You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हत्या केली, जन्मठेप झाली, पॅरोलवर सुटला आणि मुंबईत थेट अभिनेता बनला; मात्र 12 वर्षांनी पोलिसांना 'असा' सापडला
- Author, भार्गव पारीख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अहमदाबादच्या क्राईम ब्रँचनं अलीकडेच एका खास गुन्हेगाराला अटक केली आहे. हा गुन्हेगार हत्येच्या एका प्रकरणात 12 वर्षांपूर्वी पॅरोल मिळाल्यानंतर फरार झाला होता. नंतर तो अभिनेता बनला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगाराचे नाव हेमंत मोदी असून तो वकील आहे. त्याला 2008 मध्ये हत्येच्या एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र 6 वर्षांनी पॅरोल मिळाल्यानंतर तो फरार झाला.
त्यानंतर तो मुंबईत आला आणि अभिनेता बनला. इतकंच काय, तर त्यानं अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केलं.
आता तो अहमदाबादमध्येच एका मालिकेचं चित्रीकरण करत होता. तेव्हा सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
हे प्रकरण जाणून घेण्यासाठी बीबीसीनं क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांशी आणि हेमंत मोदीला ओळखणाऱ्या लोकांशी संवाद साधला.
त्यातून समोर आलं की इतक्या वर्षांपासून फरार असलेला हा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अहमदाबादच्या क्राईम ब्रँचचे पोलीस इन्स्पेक्ट्रर पी एम धाकडा म्हणाले, "आम्ही जेव्हा 'मोटी बानी नानी बहू' या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याला अटक करायला गेलो, तेव्हा त्याचा अभिनय इतका दमदार होता की, त्याला ओळखणं कठीण होतं."
"मात्र त्याला अटक करताना त्याच्या शरीरावर आढळलेल्या खुणा जुळवून पाहिल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. शेवटी त्यानं कबूल केलं की, 12 वर्षांपूर्वी पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला हेमंत मोदी तोच आहे आणि नंतर तो अभिनेता बनला आहे."
या प्रकरणामधील तथ्यांनुसार हत्येच्या आधी हेमंत मोदी अहमदाबादच्या नरोदामधील सैजपूर बोघामधील दास की चॉल म्हणजे दास चाळीत राहत होता.
त्याचं 12 जून 2005 ला त्याच्या एका शेजाऱ्याशी भांडण झालं. त्यानंतर त्यानं त्याचा भाऊ आणि मित्रांबरोबर मिळून त्याच्या शेजाऱ्याचा मित्र नरेंद्र ताम्बले उर्फ नन्नो याची हत्या केली होती.
हेमंत मोदी हा स्वत:च एक वकील होता. त्यामुळे त्याच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या 7 जणांवरचा खटला त्यानंच लढवला. मात्र 3 वर्षे या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर 2008 मध्ये न्यायालयानं हेमंत मोदीसह सर्व 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
वकील असल्यामुळे हेमंतला जेल मॅन्युअल माहीत होतं. त्यानं तात्काळ जेलर केशव कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल केली आणि तक्रार केली की, तो डिप्रेशनमध्ये आहे. नंतर त्याला अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातून मेहसाणाच्या तुरुंगात हलवण्यात आलं.
मेहसाणा तुरुंगात असलेल्या हेमंतला न्यायालयाच्या निकालानंतर 6 वर्षांनी गुजरात उच्च न्यायालयानं 30 दिवसांचा पॅरोल दिला. पॅरोल मिळाल्यानंतर तो फरार झाला आणि नंतर एक अभिनेता म्हणून करियर घडवू लागला.
पोलिसांनी काय सांगितलं?
इन्स्पेक्टर पी एम धाकडा यांनी सांगितलं की, पॅरोल मिळाल्यानंतर हेमंत तिथून पळून गेला. काही काळ वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यानंतर तो अभिनयाच्या क्षेत्रात संधी शोधण्यासाठी मुंबईत गेला.
ते म्हणाले, "तिथे त्याला एका प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर साईड रोल मिळू लागले. नंतर त्याला नाटकांमध्ये काम मिळू लागलं. यादरम्यान त्यानं त्याचं नाव बदलून स्वप्निल मोदी असं केलं. त्यानं हेअरस्टाईलदेखील बदलली. तो चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करू लागला."
