'अचानक माझं आयुष्य बदललं', महिलांमध्ये ब्रेस्ट रिडक्शन आता लोकप्रिय का होतंय?

फोटो स्रोत, Ranvia
- Author, रॅचेल फ्लीन
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
रनवियाला ती फक्त 11 वर्षांची असताना घडलेला एक प्रसंग आठवून आजही अस्वस्थ व्हायला होतं. तेव्हा एका आईस्क्रीमवाल्यानं तिला पाहून चुकीच्या पद्धतीनं किंवा बीभत्सपणे शिट्टी वाजवली होती.
काही वर्षांपूर्वीच ती पौंगडावस्थेत म्हणजे वयात आली होती. तिला वाटतं की, त्याच वेळेस तिच्या स्तनांच्या आकारामुळे लोक तिच्याकडे कसे पाहतात आणि ती स्वत:कडे कसं पाहते या गोष्टीवर परिणाम होऊ लागला होता.
शाळेत, मुलं तिला तिच्या स्तनांवरून टोपणनाव ठेवत असत. तसंच तिच्या संमतीशिवाय त्यांना स्पर्श करत आणि दाबत असत.
"मी अजूनही एक लहान मुलगीच होते. मात्र अचानक माझ्या शरीराच्या या दोन अवयवांमुळे माझ्याकडे अशाप्रकारे लक्ष वेधलं जाऊ लागलं, ज्यासाठी मी भावनिकदृष्ट्या तयार नव्हते," असं रनविया सांगते.
मोठ्या स्तनांमुळे आलेले वाईट अनुभव
रनविया लेस्टरमध्ये एका आशियाई कुटुंबात वाढली आहे. तिला आठवतं की, तिच्या हायस्कूलमधील मैत्रिणींप्रमाणे तिला कपडे घालता येत नसल्यामुळे तिला खूपच लाजिरवाणं वाटायचं.
"माझे स्तनांच्या आकारामुळे मी विशिष्ट प्रकारचे कपडे घालू शकत नव्हते. कारण त्यात ते मोठे दिसायचे. माझी आई आश्चर्यानं किंवा धक्क्यानं म्हणायची, 'तू ते कपडे घालू शकत नाहीस,'" असं रनविया म्हणाली.
स्तनांच्या आकाराचा शारीरिक परिणामदेखील झाला होता. रनवियाला पाठदुखीचा त्रास होत होता. तिच्या ब्राच्या पट्ट्या तिला टोचायच्या किंवा त्यामुळे तिला असुविधा व्हायची.
व्यायाम करणं कठीण होतं. तिच्या एडीएचडीमुळे (अटेंशन डेफिसिट/हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर) देखील "माझ्या शरीराची सतत जाणीव होत राहण्याची संवेदनात्मक आणि भावनिक तीव्रता असह्य होत होती."
रनविया 25 वर्षांची झाली, तेव्हा तिचं वजन 50 किलो होतं आणि तिच्या छातीचा आकार 32 जेजे कप होता. तेव्हा रनवियाची सहनशक्ती संपली होती.
'ही शस्त्रक्रिया मी खूप आधीच करून घ्यायला हवी होती'
फेसबुकवर जवळपास 6,000 सदस्य असलेला एक ब्रेस्ट रिडक्शनशी (स्तन छोटे करण्याची शस्त्रक्रिया) संबंधित ग्रुप सापडणं, ही गोष्ट तिच्यासाठी जीवनरेषा ठरली, असं रनविया म्हणाली.
एनएचएसद्वारे शस्त्रक्रिया करून घेण्याबाबत डॉक्टरकडून (जीपी) प्रतिसादाची वाट पाहत असतानाच, तिनं या ग्रुपच्या माध्यमातून ब्रेड रिडक्शनच्या शस्त्रक्रियेविषयीचा बहुतांश अभ्यास केला.

