बॉसच्या नंबरवरून मेसेज, थेट 1.5 कोटींची मागणी; काय आहे हा 'बॉस स्कॅम'?

बॉस स्कॅम

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रॉक्सी गागडेकर छारा
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

एक मेसेज आला, त्यासोबत एक झिप फाइल आली आणि काही तासांतच कंपनीला तब्बल दीड कोटी रुपये दुसऱ्या अकांउटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. पुढे काय घडलं?

अहमदाबादमधून समोर आलेल्या 'बॉस स्कॅम'मध्ये सायबर गुन्हेगार कंपनीच्या बॉसची ओळख वापरून कर्मचाऱ्यांकडून पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून फसवणूक करतात.

या प्रकारच्या स्कॅम किंवा फसवणुकीमध्ये सायबर गुन्हेगार कंपनीच्या बॉसचं नाव आणि प्रोफाइल फोटो वापरतात. त्यानंतर कंपनीच्या अकाउंटंट किंवा फायनान्स विभागातील कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲपवर मेसेज करून एका ठराविक खात्यात लगेचच पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात.

हा मेसेज प्रत्यक्षात बॉसच्या नंबरवरून आलेला नसतो, तरी कर्मचाऱ्याच्या फोनवर तो बॉसच्या नावाने दिसतो. त्यामुळे मेसेजची खात्री न करता पैसे ट्रान्सफर करण्याची शक्यता वाढते.

अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांच्या तपासात या फसवणुकीमागे एक संघटित यंत्रणा असल्याचं समोर आलं आहे. यासाठी बनावट सिम कार्ड, ओटीपी, व्हॉट्सॲप अकाउंट आणि मालवेअरचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांनी सुमारे साडेचार हजार सिम कार्डशी संबंधित माहितीच्या आधारे देशातील 26 राज्यांमध्ये दाखल झालेल्या 251 तक्रारींचा तपास केला. यात 'बॉस स्कॅम'च्या 3 तक्रारींचाही समावेश होता.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या नेटवर्कचे चीन, पाकिस्तान, भारत आणि हाँगकाँगपर्यंत संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

'बॉस स्कॅम' उघडकीस कसा आला?

अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रवीण नागजीभाई बावलिया यांना 23 जून 2026 रोजी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता.

मेसेज करणाऱ्या व्यक्तीने आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) 'रिस्क कंट्रोल' विभागाशी संबंधित असल्याचे दाखवले.

मेसेजमध्ये त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात संशयास्पद व्यवहार होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे खाते बंद केले जाऊ शकते किंवा त्यावर निर्बंध येऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला. या मेसेजसोबत एक 'झिप' फाइलही पाठवण्यात आली होती.

बीबीसी गुजरातीशी बोलताना प्रवीणभाई म्हणाले, "गेल्या 6 महिन्यांपासून मला असे मेसेज सातत्याने येत होते. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु, असे मेसेज आणि लिंक सतत येत असल्याने हे कदाचित आरबीआयकडून आलेले संदेश असावेत, असं मला वाटलं."

"त्यामुळे मी ती लिंक माझ्या रिअल इस्टेट कंपनीच्या अकाउंटंटला पाठवली आणि खातं बंद किंवा गोठवलं जाऊ नये म्हणून त्याची माहिती तपासण्यास सांगितलं."

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांच्या म्हणण्यानुसार, अकाउंटंटने आपल्या डेस्कटॉपवर ती लिंक उघडली आणि त्यातून एक फाइल डाउनलोड केली.

ती फाइल डाउनलोड केल्यानंतर हॅकरला माझ्या व्हॉट्सॲपमधील कॉन्टॅक्ट्स आणि डेस्कटॉपवरून होणारे व्हॉट्सॲपवरील संभाषण दिसू लागले.

प्रवीणभाईंच्या म्हणण्यानुसार, या घटनेच्या वेळी ते लग्नासाठी उदयपूरला गेले होते. हॅकरला याचीही माहिती होती. दुसऱ्या दिवशी पहाटे हॅकरने प्रवीणभाईंच्या नावाने त्यांच्या अकाउंटंटला मेसेज केला आणि कोलकात्यातील एका गारमेंट कंपनीला तातडीने 1.5 कोटी रुपये पाठवण्यास सांगितले. अकाउंटंटने आरटीजीएसद्वारे 1.5 कोटी रुपये ट्रान्सफरही केले.

