साडेतीन वर्षांच्या प्रेमसंबंधांचा दुर्दैवी अंत; लग्नाला संमती असतानाही प्रियकरानं घेतला तरुणीचा जीव

पोलीस ठाणे
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पुण्यातील हिंजवडीत प्रियकराने मारहाण करत 27 वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे.

तरुणी आणि तिचा प्रियकर हे दोघं आयटी कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. त्या दोघांमध्ये जवळपास साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

रविवारी (22 नोव्हेंबर) रात्री झालेल्या वादानंतर शुभमनं तरुणीला मारहाण केली होती. त्यानंतर मध्यरात्रीही त्यानं तिला मारहाण केली.

विशेष म्हणजे सकाळी त्यानं स्वतःच पोलिसांना फोन करत रुग्णवाहिकेची मागणी केली होती.

त्यानंतर संशय आल्यानं पोलिसांनी त्याठिकाणी पोहोचत तपास केला आणि लगेचच आरोपी शुभम याला अटक केली आहे.

हिंजवडीचे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.

नेमकं काय घडलं?

मूळची वर्धा जिल्ह्यातील 27 वर्षीय मृत तरुणी आणि हिंगोली येथील शुभम काळबांडे हे दोघंही पुण्यातील हिंजवडीत आयटी अभियंता म्हणून कंपनीत काम करत होते.

जवळपास साडेतीन वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंधात झालं.

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दोघेही नोकरीनिमित्त पुण्यात आलेले होते आणि हिंजवडी परिसरातील एका खासगी पेईंग गेस्ट (पीजी) म्हणून वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या लग्नालाही दोन्ही कुटुंबीयांची संमती होती, अशी माहिती समोर आली आहे.

पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते अशी माहिती मिळाली आहे. या वादांमुळं त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झालेला होता. या वादामागचं कारण मात्र अद्याप अधिकृतपणे कोणी सांगितलेलं नाही.

रविवारी (22 नोव्हेंबर) रात्री दोघे जेवणासाठी बाहेर गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यात वाद झाला नंतर रूमवर परतल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

संतापलेल्या शुभमने मुलीच्या डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास आणि पुन्हा पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यानं कोमलला मारहाण केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी दिली.

प्रतिकात्मक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शुभमनेच सोमवारी (13 नोव्हेंबर) पहाटे साडेसहाच्या सुमारास पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली.

हिंजवडीचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी ही माहिती दिली.

तरुणी बेशुद्ध असून तिच्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्याची मागणी शुभमने फोनवर केली होती. त्यानंतर पोलिसांनी संशय आल्यानं घटनास्थळी धाव घेतली.

तरुणीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी शुभमची चौकशी केली त्यात समोर आलेल्या माहितीनंतर शुभमनंच तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)