वाघिणीच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 4 महिलांचा मृत्यू, जाणून घ्या नेमकं काय घडलं

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यात एका वाघिणीच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. गुंजेवाही जंगल परिसरात ही घटना घडली.

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी 13 महिला जंगलात गेल्या होत्या.

या महिला जंगलात तेंदूपत्ता तोडत असताना वाघिणीने अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर सर्व महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्या जीव वाचवण्यासाठी पळू लागल्या.

मात्र या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला. इतर महिलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

यातील एक महिला जीव वाचवत गावाच्या दिशेने धावत आली आणि तिने गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना 4 महिलांचे मृतदेह आढळून आले.

कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय- 45 वर्षे), अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय-46 वर्षे), संगीता संतोष चौधरी (वय-36 वर्षे), सुनीता कौशिक मोहुर्ले (वय-33 वर्षे) अशी या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने पथके घटनास्थळी रवाना केली. वाघिणीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.

वन विभागाकडून या घटनेनंतर परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना जंगलात एकट्याने न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात असून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेषतः जंगलालगतच्या गावांमध्ये वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

प्रत्यक्षदर्शी आणि गावकऱ्यांनी काय सांगितलं?

या घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका महिलेने सांगितलं, "आम्ही मागचे आठ दिवस झाले त्याच रस्त्यावर जात होतो. आज (हल्ल्याचा दिवस) सकाळी साडे सातच्या सुमारास आम्ही सातही जण मिळून पाने तोडत होतो. त्यावेळी वाघाने चार जणींवर मागून हल्ला केला. एकदम किंचाळण्याचा आवाज झाला. तो आवाज ऐकून आम्ही थोडं बाजूला गेलो. आमच्याजवळ मदतीला कुणीही नव्हतं. आम्ही त्यांना खूप आवाज दिला पण त्या महिलांपैकी कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही घाबरलो होतो, शेवटी आम्ही एका मार्गाने मुख्य रस्त्यावर आलो. तिथून जाणाऱ्या गाड्यांना थांबवलं, त्यांना आमच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी वनविभागाला फोन लावला, त्यांचे अधिकार आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विचारलं की, तुम्ही तेंदू पाने तोडायला नेमक्या कुठे गेल्या होत्या? आम्ही त्यांना ती जागा दाखवली तर त्या चार महिलांचे मृतदेह तिथेच होते."

तेंदूपत्ता तोडण्याचं काम करणाऱ्या आणखीन एका महिलेने माध्यमांना सांगितलं, "आम्हाला पोटासाठी जंगलात जावं लागतं. पण वाघाची भीती वाटते. तेंदुपत्त्यावर आमचं पोट आहे. गावात रोजगार नाही. हे काम सोडलं तर आम्ही कसं जगायचं? या गावात दुसरं कामच नाही. त्या महिला पण पोटासाठी गेल्या होत्या आणि असं झालं. काहींनी लहान लहान मुली आहेत."

या घटनेत मृत झालेल्या सुनीता मोहुर्ले यांचे दीर चंद्रकांत मोहुर्ले म्हणाले, "वहिनी रोज सकाळी जंगलात तेंदूपत्ता तोडायला जायच्या. तर तिथेच वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. सुनीता मोहुर्ले या माझ्या वहिनी होत्या. त्यांना दोन दोन छोट्या मुली आहेत."

वनविभागाने काय म्हटलं?

सिंदेवाही वनविभागाने एक प्रेस नोट जारी करून सदरील घटनेची माहिती दिली आहे. मृतांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 25000 रुपये देण्याची घोषणा या पत्रकात करण्यात आली आहे. एकूण 1 लाख रुपयांची तातडीची मदत वनविभागाने केली आहे.

या परिसरात सध्या तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरु आहे. वनविभागातर्फे नियमित गस्त सुरु आहे. तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मजुरांना समूहाने जाण्याचा सल्ला देणे, भित्तिपत्रके लावणे, लाऊड स्पीकरवरून माहिती देणे असे उपाय केले जात असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

जिथे ही घटना घडली त्या ठिकाणी वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप आणि लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच विशेष पथकाद्वारे गस्त वाढवण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी वन विभागाने दिली आहे.

गेल्या वर्षीही घडली होती अशीच घटना

विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही सिंदेवाही तालुक्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 3 महिलांवर वाघाने हल्ला केला होता. त्या घटनेतही तिन्ही महिलांचा मृत्यू झाला होता.

मे 2025 या महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 9 जणांनी प्राण गमावले होते.

हे मृत्यू मागील काही वर्षांच्या मे महिन्यातील मृत्यूंपेक्षा जास्त आहेत. त्यााधीच्या काही वर्षांत मे महिन्यात 2 ते 3 लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, अशी माहिती वनविभागानं दिली होती.

मे 2025 मध्ये बीबीसी मराठीने या संबंधी एक सविस्तर बातमी केली होती. ती तुम्ही इथे वाचू शकता-

त्यावेळी वनविभागाने आकडेवारी देताना म्हटलं होतं की, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण 147 जणांचा मृत्यू झाला आहे. 2021 आणि 2022 मध्ये मृत्यूंची संख्या वाढलेली आहे, तर 2023 पासून ही संख्या कमी झालेली दिसतेय.

देशातही वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रात जास्त आहे. 2022 मध्ये एकट्या महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यांत 85 जणांचे मृत्यू झाले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2018 ते 2022 या 5 वर्षांत सर्वाधिक मृत्यू हे 2022 मध्ये झाले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)