या व्यवहाराची माहिती समजताच प्रवीणभाईंनी सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1930 हेल्पलाइनवर या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. फसवणुकीत गेलेल्या 1.5 कोटी रुपयांपैकी 1 कोटी 13 लाख 53 हजार 700 रुपये परत मिळवण्यात आले आहेत. तर साधारण 25 लाख रुपये परदेशात ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

पोलिसांनी या स्कॅममध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून इराम अली पियादा आणि इन्झामुल मोल्ला या दोघांना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बीबीसीने दोन्ही आरोपींच्या वकिलांशी किंवा कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही बातमी होईपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची बाजू समोर आल्यास या बातमीत त्याची माहिती अपडेट केली जाईल.

बॉस स्कॅमची पद्धत काय?

हा स्कॅम नेमका कसा करण्यात आला, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचच्या डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलिस (डीएसपी) लविना सिन्हा यांच्याशी संवाद साधला.

ते सांगतात की, सायबर गुन्हेगार सुरुवातीला आरबीआय किंवा एखाद्या सरकारी संस्थेचे अधिकारी असल्याचे भासवतात. त्यानंतर कंपनीच्या सीईओ, संचालक किंवा कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर झिप फाइल पाठवतात.

"या झिप फाइलमध्ये .exe किंवा .dll सारख्या धोकादायक फाइल्स असतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशी फाइल व्हॉट्सॲप वेबच्या माध्यमातून कंपनीच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर उघडली, तर सायबर गुन्हेगार त्या व्हॉट्सॲप वेबवर ताबा मिळवू शकतात."

"त्यानंतर कंपनीच्या सीईओ किंवा संचालकाची ओळख आणि प्रोफाइल फोटो वापरून सायबर गुन्हेगार स्वतःचा मोबाईल नंबर बॉसच्या नावाने सेव्ह करतात."

"नंबर सेव्ह केल्यानंतर कंपनीच्या अकाउंट्स किंवा फायनान्स विभागातील कर्मचाऱ्याला त्वरीत पैसे ट्रान्सफर करण्यास सांगणारा मेसेज पाठवला जातो. या संपूर्ण फसवणुकीत बनावट सिम कार्ड आणि ओटीपी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात."

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Getty Images

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांच्या नावावर घेतलेल्या सिम कार्डमधून त्यांच्या नकळत मोबाईल नंबर सक्रिय करून बनावट सिम कार्ड तयार केले जात होते. हे सिम कार्ड वेगवेगळ्या फोनमध्ये वापरले जात होते आणि त्यांची माहिती सायबर गुन्हेगारांना पुरवली जात होती.

जेव्हा या नंबरवरून व्हॉट्सॲप अकाउंट सुरू केले जात असत, तेव्हा त्यासाठी लागणारा ओटीपी बनावट सिम कार्डवर घेतला जात असे. हा ओटीपी नंतर सायबर गुन्हेगारांना दिला जात होता.

अशाप्रकारे सायबर गुन्हेगारांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी एक यंत्रणा तयार करता येत होती.

अहमदाबाद पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, यातील एक आरोपी सायबर फसवणुकीत सहभागी असलेल्या लोकांच्या संपर्कात होता.

ही व्यक्ती त्यांना मोबाईल नंबर, बनावट सिम कार्ड आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संवादाची व्यवस्था तयार करण्यासाठी मदत करत असत.

दुसरा आरोपी एअरटेल, जिओ, व्हीआय आणि बीएसएनएल या टेलिकॉम कंपन्यांसाठी सिम कार्ड विक्री केंद्र (सेल्स आऊटलेट) म्हणून काम करत होता.

पोलिसांचा आरोप आहे की, हा आरोपी ग्राहकांच्या बायोमेट्रिक ठशांचा आणि टेलिकॉम कंपनीच्या ॲप्लिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर सिम कार्ड घेत होता. त्यानंतर ग्राहकांना काहीही माहिती नसताना त्यांचा मोबाईल नंबर दुसऱ्या सिम कार्डवर ॲक्टिव्ह करत असत.

