दिवसाला 20 प्याले रिचवणाऱ्या जहाँगीरने सोपवली होती नुरजहाँकडे सत्ता, व्यसनाचा मुघल बादशाहवर कसा झाला परिणाम?

फोटो स्रोत, Heritage Art/Heritage Images via Getty Images
- Author, वकार मुस्तफा
- Role, पत्रकार, संशोधक
- Published
- वाचन वेळ: 10 मिनिटे
"मी सल्तनत (राज्य) नूरजहाँकडे सोपवली आहे. आता मला केवळ एक शेर मदिरा आणि अर्धा शेर मांस यापलीकडे काही नकोय."
हे शब्द चौथा मुघल बादशाह नुरुद्दीन मुहम्मद जहाँगीर याचे आहेत. मिर्झा मुहम्मद हादी यांनी आपल्या 'तुझुक-ए-जहाँगीरी' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हे शब्द लिहिले आहेत.
पण, जहाँगीरने स्वतःही रोजच्या घटनांवर आधारित आपल्या 'जहाँगीरनामा' या पुस्तकात मद्य आणि नशेच्या इतर पदार्थांच्या सेवनाच्या घटनांचा उल्लेख लपवून ठेवलेल्या नाहीत.
शासन, न्याय, कला आणि निसर्ग यांविषयीच्या आपल्या अनुभवांसोबत त्याने या गोष्टींचाही उल्लेख केला आहे.
बेनी प्रसाद यांनी त्यांच्या 'हिस्ट्री ऑफ जहाँगीर' या पुस्तकात लिहिलं आहे की, 31 ऑगस्ट 1569 रोजी जन्मलेला "हा मुलगा प्रार्थना, नवस आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर जन्माला आला होता. तो त्याकाळच्या सर्वात श्रीमंत आणि वैभवशाली बादशाहचा मोठा मुलगा होता. फतेहपूर सिक्री या सुंदर शाही शहरातील तो सर्वांचा लाडका शहजादा होता."
आपल्या आधीच्या मुघल बादशाहंच्या तुलनेत जहाँगीरचं आयुष्य मात्र खूपच सुखाचं आणि आरामात गेलं होतं.
"परंतु, आरामात वाढल्यामुळे जहाँगीरला आयुष्यभर ठाम निर्णय घेण्यात नेहमी अडचणी येत राहिल्या. स्वतःपेक्षा अधिक हुशार किंवा धूर्त लोकांसमोर तो सहजपणे दबून जात असे, हतबल होत असे. तरुण वयात लागलेल्या एका सवयीमुळे त्याच्या या उणिवा आणखी वाढल्या. ही सवय होती मद्यपानाची."
बेनी प्रसाद यांच्या मते, मद्यपान ही मुघल घराण्याची एक जुनी कमजोरी होती.
बाबरने आपल्या आत्मचरित्रात अशा मद्यपानाच्या मैफलींचे वर्णन केले आहे, जिथे मद्य पिऊन लोक आपलं दुःख आणि चिंता विसरून जात. मद्य आणि अफूच्या सेवनामुळे हुमायूँच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. त्याचा मुलगा मुहम्मद हकीमही मद्याच्या व्यसनापासून स्वतःला वाचवू शकला नाही आणि वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
अकबर मात्र या परंपरेला एक अपवाद होता. तरुणपणी तोही मद्य प्यायचा आणि कधी-कधी प्रमाणापेक्षा जास्त मद्य प्यायचा. त्याचे दोन धाकटे मुलगे, मुराद आणि दानियाल, यांचाही मद्याच्या व्यसनामुळेच दुर्दैवी मृत्यू झाला.
विशेष म्हणजे आपल्या वयाच्या 17 व्या वर्षांपर्यंत जहाँगीरने कधीच मद्यपान केलं नव्हतं.
'शिकार केलेले प्राणी स्वतःसमोर साफ करून घेत'
1605 ते 1627 या काळात भारतावर राज्य करणारा जहाँगीर आपल्या राज्यकाळातील निम्म्याहून अधिक काळ साम्राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्यात घालवला.
