हिंदू धर्मासाठी नेपाळ इतकं खास का आहे? जाणून घ्या 'देवभूमी'बद्दल सर्वकाही

कैलास पर्वताचं धार्मिक महत्त्व काय?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, के. मायाकृष्णन
    • Role, बीबीसी तामिळसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

नेपाळला हिंदूंची एक पवित्र भूमी आणि आध्यात्मिक स्वर्ग मानलं जातं. नद्या, तलाव, दऱ्या आणि उंच पर्वतशिखरांनी नटलेला हा देश निसर्गसौंदर्याने समृद्ध आहे. परंतु, नेपाळला वेळोवेळी मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींचाही सामना करावा लागतो.

26 ऑगस्टच्या सकाळी नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला अचानक पूर आला आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं.

यापूर्वीही नेपाळमध्ये अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती घडल्या आहेत का? आध्यात्मिक कारणांसाठी विशेषतः हिंदू नेपाळला का जातात? आणि भाविक नेपाळला कसं जातात?

कैलास मानसरोवर नेमकं कुठे आहे?

हिंदू धर्मातील भाविक मोठ्या संख्येनं ज्या कैलास मानसरोवरची तीर्थयात्रा करतात, ते तिबेटमध्ये आहे.

मानसरोवरला जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. त्यापैकी 2 मार्ग भारतातून, तर एक मार्ग नेपाळमधून जातो.

भारतातून उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड आणि सिक्कीममधील नाथू ला खिंड या दोन मार्गांनी कैलास मानसरोवर यात्रेला जाता येतं. त्याचप्रमाणे पश्चिम नेपाळमधील हुमला मार्गानेही कैलास मानसरोवर यात्रेला जाता येते.

नेपाळमार्गे कैलास मानसरोवरला कसं जाता येतं?

नेपाळमधील हुमला मार्गे मानसरोवरला जाण्यासाठी एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ सर्वात योग्य मानला जातो. परंतु, काही भाविक ऑक्टोबरच्या शेवटपर्यंतही मानसरोवरला भेट देत असतात.

मानसरोवरला जाणाऱ्या भाविकांमध्ये भारतीय भाविकांची संख्या जास्त असते. ते आधी काठमांडूहून नेपाळगंजला जातात आणि तिथे एक रात्र मुक्काम करतात. नेपाळगंजहून सुमारे 45 मिनिटांच्या प्रवासानंतर सिमिकोटला जाता येतं.

सिमिकोटहून छोट्या विमानाने हिल्सा येथे जाता येतं. तिथून रस्ते मार्गाने तिबेटमधील तकलाकोटला जाता येतं. तकलाकोटपासूनच मानसरोवरची खरी यात्रा सुरू होते.

भारतातून कैलास मानसरोवरला कसं जाता येतं?

भारताचं परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान कैलास मानसरोवर यात्रेचं आयोजन करतं. यासाठी उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड आणि सिक्कीममधील नाथू ला खिंड असे दोन मार्ग आहेत.

एका ट्रॅव्हल वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील लिपुलेख मार्गाने कैलास मानसरोवर यात्रेचा अंदाजे खर्च 1 लाख 70 हजार रुपये इतका आहे. या मार्गावर साधारण 200 किमीचा डोंगराळ प्रवास करावा लागतो. यात्रेकरूंना 5 गटांमध्ये पाठवलं जातं आणि संपूर्ण यात्रा पूर्ण होण्यासाठी सुमारे 22 दिवस लागण्याची शक्यता असते.

नाथू ला खिंड मार्गाने कैलास मानसरोवर यात्रेचा अंदाजे खर्च 2 लाख 83 हजार रुपये इतका आहे. या मार्गावर सुमारे 36 किमीचा प्रवास डोंगराळ वाटेतून करावा लागतो. या मार्गाने भाविक 10 गटांमध्ये प्रवास करू शकतात. संपूर्ण यात्रा सुमारे 21 दिवसांत पूर्ण होते.

भारतातून कैलास मानसरोवरला कसं जाता येतं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कैलास पर्वत

समुद्रसपाटीपासून 6,638 मीटर उंचीवर असलेलं कैलास पर्वत आणि मानसरोवर तलाव यांना बौद्ध आणि जैन धर्मातही विशेष महत्त्व आहे.

2025 मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यात्रा सुरू करण्यापूर्वी भाविकांची वैद्यकीय तपासणी केली जाते. परराष्ट्र मंत्रालयाच्या नियमानुसार, सर्व भाविकांनी एकत्र प्रवास करून परत येणं आवश्यक आहे. तसेच, सर्व यात्रेकरूंना आपला प्रवास दिल्लीतूनच सुरू करावा लागतो.

