जोगवा : धर्माने लादलेल्या लिंगबदलाचं भयाण वास्तव मांडणारा चित्रपट; काळाच्या पुढे आणि मागेही असणारी गोष्ट

जोगवा चित्रपटाचे पोस्टर

फोटो स्रोत, IDREAM PRODUCTION

    • Author, अक्षय शेलार
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

मराठी चित्रपटसृष्टीने अंधश्रद्धेवर बोट ठेवणारे चित्रपट यापूर्वीही बनवले होते. पण एखाद्या धार्मिक प्रथेच्या नावाखाली एका पुरुषाला त्याच्या इच्छेविरुद्ध स्त्रीरूप स्वीकारायला भाग पाडलं जातं, त्याचं शरीर, त्याचे कपडे, त्याचं नाव, त्याचं संपूर्ण अस्तित्वच धर्माच्या हातात सोपवलं जातं, हे इतक्या थेट आणि करुण पद्धतीने मांडणारा चित्रपट राजीव पाटील यांच्या 'जोगवा'च्या आधी मराठीत झाला नव्हता.

2009 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज मागे वळून पाहताना अधिकच धाडसी वाटतो, कारण भारतात तृतीयपंथीयांच्या हक्कांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल द्यायला त्यानंतर आणखी पाच वर्षं जावी लागली.

2014 सालच्या नालसा निकालाने तृतीयपंथीय ओळखीला कायदेशीर मान्यता दिली, तेव्हा कुठे या विषयावर देशपातळीवर उघड चर्चा सुरू झाली.

'जोगवा' मात्र त्याआधीच, कुठल्याही कायदेशीर किंवा सैद्धांतिक चौकटीशिवाय, एका खेड्यातल्या दोन उपेक्षित जिवांची गोष्ट सांगत या प्रश्नाला भिडला होता.

'जोगवा' ही आत्मशोधाची, स्वतःची लिंगओळख उलगडत जाण्याची गोष्ट नाही. बहुतांश तृतीयपंथीय व्यक्तिरेखांवरचे चित्रपट अशा दिशेने जातात की जिथे व्यक्ती स्वतःच्या आतल्या सत्याकडे हळूहळू चालत जाते.

'जोगवा'ची दिशा नेमकी उलटी आहे. इथला नायक तायप्पा (उपेंद्र लिमये) स्वतःहून काहीही निवडत नाही. त्याच्यावर स्त्रीत्व लादलं जातं. एखाद्या शिक्षेसारखं, विधीसारखं. हाच फरक समजून घेतला की या चित्रपटाचं खरं वेगळेपण आणि त्याची अस्वस्थ करणारी ताकद दोन्ही उमगतात.

जोगता, जोगतीण आणि लादलेली ओळख

'जोगवा'चं मूळ कथासूत्र राजन गवस यांच्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या साहित्यकृतींमध्ये आणि चारुता सागर यांच्या 'दर्शन' या कथेत सापडतं. म्हणजे हा निव्वळ काल्पनिक चित्रपट नसून, वर्षानुवर्षांच्या साहित्यिक आणि पत्रकारितेतल्या दस्तऐवजीकरणाचा तो परिपाक आहे.

चित्रपटाची पार्श्वभूमी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरच्या यल्लम्मा देवीच्या पंथाची आहे. यल्लम्मा म्हणजे रेणुका, जमदग्नींची पत्नी आणि परशुरामाची आई, अशी आख्यायिका प्रचलित आहे. जमदग्नींनी रेणुकेचा वध करण्याची आज्ञा आपल्या मुलांना दिली, तेव्हा फक्त धाकट्या परशुरामाने ती पाळली.

पुढे रेणुकेच्या त्या एका मुंडक्याची हजारो मुंडकी झाली आणि ती सर्व दिशांना विखुरली, अशी लोककथा सांगितली जाते. जोगते आणि जोगतिणी म्हणजे त्याच रेणुकेचे अवतार, अशी श्रद्धा या भागात रुजलेली आहे.