अंशिका जैन यांनी 'एम्परर जहाँगीर: द नॅचरलिस्ट' या आपल्या लेखात लिहिलं आहे की, जहाँगीर लहानपणापासूनच आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बारकाईने पाहत असे. भारतातून आणि परदेशातून भेट म्हणून मिळालेले प्राणी आणि पक्षी तो आवडीने पाहत असत. त्यांची चित्रेही काढून घेत असे.
अंशिका जैन यांच्या मते, जहाँगीरने मार्खोर आणि बर्बरी जातीच्या बकऱ्यांचा संकरही करून घेतला. त्यांच्या पिल्लांच्या हालचाली आणि वागण्याकडे तो बारकाईने लक्ष ठेवत असत.
आयुष्याच्या अखेरच्या काळात प्राण्यांबद्दलची जहाँगीरची आवड इतकी वाढली की, त्याने खाण्यापिण्याबाबतही विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली.
"जहाँगीर शिकार केलेल्या प्राण्यांना स्वतःच्या उपस्थितीत स्वच्छ करण्याचा आदेश देत असत. त्यानंतर तो त्यांच्या पोटात काय आहे, हे तपासून घेत असे. त्या प्राण्याने काय खाल्लं होतं, हे तो जाणून घेत असे. एखाद्या प्राण्याच्या पोटात घाणेरडी किंवा किळसवाणी वस्तू आढळली, तर तो त्या प्राण्याला आपल्या खाद्यपदार्थांच्या यादीतून काढून टाकत असत."

फोटो स्रोत, Getty Images
अंशिका जैन यांच्या मते, जहाँगीरचं व्यक्तिमत्त्व अनेक विरोधाभासांनी भरलेलं होतं. एका बाजूला तो ऐषआरामात जगणारा बादशाह होता, तर दुसऱ्या बाजूला जगाकडे खूप बारकाईने पाहणारा विचारवंत तत्त्वज्ञही होता.
इतिहासकार हेन्री बेव्हरिज यांनी तर असंही लिहिलं आहे की, जहाँगीरने मुघल साम्राज्याऐवजी एखाद्या नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचे प्रमुखपद सांभाळलं असते, तर कदाचित तो अधिक 'चांगला आणि आनंदी स्वभावाचा' माणूस झाला असता.
लीसा बालाबान लिलर यांनी आपल्या 'द एम्परर जहाँगीर अँड द परस्यूट ऑफ प्लेझर' या संशोधनपर लेखात लिहिलं आहे की, जहाँगीर स्वतः फार क्वचितच सैन्याचं नेतृत्व करत असे. अनेकदा तो आपल्या मुलांच्या नेतृत्वाखालील सैन्याच्या मागे राहत असे किंवा कोणतेही ठोस उद्दिष्ट नसताना वैयक्तिक सुख आणि मनोरंजनासाठी फिरत असत.
"जहाँगीर सतत भटकणे, शिकारीची आवड आणि नशेच्या पदार्थांचे उघडपणे सेवन करत असूनही शाही कर्मचारी आणि सरदारांनी त्याला काही प्रमाणात स्वीकारलं होतं."
बादशाह जहाँगीरने आपल्या 'तुझुक-ए-जहांगीरी' या आत्मचरित्रात केवळ आपले विजय, दरबार आणि साम्राज्याचीच माहिती दिली नाही, तर आपल्या कमतरता आणि चुका यांचाही उघडपणे खुलासा केला आहे.
'तुझुक'मधून असं दिसतं की, जहाँगीरचा मद्याशी संबंध एका साध्या घटनेपासून सुरू झाला होता.
मद्यपानाची सवय कशी लागली?
तरुण राजकुमार जहाँगीर त्याचे वडील अकबर यांच्या सैन्यासोबत सिंधू नदीच्या काठावर अटकजवळ होता. एकदा शिकारीहून परत येताना त्याला खूप थकवा जाणवला. तेव्हा तोफखान्यातील उस्ताद शाह कुलीने त्याला एक प्याला मद्य पिण्याचा सल्ला दिला.
जहाँगीरने आपल्या 'अब्दार' (पाणी पुरवणारा सेवक) महमूदला हकीम अली यांच्या घरातून नशेचं पेय आणण्याचा आदेश दिला. त्यानंतर एका छोट्या बाटलीत सुमारे दीड प्याला गोड, पिवळ्या रंगाचं मद्य आणण्यात आलं.