यात्रा सुरू करण्यापूर्वी वैध पासपोर्ट, पासपोर्ट आकाराचे 6 रंगीत फोटो आणि 100 रुपयांच्या स्टॅम्पवरील नोटरीकडून प्रमाणित केलेलं नुकसानभरपाईचं पत्र मंत्रालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे जमा करणं आवश्यक आहे.

यासोबत आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यासाठीचं प्रतिज्ञापत्र आणि चीनच्या हद्दीत मृत्यू झाल्यास तिथेच अंत्यसंस्कार करण्यासाठीचं संमतीपत्र द्यावं लागतं. या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास प्रवासाला परवानगी दिली जात नाही.

या यात्रेसाठी कोण अर्ज करू शकतं?

भारतमार्गे कैलास मानसरोवर यात्रेसाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काही नियम निश्चित केले आहेत. त्यातील पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे यात्रेकरू हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे.

यात्रेकरूकडे किमान 6 महिने वैध असलेला भारतीय पासपोर्ट असणं आवश्यक आहे. तसेच, चालू वर्षाच्या 1 जानेवारी रोजी वय किमान 18 आणि जास्तीत जास्त 70 वर्षे असावं.

मानससरोवर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मानससरोवर

या यात्रेसाठी भाविक किवा यात्रेकरूंचा बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स महत्त्वाचा आहे. बीएमआय 25 किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या व्यक्तींनाच या यात्रेला जाण्याची परवानगी दिली जाते.

या यात्रेला जाणारी व्यक्ती शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. परदेशी नागरिकांना या यात्रेसाठी अर्ज करता येत नाही. त्याचप्रमाणे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकही या यात्रेसाठी अर्ज करू शकत नाहीत.

'भगवान शिवाचं निवासस्थान मानला जाणारा नेपाळ'

तिरुवन्नमलाई, पोलूरचे गोकुळकृष्णन महाराज सांगतात की, हिंदूंचे प्रमुख देव मानले जाणारे भगवान शिव यांचं निवासस्थान म्हणून नेपाळकडे पाहिलं जातं. त्यामुळे नेपाळ हे आध्यात्मिक पर्यटनाचं महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं.

बीबीसी तमिळशी बोलताना ते म्हणाले, "नेपाळ हा निसर्गसौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेला एक देश आहे. आयुष्यात एकदा तरी या भूमीवर जावं आणि कैलासाचं दर्शन घ्यावं, अशी हिंदू धर्माच्या अनुयायांची इच्छा असते. त्यानुसार मला देखील 2 वर्षांपूर्वी नेपाळला जाऊन येण्याची संधी मिळाली होती."

नेपाळची राजधानी काठमांडूमधील पशुपतीनाथ मंदिर काशीइतकंच पवित्र मानलं जातं, असं गोकुळकृष्णन यांनी सांगितलं. ते म्हणाले, "काशीमध्ये मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यास त्याला स्वर्ग मिळतो, अशी श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे नेपाळमध्येही मृत्यू झाल्यास स्वर्गात प्रवेश मिळतो, अशी धारणा आहे. काशीमधून गंगा नदी वाहते, त्याचप्रमाणे नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिराजवळून बागमती नदी वाहते."

नेपाळमधल्या एका मंदिरातलं दृश्य (संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नेपाळमधल्या एका मंदिरातलं दृश्य (संग्रहित छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तिथल्या पूजापद्धतीबद्दल त्यांनी सांगितलं, "काठमांडूत 2 ते 5 वर्षांच्या वयोगटातील एका विशिष्ट समाजातील मुलीची निवड करून तिची जिवंत देवी म्हणून पूजा केली जाते. सण-उत्सवांच्या काळातच ही 'जिवंत कुमारी' दर्शनासाठी बाहेर येते आणि तिचे आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात. या मुलीला देवीचं रूप मानलं जातं आणि ती वयात येईपर्यंत तिची देवी म्हणून पूजा केली जाते."

त्यांच्या मते, "ती मुलगी वयात आल्यानंतर तिची जागा घेण्यासाठी दुसऱ्या मुलीची कुमारी म्हणून निवड केली जाते. नेपाळमध्ये ही परंपरा आजही सुरू आहे. महिलांना देवीचं रूप मानून त्यांची पूजा करण्याचं हे एक प्रतीक मानलं जातं. याचप्रमाणे, भगवती देवीचं मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेलं मनकामना हेही नेपाळमधील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे."

