फ्रान्समध्ये एका हिंदू धार्मिक गटाच्या भेटीनंतर आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

आयफेल टॉवर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डॉन सेल्स आणि मिमी स्वॅबी
    • Role, प्रतिनिधी, ग्लोबल अफेयर्स
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर तिथल्या महिला कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सोमवारी (7 सप्टेंबर) बंद ठेवण्यात आलं होतं. महिला कर्मचाऱ्यांच्या या संपाचं कारण होते स्वामीनिरायण संप्रदायाचे लोक.

आयफेल टॉवरच्या कर्मचारी आणि व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार, एका हिंदू धार्मिक गटाच्या भेटीसाठी महिला कर्मचाऱ्यांना आयफेल टॉवरमध्ये काम करत असलेल्या त्यांच्या जागेवरून हटवलं गेलं होतं.

बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) या संस्थेशी संबंधित सुमारे 100 जणांच्या गटानं शनिवारी (5 सप्टेंबर) फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेल्या आयफेल टॉवरला भेट दिली होती.

पण हा गट आयफेल टॉवरच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या जागेवरून हटण्यास सांगण्यात आलं होतं, अशी माहिती कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी डायन डावॉइन यांनी सांगितलं.

"या गटाच्या भेटीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी पुरुष कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या," असं डायन यांनी म्हटलं.

नंतर व्यवस्थापनानं या संपूर्ण प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांची माफी मागितल्याचंही त्यांनी सांगितलं.

"कर्मचाऱ्यांना, विशेषतः महिलांना हे अजिबात मान्य नव्हतं. जे घडलं आणि ज्या पद्धतीनं काही महिलांशी वर्तन करण्यात आलं, त्यामुळं सर्वांचा अपमान झाला आहे," असं डायन डावॉइन म्हणाल्या.

"या मुद्द्यावरून प्रचंड तणाव वाढला होता. त्यामुळं व्यवस्थापनाशी संवाद सुरू करण्यासाठी आणि भविष्यात कंपनीत महिलांना अशा प्रकारे वागणूक दिली जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी सोमवारी (7 सप्टेंबर) सकाळी बैठक घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला," असं त्या पुढे म्हणाल्या.

फ्रान्समध्ये मंदिराची प्राणप्रतिष्ठा

पॅरिसमधील या वास्तूच्या व्यवस्थापनाची जबाबदारी Société d'Exploitation de la tour Eiffel (SETE) या कंपनीकडं आहे. हिंदू धार्मिक गटातील सदस्यांनी भेटीदरम्यान "महिलांशी मर्यादित संवाद ठेवण्याची" विनंती केली होती असं या कंपनीनं सांगितल्याचं एएफपी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

पण या अटी मान्य करायला नको होत्या, असं कंपनीनं एएफपीशी बोलताना म्हटलं. तसंच, या अटी "SETE च्या मूल्यांशी किंवा महिला आणि पुरुषांमधील समानतेच्या तत्त्वांशी सुसंगत नव्हत्या," असंही कंपनीनं म्हटलं आहे.

हे नक्कीच स्वीकारार्ह नसल्याचं SETE चे अध्यक्ष एरियल वेल यांनी म्हटलं आहे.

"आयफेल टॉवरची प्रजासत्ताक मूल्ये आणि महिला-पुरुष समानता यासाठी असलेली बांधिलकी मी पुन्हा अधोरेखित करतो."

आयफेल टॉवर

फोटो स्रोत, Reuters

बीबीसीनं या प्रकरणी Union Confédération générale du travail (CGT) कडून प्रतिक्रिया मागितली आहे.

BAPS संस्थेनं रविवारी (6 सप्टेंबर) पॅरिसच्या एका उपनगरात फ्रान्समधील पहिल्या मोठ्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली.

BAPS च्या पॅरिसमधील मंदिरानं X वर एका पोस्टद्वारे या प्रकरणी निवेदन दिलं.

"इतरांना त्रास किंवा गैरसोय होऊ नये म्हणून नियमित कामकाज सुरू होण्याच्या वेळेच्या आधी आयफेल टॉवरच्या व्यवस्थापनाच्या समन्वयानं हा दौरा आयोजित करण्यात आला होता," असं त्यांनी म्हटलं आहे.

या भेटीमुळं कुणालाही झालेल्या त्रासाबद्दल किंवा गैरसोयीबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे.

तसंच, "परस्पर आदर आणि सेवा या सार्वत्रिक मूल्यांवर आमचा विश्वास आहे," असंही त्यात म्हटलं आहे.

'महिला पुरुष समानतेशी तडजोड नाही'

लंडन, लॉस एंजेलिस आणि सिडनीसह जगभरातील प्रमुख शहरांमध्ये BAPS ची मंदिरं आहेत. BAPS संस्थेनं त्यांच्या वेबसाइटवर स्वतःचं वर्णन, 'हिंदू मूल्यांच्या माध्यमातून समाज सुधारण्यासाठी समर्पित आध्यात्मिक, स्वयंसेवक-आधारित संस्था' असं केलं आहे.

पॅरिसचे महापौर इमॅन्युएल ग्रेगोआर यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं सांगितलंय.

"आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या संतापाची मी दखल घेत आहे , त्यांचा असंतोष योग्य आहे, हे मला त्यांना सांगायचं आहे," असं त्यांनी X वर लिहिलं.

"आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये किंवा शहरात कुठेही महिला आणि पुरुषांमधील समानता याच्याशी तडजोड करणार नाही. ती सर्वांसाठी, सर्वत्र लागू झालीच पाहिजे."

आयफेल टॉवर

फोटो स्रोत, Reuters

"फ्रान्समध्ये महिलांच्या उपस्थितीवर 'मर्यादा' आणली जाणं आम्ही कधीही स्वीकारणार नाही," असं फ्रान्सच्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ले पेन यांनी म्हटलं.

तर मध्यममार्गी उजव्या विचारसरणी असलेले फ्रान्सचे माजी पंतप्रधान गॅब्रिएल अताल यांनीही "फ्रान्समध्ये कोणतीही संस्कृती, विश्वास, उपासना, कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही व्यक्ती महिलांना त्यांचं स्थान काय असावं हे ठरवू शकत नाही," असं म्हटलं आहे.

अताल यांनी पुढच्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे.

तर, "परदेशी पाहुण्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महिलांना बाजूला होण्यास भाग पाडलं जावं, हे कधीही मान्य करणार नाही," असं फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षा याएल ब्रॉन-पिव्हे यांनी म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)