जहाँगीरने ते मद्य प्यायलं आणि त्याला त्याची चव आवडली. त्यानंतर, त्याच्याच शब्दांत सांगायचे तर, त्याने 'दिवसेंदिवस मद्याचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली.'

फोटो स्रोत, Getty Images
द्राक्षाची दारूही त्याला पुरेशी वाटेनाशी झाली, तेव्हा जहाँगीरने अर्क म्हणजेच गाळून तयार केलेलं मद्य पिण्यास सुरुवात केले. अवघ्या 9 वर्षांत त्याचे मद्याचे सेवन इतके वाढले की, तो दिवसाला 20 प्याले अर्क पिऊ लागला. यापैकी 14 प्याले दिवसा आणि 6 प्याले रात्री घेत असे. प्रत्येक प्याल्यात सुमारे 82 ग्रॅम म्हणजेच सुमारे 85 मिलिलीटर मद्य असायचे.
नशेचं हे प्रमाण केवळ एक आकडा नव्हता. जहाँगीरने स्वतः लिहिलेल्या नोंदींमधून त्याच्या शरीरावर या नशेचा किती गंभीर परिणाम होत होता, याची धक्कादायक माहिती समजते.
जहाँगीरने स्वतः लिहिलं आहे की, मद्यामुळे त्याचे हात इतके थरथरू लागले होते की, त्याला स्वतःच्या हाताने प्याल्यातून मद्य पिणंही शक्य होत नव्हते. त्यामुळे इतरांना त्याला मद्य पाजावं लागत असे. तेव्हा हकीम हमाम यांनी बादशहाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर त्याने अशाच प्रकारे मद्य पिणे सुरू ठेवले, तर काही महिन्यांत त्याच्यावर उपचार करणंही शक्य होणार नाही.
जहाँगीरने लिहिलो की, या सल्ल्याचा त्याच्यावर परिणाम झाला, कारण त्याला 'आपलं जीवन प्रिय होतं.' त्याने मद्याचं प्रमाण कमी करण्यास सुरुवात केली. पण, त्याचवेळी तो एका नशेपासून दुसऱ्या नशेकडे वळला.
'रोज 20 प्याले मद्य; वाढत गेले जहाँगीरचे व्यसन'
जहाँगीरच्या म्हणण्यानुसार, त्याने मद्यपानाचे प्रमाण कमी केलं, तितकेच 'फिलोनिया' या नशेच्या पदार्थाचे सेवन वाढवलं.
आणि त्यानंतर या कहाणीत अफूचाही प्रवेश झाला.
जहाँगीरने लिहिलं आहे की, वयाच्या 46 वर्षे आणि 4 महिन्यांच्या काळात तो रोज किती अफू घेत असे, याचीही नोंद त्याने ठेवली होती. दिवसा पाच घड्या उलटल्यानंतर तो 8 सुर्ख (सुमारे 1 ग्रॅम) आणि रात्री एक घडी उलटल्यानंतर 6 सुर्ख (सुमारे पाऊण ग्रॅम) अफू घेत असत. म्हणजेच, अफूच्या सेवनाचाही तो दररोज नियमितपणे पद्धतशीररीत्या हिशोब ठेवत असत.
जहाँगीरने लिहिलं आहे की, तो वयाच्या 18व्या वर्षापासून मद्यपान करत होता. एकेकाळी तो दिवसाला 20 प्याले मद्य प्यायचा. नंतर त्याने मद्याचे प्रमाण कमी केले आणि वयाच्या 30व्या वर्षानंतर केवळ रात्री मद्य पिऊ लागला. शेवटी त्याने मद्य पिण्याचे तेच कारण सांगितले- आता तो केवळ पचनासाठी मद्य घेतो.
राजवटीच्या 13व्या वर्षी गुजरातचे हवामान जहाँगीरला मानवलं नाही आणि त्याची तब्येत बिघडली. त्यावेळी हकीमांनी त्याला मद्य आणि अफू, दोन्हीचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला. जहाँगीरच्या म्हणण्यानुसार, त्याने त्याच दिवशी दोन्हींचे प्रमाण कमी केले आणि पहिल्याच दिवशी त्याच्या प्रकृतीत 'लक्षणीय सुधारणा' दिसून आली.
परंतु, सवय नेहमीच आपल्या बुद्धीच्या म्हणण्यानुसार चालत नसते.
