.
21 मे रोजी दुपारी उपग्रहानं टिपलेल्या दृश्यांमध्ये अंदमान निकोबार बेटांवर ढग जमा झालेले दिसतायत. पण केरळच्या किनाऱ्यापासून ढग अजून दूरच आहेत.
26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये येऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं सुरुवातीला वर्तवला होता. पण केरळमध्ये अजून मान्सूनचे वारे पोहोचलेले दिसत नाहीत.
युकेतील रेडिंग विद्यापीठात हवामानावर संशोधन करणारे संशोधक अक्षय देवरस यांच्या अंदाजानुसार केरळमध्ये 1 जूनच्या आसपासच मान्सून ऑनसेट होण्याची शक्यता आहे.
तिथून साधारण आठवडाभरानं मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. म्हणजे यावेळी राज्यात मान्सून नेहमीच्या वेळेवर किंवा त्याच्या आसपासच दाखल होईल.
त्याआधी राज्यात तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता आहे.
पुढच्या चार आठवड्यांसाठीचा अंदाज
भारतीय हवामान विभाग दर गुरुवारी पुढच्या चार आठवड्यांसाठीचा विस्तारीत अंदाज म्हणजे एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट जारी करतो.
21 मे रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार विदर्भात 21 ते 28 मे या पहिल्या आठवड्यात आठवड्यात काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता जाणवेल.
पण त्यानंतरच्या आठवड्यांत राज्यातलं कमाल तापमान हळूहळू कमी होत जाईल अशी अपेक्षा आहे.
पण कमाल तापमानात घट झाली, तरी राज्यातलं रात्रीचं किमान तापमान जूनच्या मध्यापर्यंत थोडं वर राहू शकतं.
दिलासा देणारी बाब म्हणजे याच काळात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारताकडून मान्सून वर सरकत जाईल तशी राज्यातलं पावसाचं प्रमाणही वाढत जाईल.
21 ते 28 मे या पहिल्या आठवड्यात राज्याच्या पश्चिम किनारी प्रदेशात पावसाला सुरुवात होताना दिसते आहे. दुसऱ्या आठवड्यापर्यंत या परिसरात मान्सूनचं आमगन आणि नियमित पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सरासरीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण पाहिलं, तर तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे 11 जूनपर्यंत बहुतांश राज्यात पाऊस हजेरी लावेल. पण त्यानंतरच्या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
भारतीय हवामान विभाग तसंच जगभरातल्या फोरकास्टिंग मॉडेल्सनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यांमध्ये मासिक सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, असं भाकीत युकेच्या रेडिंग विद्यापीठातले वातावरण आणि हवामानाचे संशोधक अक्षय देवरस यांनी वर्तवलं आहे.
यंदा मान्सूनच्या कालावधीतच एल निनो सक्रीय होण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागरातल्या या प्रवाहाचा भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)