गोलंदाजांना न जुमानणाऱ्या वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, ख्रिस गेलचा दीर्घकाळाचा विक्रमही मोडला

वैभव सूर्यवंशीच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, वैभव सूर्यवंशीच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    • Author, विमल कुमार
    • Role, क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये बिहारची फारशी चर्चा होत नव्हती. पण वैभव सूर्यवंशीमुळे हे चित्र आता पूर्णपणे बदललं आहे.

'एक बिहारी, सब पर भारी' असं म्हटलं जातं आणि वैभव सूर्यवंशी हा याचं एक उत्तम उदाहरण ठरत आहे.

वैभव सूर्यवंशीच्या रूपाने बिहारमधील एक विलक्षण प्रतिभा आता देशातच नाही तर जगभरातही नाव कमावत आहे. वैभवला पाहून अनेकांना किशोरावस्थेतील सचिन तेंडुलकरची आठवण होत आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे वैभवचा आदर्श सचिन तेंडुलकर किंवा धोनी नाही, तर ब्रायन लारा हा आहे. विशेष म्हणजे, वैभवचा जन्म होण्यापूर्वीच लारा निवृत्त झाला होता.

बुधवारी (28 मे) रात्री आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सूर्यवंशीने अनेक विक्रम केले. परंतु, त्यातील एक खास विक्रम म्हणजे त्याने एका हंगामात सर्वाधिक 59 षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा सुमारे दशकाहून अधिक काळ टिकून राहिलेला विक्रम मोडला.

वैभव सूर्यवंशीच्या नावावर सध्या एका हंगामात 65 सिक्सर आहेत. वैभवच्या खेळावर ख्रिस गेलने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की वैभव हा नवे सिक्स मशीन आहे.

सूर्यवंशीच्या 97 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 8 बाद 243 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिग्गज फलंदाजांनी भरलेल्या सनरायझर्स हैदराबादचा संघ 19.2 षटकांत 196 धावांवर संपुष्टात आला.

राजस्थान रॉयल्सने हैदराबादवर 47 धावांनी विजय मिळवला.

अनेक विक्रमांची नोंद

अवघ्या तीन धावांनी आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतक करण्यापासून सूर्यवंशी दूर राहिला. या खेळीनंतर त्याच्या नावावर 680 आहेत. या हंगामात सर्वाधिक धावा करण्यासाठी ऑरेंज कॅप सध्या त्याच्या नावावर आहे. त्याचा स्ट्राइक रेटही सुमारे 250 इतका आहे.

आयपीएल प्ले-ऑफमध्ये त्याच्यापेक्षा वेगवान अर्धशतक (16 चेंडूंत) आजपर्यंत कुणीही केलेलं नाही. इतकंच नाही तर एका सामन्यात 10 पेक्षा जास्त षटकार मारण्याचा पराक्रम त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 4 वेळा केला आहे.

अशा परिस्थितीत भारतीय निवडकर्त्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे, आयर्लंड दौऱ्यासाठी वैभवची निवड न करण्याचं आता कारण काय असेल?

सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.

आयपीएलच्या सुरुवातीला माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने भावनेच्या आहारी जाऊ नका, वैभवने आधी एक हंगाम प्रथमश्रेणी क्रिकेट खेळायला हवं. सर्वांना धीर धरावा लागेल... असं म्हटलं होतं.

परंतु, आयपीएलदरम्यानच अश्विनने आपलं मत बदललं आणि हा मुलगा टी-20 संघात जागा मिळवण्यास पात्र असल्याचं सांगितलं.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या धडाकेबाज खेळीनंतर अश्विन म्हणाला, "आपण केवळ एकाच फॉरमॅटमधील निवडीबद्दल का बोलत आहोत?"

"वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात निवडलं नाही म्हणून अजित आगरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कदाचित कोणी सुप्रीम कोर्टात घेऊन जाऊ नये!"