फोटो स्रोत, Ranvia
एनएचएस म्हणजे नॅशनल हेल्थ सर्व्हिस, ही यूकेमधील आरोग्यसेवा आहे.
"मला पुन्हा, पुन्हा महिला एकच वाक्य म्हणताना दिसायच्या. ते म्हणजे, ही शस्त्रक्रिया मी खूप आधीच करून घ्यायला हवी होती," असं रनविया म्हणाली.
डॉक्टरची अपॉईंटमेंट मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी आणि एनएचएसकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे, रनवियानं अखेर खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन हे उपचार घ्यायचं ठरवलं.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही महिन्यांनी रनवियाला असं सांगण्यात आलं की, एनएचएसच्या सेवेअंतर्गत ही शस्त्रक्रिया करून घेण्यास ती पात्र होती.
असं फार 'अपवादात्मक परिस्थितीत'च घडतं. तिचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) कमी असल्यामुळे हे शक्य झालं होतं, असं ब्रेस्ट सर्जन लिंडसे हायटन म्हणतात.
यूकेमध्ये हजारो महिलांनी ब्रेस्ट रिडक्शन म्हणजे स्तनांचा आकार कमी करण्यासाठीच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये पैसे मोजले आहेत. रनविया त्यापैकी एक आहे.
ही शस्त्रक्रिया अधिकाधिक लोकप्रिय होत चालली आहे, अशी माहिती ब्रिटिश असोसिएशन ऑफ ॲस्थेटिक प्लास्टिक सर्जन्सनं (बीएएपीएस) दिली.
"शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जेव्हा शुद्धीवर आले आणि खाली पाहिलं, तेव्हा पहिल्यांदाच मला माझं पोट दिसलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे शारीरिक आणि मानसिक ओझं मी कित्येक वर्षांपासून वाहत होते. आता अचानक जणूकाही मी स्वत:लाच पाहत होते," असं रनविया म्हणाली.
ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ
ब्रिटिश असोसिएशन ऑफ ॲस्थेटिक प्लास्टिक सर्जन्सच्या (बीएएपीएस) एप्रिलमधील आकडेवारीनुसार, पहिल्यांदाच स्तनांचा आकार कमी करून घेणाऱ्यांची आणि ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकणाऱ्या शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांची एकत्रित संख्या, स्तनांचा आकार मोठा करून घेणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे.
यूकेमध्ये 2025 मध्ये ब्रेस्ट एनलार्जमेंट म्हणजे स्तनांचा आकार मोठा करून घेणाऱ्यांच्या संख्येत 8 टक्क्यांची घट झाली होती.
बीएएपीएसचे अध्यक्षा नोरा न्युजंट यांना वाटतं, "अतिशयोक्तीपूर्ण किंवा खूप मोठ्या आकारांपासून दूर जात अधिक नैसर्गिक आकारांकडे असणारा एक व्यापक कल किंवा बदल या आकडेवारीतून दिसून येतो. असा बदल जो सक्रिय जीवनशैलीला आणि स्पोर्टी कॅज्युअल कपड्यांच्या (टी-शर्ट, ट्रॅकसूट, लेगिन्स इत्यादी) फॅशनच्या वाढत्या लोकप्रियेला अधिक पूरक ठरतो आहे."

फोटो स्रोत, Getty Images
वजन कमी करणाऱ्या औषधांमध्ये वाढ झाल्यामुळे देखील "अधिक सडपातळ किंवा बारीक शरीरयष्टीकडे कल वाढला आहे," असं प्राध्यापक मेरेडिथ जोन्स यांना वाटतं. त्या 'द ब्युटी क्रोनिकल्स पॉडकास्ट'च्या सादरकर्त्या आहेत.
हायटन, मँचेस्टरमधील एक एनएचएस ब्रेस्ट कन्सल्टंट आहेत. त्या खासगी स्वरुपातदेखील स्तनांच्या शस्त्रक्रिया करतात.
