'पाण्यावर तरंगणारं' बेट अचानक गायब झालं, मग 30 किमी दूर सापडलं; रहस्य काय?

फोटो स्रोत, Supplied by Rocky Avery
- Author, नादिन युसूफ
- Role, वरिष्ठ कॅनडा प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका अथांग सरोवरात पाण्यावर तरंगणारं एक गूढ बेट पुन्हा एकदा नजरेस पडलं आहे. सुरुवातीला काही दिवस दिसल्यानंतर हे बेट अचानक कुठल्या कुठे गायब झालं होतं आणि सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडून गेलं होतं.
हिरव्यागार झाडांनी झाकलेलं हे रहस्यमयी बेट पहिल्यांदा ऑगस्टच्या सुरुवातीला समोर आलं. ब्रिटिश कोलंबियातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर असलेल्या 'विलिस्टन रिझर्वायर'च्या अगदी मधोमध ते पाण्यावर तरंगताना आढळलं होतं.
तिथून जाणाऱ्या काही नाविकांनी या तरंगत्या बेटाचा एक व्हीडिओ कॅमेऱ्यात कैद केला आणि अल्पावधीतच तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
जुलैच्या अखेरीस टिपलेल्या एका सॅटेलाइट फोटोमुळे हे बेट खरंच तिथे अस्तित्वात असल्याचं सिद्ध झालं होतं. आकाराचा अंदाज घ्यायचा, तर हे बेट फुटबॉलच्या एका मैदानाच्या जवळपास दीड पट मोठं आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे, अवघ्या काही आठवड्यांतच हे भलेमोठे बेट त्या जागेवरून अचानक दिसेनासे झाले.
आता हे बेट पुन्हा एकदा सरोवराच्या एका किनाऱ्याजवळ शोधण्यात यश आलं असलं, तरी हे अजब बेट अचानक आलं कुठून, हे गूढ अजूनही कायम असल्याची माहिती ब्रिटिश कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक वीज कंपनी 'ब्रिटिश कोलंबिया हायड्रो'चे प्रवक्ते बॉब गॅमर यांनाही या बेटाबद्दल काहीच कल्पना नव्हती. जेव्हा सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले, तेव्हाच त्यांना पहिल्यांदा या अनोख्या बेटाबद्दल माहिती मिळाली.
बीसी हायड्रो ही सरकारची वीज कंपनी असून या सरोवराची आणि जवळच्या धरणाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडेच आहे.
बोट चालकांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये झाडांनी आच्छादलेला जमिनीचा भलामोठा तुकडा चक्क पाण्याच्या प्रवाहावर तरंगताना दिसत होता.

सुरुवातीला हा AI तयार केलेला फेक व्हीडिओ वाटला होता.
"हा व्हिडिओ कुठलाही असू शकतो आणि कदाचित यात काहीच तथ्य नसेल," असे 'बीसी हायड्रो'चे प्रवक्ते बॉब गॅमर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
पण नंतर त्यांच्या टीमने 21 जुलैचा एक सॅटेलाइट फोटो तपासला, तेव्हा हे बेट पूर्णपणे खरं असून प्रांताच्या दुर्गम उत्तरेकडील भागात पाण्यावर तरंगत असल्याचं स्पष्ट झालं.
मात्र, अवघ्या काही आठवड्यांतच 5 ऑगस्ट रोजी घेतलेल्या सॅटेलाइट फोटोमध्ये हे बेट त्या जागेवरून गायब झाल्याचं दिसून आलं.
हे बेट अचानक दिसेनासे झाल्याची बातमी अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केली, ज्यामुळे जगभरातील लोकांचे कुतूहल अधिकच वाढले.
यावर गॅमर म्हणाले होते, "हे बेट नेमकं कुठे गेलं, हे आम्हाला अजिबात ठाऊक नव्हतं. ते पाण्यात बुडालं की तरंगत दुसऱ्याच कुठल्या भागात पोहोचलं?"
पण आता आपल्याकडे या सर्व प्रश्नांची उत्तरे असल्याचे गॅमर यांनी स्पष्ट केलं.

