वेळेआधी जन्मलेल्या बाळांना आयुष्यभर त्रास होतो, याबाबतचे गैरसमज अन् तथ्य

वेळेआधी जन्मलेली बाळे: मुदतीपूर्वी जन्माला आलेल्या बाळांना आयुष्यभर त्रास होतो का? गैरसमज - तथ्य

फोटो स्रोत, Jennifer Polixenni Brankin/Getty Images

    • Author, डॉ. हिमानी
    • Role, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

गर्भावस्थेचा काळ हा प्रत्येक कुटुंबात मोठा आनंद घेऊन येणारा एक अत्यंत गोड क्षण असतो.

साधारणपणे गरोदरपणाचे 37 ते 40 आठवडे पूर्ण झाल्यानंतर बाळ जन्माला येते. पण जर 37 आठवडे पूर्ण होण्याआधीच प्रसूती झाली तर त्याला 'प्री-टर्म डिलिव्हरी' किंवा 'वेळेआधी झालेला जन्म' म्हणतात. (नऊ महिने पूर्ण होण्याआधी झालेली प्रसूती) असे म्हणतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 1 कोटी 30 लाख बालकांचा जन्म वेळेआधी (प्री-टर्म) होतो.

पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी वेळेआधी होणारा जन्म हे एक मुख्य कारण आहे.

असे असले तरी वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार पद्धतींच्या मदतीने आजकाल अशी अनेक बाळं पूर्णपणे निरोगी आयुष्य जगत आहेत.

गर्भधारणेच्या कालावधीनुसार प्री-टर्म प्रसूतीचे चार प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते:

अत्यंत मुदतीपूर्वी (Extremely Preterm): 28 आठवड्यांपेक्षा कमी

खूप मुदतीपूर्वी (Very Preterm): 28 ते 32 आठवडे

मध्यम मुदतीपूर्वी (Moderate Preterm): 32 ते 34 आठवडे

शेवटच्या टप्प्यातील मुदतीपूर्वी (Late Preterm): 34 ते 36 आठवडे

गर्भधारणेचा काळ जितका कमी असेल तितकी बाळाला वैद्यकीय मदतीची गरज जास्त भासू शकते.

वेळेआधी प्रसूती होण्याची कारणे काय आहेत?

काही प्रकरणांमध्ये स्पष्ट कारण दिसत नसले तरी, काही परिस्थितीत हा हा धोका वाढतो :

  • गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखाशी (Cervix) संबंधित समस्या: गर्भाशयाचे मुख कमकुवत असणे, गर्भाशयाच्या रचनेतील दोष.
  • पाणी आधीच वाहून जाणे (PPROM): ॲम्निऑटिक पिशवी फुटून प्रसूती वेदना सुरू होण्यापूर्वीच पाणी वाहून जाणे.
  • युरिन इन्फेक्शन, योनीतील संसर्ग आणि गर्भाशयाचे इन्फेक्शन.

आईचे आरोग्य: आईला उच्च रक्तदाब (हाय बीपी), प्री-एक्लॅम्प्सिया, मधुमेह (डायबिटीज), थायरॉईडच्या समस्या आणि ॲनिमिया (रक्तक्षय) यांसारख्या आरोग्याच्या समस्या असणे.

एकापेक्षा जास्त गर्भधारणा : गर्भाशयात जुळी किंवा तिळी बाळे असणे.

जीवनशैलीशी संबंधित कारणे: धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन आणि तीव्र कुपोषण.

इतर कारणे: आधी कधी वेळेआधी प्रसूती झालेली असणे, आईचे वय 18 वर्षांपेक्षा कमी किंवा 35 वर्षांपेक्षा जास्त असणे. दोन गरोदरपणाच्या मध्ये खूप कमी वेळ असणे आणि प्रचंड मानसिक ताण असणे.

प्री-टर्म बालकांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बाळाचा जन्म जितका लवकर होईल, तितका त्याच्या अवयवांचा विकास अपुरा राहण्याचा धोका जास्त असतो.

श्वसनाच्या समस्या: फुफ्फुसांचा पूर्ण विकास न झाल्यामुळे बाळाला श्वास घेणे कठीण होते. फुफ्फुसे पूर्ण न विकसित झाल्यामुळे 'रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम' (RDS) होऊ शकतो. आवश्यकतेनुसार 'सर्फॅक्टंट' उपचार दिले जातात. व्हेंटिलेटर किंवा CPAP ची गरज भासू शकते.

कावीळ : प्री-टर्म बालकांमध्ये कावीळ अधिक प्रमाणात दिसून येते. बहुतेकांना 'फोटोथेरपी'ने आराम मिळतो.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे: जन्मानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत ग्लुकोजची पातळी वारंवार तपासली पाहिजे.

शरीराचे तापमान: चरबीचे साठे कमी असल्यामुळे शरीराचे तापमान कमी होते. म्हणूनच त्यांना इनक्यूबेटरमध्ये ठेवावे लागू शकते.

