राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या खासदारांची सुटका, तीन तास पोलिसांच्या ताब्यात; दिवसभरात काय घडलं?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर ठिय्या देणाऱ्या इंडिया आघाडीतील खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

फोटो स्रोत, X/Rahul Gandhi

फोटो कॅप्शन, विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर ठिय्या देणाऱ्या इंडिया आघाडीतील खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Published
वाचन वेळ: 9 मिनिटे

विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर ठिय्या देणाऱ्या इंडिया आघाडीतील खासदारांना पोलिसांनी अखेर सोडून दिलं आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी पवनकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना छत्रसाल स्टेडियमवर नेण्यात आलं होतं.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.

राहुल गांधी यांच्यासोबत अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

याआधी, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सांगितलं होतं की, पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याशी गैरवर्तन केले आणि पक्षाच्या नेत्यांना कुठे नेण्यात आले आहे, याची त्यांना कल्पना नाही.

पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करत असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींशी चर्चा करत होते. जितेंद्र सिंह यांनी नुकताच माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की, "मी त्यांच्याशी चर्चा करून संसदेत यावर चर्चा होईल, असं आश्वासन दिलं पण त्यांनी आपल्या मागण्या वाढवत नेल्या. ते आधीपासूनच ठरवून आले होते की, काहीतरी संघर्ष व्हावा आणि गोंधळ व्हावा, पण सामान्य लोकांना ही राजकीय नौटंकी समजते."

दुसरीकडे, संसदेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर चर्चा करू दिली जात नाहीये, आम्हाला संसदेतही बोलू दिलं जात नाही. पंतप्रधान संसदेत येत नाहीत आणि बोलूही देत नाहीयेत, तर मग आम्ही काय करायचं, असा प्रश्न काँग्रेसचे खासदार विचारत आहेत.

राहुल गांधी

फोटो स्रोत, X/Rahul Gandhi

राहुल गांधी यांनी फेसबुकवर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच्या धरणे आंदोलनात सामील होण्याचं आवाहन लोकांना केलं होतं.

त्यांनी म्हटलं आहे की, "आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हवा, असे मानणाऱ्या प्रत्येक देशभक्त भारतीयाला मी आवाहन करतो की, त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच्या आमच्या धरणे आंदोलनात सामील व्हावे."

त्याआधीच्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलंय की, "काल तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांबद्दल पंतप्रधान मोदींकडून उत्तर मागण्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला आहे. सरकारला कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही किंवा संसदेत यावर चर्चाही करायची नाही."

या भेटीनंतर त्यांनी 'एक्स' (X) वर त्याबाबत एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

"भारताच्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी राजीनामा दिलाच पाहिजे," असंही त्यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या बाजूला, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे.

फोटो स्रोत, X/Sharad Pawar

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे.

शरद पवार यांनी फेसबुकवर लिहिलंय की, "नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतरमंतर येथे उपोषण आणि आंदोलन केले आहे. काल आपल्या न्याय्य मागणीसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली, ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे. आज आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या."

"देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले असून सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्याचा संवेदनशीलपणे विचार करावा तसेच त्यांच्या मागण्यांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी," असंही त्यांनी म्हटलंय.

'...अन्यथा पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन करू'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीनं महत्त्वाची घोषणा केली आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास, आशुतोष रांका आणि समर्थक दीपक बलिया रात्री आठ वाजता दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर शांततापूर्ण धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती.

पण त्यांनी दिलेल्या नव्या माहितीनुसार, हे आंदोलन त्यांनी मागे घेतलं आहे.

त्यांनी आधी म्हटलं होतं की, "दिल्ली पोलिसांनी अत्यंत हिंसक आणि जीवघेणा ठरू शकेल अशा बळाचा वापर करून शेकडो शांततापूर्ण निदर्शकांना ताब्यात घेतले आहे. आता ते वकिलांना त्यांना भेटू देत नाहीत आणि ताब्यात घेतलेल्यांची संपूर्ण यादीही आम्हाला देत नाहीत."

"जर त्याआधी ताब्यात घेतलेल्यांच्या या घटनात्मक अधिकाराचं पालन करण्यात आलं नाही, तर आशुतोष रांका आणि दीपक बलिया आणि मी आज रात्री 8 वाजता दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर शांततापूर्ण धरणे आंदोलन करू!"

पण नव्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "आमच्या वकिलांनी आम्हाला नुकतेच कळवले आहे की, सर्व ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे, दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेरील धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे! सर्वांना शांतता राखण्याची विनंती करण्यात येत आहे."

