मेस्सीला कुठं ठाऊक होतं, हेच पोरगं उद्या त्याच्यासमोर शड्डू ठोकेल; लामिन यमालच्या 'त्या' फोटोची गोष्ट

लामिन यमाल

फोटो स्रोत, Joan Monfort/AP

फोटो कॅप्शन, 2007 मधील एका फोटोमध्ये मेस्सी आणि त्याच्या हातात चिमुकला यमाल.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

2007 सालची ही गोष्ट आहे. एका चॅरिटी कॅलेंडरच्या फोटोशूटसाठी बार्सिलोनामधील 'कॅम्प नोऊ' स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये लिओनेल मेस्सीनं एका बाळासोबत फोटो काढले होते.

तेव्हा मेस्सी अवघ्या 20 वर्षांचा होता. नुकतंच त्याचं नाव जागतिक पटलावर झळकू लागलं होतं आणि तो येत्या काळातील फुटबॉलच्या जगतातील उगवता सूर्य असणार आहे, हेदेखील स्पष्ट होऊ लागलं होतं.

पण त्या फोटोग्राफरला याची पुसटशीही कल्पना नव्हती की, मेस्सीच्या हातात असलेलं हेच लहानगं बाळ येत्या काळात अगदी वयाच्या विशीच्या आतच मेस्सीच्या पावलावर पाऊल टाकत फुटबॉलच्या जगतात खळबळ उडवून देणार आहे.

मेस्सी ज्या बाळाला गोंजारत होता, ते बाळ म्हणजेच लामिन यमाल.

यमाल हा स्पेनचा तोच खेळाडू जो सध्या चर्चेत आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत स्पेनने फ्रान्सला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या यशात यमालचा मोठा वाटा आहे.

डॅलस स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात स्पेननं विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या फ्रान्सवर मात केली आहे.

आता काय योगायोग आहे पाहा? अर्जेंटिना विरूद्ध इंग्लंडच्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाचा संघ जिंकला तर मेस्सी आणि लामिन यमाल आमनेसामने येतील.

'दोन दिग्गजांची सुरुवात'

लामिन यमाल स्पेनसाठी एकही सामना हरलेला नाही. त्यानं विश्वचषक आणि युरो स्पर्धांमध्ये मिळून 12 सामन्यांमध्ये सुरुवातीपासून खेळ केला असून, त्या सर्वांमध्ये संघ विजयी ठरला आहे. सुरुवातीपासून खेळताना या दोन स्पर्धांमध्ये कोणत्याही युरोपियन खेळाडूची ही सर्वोत्तम 100% विजयाची सरासरी आहे.

लामिन यमालने 2024 ला युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये देखील आपल्या चमकदार कामगिरीनं धुमाकूळ घातला होता.

लामिन यमाल

फोटो स्रोत, Kaz Photography/Getty Images

तेव्हा त्याचं वय धड 17 वर्षेही पूर्ण नव्हतं. तेव्हा तो 16 वर्षे आणि 362 दिवसांचा होता. म्हणजेच, 17 वर्षे वय पूर्ण व्हायला अगदी काही तास बाकी. इतकं वय असताना केलेल्या या गोलमुळे, स्पर्धेच्या इतिहासात गोल करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला.

तेव्हाही मेस्सी आणि यमाल यांचा हा बराच काळ विस्मृतीत गेलेला फोटो पुन्हा चर्चेत आला होता.

तेव्हा यमालच्या वडिलांनी इन्स्टाग्रामवर तो फोटो पोस्ट करून त्यासोबत 'दोन दिग्गजांची सुरुवात' (The beginning of two legends) असं कॅप्शन लिहिलेलं होतं.

काय आहे फोटोचा इतिहास?

हे फोटो जोन मॉनफोर्ट यांनी काढले होते. ते 'असोसिएटेड प्रेस'साठी फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करतात.

तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, लामिनचे कुटुंब राहत असलेल्या 'मातारो' शहरात युनिसेफनं एका रॅफलचे (लकी ड्रॉचं) आयोजन केलं होतं आणि त्यानंतरच ही फोटोग्राफी झाली होती.

"त्यांनी 'कॅम्प नोऊ' इथे 'बार्सा'च्या खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठी एका लकी ड्रॉमध्ये सहभाग नोंदवला होता आणि ते त्यात विजयी झाले," असं मॉनफोर्ट यांनी 'असोसिएटेड प्रेस'ला सांगितलं.

हे काम काहीसं आव्हानात्मक होतं, असंही त्यांनी सांगितलं.

लामिन यमाल

फोटो स्रोत, Joan Monfort/AP

"मेस्सी हा तसा अंतर्मुख आणि लाजाळू स्वभावाचा माणूस आहे," असं ते म्हणाले.

"तो लॉकर रूममधून बाहेर येत होता आणि अचानक त्याला स्वतःला एका वेगळ्याच लॉकर रूममध्ये पाहावं लागलं, जिथे पाण्याने भरलेला एक प्लास्टिकचा टब होता आणि त्यात एक बाळ होतं.

ही परिस्थिती जरा गुंतागुंतीची होती. सुरुवातीला तर त्याला त्या बाळाला कसं पकडावं, हेही समजत नव्हतं."

मेस्सीप्रमाणेच यमालनेही बार्सिलोनासाठी खेळण्यास सुरुवात केली. तिथे तो या क्लबच्या इतिहासातील सुरुवातीच्या फळीत खेळणारा आणि गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. तसेच, स्पॅनिश लीगमध्ये गोल करणारा सर्वात तरुण खेळाडूही बनला.

मॉनफोर्ट यांनी 2024 साली हा फोटो व्हायरल झाल्यावर सांगितलं की, जेव्हा हा फोटो ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागला, तेव्हाच त्यांना समजलं की त्या फोटोतील बाळ म्हणजे यमाल होता.

"एखाद्या अशा गोष्टीशी जोडलं जाणं खूपच रोमांचक आहे, जिने इतकी मोठी खळबळ उडवून दिली आहे," असंही ते म्हणाले.

"खरं सांगायचं तर, ही खूप छान भावना आहे," असंही ते म्हणाले होते.

'लामिन स्टार होणार हे माहिती होतं'

लामिनच्या पालकांनीही अफ्रिकेतून स्थलांतर केलं आहे.

त्याचे वडील मोनिर नारसॉई यांचा जन्म मोरोक्कोमध्ये झाला. तर त्याची आई शीला इबाना या ग्विना देशातील आहेत. ते बार्सिलोनाच्या बाहेरील भागात राहिले.

"ज्या क्षणी तो जन्माला आला तेव्हाच आम्हाला माहिती होतं की तो स्टार होणार आहे," असं त्याच्या वडिलांनी पत्रकारांना 2024 साली युरो कपच्या अंतिम फेरीच्या आधी अभिमानानं सांगितलं होतं.

लामिन यमाल

फोटो स्रोत, Reuters

तो लहान होता तेव्हाच तो फुटबॉलमधील सार्वकालिक श्रेष्ठ खेळाडू लिओनेल मेस्सीला भेटला होता. अर्जेंटिनाचा हा खेळाडू तेव्हा फक्त वीस वर्षांचा होता आणि युनिसेफच्या एका कार्यक्रमाला आला होता. बार्सिलोना फुटबॉल क्लबमध्ये त्याने लामिनबरोबर फोटो काढला होता.

"हा त्याच्या आयुष्यातला योगायोग आहे की, त्याने लामिनला आशीर्वाद दिला," असं लामिनचे वडील मिश्कील पद्धतीने सांगतात.

आता जर फायनलमध्ये अर्जेंटिना आणि स्पेन आमने-सामने आले तर मेस्सी आणि यमालही एकमेकांसमोर असतील. जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांसाठी तो क्षण जेवढा खास असेल तेवढात तो यमालसाठीही खास असणार.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)