महाराष्ट्रात मान्सूनच्या स्थितीबाबत हवामान विभागाने काय सांगितलं? कोणत्या जिल्ह्यांना मिळालाय अलर्ट?

रिक्षा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

मान्सून आज पुढे सरकलाय, पण त्यानं आज महाराष्ट्रात आगेकूच केलेली नाही. नैऋत्य मोसमी वारे कुठे पोहोचले आहेत, महाराष्ट्रात पावसाची किती शक्यता आहे आणि कोणत्या जिल्ह्यांत उद्या यलो अलर्ट आहे, जाणून घेऊयात.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशात तसंच पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही आगेकूच केली आहे. पण महाराष्ट्रात अजूनही मान्सून हर्णे आणि सोलापूरच्या पुढे सरकलेला नाही.

पुढच्या दोन तीन दिवसांत मान्सून इथे आगेकूच करू शकतो, त्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.

दरम्यान, मान्सून सध्या अगदी संथगतीनं वाटचाल करत असून मुंबईसह कोकणात पुढच्या आठवड्यातही पावसात चढउतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे, असं ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी नमूद केलं आहे.

सध्या महाराष्ट्रावर तुरळक ठिकाणी ढगांचं विरळ आवरण दिसून येतंय.

पुढच्या 24 ते 48 तासांत कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यातील अंतर्गत भागात मात्र थंडरस्टॉर्म्स येतील, म्हणजेच वीजा, गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मान्सून

फोटो स्रोत, Getty Images

मान्सूनचं आगमन लांबल्यानं उत्तर कोकणात तसंच विदर्भातही उष्णतेचा तडाखा जाणवतो आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 42 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. नागपूर आणि गडचिरोली परिसरात पारा 45 अंशांवरही जाऊ शकतो. तर किनारी भागात, तापमान घटलं असलं तरी दमट हवेमुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

किनारी प्रदेशांत आणि विदर्भातील अनेक ठिकाणी रात्रीचं किमान तापमानही 30 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे.

मान्सून

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळेच 11 जूनच्या रात्रीसाठी पालघर, मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानासाठी तर नाशिक आणि पुण्याचा पठारी प्रदेश, अहिल्यानगर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, धाराशीव, लातूर, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इथे वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे.

12 जून रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये उष्ण व दमट हवामानासठी तर नाशिक आणि पुण्याचा पठारी भाग, अहिल्यानगर आणि चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट दिला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.