विजेता दहियाला सीजेपी प्रवक्तेपदावरून हटवलं

कॉक्रोच जनता पार्टीनं एक महत्त्वाची घोषणा करत प्रवक्ते विजेता दहियाला प्रवक्ते पदावरून हटवलं आहे.

सीजेपीने आपल्या निवेदनात म्हटलंय की, "आमचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्या अत्यंत असंवेदनशील वर्तनाचा आम्ही तीव्र निषेध करतो. शांततापूर्ण निदर्शक आणि आमची टीम पोलिसांच्या क्रूर हिंसाचाराचा सामना करत असताना त्यांचे व्हीडिओ समोर आले. असे वर्तन अस्वीकार्य आहे, त्यातून योग्य-अयोग्यतेची समज नसल्याचे दिसून येते आणि ते आमच्या चळवळीची मूल्ये व तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे."

"या पार्श्वभूमीवर, आम्ही विजेता दहिया यांना 'कॉकरोच जनता पार्टी'च्या प्रवक्तेपदावरून दूर करत आहोत आणि त्यांना सर्व अधिकृत जबाबदाऱ्यांतून मुक्त करत आहोत," असंही सांगण्यात आलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीनं एक महत्त्वाची घोषणा करत प्रवक्ते विजेता दहियाला प्रवक्ते पदावरून हटवलं आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, कॉक्रोच जनता पार्टीनं एक महत्त्वाची घोषणा करत प्रवक्ते विजेता दहियाला प्रवक्ते पदावरून हटवलं आहे.

दरम्यान, 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या समर्थकांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला ठिकठिकाणी रोखण्यासाठी प्रयत्न केले. सोमवारी दिवसभर चाललेल्या या आंदोलनात पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करून कारवाई केल्याचं पाहायला मिळालं.

प्रचंड संतापात असलेल्या तरुणाईच्या गर्दीला अटकाव करण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दल प्रयत्न करत होते. तर तरुण वारंवार मागे सरकल्यानंतर पुन्हा संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते.

दिल्लीच्या मध्यवर्ती भागात पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रुधूराचा वापर केला. अनेक आंदोलकांनी लाठीमारात जखमी झाल्याचा दावा केला.

त्याचबरोबर तरुणांनी केलेल्या हिंसेमध्ये पोलीसही जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमानुसार कारवाई केल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, रिमझिम पाऊस असतानाही सकाळपासून जंतर मंतरवर पुन्हा समर्थक गोळा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी जंतर मंतरकडे येणाऱ्या काही रस्त्यांवर पोलिसांनी प्रवेश बंद केल्याची तक्रार अभिजीत दिपके यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.

यावेळी अभिजीत दिपके यांनी पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारल्याचं पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांना निर्घृणपणे मारूनही आता पुन्हा पोलिसांकडून का त्रास दिला जात आहे? अशी विचारणा अभिजीत यांनी केली.

जे.पी नड्डांशी चर्चा म्हणजे पूर्णपणे वेळ वाया गेला असल्याचं अभिजीत दिपकेनं एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.

तिकडे आमच्या प्रतिनिधींना चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं आणि इकडं मुलांना मारलं जात होतं. आता आमच्याकडून कोणीही सरकारशी चर्चा करायला जाणार नाही, चर्चा करायची असेल तर सरकारला इथं यावं लागेल", असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं.

कोण-कोण कुठे पोहोचले?

शिवसेना उद्धव बाळासहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी जंतर-मंतर याठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाठिंबा दिल्याचं संजय राऊत म्हणाले.

दिल्लीच्या रस्त्यांवर काल झालेला प्रकार हुकूमशाहीलाही लाजवणारा होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह तरुणांचं हे आंदोलन चिरडून टाकू शकणार नाहीत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी आरएमएल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेतली. तसंच याठिकाणी त्यांची डॉक्टरांची एक बैठक घेतल्याचंही पाहायला मिळालं.

त्याशिवाय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आरएमएल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेतली. जे काही घडलं त्यासाठी मोदींनी साधी माफीही मागितली नाही. विद्यार्थी शिक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. पंतप्रधान यावर मौन का आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी म्हणाले.

"देशातील तरुणांबरोबर वर्तन करण्याची ही पद्धत नाही. तरुणांना संधी शिल्लक नाहीत. सर्व दारं बंद आहेत, अशात स्पर्धा परीक्षा हाच पर्याय त्यांच्यासमोर राहतो. तरुण त्यांना भविष्यच शिल्लक राहिलं नसल्याचं म्हणत आहेत. धर्मेंद्र प्रधान, गृह मंत्री आणि पंतप्रधानांनीही राजीनामा द्यायला हवा."