या श्रद्धेच्या आडून प्रत्यक्षात जे घडतं, ते मात्र भयाण आहे. एखाद्या मुलीच्या केसांत जट सापडली, किंवा एखाद्या मुलाला लघवीतून रक्तस्राव झाला, तर तो देवीचा कौल समजला जातो आणि त्या मुलाला किंवा मुलीला देवीला 'सोडलं' जातं.

गरिबी, अंधश्रद्धा आणि सामाजिक दबाव या तिन्हींची अभद्र सरमिसळ यातून घडते.

देवदासी प्रथेचं स्थान मानल्या जाणाऱ्या बेळगावातील सौंदत्ती येल्लम्मा मंदिराच्या उत्सवाला मोदी गर्दी जमते.
फोटो कॅप्शन, देवदासी प्रथेचं स्थान मानल्या जाणाऱ्या बेळगावातील सौंदत्ती येल्लम्मा मंदिराच्या उत्सवाला मोदी गर्दी जमते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चित्रपटातली सुली (मुक्ता बर्वे) आणि तायप्पा यांचं आयुष्य याच एका दिवशी उलटं फिरतं. सुलीच्या केसांत जट सापडते म्हणून ती जोगतीण होते. तायप्पाच्या बाबतीत घडलेलं वेगळं कारण त्याला जोगता बनवतं.

जोगतीण म्हणजे देवीला वाहिलेली, अविवाहित राहून भिक्षा मागत जगणारी स्त्री. जोगता मात्र त्याहून एक पाऊल पुढे जाणारा, अधिक क्रूर प्रकार आहे.

देवीचा अवतार मानला जाणारा हा पुरुष साडी नेसतो, बांगड्या भरतो, स्त्रीसारखी वेशभूषा आणि वर्तन स्वीकारतो. आणि तेही स्वतःच्या इच्छेने नव्हे, तर पंथाच्या दबावाखाली. तायप्पाच्या शरीरावर, त्याच्या ओळखीवर हा बदल लादला जातो तेव्हा तो त्याविरुद्ध लढतो, चिडतो, स्वतःला हरवून बसतो.

इथे चित्रपट एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतो, जो त्या काळात मराठी सिनेमात कुणीही विचारला नव्हता.

लिंगओळख जर बळजबरीने बदलली गेली, तर त्या माणसाच्या मनाचं काय होतं? त्यानं त्याचं दुःख कुठे मांडायचं, कुणाला सांगायचं?

'जोगवा' विषयीच्या चर्चांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा नेहमी समोर येतो, तो म्हणजे चित्रपट सुधारणावादी हेतूने पाहत असला तरी शेवटी तो परंपरागत विषमलिंगी चौकटच बळकट करतो, कारण तायप्पाची सुटका ही स्त्रीत्वाच्या स्वीकारातून नव्हे, तर सुलीवरच्या प्रेमातून पुन्हा 'खरा पुरुष' होण्यातून घडते.

हा मुद्दा अनाठायी नाही. 'जोगवा' तृतीयपंथीय अस्तित्वाला सन्मानाने पाहणारा चित्रपट नसून तो धर्माने लादलेल्या लिंगबदलाचं भयाण वास्तव उघडं करणारा चित्रपट आहे.

हा फरक बारीक वाटला तरी महत्त्वाचा आहे. चित्रपटाचं मोठेपण त्याच्या उत्तरात नसून त्याने विचारलेल्या प्रश्नात आहे, भले ते प्रश्न आताच्या जगात कितीही सरळसोट आणि मूलभूत का वाटेनात.

तपशीलाचं समाजशास्त्र

चित्रपटातला प्रत्येक भौतिक तपशील हे त्या चित्रपटाचं समाजशास्त्र असतं. 'जोगवा'कडे याच नजरेने पाहिलं तर बरंच काही उलगडतं. भंडारा म्हणजे हळदीची पूड, जी जोगत्या-जोगतिणींच्या कपाळावर, अंगावर सतत माखलेली दिसते.