दूध पिण्यास त्रास: दूध चोखणे, गिळणे आणि श्वास घेणे या तिन्ही गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतात. वेळेआधी जन्माला आलेल्या बाळांमध्ये हे कौशल्य पूर्ण विकसित झालेले नसते.

इन्फेक्शन्स: रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

मेंदूचा विकास: काही बालकांमध्ये मेंदूत रक्तस्राव होणे, वाढ मंदावणे अशा समस्या दिसू शकतात. पण नियमित फॉलो-अपद्वारे याचे वेळेवर निदान करून उपचार केले जाऊ शकतात.

डोळ्यांच्या समस्या: प्री-टर्म बालकांमध्ये 'रेटीनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी' (ROP) होण्याची शक्यता असते. म्हणूनच डोळ्यांची तपासणी करणे अनिवार्य आहे.

ऐकण्याच्या समस्या: काही बालकांना ऐकण्याच्या क्षमतांची तपासणी (हियरिंग टेस्ट) करण्याची आवश्यकता असते.

वेळेआधी जन्मलेल्या सर्व बाळांना आयुष्यभर त्रास होतो का?

अजिबात नाही. समाजात पसरलेला हा एक अत्यंत मोठा गैरसमज आहे.

34 ते 36 आठवड्यांच्या दरम्यान जन्मलेली बहुतांश मुले काही दिवसांच्या वैद्यकीय देखभालीनंतर पूर्णपणे निरोगी आयुष्य जगतात.

28 ते 32 आठवड्यांच्या दरम्यान जन्मलेली बाळेसुद्धा आधुनिक NICU उपचार, योग्य पोषण आणि नियमित फॉलो-अपद्वारे सामान्य जीवन जगू शकतात.

त्यामुळे 'मुदतीपूर्वी जन्म झाल्यामुळे भविष्यात समस्या येणारच' हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे.

वेळेआधी जन्मलेल्या सर्व बाळांना आयुष्यभर त्रास होतो का?

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images

वेळेआधी जन्मलेल्या बाळाला NICU ची गरज का पडते?

बाळाला NICU मध्ये का ठेवले आहे? असे वाटून बरेच पालक घाबरतात.

पण NICU (नियोनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट) मध्ये ठेवले म्हणजे बाळाची तब्येत खूप धोक्यात आहे असा अर्थ होत नाही.

बाळाला लागणारी विशेष वैद्यकीय काळजी आणि ट्रीटमेंट देण्यासाठी बनवलेला तो एक विभाग आहे.

गरजेनुसार NICU मध्ये मिळणारे उपचार आणि सुविधा

  • श्वास घेण्यासाठी CPAP किंवा व्हेंटिलेटरची मदत
  • इनक्यूबेटरद्वारे शरीराच्या तापमानाचे नियंत्रण
  • सलाईन द्वारे लिक्विड आणि औषधे देण
  • नळीवाटे (ट्यूब) किंवा विशिष्ट पद्धतीने आईचे दूध पाजणे
  • हृदयाचे ठोके, श्वास आणि ऑक्सिजनच्या पातळीचे सतत (मॉनिटरिंग) लक्ष ठेवणे
  • इन्फेक्शन टाळणे आणि त्यावर उपचार करणे
  • गरोदरपणाचा काळ, बाळाचे वजन आणि आरोग्याची स्थिती यावर बाळ किती दिवस NICU मध्ये राहील हे ठरते.

वेळेआधी जन्म झाल्याने दीर्घकालीन समस्या उद्भवतात का?

अनेक प्री-टर्म बालके पूर्णपणे सामान्य जीवन जगतात. मात्र गर्भाशयात अत्यंत कमी काळ राहून जन्मलेल्या काही बालकांमध्ये काही समस्या दिसून येण्याची शक्यता असते:

  • शारीरिक वाढ आणि विकास मंदावणे
  • बोलण्यास उशीर होणे
  • शिकण्यात किंवा समजून घेण्यात उशीर होणे
  • दृष्टी किंवा ऐकण्याच्या समस्या
  • दुर्मिळ प्रकरणांमध्ये सेरेब्रल पाल्सी (मेंदूच्या इजांमुळे स्नायूंवर नियंत्रण न राहणे)

कांगारू मदर केअर (KMC)

  • कमी वजनाच्या बालकांसाठी ही अत्यंत उपयुक्त पद्धत आहे.
  • आई किंवा वडिलांच्या छातीवर बाळाची त्वचा स्पर्श करेल अशा प्रकारे (Skin-to-Skin) ठेवल्यामुळे...
  • शरीराचे तापमान स्थिर राहते.
  • आईचे दूध चांगले येते.
  • इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
  • बाळाचे वजन लवकर वाढते.
  • आई आणि बाळातील नाते अधिक घट्ट होते.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) देखील KMC वापरण्याचा सल्ला देते.