मी माफी मागतो-दिपके

अभिजीत दिपके यांनी एक्सवर एक पोस्ट करत समर्थकांची माफी मागितली आहे.

"मी समर्थकांची, विशेषतः ज्या मुलींना पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी निर्घृणपणे मारहाण केली, त्यांची माफी मागतो. दिल्ली पोलिसांच्या अमानवीय कारवाईपासून तुमचं संरक्षण करण्यासाठी कदाचित आम्हाला आणखी चांगले प्रयत्न करता

20 हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी, सरकार आणखी अनेक तरुण विद्यार्थ्यांचे रक्त सांडायला तयार होते. जर तुम्ही जखमी असाल आणि हे पाहत असाल, तर कृपया मला DM (थेट मेसेज) करा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचे आहे आणि माफी मागायची आहे. आम्ही तुमच्या सर्वांसाठी लढत राहू," असं अभिजीत दिपकेनं म्हटलं आहे.

सुरक्षा दलांच्या कारवाईची मानवाधिकार संघटनांकडून दखल

भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईची दखल 'ह्युमन्स राइट्स वॉच' या आंतराराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनी घेतली आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, "भारताची राजधानी दिल्लीत अलीकडच्या काळातील सरकारविरोधातील सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एका आंदोलनावर सुरक्षा यंत्रणांनी कठोर कारवाई सुरू केली आहे."

"अधिकाऱ्यांनी पोलिसांना संयम बाळगण्याचे निर्देश द्यावेत, आंदोलनस्थळांच्या परिसरातील मोबाईल इंटरनेट सेवा तातडीने पूर्ववत करावी आणि लोकांना शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार सुरक्षित असल्याची खात्री द्यावी."

ह्युमन्स राइट्स वॉचचे निवेदन

फोटो स्रोत, HRW

फोटो कॅप्शन, ह्युमन्स राइट्स वॉचचे निवेदन

आंदोलनादरम्यान, सुरक्षा दलांकडून लाठीचा आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आल्याचे आरोप होत आहेत याबाबत चौकशी करण्यात यावी असे ह्युमन्स राइट्स वॉचच्या डेप्युटी एशिया डायरेक्टर मीनाक्षी गांगुली यांनी म्हटले आहे.

कोणत्याही परिस्थितीत आंदोलन सुरू राहील - दिपके

शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल आणि नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) या आंदोलनातील हजारो समर्थकांनी सोमवारी संसदेकडं हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता.

दिवसभराच्या गोंधळानंतर पुन्हा रात्री अनेक आंदोलक जंतर मंतरवर परतले, अभिजीत दिपके यांनीही आंदोलन कोणत्याही परिस्थितीत सुरू राहणार असं म्हटलं आहे.

आता आज मंगळवारी संसदेच्या अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आंदोलक पुन्हा जंतर-मंतरवर?

पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या जोरावर सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या चौकांमध्ये असलेली आंदोलकांची गर्दी हटलेली पाहायला मिळाली होती. मात्र अभिजीत दिपके ज्या ट्रकमधून निघाले होते, तो ट्रक जंतर मंतरजवळ उभा होता आणि त्याठिकाणी आंदोलकही जमलेले पाहायला मिळाले.

दुसरीकडे जंतर-मंतरमध्ये आंदोलक ज्याठिकाणी पूर्वी आंदोलन करत होते त्याठिकाणचे स्टेज आणि इतर गोष्टी मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या होत्या असं पाहायला मिळालं.

त्याठिकाणची अवस्था पाहता पुन्हा आंदोलकांना याठिकाणी आंदोलन करू शकतील असं वाटत नव्हतं. पण सायंकाळी शेवटी अनेक तरुण पुन्हा जंतर मंतर परिसरातच आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळालं. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी आंदोलक याठिकाणी होते असं पाहायला मिळालं.

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, 70 जण ताब्यात घेतल्याची पोलिसांची माहिती, जखमींबाबत काय म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images

अभिजीत दिपके यांच्यासह कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांनी आंदोलन अजूनही सुरू असून ते सुरुच राहणार असवल्याचं सांगितलं. पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्या एका तरुणीची अभिजीत दिपके यांनी मध्यरात्रीनंतर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या तरुणीची स्थिती गंभीर असल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं.