त्या म्हणतात की, हा बदल 'काही प्रमाणात' ट्रेंडशी संबंधित आहे. मात्र सध्याच्या काळात बहुतांश महिलांचं प्राधान्य शारीरिक कार्यक्षमतेला आहे. म्हणजे त्यांना सहजपणे हालचाल करता आली पाहिजे आणि अधिक आत्मविश्वास जाणवला पाहिजे.
ब्रेस्ट रिडक्शनसाठीचा महागडा खर्च
ग्रेटर मँचेस्टरच्या स्यू 54 वर्षांच्या आहेत. त्यांना असं वाटत होतं की, त्यांना आता ब्रेस्ट इम्प्लांट त्यांना सूट होत नाहीत किंवा त्यांना त्याची गरज नाही. अनेक वर्षे स्तनपान दिल्यानंतर त्यांनी हे ब्रेस्ट इम्प्लांट करून घेतले होते.
"ते खूपच जड वाटत होते. मला पुन्हा फीट व्हायचं होतं. मला ते शरीरावर नैसर्गिक अवयवासारखे वाटण्याऐवजी जणूकाही जोडून ठेवल्यासारखे वाटत होते," असं स्यू म्हणाल्या.
मात्र खासगी हॉस्पिटलमध्ये केलेली शस्त्रक्रिया स्वस्त नसते. देशभरात त्यासाठीचा खर्च वेगवेगळा आहे.
मँचेस्टरमध्ये स्यू यांनी 2025 मध्ये त्यांचे ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकण्यासाठी 9,500 पौंड (आजच्या दरानं अंदाजे 12 लाख 23 हजार 125 रुपये) खर्च केले होते.
तर रनवियाला तिच्या ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रियेसाठी जवळपास 8,000 पौंड (अंदाजे 10 लाख 30 हजार रुपये) खर्च आला. हे पैसे तिनं 3 वर्षांमध्ये मासिक हफ्त्यांद्वारे दिले.
एनएचएसचं म्हणणं आहे की, यूकमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रिया करण्यासाठी 'जवळपास 6,500 पौंड' (अंदाजे 8 लाख 36 हजार 875 रुपये) खर्च येतो.
यात डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं किंवा पुढील फॉलो-अप खर्चाचा समावेश नाही. एनएचएसमध्ये ब्रेस्ट रिडक्शन ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया मानली जाते. ती उपलब्ध असली तरीदेखील, हयटन यांच्या मते, ती मिळवणं 'जवळपास अशक्यच' आहे.

फोटो स्रोत, Ranvia
एनएचएसच्या मार्गदर्शन तत्वांनुसार, जर तुमच्या स्तनांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतील आणि जर व्यावसायिकरित्या फिट असलेल्या ब्रासारखे इतर पर्याय उपयुक्त ठरले नसतील, तर तुम्ही ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरू शकता.
तसंच तुमच्या स्तनांचा आकार, वजन आणि तुमचं सर्वसाधारण आरोग्य या गोष्टीदेखील विचारात घेतल्या जाऊ शकतात.
"ही प्रक्रिया काहीशी जो सर्वात फीट असेल तोच टिकेल अशा सूत्रासारखीच आहे," असं हायटन म्हणतात.
"ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी कोण दृढनिश्चयी आहे, कोण पुरेसा शिकलेला आहे, यावर ते अवलंबून आहे. शेवटी सर्वसाधारणपणे याचं उत्तर 'नाही' असंच असतं." म्हणजे ते पात्र ठरत नाहीत.
"एनएचएसमध्ये निधी मिळण्यातील अडचणी म्हणजे आर्थिक समस्या तर आहेतच. मात्र मला वाटतं की, नकार देणं ही एनएचएससाठी सोपी गोष्ट आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.
