डोनाल्ड ट्रम्प यांनी खरंच 'त्या' 8 महिलांना फाशीच्या शिक्षेतून वाचवलं का? त्या कोण आहेत?

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांच्या फोन कॉलनंतर त्या महिलांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली. दुसरीकडे इराणने या महिलांना फाशी दिली जाणार नव्हतीच, असं म्हटलं.

फोटो स्रोत, EYakoby/Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांच्या फोन कॉलनंतर त्या महिलांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली. दुसरीकडे इराणने या महिलांना फाशी दिली जाणार नव्हतीच, असं म्हटलं.
वाचन वेळ: 4 मिनिटे

गेल्या आठवड्यात, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "8 इराणी महिलांना फाशीच्या शिक्षेतून वाचवले" असा दावा केला.

परंतु इराणच्या न्यायव्यवस्थेने हे दावे चुकीचे असल्याचे म्हटले. तसेच ट्रम्प यांनी ज्या 8 महिलांचा उल्लेख केला त्यांना फाशी दिलीच जाणार नव्हती, असं नमूद केलं.

"ट्रम्प यांनी खोट्या वृत्तांवर विश्वास ठेवला", असं इराणच्या न्यायव्यवस्थेने म्हटलं.

या दावे आणि प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत आपल्याला काय माहीत आहे? जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर या 8 महिलांना फाशी दिली जाणार असल्याचा दावा करणारे फोटो प्रसारित झाले होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलं होतं.

ट्रम्प यांचा दावा खरा आहे का?

संबंधित दाव्यानुसार, या महिला जानेवारी महिन्यात इराणमध्ये झालेल्या सरकारविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. सरकारनं बळाचा वापर करून ही आंदोलनं रोखली होती.

ट्रम्प यांनी मंगळवारी (21 एप्रिल) अशीच एक पोस्ट करून इराणी राजवटीला या महिलांबद्दल विचारणा केली. ते म्हणाले की, या महिलांची सुटका ही 'आपल्या चर्चेची एक चांगली सुरुवात' असेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांच्या फोन कॉलनंतर त्या महिलांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली. दुसरीकडे इराणने या महिलांना फाशी दिली जाणार नव्हतीच, असं म्हटलं.

फोटो स्रोत, EYakoby

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांच्या फोन कॉलनंतर त्या महिलांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली. दुसरीकडे इराणने या महिलांना फाशी दिली जाणार नव्हतीच, असं म्हटलं.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच हे घडले.

त्यानंतर, बुधवारी (22 एप्रिल) ट्रम्प यांनी पुन्हा 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करून असा दावा केला की, ज्या 8 इराणी महिला आंदोलकांना फाशी देण्यात येणार होती, त्यांना आता फाशी दिली जाणार नाही.

मात्र, इराणने या महिलांना फाशी देण्याचा कोणताही हेतू नसल्याचे म्हटले होते.

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ' या सोशल प्लॅटफॉर्मवर म्हटले, "एक खूप चांगली बातमी येत आहे. मला सांगण्यात आले आहे की, या आठही महिला आंदोलकांना फाशी दिली जाणार नाही. चौघींना तत्काळ सोडण्यात येईल आणि उर्वरित चौघी महिनाभर तुरुंगात राहतील."

"अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत या महिलांच्या फाशीची शिक्षा रद्द केल्याबद्दल मी इराण आणि त्यांच्या नेत्यांचे कौतुक करतो."

ट्रम्प यांचं हे विधान तेव्हा आलं होतं जेव्हा जानेवारी महिन्यात सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या या महिलांना इराणमध्ये फाशी देण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

गेल्या आठवड्यात, डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिलांच्या सुटकेसाठी आवाहन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

फोटो स्रोत, EYakoby

फोटो कॅप्शन, गेल्या आठवड्यात, डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिलांच्या सुटकेसाठी आवाहन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बीबीसी अरबीच्या वृत्तानुसार, इराणी न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्या मिझान न्यूज एजन्सीनं म्हटलं की, "विरोधी माध्यमांनी पसरवलेल्या खोट्या बातम्यांमुळे ट्रम्प यांची दिशाभूल झाली. काही महिलांना आधीच सोडण्यात आलं आहे. तर उर्वरित महिलांवर असे आरोप आहेत ज्याला मृत्युदंडाची शिक्षा होत नाही."

बीबीसीच्या वार्ताहर लिस डुसेट यांनी सांगितले की, बीबीसीने या संदर्भात इराणी न्यायिक अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती मागितली आहे. त्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.

लिझ डुसेट यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी ओस्लो येथील 'इराण ह्युमन राइट्स' नावाच्या संस्थेकडे याबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे यातील 5 महिलांविषयी माहिती असल्याचं सांगितलं.

इराण ह्युमन राइट्सचे संचालक महमूद अमिरी मोघादम म्हणाले, "या महिलांपैकी डॉक्टर गुलनार नारघी आणि व्हीनस हुसैनीजाद यांना गेल्या महिन्यात जामिनावर सोडण्यात आले. परंतु गझल गलांदरी आणि महबूबे शबानी 2 महिलांना मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते."

"बिटा हिमाती नावाच्या एका महिलेला यापूर्वीच मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या महिलेला जानेवारी महिन्यात सरकारविरोधी आंदोलनादरम्यान तिच्या पतीसह अटक करण्यात आली होती."

इराणमधील सरकारविरोधी आंदोलनं

फोटो स्रोत, MAHSA / Middle East Images / AFP via Getty Images

इराणमध्ये मृत्युदंडाची अंमलबजावणी सुरुच आहे. इराणी न्यायव्यवस्थेने पुष्टी केली की, गेल्या आठवड्यात 5 जणांना फाशी देण्यात आली. त्यापैकी बहुतेक जण इस्रायलसाठी हेरगिरी केल्याबद्दल दोषी आढळले होते.

गेल्या वर्षी 169 इराणी नागरिकांना फाशी देण्यात आली. ही संख्या 1989 नंतरची सर्वाधिक फाशी दिलेल्या नागरिकांची संख्या आहे.

यावरून मानवाधिकार संघटनांनी इराणवर टीका केली आहे.

युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत इराणने 12 हून अधिक लोकांना फाशी दिली आहे. त्यापैकी काहींवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा, तर इतरांवर या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या सरकारविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)