हा केवळ धार्मिक शृंगार नसून ती त्यांच्यावर कायमची चिकटलेली एक ओळख आहे, ज्यामुळे कुणालाही रस्त्यात ते कोण आहेत हे कळतं आणि त्यांना त्यांच्या 'देवत्वा'तून कधीच बाहेर पडता येत नाही. कवड्यांची माळ, हातातला डफ किंवा टाळ, खांद्यावरची झोळी, हे सगळे तपशील त्यांच्या उपजीविकेचं, म्हणजे भिक्षा मागण्याचं साधन आणि त्याचबरोबर त्यांच्या बंदिस्ततेचं प्रतीकही आहेत.

चित्रपटातला सर्वाधिक अंगावर येणारा प्रसंग म्हणजे तायप्पा स्वतःच्याच घरी जोगवा मागायला जातो तो. ज्या घरात तो लहानाचा मोठा झाला, ज्या उंबरठ्यावरून तो हजारो वेळा आत-बाहेर गेला, त्याच उंबरठ्यावर आता तो साडी नेसून, भंडारा लावून, भिक्षेचा वाडगा हातात घेऊन उभा राहतो.

हा एकच प्रसंग चित्रपटाचा गाभा स्पष्ट करतो. इथे कुठलाही संवाद फार गरजेचा उरत नाही, कारण जागाच बोलते.

जो उंबरठा एरवी घरपणाचं, आपलेपणाचं प्रतीक असतो, तोच आता ओळखीच्या (आयडेंटिटी) नाशाची जागा बनतो. संवादांपेक्षा इथे शरीराची भाषा, चेहऱ्यावरचा गोंधळ आणि लाज हेच सगळं सांगून जातात.

मुक्ता बर्वे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुक्ता बर्वे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

उपेंद्र लिमये यांनी या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. भूमिकेतले बारकावे समजून घेण्यासाठी ते प्रत्यक्ष एका जोगत्यासोबत काही दिवस राहिले होते, असं नोंदवलं गेलेलं आहे.

छायाचित्रकार संजय जाधव यांनी हा 'रॉ' अंगावर येणारा भवताल पडद्यावर आणताना कुठेही तो सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

गावातल्या धुळीने माखलेल्या वाटा, देवळाच्या गाभाऱ्यातला अंधुक उजेड, जत्रेतल्या गर्दीचा कोलाहल हे सगळं जसंच्या तसं टिपलं गेलं आहे. हा रखरखीतपणा आणि सौंदर्य एकाच वेळी पडद्यावर दिसणं, हेच या चित्रपटाच्या दृश्यभाषेचं वैशिष्ट्य आहे.

आरशाचा किंवा प्रतिबिंबाचा वापर मराठी समांतर सिनेमातलं एक सुपरिचित रूपक आहे. 'जोगवा'तही तायप्पाला साडी नेसवल्यानंतरचा त्याचा स्वतःकडे पाहण्याचा प्रसंग याच परंपरेत बसतो.

आरशातलं प्रतिबिंब आणि आतलं खरं स्वत्व यांच्यातली दरी, हीच या चित्रपटाची खरी शोकांतिका आहे.

लल्लाटी भंडार आणि जीव रंगला

अजय-अतुल यांचं संगीत आणि संजय पाटील यांची गीतं चित्रपटाच्या भावनिक गाभ्याला अधिक खोली देतात. 'लल्लाटी भंडार' हे जागर-शैलीतलं गाणं चित्रपटात वारंवार वापरलं जातं.

देवीच्या स्तुतीत गायलं जाणारं हे गाणं जितकं ऐकायला मोहक आहे, तितकंच ते अस्वस्थ करणारंही आहे, कारण त्याची चित्रपटातील पुनरावृत्ती जोगत्या-जोगतिणींच्या नित्यनेमाने चाललेल्या, शरणागत आयुष्याचं प्रतीक बनते.

देवीचं स्तवन गात राहणं हेच त्यांचं प्राक्तन आहे, त्यातून सुटका नाही, हे या गाण्याच्या पुनरावृत्तीतून सूचित होत राहतं.