तर सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जंतर-मंतर याठिकाण पत्रकारांशी बोलताना म्हटलं. पण सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावत आहे, त्यामुळं त्यांना वाचवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

वांगचूक उपोषणावर ठाम आहेत, ते सोडवणं गरजेचं आहे. वांगचूक यांना गमावलं तर ते मोठं पाप ठरेल, त्यामुळं त्यांना वाचवण्यासाठी काहीतरी विचार करणं गरजेचं असून काय करता येईल हे पाहावं लागेल, असंही सौरभ दास यांनी म्हटलं.

जखमींचा नेमका आकडा किती?

पोलिसांनी संसदेकडं निघालेल्या तरुणांना ठिकठिकाणी अडवत मागे सरकवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये आंदोलक तरुण आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाल्याचं सोमवारी पाहायला मिळालं.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी या आंदोलनाचं वार्तांकन करत असताना हा संघर्ष अगदी जवळून पाहिल्याचं सांगितलं. विशिष्ट ठिकाणाहून पोलीस आंदोलकांना अश्रूधूर आणि लाठीचार्ज करत मागे ढकलत होते. पण पुन्हा काही क्षणांत मागे हटलेले तरुण त्याच आवेशात पुढं सरकण्याचा प्रयत्न करत होते आणि यातून सुरक्षारक्षक आणि आंदलोकांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं.

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, 70 जण ताब्यात घेतल्याची पोलिसांची माहिती, जखमींबाबत काय म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीतील प्रामुख्याने जंतर मंतरच्या आसपासचा परिसर, तिथून संसदेकडं जाणारा संसद मार्ग, कॅनॉट प्लेस परिसर, रिगल सिनेमाच्या जवळचा भाग याठिकाणी झालेला हा संघर्ष बीबीसींच्या प्रतिनिधींनी पाहिला.

काही आंदोलक जखमी अवस्थेत जंतर-मंतरकडे परतले, तर काहींना त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलून आणलं. दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील काही ठिकाणी प्रशासनाने मोबाईल इंटरनेट सेवाही बंद केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं अनेकांना मेसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडियाचा वापर करण्यात अडचणी आल्या.

पोलिसांनी यासंघर्षात 60 आंदोलक जखमी झाल्याचं म्हटलं आहे. पण बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी जे पाहिलं त्यावरून प्रत्यक्षात जखमींची संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

70 जण ताब्यात?

दिवसभराच्या संपूर्ण घटनाक्रमानंतर दिल्ली पोलिसांनी रात्री एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करत दिवसभरातील घटना आणि कारवाईबाबत माहिती दिली. यामध्ये आंदोलकांबरोबर पोलीसही जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. तर 70 आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचंही सांगण्यात आलंय.

"सीजेपीच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी बेशिस्त, आक्रमक आणि हिंसक वर्तन केले. पोलिसांनी वारंवार इशारे देऊन तसेच कायदेशीर आदेशांचे पालन करण्यास सांगूनही आंदोलकांनी ते मानण्यास नकार दिला आणि लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. पोलिसांवर दगडफेक, बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न, गाड्यांची तोडफोड केली," असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात 118 हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले. तर जखमी आंदोलकांनी संख्या 60 असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, 70 जण ताब्यात घेतल्याची पोलिसांची माहिती, जखमींबाबत काय म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images

या प्रकरणी सुमारे 70 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू असून, भारतीय न्याय संहिता आणि इतर कायद्यांतील दंगल, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि आंदोलनादरम्यान घडलेल्या इतर गुन्ह्यांशी संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं.

राजधानीत कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. कायद्याचे उल्लंघन करून हिंसक कारवायांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी यात म्हटलं आहे.

वांगचूक म्हणाले, उपोषण सुरुच राहणार

दरम्यान सोनम वांगचूक सोमवारी म्हणाले, "शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी ज्या क्रूरतेने वागले जात आहे, ते पाहून मी माझे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. जोपर्यंत युवा नेत्यांना संसद भवनात जाऊन खासदारांना भेटण्याची किंवा मला इथे रुग्णालयात त्यांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी उपोषण सुरूच ठेवेन."

"मला आशा आहे की, त्याआधीच सरकार शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित करेल. चिथावणी मिळूनही तरुणांनी ज्या प्रकारे शांतता राखली आहे, त्याने मी भारावून गेलो आहे. मी सरकार आणि पोलीस दलाला आवाहन करतो की, विद्यार्थ्यांना आज किंवा उद्या संसदेसमोर आपली गाऱ्हाणी मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवावा."

"मला खात्री आहे की, हे तरुण आंदोलक उद्याही तसाच संयम आणि सहनशीलता दाखवतील, जसा संयम त्यांनी आतापर्यंत दाखवला आहे", असंही त्यांनी नमूद केलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.