त्याचबरोबर, काठमांडूजवळ नागरकोट, चंद्रागिरी पर्वत आणि सिसपानी यासारखी अनेक ठिकाणं आहेत. परंतु, भव्य सूर्योदय पाहण्यासाठी नागरकोट हे सर्वोत्तम ठिकाण आहे, असं गोकुळकृष्णन यांनी सांगितलं.

त्यामागचं एक कारण म्हणजे, पहाटे हिमालयाच्या पर्वतरांगांमागून उगवणारा सूर्य आणि त्याच्या नारिंगी प्रकाशात उजळून निघणारे डोंगर-दऱ्यांचं सुंदर दृश्य पाहताना देवाचं दर्शन झाल्यासारखं वाटतं, अशी हिंदू भाविकांची श्रद्धा आहे.

त्याचप्रमाणे, बुद्धांचा जन्म झालेलं पवित्र ठिकाण लुंबिनी, भगवान विष्णूंना समर्पित वैष्णव तीर्थक्षेत्र मुक्तिनाथ मंदिर आणि सीतेचं जन्मस्थान मानलं जाणारं जनकपूर सीता मंदिर अशी अनेक धार्मिक स्थळंही नेपाळमध्ये आहेत. या ठिकाणी हिंदू भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.

कैलास पर्वताचं धार्मिक महत्त्व काय?

गोकुळकृष्णन सांगतात, "माझ्यासारखे साधू आणि हिंदू भाविक कैलासाचं दर्शन घेण्याची इच्छा बाळगतात. कैलासला जाऊन पूजा केल्याने आध्यात्मिक परिवर्तन होते, अशी श्रद्धा आहे. कैलास पर्वताची प्रदक्षिणा आणि पूजा ही जगातील महत्त्वाच्या पवित्र तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. हा पर्वत मनःशांती आणि एकतेचं प्रतीक म्हणून पूजनीय मानला जातो."

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, कैलास पर्वतावर भगवान शिव आपल्या परिवारासह वास करतात. जैन धर्मीय या पर्वताला 'अष्टपद' म्हणतात. जैन धर्मातील 24 तीर्थंकरांपैकी पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांना याच ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली होती, अशीही मान्यता आहे.

नेपाळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नेपाळमधल्या इंद्र जत्रा सोहळ्यातलं एक दृश्य (संग्रहित छायाचित्र)

तिबेटमधील बौद्ध आणि बोन धर्माचे अनुयायी या पर्वताला 'तिसे' म्हणतात. त्यांच्या श्रद्धेनुसार, हे देवी 'सिपाईमेन'चं निवासस्थान आहे. तर तिबेटी बौद्ध धर्मीय कैलास शिखराला 'डेमचोक' आणि त्यांची पत्नी 'दोर्जे फाग्मो' यांचं पवित्र निवासस्थान मानतात.

गोकुळकृष्णन यांनी सांगितलं, "आशियातील 4 प्रमुख नद्या आणि त्यांच्या हिमनद्या या पर्वताच्या शिखरावर 'स्वस्तिक' हे हिंदू धर्मातील एक भव्य प्रतीक साकारतात. सिंधू नदी उत्तरेकडून, कर्णाली नदी दक्षिणेकडून, सतलज पश्चिमेकडून आणि ब्रह्मपुत्रा पूर्वेकडून वाहते. या नद्या आशिया खंडासाठी जीवनदायिनी मानल्या जातात. कैलास पर्वताजवळ असलेलं मानसरोवर देखील पवित्र मानलं जातं."

'ब्रह्मदेवाच्या मनातून निर्माण झालेलं मानसरोवर'

गोकुळकृष्णन सांगतात, "हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मानसरोवर तलावाची निर्मिती सर्वप्रथम ब्रह्मदेवाच्या मनात झाली. त्यामुळे या तलावाला 'मानसरोवर' असं नाव पडलं. 'मानसरोवर' हे दोन संस्कृत शब्दांचे मिश्रण आहे. 'मानस' म्हणजे मन किंवा बुद्धी, तर 'सरोवर' म्हणजे तलाव."

कैलास पर्वत-मानसरोवर परिसरात देवतांचा वास असून त्या तिथे ध्यान करतात, अशी श्रद्धा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, केवळ हिंदूच नाही, तर विविध धर्मांचे आध्यात्मिक श्रद्धा असलेले लोकही या स्थळाला भेट देतात, असं त्यांनी सांगितलं.

त्याचप्रमाणे, तिरुवन्नमलाईचे गोकुळकृष्णन महाराज यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने नेपाळला जाण्यासाठी योग्य असल्याचं सांगितलं.,

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)