राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात इथे पाऊस वाढणार?

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील इतर भागात हवामानाची काय स्थिती आहे? कोकण, मराठवाडा, विदर्भात कुठे पावसासाठी काय इशारे दिले आहेत, जाणून घ्या.

राज्यात आज (26 जुलै) काही जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचा तर काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोकण आणि घाट प्रदेशात पावसानं जुलैअखेरीस जोर धरलेला दिसतो आहे, पण मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे अजूनही कोरडे आहेत.

पुढच्या चोवीस तासांत राज्यातल्या या वेगवेगळ्या भागांत हवामान कसं असेल, जाणून घेऊया.

26 जुलैला दुपारच्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये महाराष्ट्रावर फारसे दाट ढग दिसत नाहीत. पण इथे बंगालच्या उपसागरात ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत बरंच काही घडताना दिसतंय, ज्याचा परिणाम राज्यातल्या पावसावरही होतो.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून त्याचं डिप्रेशनमध्ये रुपांतर झालं आहे. तर पुढच्या चोविस तासांत इथे डीप डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे.

27 जुलैला हे वादळ उत्तर ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत जमिनीवर धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

या वादळाच्या प्रभावामुळे किनारी भागांत तसंच घाट प्रदेशात आणि विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या अंतर्गत भागांतही पुढच्या चोवीस तासांत काही ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो.

मात्र ही प्रणाली किती तीव्र होते आहे, यावरच किती पाऊस पडेल, हे अवलंबून राहील. 27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान कोकण आणि विदर्भात सर्वदूर पाऊस पडू शकतो, यात काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

राज्यातील हवामानाची स्थिती

फोटो स्रोत, X/@RMC_Mumbai

फोटो कॅप्शन, राज्यातील हवामानाची स्थिती
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं जारी केलेल्या इशाऱ्यानुसार 26 जुलैसाठी रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे तसंच लगतच्या पुणे आणि साताऱ्याच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.

तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाट प्रदेश, भंडारा गोंदिया, गडचिरोली इथे जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे. नागपूर, भंडारा, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.

विशेषतः पुण्याच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट जारी केला असून, या भागांत अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथे काही ठिकाणी अतीवृष्टीही होऊ शकते.

रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मुसळधार ते अतिमअतिमुसळधारसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. सोसाट्याच्या वाऱ्याच्या काही झोतांचा वेग ताशी 70 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.

मुंबत आज ढगाळ वातावरण आहे. तर ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्टदेखील लागू आहे.

कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यताही सांगितली आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

विदर्भातील हवामान कसं असेल?

विदर्भात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

नागपुरात आज दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

तसेच, नागपूरसह अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भातील या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

27 जुलैसाठीचा अंदाज

27 जुलै रोजी हवामान विभागानं रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे तसंच लगतच्या पुणे आणि साताऱ्याच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाट प्रदेश, चंद्रपूर आणि गडचिरोलीत जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे.

नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, जालना, संभाजीनगर आणि जळगाव इथे मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.

नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी आणि धाराशीवमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.