त्यांन वाटतं की, जेव्हा महिलांना मोठ्या स्तनांमुळे स्पष्टपणे शारीरिक लक्षणं जाणवतात किंवा त्यांचा त्रास होतो, तेव्हा स्तनांचा आकार कमी करण्यासाठीच्या शस्त्रक्रियेला 'एक कॉस्मेटिक शस्त्रक्रिया' म्हणून नकार देता कामा नये. त्याला एक कार्यक्षमतेशी निगडीत शस्त्रक्रिया म्हणून मान्यता दिली पाहिजे.
बीबीसीनं एनएचएस इंग्लंडशी संपर्क साधला. मात्र त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.
अनेक महिलांच्या आयुष्यात शस्त्रक्रियेनंतर झालेला सुखकारक बदल
गेल्या काही वर्षांमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रिया केलेल्या काही महिलांना बीबीसीनं संपर्क केला.
स्टॉकपोर्टच्या केटी म्हणतात की, ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रियेआधी "त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या स्तनांच्या आकाराचाच वरचष्मा होता."
एनएचएसनं या शस्त्रक्रियेस नकार दिल्यानंतर, त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया केली. त्यात त्यांचं 3 किलो वजन कमी करण्यात आलं. हे त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळच्या वजनाइतकंच होतं.
नॉर्विकच्या सिंडी म्हणाल्या की, त्यांना वयाच्या 16 व्या वर्षी एका डॉक्टरनं सांगितलं होतं की "रिडक्शनच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे वाचवण्यास सुरुवात कर. कारण या बाबतीत एनएचएसची तुला मदत होणार नाही."
त्या आता नियमितपणे जिममध्ये जातात. त्या म्हणाल्या, "आता माझ्या दैनंदिन आयुष्यातील निर्णयांवर माझ्या स्तनांचा प्रभाव असत नाही."
रियान 36 वर्षांच्या आहेत. त्यांनी 2025 मध्ये त्यांच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठीच्या खर्चासाठी वयाच्या 21 व्या वर्षापासून दर आठवड्याला 10 पौंडची बचत करण्यास सुरुवात केली होती. त्या आता आठवड्यातून 4 वेळा वेट-ट्रेनिंग करू शकतात आणि धावू शकतात.
सारा, काउंटी डरहॅमच्या रहिवासी आहेत. त्यांना ऑटिझमची (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) समस्या आहे. त्या स्वत:ची ओळख नॉन-बायनरी म्हणजे पुरुषही नाही किंवा महिलाही नाही अशी करतात.
त्यांच्या मोठ्या स्तनांमुळे त्यांना संवेदनात्मक समस्या निर्माण झाल्या. त्यांना "सार्वजनिक मालमत्ता असल्यासारखं वाटत होतं."

फोटो स्रोत, Sue
मिशेल अर्मस्टनच्या रहिवासी आहेत. त्यांच्या 28 व्या वाढदिवशी त्यांच्या स्तनांना अयोग्यरित्या स्पर्श झाल्याचं त्यांना आठवतं.
"त्या घटनेनंतर काही काळ मी घराबाहेर पडले नव्हते. ब्रेस्ट रिडक्शनची शस्त्रक्रिया कधीही दिखाव्यासाठी, स्वत:विषयीचा अतिरिक्त अभिमान किंवा प्रतिमेसाठी नव्हती. तर ती आयुष्याच्या गुणवत्तेसाठी होती," असं त्या म्हणतात.
एनएचएसमध्ये ब्रेस्ट रिडक्शनच्या शस्त्रक्रियेसाठी प्रवेश मिळवण्यातील अडचण आणि खासगी हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्च, यामुळे स्वस्त उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे, असं हायटन म्हणाल्या.
ॲलेक्स (नाव बदललेलं आहे) यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस मध्य लंडनमध्ये ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रियेसाठी 16,500 पौंड (अंदाजे 21 लाख 24 हजार 375 रुपये) मोजले होते. या शस्त्रक्रियेत त्यांच्या स्तनांचं वजन 4.2 किलो कमी करण्यात आलं.