आईच्या दुधाचे महत्त्व

फोटो स्रोत, Christopher Furlong/Getty Images

आईच्या दुधाचे महत्त्व

  • प्री-टर्म बालकांसाठी आईचे दूध एखाद्या औषधासारखे असते.
  • आईचे दूध इन्फेक्शनपासून रक्षण करते.
  • आतड्यांच्या विकासासाठी मदत करते.
  • मेंदूच्या विकासाला चालना देते.
  • NEC (नेक्रोटायझिंग एन्टेरोकोलायटिस) चा धोका कमी करते.
  • बाळ थेट दूध पिऊ शकत नसल्यास आईचे दूध काढून पाजता येते.

पालकांनी लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी

  • डॉक्टरांनी दिलेल्या फॉलो-अपच्या तारखांचे आवर्जून पालन करावे.
  • वेळेवर लसीकरण करून घ्यावे.
  • बाळाच्या वजनावर नियमितपणे लक्ष ठेवावे.
  • आवश्यक असल्यास डोळ्यांची तपासणी (ROP Screening) आणि ऐकण्याची तपासणी (हियरिंग टेस्ट) नक्की करून घ्यावी.
  • आजारी व्यक्तींना बाळापासून दूर ठेवावे.
  • हात स्वच्छ धुतल्यानंतरच बाळाला स्पर्श करावा.

वेळेआधी प्रसूती... गैरसमज आणि सत्य

गैरसमज: वेळेआधी जन्मलेली बाळे कधीच सामान्य बाळांसारखी मोठी होत नाहीत.

सत्य: आजच्या आधुनिक उपचारांमुळे ही बाळे पूर्णपणे सामान्य आयुष्य जगतात.

गैरसमज: वेळेआधी जन्मलेली बाळे कधीच सामान्य बाळांसारखी मोठी होत नाहीत.

सत्य: आजच्या आधुनिक उपचारांमुळे ही बाळे पूर्णपणे सामान्य आयुष्य जगतात.

गैरसमज: NICU मध्ये ठेवले म्हणजे काहीच आशा उरलेली नाही.

सत्य: NICU हे फक्त खास काळजी घेण्यासाठी असते. बाळ पूर्ण बरे होऊन घरी जाऊ शकते.

गैरसमज: वेळेआधी जन्मलेल्या बाळाला आईचे दूध पाजू नये.

सत्य: बाळासाठी आईचे दूध हेच सर्वोत्तम अन्न आहे.

गैरसमज: वजन कमी असेल तर बाळ कायम अशक्तच राहील.

सत्य: योग्य आहार आणि डॉक्टरांच्या देखरेखीने बाळाचे वजन सहज वाढू शकते.

वेळेआधी होणारी प्रसूती टाळता येते का?

वेळेआधी होणारी प्रसूती प्रत्येक वेळी टाळणे शक्य नसले, तरी त्याचा धोका कमी करता येऊ शकतो.

  • गरोदर राहताच डॉक्टरांचा सल्ला आणि तपासणी सुरू करावी.
  • गर्भावस्थेत करावयाच्या सर्व तपासण्या वेळेवर करून घेतल्या पाहिजेत.
  • रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) यांसारख्या गोष्टी नियंत्रणात ठेवल्या पाहिजेत.
  • कसलेही इन्फेक्शन झाल्यास लगेच उपचार घ्यावेत.
  • धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे सोडले पाहिजे.
  • चांगला पोषक आहार घ्यावा.
  • फोलिक ॲसिड, आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्याव्यात.
  • आधी वेळेआधी डिलिव्हरी झाली असल्यास पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये खास काळजी घेण्याची गरज असते.

रुग्णालयात कधी जावे?

खालील लक्षणे दिसल्यास कोणताही विलंब न करता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • योनीतून पाणी जाणे (Water breaking)
  • रक्तस्राव होणे
  • वारंवार कळा येणे
  • बाळाची हालचाल कमी होणे
  • खूप ताप येणे
  • तीव्र पोटदुखी
  • भयंकर डोकेदुखी आणि अंधारी येणे

वेळेआधी डिलिव्हरी होणे ही पालकांसाठी घाबरवणारी गोष्ट नक्कीच असते. पण आजच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा, नवजात बाळांची खास काळजी, NICU ची सोय, आईचे दूध, कांगारू मदर केअर आणि रेग्युलर चेकअप्समुळे वेळेआधी जन्माला आलेली बहुतांश मुले मोठी होऊन निरोगीपणे वाढून शिक्षण, नोकरी आणि छान कौटुंबिक आयुष्य जगतात.

गर्भावस्थेदरम्यान नियमित वैद्यकीय देखरेख, धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे आणि वेळेवर उपचार घेणे यांद्वारे माता आणि बाळ.. दोघांचेही आरोग्य सुरक्षित ठेवता येते.

(टीप: या लेखाचे लेखक एक डॉक्टर आहेत. वैद्यकीय माहिती आणि उपचारांबद्दल जागरूकता निर्माण करणे हाच या लेखाचा उद्देश आहे. आरोग्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन