शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड

पुणे येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत आज (24 नोव्हेंबर) डॉ. निंबाळे यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
जानेवारी 2027 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे.
डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि दलित साहित्याचे महत्त्वाचे अभ्यासक आहेत. त्यांच्या 'अक्करमाशी' या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले. दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची मांडणी करणारा 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' हा त्यांचा ग्रंथ विशेष महत्त्वाचा मानला जातो.
'हिंदू', 'सनातन', 'झुंड', 'बहुजन', 'रामराज्य' या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. त्यांच्या साहित्याचे हिंदी, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले असून, काही साहित्य परदेशी भाषांमध्येही अनुवादित झाले आहे.
सरस्वती सन्मान प्राप्त साहित्यिक
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सुमारे 40 हून अधिक पुस्तकांचे लिखाण केले आहे. ते 2011 मध्ये नांदेड येथे झालेल्या 12 व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
2019 मध्ये झालेल्या 20 व्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात त्यांना प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
'सनातन' या कादंबरीसाठी त्यांचा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा 'सरस्वती' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
डॉ. लिंबाळे यांच्या 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' या पुस्तकाच्या बंगाली अनुवादासाठी (दलित नंदतत्त्व) अनुवादक मृण्मयी प्रामाणिक यांना 2023 चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला होता.

'हा सामाजिक लढाईचा सन्मान'
दरम्यान, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्यामुळे खूप आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, "ज्या भाषेमध्ये मी गेल्या 40 ते 45 वर्षांपासून लिहितो आहे. त्या भाषेनं, मराठी माणसाने, मराठी समाजाने आणि मराठी साहित्य महामंडळाने माझ्या लेखनाची दखल घेऊन मला हा बहुमान दिला आहे, माझा सन्मान केलेला आहे. मला याचा खूप आनंद झाला आहे."

"मला वाटतं सामाजिक लढाईचा हा सन्मान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा हा गौरव आहे. ज्या विचारांपासून प्रेरणा घेऊन मी लिहिलं त्या विचारांना प्रोत्साहन देण्याचं काम मराठी साहित्य महामंडळाने आणि त्याच्याशी संलग्नित संस्थानी केलेलं आहे."
ते पुढे म्हणाले, "मराठी भाषेला फार मोठा वारसा आहे, मोठा इतिहास आहे. महानुभव साहित्य, संत साहित्यापासून ही चळवळ सुरू होते. मराठी लेखक हा समाजाशी एकनिष्ठ असलेला सामाजिक बांधिलकी मानणारा, भाषेविषयी, माणसांविषयी प्रेम करणारा आहे. लेखकांनी विपुल लिहिलेलं आहे आणि मराठी भाषेला समृद्ध केलेलं आहे."
"संतापासून ते आतापर्यंतच्या दलित, ग्रामीण आणि स्त्रीवादी लेखकांपर्यंत, सगळ्याच लेखकांनी मराठी समाजाचं स्वप्न, मराठी समाजाचं सुख-दुःख यांच्याशी एकनिष्ठ राहून लोकांपुढे मांडलेलं आहे", असंही त्यांनी म्हटलं.
अध्यक्षपदाचा सोलापूराला तिसऱ्यांदा मान
'सनातन' या कादंबरीसाठी त्यांना 2020 मध्ये प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचे 3 साहित्य पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2021 मध्ये 'पुणे रत्न' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

डॉ. लिंबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सोलापुरातील साहित्यिकाला तिसऱ्यांदा मिळाला आहे.
यापूर्वी पुणे येथे 1990 साली झालेल्या 63 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. यु. म. पठाण हे होते.
तर सोलापूर येथे 2006 साली झालेल्या 79 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मारूती चित्तमपल्ली हे होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























