IPL 2026 फायनल आज, शुभमन गिलच्या अहमदाबाद कनेक्शनमुळे विराटच्या टीमसमोर असेल आव्हान

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलची अहमदाबादमधील कामगिरी प्रभावी आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलची अहमदाबादमधील कामगिरी प्रभावी आहे.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल 2026 च्या विजेतेपदासाठीचा अंतिम सामना थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन्ही संघांनी यापूर्वी एकदा आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे.

पण गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाज शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात खेळणार आहे. हे त्यांचं घरचं मैदान असल्यामुळे संघ आणि कर्णधार गिल या दोघांकडूनही मोठ्या अपेक्षा असतील.

दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील धर्मशालात झालेल्या पहिल्या प्ले-ऑफ सामन्यात गुजरात टायटन्सला 92 धावांनी पराभूत करून थेट अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ उत्साहात आहे.

पण गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला हरवून अतिशय दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. शिवाय कर्णधार शुभमन गिलचा अहमदाबादमधील विक्रम हे आरसीबीसाठी आव्हान ठरू शकतं.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, गिलने आतापर्यंत टी-20 सामन्यांमध्ये 6134 धावा केल्या आहेत. त्यापैकी 1500 धावा अहमदाबादच्या याच मैदानावर केल्या आहेत.

त्याने या धावा 53.57 च्या सरासरीने आणि 165.56 च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. त्याची आतापर्यंतची कारकिर्दीची सरासरी 37.86 आणि स्ट्राइक रेट 141.33 आहे.

शुभमन गिलकडे नजरा

अंतिम सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना शुभमन गिल म्हणाला की, "खरं तर मी अपेक्षांच्या ओझ्याचा माझ्यावर फार परिणाम होऊ देत नाही. इथे खेळण्याचा फायदा म्हणजे आम्हाला खेळपट्टी आणि मैदानाची चांगली माहिती आहे. इथे जिंकण्यासाठी कोणत्या प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल, हे आम्हाला माहीत आहे."

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने म्हटले आहे की, तो अपेक्षांचं ओझं स्वत:वर घेत नाही.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने म्हटले आहे की, तो अपेक्षांचं ओझं स्वत:वर घेत नाही.

शुभमन गिल शिवाय साई सुदर्शनवर गुजरात टायटन्सला सामना जिंकून देण्याची जबाबदारी असेल, तर जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. राहुल तेवतिया, जेसन होल्डर आणि रशीद खान मधली आणि खालची फळी मजबूत करतील.

गोलंदाजीत कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि राशिद खान यांच्यावर मदार असेल.

आरसीबीसाठी कोहलीचे महत्त्व

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सूत्रे रजत पाटीदार यांच्या हातात असली तरी या संघाचा सर्वात मोठा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आहे.

गेल्यावर्षी पंजाब किंग्सविरुद्ध त्यानं खेळलेल्या शानदार खेळीनं हा मोठ्या सामन्यांसाठी योग्य फलंदाज असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं. दबाव सहजतेनं हाताळण्याच्या त्याच्या अनुभवामुळं तो आरसीबीसाठी खास ठरतो.

विराट कोहली स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 10 फलंदाजांमध्ये आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विराट कोहली स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 10 फलंदाजांमध्ये आहे.

कोहलीनं आरसीबीकडून आयपीएलचे सर्व अंतिम सामने खेळले आहेत. शिवाय आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारही त्याच्या आक्रमक फलंदाजीने कधीही सामन्याचे चित्र पालटू शकतो.

त्याने धरमशाला येथे गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 33 चेंडूंमध्ये 93 धावा केल्या होत्या.

आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो रबाडापेक्षा फक्त दोन विकेट्सने मागे आहे.

आरसीबीकडे देवदत्त पडिक्कल हा भरवशाचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाजही आहे. मधल्या आणि खालच्या फळीत कृणाल पांड्या, टिम डेव्हिड आणि जितेश शर्मा यांच्यासारखे चांगले फलंदाज आहेत.

अंतिम सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अंतिम सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल.

आरसीबी इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

रजत पाटीदारच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ आज इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यांनी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला हरवले, तर ते चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यानंतर आयपीएल विजेतेपद यशस्वीपणे राखणारा तिसरा संघ ठरतील.

दुसरीकडं, गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला, स्पर्धेतला चौथा सर्वात यशस्वी संघ बनण्याची संधी मिळेल.

अंतिम सामन्यात गुजरातसमोरील सर्वात मोठं आव्हान भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या नव्या चेंडूने होणाऱ्या गोलंदाजीचा सामना करणे हे असेल.

आरसीबीकडे बाँलिंग कॉम्बिनेशन उत्तम आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, आरसीबीकडे बाँलिंग कॉम्बिनेशन उत्तम आहे.

शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने सुरुवातीचा दबाव यशस्वीपणे पेलला, तर नंतर त्यांची फलंदाजी सोपी होईल. त्यांनी राजस्थानविरुद्ध असेच करून दाखवले होते.

अंतिम सामन्यापूर्वी आरसीबीला तीन दिवसांची विश्रांती मिळाली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, ही स्पर्धेतील सर्वात मजबूत फलंदाजी फळी आहे. आरसीबीने या हंगामात नऊ वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या असून दोनदा 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

विशेष म्हणजे, स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 10 फलंदाजांमध्ये संघातील केवळ विराट कोहलीचा समावेश आहे.

हा सामना अशा मैदानावर खेळला जात आहे, जिथे दोन्ही संघांच्या सुवर्ण आठवणी जोडलेल्या आहेत. गुजरात टायटन्सने 2022 मध्ये इथंच पहिलं आयपीएल विजेतेपद पटकावलं, तर आरसीबीनं गेल्या वर्षी याच मैदानावर विजेतेपदाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)