फिफा 2026 : फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारतीय वंशाच्या या 4 खेळाडूंवर असेल चाहत्यांची नजर

फोटो स्रोत, Getty Images
फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताच्या सीनियर टीमला खेळताना पाहणं, हे भारतीय फुटबॉल प्रेमींचं स्वप्न यावेळीही पूर्ण होणार नाही. पण यंदा विश्वचषकात काही भारतीय वंशाचे खेळाडू खेळणार आहेत.
11 जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडा मिळून करत आहेत आणि त्यात यंदा तब्बल 48 देश खेळणार आहेत.
यातल्या चार देशांच्या टीम्समध्ये चार भारतीय वंशाचे फुटबॉलपटू खेळताना दिसतील.
याआधी 2006 सालच्या विश्वचषकात विकास धोरासू या भारतीय वंशाच्या खेळाडूनं फ्रान्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. पण त्याला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये लक्षणीय कामगिरी बजावता आली नही.
आता वीस वर्षांनंतर सरप्रीत सिंग (न्यूझीलंड), निशान वेलुपिल्ले (ऑस्ट्रेलिया), तहसिन मोहम्मद (कतार) आणि सॅम्युएल मुथूसामी (डी.आर. काँगो) या चौघांच्या कामगिरीवर भारतीय चाहत्यांची नजर राहील.
सरप्रीत सिंग – न्यूझीलंड
ऑकलंडमध्ये 1999 साली जन्मलेला सरप्रीत न्यूझीलंडच्या फुटबॉल टीममधला मिडफिल्डर आहे.
सरप्रीत सिंगच्या आई-वडिलांनी पंजाबमधून न्यूझीलंडला स्थलांतर केलं होतं. त्याला मोठा भाऊ आणि बहीणही आहे. हे कुटुंब न्यूझीलंडमध्ये एक किराणा दुकान चालवायचं.
सरप्रीत लहानपणी इतर अनेक खेळ खेळायचा, पण फुटबॉल हे त्याचं पहिलं प्रेम होतं. 2015 साली सोळा वर्षांच्या वयात त्यानं वेलिंग्टन फिनिक्स फुटबॉल क्लबच्या सीनियर संघात पदार्पण केलं.

फोटो स्रोत, Getty Images
2018 साली मुंबईत झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये त्याला न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघासाठी पदार्पणाची संधी मिळाली. त्या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमनं सुनील छेत्रीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघावर 2-1 मात केली होती. त्या दोन्ही गोल्ससाठी सरप्रीतची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
वर्षभरानं अंडर-20 वर्ल्ड कपमध्येही त्यानं चमकदार कामगिरी बजावली आणि जर्मनीच्या बायर्न म्युनिक क्लबचं लक्ष वेधून घेतलं. लवकरच त्याला बायर्न म्युनिककडून बुंडेसलिगा या जर्मनीतील सर्वात महत्त्वाच्या फुटबॉल लीगमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.
सरप्रीत हा बुंडेसलिगामध्ये खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरला. त्यानंतर युरोपातील इतर काही क्लब्जचं त्यानं प्रतिनिधित्व केलं.
27 वर्षांचा सरप्रीत न्यूझीलंडसाठी आजवर 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे आणि त्याच्या खात्यात तीन गोल्स जमा आहेत. तर क्लब फुटबॉलमध्ये त्याच्या खात्यात 34 गोल्स आहेत.
तहसीन मोहम्मद जमशिद – कतार
19 वर्षांचा तहसीन मोहम्मद एक विंगर म्हणून यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कतारचं प्रतिनिधित्व करणार आहे.
तहसीनचे वडील जमशिद मूळचे केरळच्या थलासरीचे तर आई श्यामा वालापट्टणमच्या. म्हणजे दोघंही कण्णूर जिल्ह्याचे रहिवासी. पण 2006 पासून ते कतारला राहतात.

फोटो स्रोत, Getty Images
जमशिद आधी कालिकत विद्यापीठाकडून फुटबॉल खेळायचे. आपल्या मुलाच्या फुटबॉल प्रशिक्षणातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
कतारमधल्या अॅस्पायर अॅकॅडमीत घडलेल्या तहसीनला लहान वयातच अल दुहैल क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली आणि लवकरच राष्ट्रीय संघातही स्थान मिळालं.
2026 च्या विश्वचषकाच्या पात्रता फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यातून त्यानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलं.
त्याआधी 2024 साली वर्लड्ड कप पात्रता स्पर्धेत दोहा इथे झालेल्या वादग्रस्त सामन्यातही तो खेळला होता. कतारनं त्या लढतीत भारताला 2-1 असं हरवलं होतं, पण रेफ्रींच्या निर्णयावर टीकाही झाली.
16 जूनला तहसीन वीस वर्षांचा होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं अजून गोल्सचं खातं उघडलेलं नाही.
निशान वेलुपिल्ले – ऑस्ट्रेलिया
25 वर्षीय निशान वेलुपिल्लेची आई अँग्लो-इंडियन तर वडील श्रीलंकन वंशाचे मलेशियन आहेत. तो मेलबर्नमध्ये लहानाचा मोठा झाला.
क्लब फुटबॉलमध्ये मेलबर्न व्हिक्टरी टीमकडून खेळणारा निशान ऑस्ट्रेलियन फुटबॉल टीमचा, म्हणजे 'सॉकरूज'चा आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
2024 साली त्याला चीनविरुद्ध वर्ल्ड कप पात्रता सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानं पहिला आंतरराष्ट्रीय गोलंही केला.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्यानं आजवर सात सामन्यांत मिळून 3 गोल्स केले आहेत.
सॅम्युएल मुथूसामी – डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो
फ्रान्सच्या पॅरीसमध्ये जन्मलेल्या सॅम्युएल मुथुसामीचे वडील भारतीय तामिळ वंशाचे आणि ग्वाडालूप या कॅरेबियन देशातले तर आई मूळची काँगोची आहे.

फोटो स्रोत, Getty Images
फिफाच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूचे जन्मदाते आई-वडील किंवा आजी-आजोबा ज्या देशाचे आहेत, त्या देशाचं प्रतिनिधित्व त्या खेळाडूला करता येतं. अर्थात, त्यासाठी त्या देशाचा पासपोर्ट त्या खेळाडूकडे असावा लागतो.
2019 पासून सॅम्युएल मुथूसामी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचं प्रतिनिधित्व करतो आहे. आजवर तो 57 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
त्याच्या खात्यात एकही आंतरराष्ट्रीय गोल नसला, तरी क्लब फुटबॉलमधले 14 गोल्स जमा आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