'सायबरक्राइम-ॲज-अ-सर्व्हिस' म्हणजे नेमकं काय?

सायबर गुन्ह्यांच्या जगात आता प्रत्येक गुन्हेगाराला संपूर्ण तांत्रिक व्यवस्था स्वतः तयार करण्याची गरज नसते.

कोणी बनावट सिम कार्ड देतो, कोणी ओटीपी मिळवून देतो, तर कोणी व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून देतो. त्यानंतर आणखी एक व्यक्ती पीडित व्यक्तीशी बोलून त्याच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेते.

अहमदाबाद पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तयार डिजिटल सेवा, ग्रुप आणि इतर साधनांचा वापर करून सायबर फसवणूक करणे म्हणजे 'सायबरक्राइम-ॲज-अ-सर्व्हिस' (CaaS) असं म्हणता येते.

म्हणजेच, सायबर गुन्हा करण्यासाठी लागणारी डिजिटल साधनं आणि सेवाही रेडिमेड म्हणजेच तयार स्वरूपात उपलब्ध असतात.

सायबर क्राइम

फोटो स्रोत, Getty Images

या प्रकरणाच्या तपासात मिळालेल्या सुमारे 4500 सिम कार्डच्या माहितीच्या आधारे अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांनी 26 राज्यांमधील 251 एनसीआरपी तक्रारींचे विश्लेषण केले.

या तक्रारींमध्ये 194 ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या, 3 'बॉस स्कॅम'च्या आणि 29 ऑनलाइन तसेच सोशल मीडियाशी संबंधित गुन्ह्यांच्या तक्रारींचा समावेश होता.

याशिवाय इतर प्रकारच्या सायबर गुन्ह्यांच्या, हॅकिंगच्या, लैंगिक स्वरूपाच्या अश्लील मजकूर आणि मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित तक्रारींचाही या डेटामध्ये समावेश होता.

या तपासादरम्यान 10 हजारांहून अधिक संक्रमित उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

आरोपींकडून 7 मोबाईल फोन आणि 1 एअरटेल राऊटरही जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या उपकरणांमधील व्हॉट्सॲप चॅट, ग्रुप्स, मोबाईल नंबर आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे आणखी आरोपी आणि या नेटवर्कचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास सुरू आहे.

अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँच आणि I4Cच्या तांत्रिक आणि नेटवर्क विश्लेषानानुसार, या प्रकरणात वापरलेलं मालवेअर चीनशी संबंधित सायबर गुन्हेगारांनी तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे.

बॉस स्कॅमपासून कसं वाचाल?

अहमदाबाद पोलिसांनी अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

अनोळखी मोबाईल नंबर किंवा ई-मेलवरून आलेली ZIP, .exe, .dll किंवा .apk फाइल डाउनलोड करुन नका किंवा ती उघडूही नका.

सिन्हा म्हणतात, "व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवरून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगणारा मेसेज आला, तर त्याची स्वतंत्रपणे खात्री केल्याशिवाय पैसे ट्रान्सफर करू नका."

"बॉस किंवा सीईओने तातडीने पैसे पाठवण्यास सांगितले, तर त्यांच्या नेहमीच्या किंवा दुसऱ्या नंबरवर फोन करून, व्हीडिओ कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून आधी खात्री करून घ्या."

ते पुढे सांगतात की, व्हॉट्सॲपमधील 'लिंक्ड डिव्हाइसेस' वेळोवेळी तपासा. अनोळखी डिव्हाइस जोडलेले दिसल्यास ते लगेच लॉगआउट करा. तसेच, व्हॉट्सॲपमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवा.

कंपन्यांनी अनोळखी .exe आणि .dll फाइल्स उघडता येणार नाहीत, अशी सुरक्षा व्यवस्था करावी. तसेच विंडोज, अँटिव्हायरस आणि इतर सुरक्षा सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवावे.

अशा प्रकारच्या फसवणुकीत वेळ खूप महत्त्वाची असते. अहमदाबाद पोलिसांनी फसवणूक झाल्यास ताबडतोब 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क करण्याचा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रवीणभाईंच्या बाबतीतही फसवणूक झाल्याचे कळताच त्वरीत तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना वेळीच कारवाई करता आली आणि मोठी रक्कम गोठवता किंवा परत मिळवता आली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.