या आजारपणात तीव्र डोकेदुखी आणि ताप असूनही तो लवकरच पुन्हा रोजच्या मद्य पिण्याच्या सवयीकडे वळला.
पण पुढील काही वर्षांत परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली.

फोटो स्रोत, Museum of Art & Photography, India
जहाँगीरने लिहिलं की, एका गंभीर आजारपणात मद्य प्यायल्यानंतर त्याला काही काळ तात्पुरता आराम मिळत असे. त्यामुळे त्याने दिवसा देखील मद्य पिण्यास सुरुवात केली. याआधी मात्र तो रोज दिवसा मद्यपान करत नसे.
नंतर जहाँगीरने मान्य केलं की, हळूहळू त्याने मद्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढवले. उष्ण हवामानामुळे त्याचा शरीरावर होणारा त्रास आणखी वाढला. त्यासोबतच त्याला अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रासही होऊ लागला.
इथेच नूरजहाँची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
नूरजहाँ बेगमने हळूहळू त्याचे मद्याचे प्याले कमी केले. त्याला नुकसान करणाऱ्या गोष्टी आणि पदार्थ खाण्यापासून रोखले आणि त्याच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्थाही केली.
जहाँगीरच्या मते, नूरजहाँचे कौशल्य आणि अनुभव हकीमांपेक्षाही अधिक प्रभावी ठरले. कारण तिच्या उपचारांमध्ये प्रेम आणि काळजीही होती. 'तुझुक-ए-जहांगीरी'मधील या वर्णनातून नूरजहाँ केवळ प्रभावशाली राणी नव्हती, तर आजारी पतीची काळजी घेणारी आणि त्याचे मद्याचे व्यसन कमी करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती होती, हेही दिसून येते.
जहाँगीरच्या आयुष्यात नूरजहाँचा वाढला प्रभाव
पण मुनी लाल यांनी आपल्या 'जहाँगीर' या पुस्तकात लिहिलं आहे की, जहाँगीरची अवस्था इतकी असहाय झाली होती की त्याची दया येऊ लागावी. नूरजहाँच्या मोहक व्यक्तिमत्त्वामुळे जहाँगीरची उरलेली थोडीफार निर्णयक्षमता आणि इच्छाशक्तीही कमी झाली होती.
दीर्घ आजारपण, मद्यपानाचे व्यसन आणि वाढलेल्या शारीरिक इच्छा- या कारणांमुळे जहाँगीर नूरजहाँवर पूर्णपणे अवलंबून झाला होता. कधी-कधी भावनिक तणावामुळे तो खूप अस्वस्थही होत असत.
पण, लीसा बलबन लर यांनी 'एनसायक्लोपीडिया इरानिका'मध्ये लिहिलं आहे की, काही इतिहासकारांना जहाँगीरने राज्याची सत्ता आपल्या पत्नी नूरजहाँकडे सोपवली होती असं वाटतं. परंतु प्रत्यक्षात, आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या 5 वर्षांपर्यंत जहाँगीर राजकीय घडामोडींमध्ये रस घेत होता आणि त्यात सक्रियपणे सहभागी होत होता.
खरं तर, नूरजहाँ अशा बादशाहच्या सत्तेत भागीदार होती, ज्याने राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केलं नव्हतं. त्याने आपल्या विश्वासू आणि कर्तबगार पत्नीवर राज्यकारभारातील काही जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या.
'तुझुक'चा संदर्भ देत लीसा लिहितात की, जहाँगीरला खेळ आणि शिकारीची खूप आवड होती. नूरजहाँही अनेकदा या मोहिमांमध्ये त्याच्यासोबत जात असे.
'अशाच एका शिकारीच्या मोहिमेत नूरजहाँने केवळ 6 गोळ्यांत 4 सिंहांची शिकार केली. पत्नीच्या या असामान्य कौशल्याचा जहाँगीरला खूप अभिमान वाटला. त्याने तिच्यावर 1 हजार अशर्फी (सुवर्णमुद्रा) ओवाळून टाकल्या. तसेच तिला मोत्यांची एक जोडी आणि 1 लाख रुपये किमतीचा हिराही भेट म्हणून दिला होता.'
