कॅप्टनने आर्मी हेलिकॉप्टरसमोर युनिफॉर्ममध्ये केलं प्रपोज, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ग्रॅज्युएशन (पदवीदान) सोहळ्यादरम्यान भारतीय लष्कराच्या एव्हिएशन विभागातील कॅप्टन भरत भारद्वाज हे त्यांच्या होणाऱ्या पत्नी (वाग्दत्त वधू) आरुषीला प्रपोज करताना.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, ग्रॅज्युएशन (पदवीदान) सोहळ्यादरम्यान भारतीय लष्कराच्या एव्हिएशन विभागातील कॅप्टन भरत भारद्वाज हे त्यांच्या होणाऱ्या पत्नी (वाग्दत्त वधू) आरुषीला प्रपोज करताना.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये ग्रॅज्युएशन (पदवीदान) सोहळ्यादरम्यान भारतीय लष्कराचे एव्हिएशन कॅप्टन भरत भारद्वाज त्यांच्या होणाऱ्या पत्नी आरुषीला प्रपोज करताना दिसले होते.

त्यांनी 2 जून रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधून फ्लाइट ट्रेनिंग (विमान प्रशिक्षण) पूर्ण केलं.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पासिंग आऊट परेड आणि एव्हिएशन शो झाला. याच वेळी भरत भारद्वाज यांनी होणारी पत्नी आरुषीला प्रपोज केलं.

ज्यावेळी भरत यांनी आरुषीला प्रपोज केलं, त्यावेळी मागे लष्कराचे एक हेलिकॉप्टर होते.

यावेळी उपस्थित कुटुंबीय आणि सहकारी अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून या खास क्षणाचं स्वागत केलं आणि आनंद साजरा केला.

पण हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांची मतं विभागली गेल्याचे दिसून आले. काहींनी या कृतीचं कौतुक केलं, तर काहींनी त्यावर टीका केली.

भरत भारद्वाज यांनी काय म्हटलं

2 जून रोजी आरुषीला प्रपोज केल्यानंतर भरत भारद्वाज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला.

ते म्हणाले, "एक वर्षाच्या कठोर मेहनतीनंतर आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होता. आज आम्ही सर्वजण पायलट आणि प्रशिक्षक बनलो आहोत. आज आमच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे."

Caption- हा दिवस आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी अधिक खास आणि संस्मरणीय बनवायचा होता, असं कॅप्टन भारद्वाज यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, हा दिवस आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी अधिक खास आणि संस्मरणीय बनवायचा होता, असं कॅप्टन भारद्वाज यांनी म्हटलं.

"आरुषी माझी होणारी पत्नी आहे. आम्ही गेली पाच वर्षे एकमेकांना ओळखतो. ती माझ्याशी लग्न करेल की नाही हे विचारण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता दिवस मला योग्य वाटला नाही."

ते पुढे म्हणाले, "आमच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा दिवस आहे. जसं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तसा हा दिवस माझ्या होणाऱ्या पत्नीसाठीही खास बनवावा, अशी माझी इच्छा होती. या संपूर्ण कल्पनेमागे माझा हाच विचार होता."

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

परंतु, कॅप्टन भारद्वाज यांची ही कल्पना सर्वांनाच आवडलेली नाही. सुरभी गरवाल नावाच्या एका यूझरने त्यांनी प्रपोज करण्यासाठी निवडलेल्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांनी एक्सवर लिहिलं की, "भारतीय सैन्य दलाचे अधिकारी कॅप्टन भरत भारद्वाज यांनी लष्कराच्या शिस्तीचे आणि नियमांचे (प्रोटोकॉल) उल्लंघन केले आहे. त्यांनी परेडसारख्या एका औपचारिक लष्करी कार्यक्रमादरम्यान गणवेशात आणि लष्करी उपकरणांसमोर आपल्या होणाऱ्या पत्नीला प्रपोज केलं."

विनय उपाध्याय नावाच्या एका यूझरने एक्सवर लिहिलं की, "गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन भरत भारद्वाज यांनी त्यांची जोडीदार आयुषीला केलेल्या प्रपोजची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे."

ते पुढे म्हणाले, "कदाचित काही नियमांचं उल्लंघन झाले असेल किंवा हा तरुण अधिकारी भावनेच्या भरात वागला असेल. पण आपण अनेकदा पाहिलं आहे की, 'नो युवर आर्मी'सारख्या कार्यक्रमांमध्ये सामान्य लोकांनाही लष्कराची उपकरणे आणि शस्त्रास्त्रांसोबत फोटो काढण्याची संधी दिली जाते. यामुळे लोकांना प्रेरणा मिळत असते."

"अशा खास क्षणाकडे वाद-विवाद आणि मतभेद बाजूला ठेवून पाहायला हवं आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे."

केएस यादव नावाच्या सोशल मीडिया युजरने लिहिलं आहे की, "कॅप्टन भरत भारद्वाज यांनी लष्कराचे नियम आणि शिस्त मोडली आहे."

"त्यांनी पासिंग आऊट परेडसारख्या औपचारिक कार्यक्रमात, लष्करी गणवेशात आणि सैन्याच्या उपकरणांसमोर आपल्या होणाऱ्या पत्नीला प्रपोज केलं."

'राष्ट्रीय सुरक्षेचं नुकसान झालेलं नाही'

पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, "या घटनेकडे चुकीच्या नजरेने पाहण्याऐवजी सकारात्मक दृष्टीकोनातूनही पाहिलं जाऊ शकतं. देशाची सेवा करणारा गणवेशातील जवान आणि त्याची जीवनसाथी, हे एक सुंदर आणि प्रेरणादायी चित्र आहे."

पुनीत नावाच्या यूझरने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं, "कॅप्टन भरत भारद्वाज यांनी हेलिकॉप्टरजवळ गणवेशात व्यक्त केलेलं प्रेम खूपच आकर्षक वाटतं."

"हे कर्तव्य आणि प्रेम यांचं सुंदर मिश्रण आहे. भारतीय लष्करातील आयुष्य अभिमान आणि साहसाने भरलेलं असतं, हे यातून दिसून येतं. तसेच तरुणांसाठी गणवेश अभिमानाने परिधान करणं ही खरी प्रेरणा आहे."

Caption- लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे यांनी भरत भारद्वाजचं समर्थन केलं आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे यांनी भरत भारद्वाजचं समर्थन केलं आहे.

लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये भरत भारद्वाज यांना पाठिंबा दिला आहे.

त्यांनी लिहिलं, "आर्मीच्या कॅप्टनने आपल्या होणाऱ्या पत्नीला प्रपोज केलं. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचं नुकसान झालेलं नाही. ती परेडची वेळ नव्हती, तर चहापानाची वेळ होती. परेड संपली होती आणि सर्वांना फोटो काढण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यात काहीही चुकीचं नाही."

"कदाचित त्यांनी काही मर्यादा ओलांडल्या असतील आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची त्यांना जाणीवही असेल.

पण एक चांगला सैनिक म्हणून ते त्याची जबाबदारी स्वीकारतील. मात्र, जर तेच धोका पत्करणार नसतील, धाडसी पाऊल उचलणार नसतील, तर मग हे कोण आणि कधी करणार?"

ते म्हणाले, "कॅप्टन भारद्वाज आणि त्यांच्या होणाऱ्या जोडीदाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी विवाह करून आनंदी आणि सुखी आयुष्य जगावं."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.