ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी

कुमार सप्तर्षी

फोटो स्रोत, Facebook

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी विचारवंत, युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि 'सत्याग्रही' मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांचं आज (18 जुलै) पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते.

दीर्घ आजारपणामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचे अंत्यदर्शन सोमवारी (20 जुलै ) सकाळी 10 ते 12 या वेळेत गांधी भवन, कोथरूड येथे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. कुमार सप्तर्षी हे समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते होते. समाज परिवर्तनाची चळवळ उभारण्यात त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांसाठी त्यांनी कायम लढा दिला.

'युक्रांद'च्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली. कुमार सप्तर्षी त्यांनी 'सत्याग्रही' मासिकाचे संपादक म्हणूनही काम पाहिलं.

मार्च 1973 मध्ये कुमार सप्तर्षी यांनी पुरीच्या शंकराचार्यांच्या विरोधात जाहीर वादविवाद केला होता. तेव्हा त्याचे देशभरात पडसाद पडले होते.

कुमार सप्तर्षी कोण होते?

कुमार सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला. बी. एससी नंतर पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं.

कुमार सप्तर्षी यांनी वैद्यकीय शिक्षणानंतर डिसेंबर 1969 मध्ये सुरू केलेला पुण्यातील दवाखाना 1974 साली बंद केला आणि 'राशीन कम्युन'मध्ये आणीबाणी जाहीर होईपर्यंत मुक्कामी राहिले. या काळात ते रोज पदयात्रा करत.

नोव्हेंबर 1967 मध्ये त्यांनी युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून डॉ. सप्तर्षींनी राज्यातील तरुणांना विविध चळवळींच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी लढण्याची नवी दिशा दिली.

कुमार सप्तर्श्री

फोटो स्रोत, Facebook

कुमार सप्तर्षी यांनी 9 ऑगस्ट 1977 रोजी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात प्रवेश केला. यानंतर ते जनता पक्षातर्फे 1978 मध्ये तत्कालीन अहमदनगर शहरातून आमदार म्हणून निवडून आले.

1980 ते 1985 या काळात ते तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील खेडनगर येथे मुक्कामी होते. येथे त्यांनी भारतीय समाज विकास व संशोधन संस्था या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त म्हणून काम केले.

त्यांनी 26 एकर पडीक जमिनीवर ग्रामीण विकास केंद्र स्थापन करून शेती, नर्सरी, लिंबोळी तेल वाटप, ससापालन गोपालन, संकरीत शेळीपालन, मत्स्यशेती, वनशेती असे अनेक प्रयोग केले.

शंकराचार्य-सप्तर्षी वाद

कुमार सप्तर्षी यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत या वादाविषयीची आठवण सांगितली होती.

त्यानुसार, 22 मार्च 1973 मध्ये पुण्याच्या 'केसरी' वृत्तपत्रात पुरीचे शंकराचार्य निरंजनदेव तीर्थ यांनी एक जाहीर आव्हान दिलं होतं.

"अस्पृश्यतेचं पालन करणं सोडून दिल्यामुळेच महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला आहे. परिवर्तनवादी लोकांना अस्पृश्यता पाळू नका म्हणून सांगतात. हा समतेचा विचार ईश्वराला व निसर्गाला मंजूर नाही. माझ्या या भूमिकेशी कुणाचा मतभेद असेल तर त्याच्याबरोबर मी 8 दिवस जाहीरपणे अखंड वादविवाद करण्यास तयार आहे", असा दावा शंकराचार्यांनी केला होता.

कुमार सप्तर्षी हे तेव्हा 31 वर्षांचे होते. आपल्या विचार-वर्तुळातील मित्रांशी चर्चा करून त्यांनी शंकराचार्यांचं हे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

कुमार सप्तर्षी आणि शंकराचार्य

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, कुमार सप्तर्षी आणि शंकराचार्य

शंकराचार्यांच्या या प्रतिगामी आणि वर्णद्वेषी भूमिकेला डॉ. कुमार सप्तर्षी यांनी थेट आव्हान दिले. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सप्तर्षींनी शंकराचार्यांशी 2 दिवस जाहीर व तार्किक वाद घातला.

या वादादरम्यान सप्तर्षी यांनी धर्माचा सखोल अभ्यास आणि तर्काच्या आधारे शंकराचार्यांचे युक्तिवाद खोडून काढले.

हा वाद केवळ एका चर्चेपुरता मर्यादित नव्हता, तर त्याने धर्म, परंपरा आणि मानवी हक्क यावर मोठा वैचारिक संघर्ष निर्माण केला होता. पुरीच्या शंकराचार्यांबरोबरचा हा वाद देशभर गाजला.

'गांधी विचारांचा एक सच्चा पाईक आपल्यातून निघून गेला'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी डॉ. सप्तर्षी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, 'युवक क्रांती दला'चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे".

"डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत."

कुमार सप्तर्श्री

फोटो स्रोत, Facebook/DrKumarSaptarshi

रोहित पवार पुढे लिहितात, "आज समाज एका विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना द्वेष, हिंसा, आर्थिक विषमता यासारख्या प्रवृत्ती बळावत असताना ग्रामीण विकासाचा, मानवतेचा आणि गांधीवादाचा विचार घेऊन चालणारे डॉ. कुमार सप्तर्षी सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्यातून जाणे ही मोठी हानी आहे."

"विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. त्यांच्या माध्यमातून गांधी विचारांचा एक सच्चा पाईक आपल्यातून निघून गेला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!"

सामाजिक व वैचारिक क्षेत्राची मोठी हानी - विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत डॉ. सप्तर्श्री यांना श्रद्धांजली वाहिली.

ते म्हणाले, "गांधीवादी विचारांचे निष्ठावंत पाईक, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, संस्थापक युवक क्रांती दल, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!"

"सत्य, अहिंसा, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांसाठी आयुष्यभर अविरत संघर्ष करणारे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, समाजवादी नेते आणि परिवर्तनवादी चळवळीचे प्रेरणास्थान डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने सामाजिक व वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे."

"सप्तर्षी परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो."

कुमार सप्तर्श्री

फोटो स्रोत, Facebook/DrKumarSaptarshi

पुरोगामी चळवळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला - सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. सप्तर्श्री यांना श्रद्धांजली वाहिली.

त्या म्हणाल्या, "'युक्रांद'चे संस्थापक, ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ कुमार सप्तर्षी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. डॉ सप्तर्षी यांनी आयुष्यभर प्रागतिक विचारांची पाठराखण केली. महात्मा गांधी स्मारक निधी ट्रस्टचे ते अध्यक्ष होते."

"ते काही काळ विधिमंडळाचे सदस्य देखील होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला. या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण सप्तर्षी कुटुंबियांसोबत आहोत. डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)