"दक्षिणेतील चित्रपटांशिवाय त्यानं गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मात्र कोणीही त्याला ओळखू शकलं नाही. त्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली. अशाप्रकारे तो गुजराती चित्रपटांबरोबरच मालिकांमध्येही साईड रोल करू लागला."
पोलिसांनुसार, अहमदाबादला परतल्यानंतर त्यानं अहमदाबादच्या कोट भागात भाड्यानं एक घर घेतलं. मग तो 'मोटी बानी नानी बहू' या मालिकेत काम करू लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत जेव्हा जेव्हा अहमदाबादला यायचा, तेव्हा त्याच्या घराच्या अवतीभोवतीच्या लोकांना सांगायचा की, तो एक मोठा अभिनेता आहे.
मात्र त्या परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याला त्याच्या हालचालीविषयी संशय वाटला. कारण हेमंतनं त्याच्या घरमालकाला त्याचं आधार कार्ड आणि इतर पुरावे दिले नव्हते.
तिथल्या एका वकिलानं त्या सामाजिक कार्यकर्त्याला सांगितलं की, हेमंत एका अशा गुन्हेगारासारखा वाटतो आहे, जो आधी फरार झाला आहे. त्यानंतर हे प्रकरण संशयावरून पुढे जात पोलिसांपर्यंत पोहोचलं.
ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी हेमंतवर लक्ष ठेवलं. एक दिवस तो जेव्हा मालिकेचं चित्रीकरण करून घरी येत होता, तेव्हा त्याला अटक करण्यात आली. चौकशीनंतर त्यानं सर्व कबूल केलं.
पोलीस म्हणाले, "त्यानं खूप विचारपूर्वक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्याचं नाव बदललं होतं. कारण जर त्याचं खरं नाव स्क्रीनवर दिसलं, तर तो पकडला जाईल, अशी भीती त्याला वाटत होती."
ज्यांना याबद्दल माहीत आहे, ते लोक काय म्हणतात?
बीबीसीशी बोलताना गुजराती चित्रपटांमधील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर रसिक त्रिवेदी म्हणाले, "मी जेव्हा मुंबईतील एका अभिनेत्याबरोबर एक चित्रपट बनवला होता, तेव्हा हा स्वप्निल माझ्याकडे चित्रपटामध्ये काम मागण्यासाठी आला होता. मात्र मला त्याचा अभिनय न आवडल्यामुळे मी त्याला काम दिलं नव्हतं."
"मला त्याचा चेहरा आठवतो, कारण त्यावेळेस त्यानं माझ्याशी उद्धटपणा केला होता. तो मला म्हणाला होता की, तो मुंबईत साईड ॲक्टर म्हणून भूमिका करतो. मला यापेक्षा जास्त माहीत नाही."
मनीष पटेल आधी सैजपूर बोघामध्ये दास चाळीत राहत होते. ते 2018 पासून नारनपुरामध्ये राहत आहेत.
फोनवर झालेल्या संभाषणात त्यांनी सांगितलं, "2005 मध्ये झालेल्या भांडणाच्या आधी हेमंत मोदी सर्वांना कायदेशीर नोटीस द्यायचा आणि लोकांवर दबाव टाकायचा. त्याचा त्याच्या पत्नीशी घटस्फोट झाला होता. हत्येनंतर या कुटुंबाशी त्याचा कोणताही संपर्क झाला नाही."
बीबीसीनं एका स्थानिक पत्रकाराच्या मदतीनं अहमदाबादच्या कोट भागातील एका सलूनमध्ये कर्मचारी असणाऱ्या इकबाल यांच्याशी संवाद साधला. हेमंत त्याच भागात राहायचा.
ते म्हणाले, "तो जेव्हा इथे यायचा, तेव्हा त्याची क्रीम, हेअर जेल इत्यादी गोष्टी स्वत:च आणायचा. तो नेहमी मुंबईत एक मोठा अभिनेता होण्याबद्दल बोलायचा. तो त्याच्या नव्या चित्रपटासाठी कोट भागात राहून तिथलं वातावरण समजून घेण्याबद्दल बोलायचा. त्यामुळे मी यासंदर्भात जास्त चौकशी केली नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)