'पण, या काळात राज्यकारभार शांतपणे सुरू असतानाही जहाँगीरला मद्य आणि इतर नशेच्या पदार्थांचे व्यसन सोडता आलं नाही. इतकंच नाही, तर त्याच्या दरबारात नशेच्या पदार्थांची देखभाल आणि सुरक्षित ठेवण्याचं काम करणारा एक खास कर्मचारीही होता.'

फोटो स्रोत, Getty Images
या आत्मचरित्रातील सर्वात मोठा विरोधाभास तेव्हा दिसून येतो, जेव्हा बादशहा झाल्यानंतर जहाँगीरने आपल्या प्रजेसाठी मद्य आणि इतर नशेच्या पदार्थांची निर्मिती आणि विक्री करण्यावर बंदी घातली. पण याच आदेशात तो स्वतःच्या मद्याच्या व्यसनाचाही उल्लेख करतो.
याच आत्मचरित्रात जहाँगीरने इतर लोकांच्या मद्य आणि अफूच्या व्यसनामुळे झालेल्या परिणामांचाही उल्लेख केला आहे.
इनायत खानबद्दल जहाँगीर लिहितो की, त्याला अफूचे व्यसन होते आणि तो मद्यही प्यायचा. मद्यपानामुळे त्याची तब्येत इतकी बिघडली होती की, त्याची अवस्था गंभीर झाली होती.
इतर लोकांच्या व्यसनाचे हे दुष्परिणाम जहाँगीरला स्पष्टपणे दिसत होते. पण, स्वतःच्या मद्यपानाबाबत तो अनेकदा ते संयम, औषध किंवा पचनासाठी आवश्यक असल्याचे सांगत असत.
कदाचित या विरोधाभासाचे एक उदाहरण म्हणजे त्याचा मुलगा खुर्रम, म्हणजेच पुढे बादशाह झालेला शाहजहाँ.
जहाँगीरने लिहिलं आहे की, खुर्रम वयाच्या 24व्या वर्षापर्यंत मद्यापासून दूर राहिला होता. एका प्रसंगी जहाँगीरने त्याला मद्य दिलं आणि संयमाने ते पिण्याचा सल्ला दिला. त्याने इब्न-ए-सिनांचे एक वाक्यही लिहिलं आहे- मद्य थोड्या प्रमाणात घेतलं तर औषधासारखं असतं, पण जास्त प्रमाणात घेतल्यास ते सापाच्या विषासारखं घातक ठरतं.
बादशाह दरबारात नियमितपणे मद्यपानाच्या मैफली भरवत असत. जहाँगीरच्या शब्दांत सांगायचं तर, या मैफलींमध्ये त्याचे दरबारी 'निष्ठेच्या मद्याने झिंगून जात' असत.
नौरोजच्या निमित्ताने बादशहाने आदेश दिला होता की, शाही उत्सवात सहभागी होणारे लोक त्यांच्या आवडीचे कोणतेही 'नशेचे किंवा मद्यपानाचे पदार्थ' घेऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारची 'बंदी किंवा अडथळा' असणार नाही.
न्यायप्रिय बादशाह
रामचंद्र प्रसाद यांनी आपल्या 'अर्ली इंग्लिश ट्रॅव्हलर्स इन इंडिया' या पुस्तकात लिहिलं आहे की, 1616 मध्ये जहाँगीर नशेत असताना त्याने काही दरबारातील लोकांना आपल्यासोबत बसून मद्यपान करण्याचा आदेश दिला होता.
दुसऱ्या दिवशी कोणीतरी मुद्दाम किंवा योगायोगाने मागच्या रात्री घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. परंतु, बादशाहला आपण दिलेला आदेश आठवत नव्हता. त्यामुळे दरबारातील लोकांना मद्यपानाची परवानगी कोणी दिली, अशी विचारणा त्याने केली.
जहाँगीरसाठी नशा केवळ मद्य किंवा अफूपर्यंतच मर्यादित नव्हती.
काश्मीरच्या प्रवासादरम्यान जहाँगीरने तिथे मिळणाऱ्या एका स्थानिक नशेच्या पेयाचाही उल्लेख केला आहे. त्यात भांग मिसळली जात असल्याचं त्याचं मत होतं.
