मीराबाई चानूने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक; अनेक विक्रमांची नोंद

फोटो स्रोत, Getty Images
वेटलिफ्टर मीराबाई चानूने ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
मीराबाईने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
वेटलिफ्टर मीराबाई चानूला 2022 सालचा बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला होता. जनतेच्या मतदानानंतर त्यांची या पुरस्कारासाठी विजेती म्हणून घोषणा करण्यात आली होती.
यापूर्वी 2021 सालचाही बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार त्यांनीच पटकावला होता. महिलांच्या 48 किलो वजनी गटातील स्पर्धेत मीराबाईने अनेक विक्रम मोडले.
स्नॅच प्रकारात त्यांनी 85 किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो असे एकूण 190 किलो वजन उचलले.
राष्ट्रकुल स्पर्धेतील स्नॅच प्रकारात 85 किलो वजन उचलून मीराबाईने नवा विक्रम प्रस्थापित केला.
मीराबाई चानूने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले असले, तरी यापूर्वी त्यांनी रौप्यपदकही जिंकले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
2014 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर 2018 मधील गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. पुढे 2022 मध्ये बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईने भारतासाठी रौप्यपदक जिंकत इतिहास रचला होता. ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
भारताने आतापर्यंत जिंकली तीन पदकं
ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026) चौथ्या दिवशी रविवारी भारतानं आपलं दुसरं पदक जिंकलं.
मणिपूरचाच रहिवासी ऋषिकांत सिंग चनंबमनं पुरुषांच्या 60 किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टिंग अंतिम फेरीत एकूण 264 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. मीराबाईप्रमाणेच तोही मणिपूरचा आहे.

फोटो स्रोत, Mattia Ozbot/Getty Images
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने केवळ तीन पदके जिंकली आहेत. यापूर्वी शुक्रवारी, झंडू कुमारने पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक जिंकले होते.
मात्र, लव्हलिना बोरगोहेनचे पदकही निश्चित झाले आहे. ड्रॉद्वारे तिला उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. त्यामुळं तिचं पदक निश्चित झालं आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2026 च्या अधिकृत वेबसाइटनुसार, वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने स्नॅच प्रकारात 121 किलो वजन उचलून एक नवीन क्रीडा विक्रम प्रस्थापित केला आहे.
त्यानंतर त्यानं क्लीन अँड जर्कमध्ये 143 किलोग्रॅम वजन उचलून एकूण 264 किलोग्रॅम वजनासह रौप्य पदक जिंकले.
बांबू वापरून वेटलिफ्टिंगचा सराव
8 ऑगस्ट 1994 ला मणिपूर इथल्या छोट्या गावात मीराबाईचा जन्म झाला.
इंफाळपासून तिचं गाव 200 किलोमीटर दूर होतं. त्याकाळी मणिपूरच्याच महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिम्पिकसाठी खेळायला गेल्या होत्या.
त्यांचा आदर्श मीराबाईने घेतला आणि सहा भावंडांत सर्वांत छोटी असलेल्या मीराबाईने वेटलिफेटर बनण्याचा निश्चय केला.

फोटो स्रोत, Lars Baron/Getty
मीराबाईंच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. 2007मध्ये त्यांनी सराव सुरू केला तेव्हा लोखंडाचा बार नसल्यानं ती बांबूच्या बारनं सराव करत असे.
गावात प्रशिक्षण केंद्र नसल्यानं सरावासाठी तिला 50-60 किलोमीटर दूर जावं लागायचं. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईला तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबली नाही.
वयाच्या 11व्या वर्षी मीराबाई अंडर 15 चॅम्पियन होती आणि 17व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजुरानी यांना बघत मीराबाईच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं त्याच कुंजुरानी यांचा 12 वर्षं जुना विक्रम मीराबाईने मोडीत काढला. 192 किलो वजन उचलून.
असं असलं तरी प्रवास सोपा नव्हता. कारण मीराबाईच्या आई-वडिलांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ सोडावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली होती.
पण ही वेळ आली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडून मीराबाईने ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.
वेटलिफ्टिंगशिवाय मीराबाईला डान्स करायला आवडतो. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, "सरावानंतर कधीकधी मी खोलीचं दार बंद करून डान्स करते आणि मला सलमान खान आवडतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