त्यांना वाटतं की, त्यांच्या शस्त्रक्रियेला जास्त खर्च आला, कारण त्यांच्या स्तनांचा आकार मोठा होता. तो 'के कप' होता. तसंच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरला 'स्तनांचा मायकलएंजेलो' मानलं जातं.
मायकल एंजेलो हा इटलीतील एक प्रसिद्ध शिल्पकार आणि चित्रकार होऊ गेला.
'हा स्वत:च्या शरीरावर मालकी हक्क मिळवण्याचा मुद्दा'
ॲलेक्स एका फेसबुक ग्रुपवर सक्रिय होत्या. त्या ग्रुपवर हजारो महिला ब्रेड रिडक्शन शस्त्रक्रियेसाठी युरोपभर प्रवास करण्याबद्दल चर्चा करत होत्या. मग ॲलेक्स यांनी स्वत:देखील यासाठी परदेशात जाण्याचा विचार केला होता.
त्यांना लिथुआनियामध्ये ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रियेसाठी जवळपास 4,000 पौंड (अंदाजे 5 लाख 15 हजार रुपये) खर्च येईल असं सांगण्यात आलं.
ही रक्कम ऐकून त्या मोहात पडल्या. मात्र मायदेशी परताना विमानात वैद्यकीय समस्या उद्भवली तर काय होईल, या कल्पनेनं त्या 'अतिशय घाबरल्या' होत्या.
जर काही गुंतागुंत निर्माण झाली, तर लोक यूकेमध्ये परत आल्यानंतर अनेकदा त्या गोष्टीची जबाबदारी एनएचएसवर पडते, असं हायटन म्हणाल्या.
ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रिया करण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग आहेत. मग ते एनएचएस असो की खासगी हॉस्पिटल असो की परदेशात जाऊन शस्त्रक्रिया करणं असो. या सर्व गोष्टी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नोंदवल्या गेल्या आहेत.

फोटो स्रोत, Michelle
ॲलेक्स म्हणतात की, त्यांना अशा महिला माहीत आहेत, ज्या मैत्रिणींच्या मैत्रिणी आहेत आणि टिकटॉकवर व्हायरल व्हीडिओमध्ये पाहिलेल्या इतर महिला, ज्या शस्त्रक्रियेसाठी आतुर आहेत. मात्र त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा खर्च परवडत नाही. तसंच एनएचएसनं त्यांना आधीच नकार दिला आहे.
"ही गोष्ट अतिशय महत्त्वाची का आहे आणि ती फक्त कॉस्मेटिक प्रकारातील नाही, हे एखाद्याला समजावून सांगणं, ही खूप निराशाजनक बाब आहे. मात्र जर तुमच्या घोट्याला किंवा हाताला खूप वेदना होत असतील, जर त्याचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होत असेल, त्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतं, हे तुम्हाला माहित आहे," असं ॲलेक्स म्हणाल्या.
रनविया माझ्याशी सोमवारी रात्री जिममध्ये व्यायाम केल्यानंतर बोलते. ब्रेस्ट रिडक्शनची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ती अशाप्रकारे व्यायाम कधीच करत नसे. तिच्यासाठी ही बाब फक्त एखादा विशिष्ट लूक मिळवण्यापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाची आहे.
"हा फक्त एक कॉस्मेटिक ट्रेंड नाही किंवा ती एक 'आधी आणि नंतर' अशा स्वरुपातील साधीसोपी कहाणी नाही," असं रनविया म्हणाली.
"अनेक महिलांसाठी, ब्रेस्ट रिडक्शनची शस्त्रक्रिया हा पुन्हा एकदा आराम, सुरक्षितता, आत्मविश्वास आणि स्वत:च्या शरीरावर मालकी हक्क मिळवण्याचा मुद्दा आहे," असंही रनविया नमूद करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