या पेयाच्या नशेबद्दल आणि शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल सांगताना तो म्हणतो की, मद्य उपलब्ध नसेल तर गरज पडल्यास हे पेय मद्याचा पर्याय म्हणून वापरता येऊ शकते.
भारतीय वंशाचे प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार आणि लेखक नरसिंह पी. सिल यांच्या मते, जहाँगीरला ऐषआरामात जगणारा बादशाह मानलं जातं. पण, त्याने लोकांना न्याय मिळावा यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्यातील सर्वात महत्त्वाची होती 'जंजीर-ए-अदल' (न्यायाची साखळी). ही साखळी अशी लावली होती की, प्रजेला आपली तक्रार किंवा गाऱ्हाणं थेट बादशाहपर्यंत पोहोचवता यावं.
जहाँगीरच्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत भारताचे व्यापारी संबंधही सुरू झाले.
अशा प्रकारे, जहाँगीरचा वारसा पाहिला तर त्यात कला आणि संस्कृतीला दिलेलं प्रोत्साहन, प्रशासनातील काही महत्त्वाचे निर्णय आणि गुंतागुंतीचे कौटुंबिक संबंध दिसून येतात. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक परस्परविरोधी बाजूही यातून समोर येतात.
लीसा लिहितात की, आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांत अनेक वर्षे मद्य आणि इतर नशेच्या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे जहाँगीरचं शरीर खूपच कमजोर झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या एका मुलाचं बंड मोडून काढण्याची यशस्वी पण खूप थकवणारी मोहीम केल्यानंतर त्याची अवस्था जवळपास अपंगासारखी झाली होती. त्याला धड ना चालता येत होतं, ना अफू घेता येत होतं. तो केवळ मद्याचे काही घोट पिऊ शकत होता.
इतकं असूनही त्यानं प्रवास करणं काही सोडलं नाही.
1627 च्या उन्हाळ्यात जहाँगीर शांतता आणि आरामासाठी आपल्या आवडत्या काश्मीरला निघाला. परंतु, तिथे पोहोचल्यानंतर काही दिवसांतच जहाँगीर आणि त्याच्यासोबत असलेला धाकटा मुलगा, शहजादा शहरयार, दोघेही गंभीर आजारी पडले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक झाली.
यानंतर तो लाहोरला परतण्यासाठी निघाला. पण, प्रवासादरम्यान 28 ऑक्टोबर 1627 रोजी चिंगरह सिरी येथे जहाँगीरचं निधन झालं. त्यावेळी तो 58 वर्षांचा होता आणि त्याला बादशाह म्हणून राज्य करताना 21 वर्षांहून अधिक काळ झाला होता.
जहाँगीरच्या आत्मचरित्राचे लेखन त्याच्या राज्यकाळाच्या 17व्या वर्षानंतर आजारपण आणि अशक्तपणामुळे थांबलं. त्यानंतरचा भाग दरबारी इतिहासकार मुतामिद खान आणि मुहम्मद हादी यांनी पूर्ण केला.
लीसा यांच्या मते, जहाँगीरनंतर आलेल्या मुघल बादशहांनीही आपल्या पूर्वजांची सतत प्रवास करण्याची आणि सक्रिय राहण्याची जीवनशैली सुरू ठेवली. जोपर्यंत त्यांच्याकडे यासाठी पुरेशी आर्थिक आणि राजकीय ताकद होती, तोपर्यंत ही परंपरा पुढची साधारण 100 वर्षे सुरू राहिली.
मात्र, जहाँगीरच्या आधी किंवा त्याच्यानंतर असा दुसरा मुघल बादशहा क्वचितच झाला, ज्याने सुख आणि आनंदासाठी सतत प्रवास करण्याला आपल्या जीवनाचा इतका नियमित भाग बनवला.
जहाँगीर स्वतःच्या मद्यपानाच्या सवयीबद्दल आणि ती कमी करण्याच्या प्रयत्नांबद्दल उघडपणे सांगत असत. जहाँगीरच्या म्हणण्यानुसार, त्याच्या दरबारातील कवी तालिब आमलीने ही परिस्थिती एका शेरमधून अशा प्रकारे मांडली होती:
'मेरे दो होंठ हैं, एक शराब का दीवाना है
और दूसरा नशे में होने के लिए माफ़ी मांगता है.'
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