याच्या अगदी विरुद्ध टोकावर आहे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'जीव रंगला' हे गाणं. हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातलं हे गाणं तायप्पा आणि सुली यांच्या मनातल्या खऱ्या ओळखीच्या, खऱ्या प्रेमाच्या क्षणी येतं.

'लल्लाटी भंडार' शरणागतीचं गाणं आहे, तर 'जीव रंगला' आत्मस्वीकाराचं गाणं आहे. या दोन गाण्यांमधला भावनिक विरोधाभासच जणू चित्रपटाच्या दोन ध्रुवांना, म्हणजे लादलेली ओळख आणि खरी ओळख यांना, संगीतातून मांडतो.

काय निसटलं?

'जोगवा'चं कौतुक करताना त्याच्या मर्यादा नजरेआड करणं प्रामाणिकपणाचं ठरणार नाही. साधना साप्ताहिकातल्या विनोद शिरसाट यांच्या परीक्षणात एक महत्त्वाचा मुद्दा येतो.

ते अरुण टिकेकर यांच्या एका निरीक्षणाचा दाखला देतात, तो म्हणजे हिंदी चित्रपटात प्रश्न बरोबर मांडलेले असतात, पण उत्तरं मात्र चुकीची काढलेली असतात, असं टिकेकर म्हणत असत.

'जोगवा'चा शेवट पाहतानाही असंच काहीसं जाणवतं, असं शिरसाट नोंदवतात. तायप्पा आणि सुली शेवटी बंड करून एकत्र येतात, हा शेवट आशादायी वाटतो खरा, पण तो किती वास्तववादी आहे हा प्रश्न उरतोच.

शिवाय आधी उल्लेख केलेला एक सैद्धांतिक मुद्दाही इथे परत आणावासा वाटतो. चित्रपट तायप्पाची सुटका त्याच्या 'मूळ' पुरुषत्वाकडे परत नेऊनच दाखवतो.

स्त्रीत्व स्वीकारणं हे इथे कायमच एक दुःस्वप्न, एक शिक्षा म्हणून चितारलं जातं, त्यातून कधीही सकारात्मक अर्थ निघत नाही. यामुळे चित्रपट धार्मिक जबरदस्तीवर टीका करतो, पण त्याच वेळी लिंगभावाच्या तरलतेबद्दल फारसं खोलात जाऊन बोलत नाही, ही एक खरी मर्यादा आहे.

ही टीका चित्रपटाचं महत्त्व कमी करत नाही, उलट त्याला अधिक नेमकेपणाने समजून घेण्यास मदत करते.

जोगवा चित्रपटात उपेंद्र लिमये मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जोगवा चित्रपटात उपेंद्र लिमये मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

'जोगवा' परिपूर्ण चित्रपट नाही. त्याचा शेवट काहीसा सुटसुटीत वाटतो आणि तृतीयपंथीय अस्तित्वाकडे पाहण्याची त्याची चौकट आजच्या भाषेत बोलायचं झालं तर मर्यादित आहे. पण म्हणूनच त्याचं धाडस अधिक ठळकपणे समोर येतं.

2009 साली, जेव्हा या विषयावर बोलायला भाषाही नीट घडलेली नव्हती, तेव्हा एका खेड्यातल्या दोन उपेक्षित जिवांची गोष्ट सांगत राजीव पाटील यांनी धर्म, गरिबी आणि लिंगओळख यांच्या गुंत्याला थेट भिडण्याचं धाडस दाखवलं.

तायप्पाचं दुःख हे कुठल्याही तात्त्विक चौकटीत बसवण्याआधीचं, अगदी कच्चं, थेट दुःख आहे आणि तेच या चित्रपटाला आजही पाहण्यालायक बनवतं.

काळाच्या किती पुढे आणि किती मागे? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच वेळी देणारा 'जोगवा' हा त्या अर्थाने खराखुरा अस्वस्थ करणारा चित्रपट आहे.

संदर्भसूची

2.पाटील, राजीव. मुलाखत. 'जोगवा'ची तळमळ लोकांपर्यंत पोहोचावी. Webdunia Marathi.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन