नेपाळ पूर : मृतांची संख्या 95 वर, 133 भारतीयांसह जवळपास 500 पर्यटक बेपत्ता

नेपाळ-तिबेट सीमेवर भयंकर पूर

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील 'भोटे कोशी' नदीला अचानक आलेल्या पुरामुळे, देशातील विविध जिल्ह्यांतून किमान 95 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

दरम्यान, नेपाळ पर्यटन बोर्डनं जाहीर केलेल्या नवीन माहितीनुसार, पुरामुळे बेपत्ता झालेल्यांची संख्या 579 झाली आहे.

बेपत्ता पर्यटकांपैकी 466 जण 28 वेगवेगळ्या देशांतील परदेशी नागरिक आहेत.

या बेपत्ता पर्यटकांपैकी 113 जण नेपाळी आणि 54 जण अमेरिकन आहेत, तर बेपत्ता ब्रिटिश नागरिकांची संख्या 33 इतकीच आहे.

नेपाळ पर्यटन बोर्ड आणि विविध ट्रॅव्हल एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यातील भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाले असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

नेपाळ पर्यटन बोर्डनं स्पष्ट केलंय की, संपर्क तुटलेल्या लोकांमध्ये भारतीयांचा गट सर्वात मोठा असून त्यात 133 भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं म्हटलंय.

नेपाळमधील पुरामुळे बिहारमधील अनेक जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे. नेपाळमधील अनेक भागांची सीमा बिहारला लागून आहे.

नेपाळच्या 'नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी'ने म्हटले आहे की, रसुवामधील भोटे कोशी नदीला आलेला पूर हा तिबेटमधील 'हिमनदीच्या भूस्खलना'मुळे (glacial landslide) आला आहे.

बीबीसी नेपाळीच्या वृत्तानुसार, संबंधित प्राधिकरणाने सांगितलंय की, उपग्रह प्रतिमांच्या विश्लेषणावर आधारित प्राथमिक अभ्यासातून असं दिसून आले आहे की, नेपाळ-चीनमधील रसुवागढी सीमा ओलांडण्याच्या ठिकाणापासून ईशान्येला सुमारे 20 किलोमीटर अंतरावर या पुराची सुरुवात झाली होती.

अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, "नेपाळ-चीन सीमेवर झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेमुळे लेंडे नदीचा प्रवाह ढिगाऱ्यामुळे अडवला गेला आणि पुराचे पाणी तिमुरेमार्गे त्रिशूली नदीत शिरले."

गेल्या वर्षी आलेल्या भीषण पुरामुळे तिबेटच्या सीमेलगतच्या भागातील 'लेंडे' नदीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

दरम्यान, 'इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट' (ICIMOD) च्या तज्ज्ञांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की, हा भीषण पूर कदाचित हिमस्खलनामुळे आला असावा.

नेपाळ पूर

फोटो स्रोत, Shaktimaya Tamang

नेपाळमधील भारतीय दूतावासाकडून मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नेपाळमधील भारतीय दूतावासानं पूरपरिस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आणि संबंधित माहिती देण्यासाठी आपत्कालीन क्रमांक जारी केलेले आहेत.

कोणत्याही माहितीसाठी या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल, असं दूतावासानं कळवलं आहे.

संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:

  • +977 985 131 6807
  • +977 970 910 7500

उत्तर नेपाळमधील काही भागांत आलेल्या भीषण पुरामुळे जीवित व वित्तहानीची मोठी भीती निर्माण झाली आहे. यात अनेक गावं वाहून गेली असून, जलविद्युत धरणासह विविध पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे.

बुधवारी पहाटे राजधानी काठमांडूच्या उत्तरेस असलेल्या रसुवा जिल्ह्यात हा पूर आला. हा भाग तिबेटच्या सीमेला लागून असून, चीनशी असलेल्या नेपाळच्या मुख्य व्यापारी मार्गावर आहे.

तिबेटमधून नेपाळमध्ये वाहणाऱ्या 'भोटे कोशी' नदीत वितळलेला बर्फ कोसळल्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 'त्रिशुली' नदीलाही पूर आला आहे.

नदीच्या प्रवाहाच्या दिशेनं खालील भागात असलेल्या अनेक जिल्ह्यांसाठी 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. रसुवाचे मुख्य जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांनी 'बीबीसी न्यूज नेपाळी'ला सांगितलं की, अधिकाऱ्यांना मोठ्या नुकसानीची शक्यता वाटत आहे. मात्र, नुकसानीच्या व्याप्तीचा अचूक अंदाज आताच घेणं घाईचं ठरेल.

नेपाळ पूर

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट करत म्हटलंय की, "नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा केली आणि तिथल्या पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे."

"नेपाळला सर्वतोपरी मदत पुरवण्यासाठी भारत सज्ज आहे. बचाव आणि मदतकार्याबाबत आमची पथके जवळून समन्वय साधत आहेत," असंही त्यांनी म्हटलंय.

अनेक जणांची सुटका

आतापर्यंत मदत आणि बचाव कार्यात 12 जणांची सुटका करण्यात आली आहे.

सशस्त्र पोलीस दलाच्या 13 जवानांचा संपर्क तुटून ते बेपत्ता झाल्यानंतर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आल्याचं सशस्त्र पोलीस दलानं सांगितलं आहे.

सशस्त्र पोलीस दलाचे उप-प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितलं की, रसुवामधील मैलुंग येथून चार आणि तिमुरे इथून नऊ जण बेपत्ता आहेत.

त्यांनी सांगितलंय की, "आम्ही बालंबूमधील 100 खाटांचं रुग्णालय सज्ज ठेवलं आहे."

रसुवा आणि नुवाकोटमधून वाहणाऱ्या भोटे कोशी आणि त्रिशूल नद्यांमधील पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या वृत्तावर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

नेपाळ पूर

फोटो स्रोत, RSS

काठमांडूमध्ये वास्तव्यास असलेल्या यी लियांग या चिनी व्यावसायिकाने बीबीसीला सांगितलं की, "आमच्या लॉजिस्टिक्स कंपनीचे सात कंटेनर ट्रक तिथे आहेत आणि त्यावर पूर्णपणे नेपाळी कर्मचारी कार्यरत आहेत. आमचा त्या सर्वांशी संपर्क तुटला आहे. तिथं नेटवर्क सिग्नल नसल्यामुळे आम्ही कोणाशीही बोलू शकत नाही."

"जितकं मला माहितीय, त्यानुसार कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. दरडी कोसळणं किंवा भूस्खलन होणं, विशेषतः पावसाळ्यात, या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु, ही घटना मात्र अत्यंत गंभीर असल्याचं दिसून येत आहे."

नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं धोकादायक क्षेत्रांमधील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

नेपाळ पूर

फोटो स्रोत, Reuters

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेतल्यानंतर, नेपाळचे पंतप्रधान बाळेंद्र शाह यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "वैद्यकीय पथकं, स्काउट्स आणि रेड क्रॉस यांच्या समन्वयाने आवश्यक उपाययोजना करण्याचे काम सुरू झाले आहे."

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यातील दोन चौक्यांवरील 'आर्म्ड पोलीस फोर्स'चे 13 जवान बेपत्ता आहेत. याव्यतिरिक्त, इतर डझनभर पोलीस कर्मचाऱ्यांशीही संपर्क तुटला आहे.

गेल्या वर्षी, सीमेच्या चिनी बाजूकडील हिमनद कोसळल्यामुळे रसुवामध्ये भीषण पूर आला होता, ज्यात 18 जणांचा बळी गेला होता.

बुधवारी ओढवलेल्या या आपत्तीची तीव्रता गेल्या वर्षीच्या पुरापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)