टीका करणारेही झाले चाहते

पण वैभवने सध्याच्या यशाच्या उत्साहात हे विसरून चालणार नाही की, काही महिन्यांपूर्वीपर्यंत अनेक जण त्याच्या वयावरून प्रश्न उपस्थित करत होते.

पण आजही प्रत्येक सामन्यानंतर त्याचं बोलणं आणि वागणं पाहिलं, तर तो खरंच केवळ 15 वर्षांचा मुलगा असल्यासारखाच वाटतो.

पण, हाच मुलगा हातात बॅट घेताच 29 चेंडूंमध्ये 12 षटकार ठोकतो. वैभवच्या बोलण्यातही आज तोच निरागपणा दिसतो, जो एकेकाळी सुरुवातीच्या काळातील सचिन तेंडुलकरमध्ये दिसायचा.

ग्राफिक्स

सचिनने कमी वयात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जशी परिपक्वता दाखवली होती, तशीच परिपक्वता वैभव आता आयपीएल आणि अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये दाखवत आहे.

फरक इतकाच आहे की, सचिन तेंडुलकर मुंबईसारख्या क्रिकेटची संस्कृती असलेल्या ठिकाणाहून आला, जिथे त्याला गावसकर-वेंगसरकरसारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन मिळालं.

तर वैभव बिहारमधील ताजपूर (समस्तीपूर) या छोट्याशा गावातून आला, जिथे जिल्हास्तरीय क्रिकेट खेळणारे आदर्शही फारसे नव्हते.

राजस्थानची भेदक गोलंदाजी

सूर्यवंशीसोबतच ध्रुव जुरेलनेही अवघ्या 21 चेंडूंत अर्धशतक झळकावलं. पण शेवटच्या षटकांमध्ये सनरायझर्सच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत राजस्थानला 250 धावांच्या आत रोखलं, हाच त्यांना थोडासा दिलासा मिळाला असेल.

दुसऱ्या विकेटसाठी ईशान किशन आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने अवघ्या 15 चेंडूंत 51 धावांची भागीदारी केली, त्यावेळी सामना रंगतदार होईल असं वाटत होतं. परंतु, त्यानंतर सनरायझर्सच्या विकेट एकापाठोपाठ पडू लागल्या आणि सातव्या षटकांत संघाची अवस्था 5 बाद 81 अशी झाली.

जोफ्रा आर्चरने चार षटकांत 58 धावा दिल्या. इतर कोणत्याही दिवशी हे आकडे साधारण वाटले असते, पण याच स्पेलमध्ये त्याने अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि ट्रेव्हिस हेड असे तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. हे तिघेही हैदराबादच्या फलंदाजीचे आधार आहेत.

ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नितीश कुमार रेड्डी आणि सलील अरोराने आक्रमक फलंदाजी करत सामना पुन्हा रंगतदार करण्याचा प्रयत्न केला. ते दोघे मैदानात असताना लक्ष्य गाठण्यासाठी लागणारी धावगतीही नियंत्रणात असल्याची दिसत होती.

याच वेळी रवीद्र जडेजाची मैदानात एंट्री झाली. त्याने 3 षटकांत केवळ 21 धावा देत रेड्डी आणि अरोरा जोडीला बाद केलं.

47 धावांच्या या विजयामुळे राजस्थान रॉयल्सचा आत्मविश्वास वाढला असून, गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर-2 सामन्यासाठी संघ मजबूत दावेदार मानला जात आहे.

या विजयासह राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत जाण्यासाठी त्यांच्यासमोर गुजरात टायटन्सचं आव्हान असेल. दोन्ही संघ शुक्रवारी (29 मे) न्यू चंदीगड येथे आमनेसामने येणार आहेत.

राजस्थान रॉयल्सचा संघ मोठ्या संघर्षानंतर आणि थोड्या नशिबाच्या जोरावर चौथ्या संघाच्या रूपात प्ले-ऑफमध्ये पोहोचला. परंतु, त्यांच्या प्रमुख खेळाडूंनी ज्या पद्धतीने जबरदस्त कामगिरी केली आहे, त्यावरून 2008 नंतर हा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.