त्यांच्या माहितीनुसार, पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत वाहत हे बेट अखेर किनाऱ्याकडे सरकले, आणि जिथे ते पहिल्यांदा आढळले होते, तिथून तब्बल 30 किलोमीटर लांब जाऊन पोहोचले.
एका ताज्या सॅटेलाइट फोटोमुळे आणि वरून उड्डाण करणाऱ्या दोन वैमानिकांनी ते स्वतः डोळ्यांनी पाहिल्यामुळे हे बेट तिथेच असल्याची खात्री पटली.
'बीसी हायड्रो'च्या अंदाजानुसार, या बेटाचा विस्तार सुमारे 9,800 चौरस मीटर म्हणजे जवळपास 1 हेक्टर इतका अवाढव्य आहे; साध्या भाषेत सांगायचे तर, कॅनेडियन फुटबॉलचे एक पूर्ण मैदान किंवा अमेरिकन फुटबॉलच्या दीड पट मैदानांइतका हा विस्तीर्ण भूभाग चक्क पाण्यावर तरंगतो आहे!.
हे बेट तयार कसे झाले यामागचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. तरीही वर्षानुवर्षे पाण्यावर वाहत आलेल्या लाकडांचे ओंडके एकत्र जमा होऊन हा तरंगता भूभाग तयार झाला असावा, असा एक मोठा अंदाज आहे.
पाण्यावर साचलेल्या याच लाकडांच्या आधाराने झाडाझुडपांची मुळे घट्ट रुजली असावीत.
गॅमर यांच्या अंदाजानुसार, यंदा उन्हाळ्याच्या दिवसांत सरोवरातील पाणी वाढल्याने हा जमिनीचा तुकडा मुख्य किनाऱ्यापासून तुटून थेट पाण्यावर तरंगू लागला. 2012 नंतर पहिल्यांदाच या जलाशयातील पाणी इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते.
अमेरिकेतही आहे असंच एक चक्रावून टाकणारं बेट
पाण्यावर तरंगणाऱ्या अशा भूभागांची आश्चर्यकारक रूपं जगातील इतर भागांतही पाहायला मिळाली आहेत.
अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील चिप्पेवा लेकमध्ये असंच एक भलंमोठं बेट आहे, ज्याला 'फोर्टी एकर बॉग' म्हटलं जातं.
कित्येकदा हा तरंगता दलदलीचा भाग पाण्याच्या प्रवाहामुळे जवळच्या पुलावर जाऊन आदळू नये, म्हणून स्थानिक बोट चालक एकत्र येऊन चक्क आपल्या बोटींच्या ताकदीने या महाकाय बेटाला ढकलून दूर करतात.

'लेक चिप्पेवा फ्लोएज रिसॉर्ट असोसिएशन'ने दिलेल्या माहितीनुसार, या अनोख्या बेटावर बेडूक, सॅलामँडर यांसारख्या अनेक जलचर आणि उभयचर प्राण्यांचे हक्काचे घर तयार झाले आहे. इतकेच नाही तर या संपूर्ण सरोवराप्रमाणेच या तरंगत्या भूभागालाही विस्कॉन्सिनच्या स्थानिक कायद्यानुसार कडक संरक्षण देण्यात आले आहे.
हा दलदलीचा तुकडा "एखाद्या महाकाय हिमनगासारखा" आहे, असं स्थानिक नागरिक चेरिल ट्रेलँड यांनी 2024 मध्ये 'विस्कॉन्सिन पब्लिक रेडिओ'ला सांगितलं होतं.
त्या पुढे म्हणाल्या, "हे काही पाण्यावर अलगद तरंगणारे झाडाचे हलके पान नव्हे, तर खूप मोठा भूभाग आहे."
दुसरीकडे, कॅनडात सापडलेले हे तरंगते बेट स्थिर नसून त्यावर पाय ठेवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा देत बीसी हायड्रोचे गॅमर यांनी लोकांना तिथे न जाण्याचे आवाहनही केले.
"हा भाग इतका आडवळणी आणि दुर्गम आहे की सर्वसामान्य लोक सहसा इथे पोहोचूच शकत नाहीत," असं ही त्यांनी सांगितलं
पण तरीही ज्यांच्याकडे तिथे जाण्यासाठी स्वतःची साधने किंवा बोटींची सोय आहे त्यांना सावध करत ते म्हणाले, "या बेटापासून सुरक्षित अंतर ठेवा. कारण ते कोणत्याही क्षणी तुटून विखुरले जाऊ शकते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























