'आमच्या मनात संशय'; रुग्णालयाच्या अहवालावर सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली काय म्हणाल्या?

फोटो स्रोत, ANI/Getty Images
जंतर-मंतर येथे गेल्या 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.
या हेल्थ बुलेटिनवर सोनम यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो प्रतिक्रिया दिली आहे.
गीतांजली जे. अंगमो यांनी म्हटलं, "सफदरजंग रुग्णालयाच्या अहवालानुसार सोनम वांगचूक यांच्या पोटॅशियमची पातळी 2.9 आहे, तर काल (20 जुलै) ती 4.3 होती. ते आम्हाला सेकंड ओपिनियन घेण्यासाठी सोनम यांना दुसऱ्या लॅबमध्ये घेऊन जाण्याची परवानगी देत नाहीत किंवा आमच्या उपस्थितीत रक्ताचा नमुनाही देत नाहीत, जेणेकरून आम्ही तो इतरत्र तपासू शकू."
"मी गेल्या 3 तासांपासून वाट पाहत आहे, पण त्यांनी अजूनही आमचे ऐकलेले नाही. या पारदर्शकतेच्या अभावामुळे आमच्या मनात संशय निर्माण होत आहे. आम्ही त्यांना तात्काळ डिस्चार्ज देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून आम्ही त्यांना अशा रुग्णालयात घेऊन जाऊ शकू ज्यांच्यावर आम्हाला अधिक विश्वास आहे."
रुग्णालयाच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, सोनम वांगचूक यांनी सलाईन (ड्रिप) तसेच तोंडावाटे कोणत्याही प्रकारचे द्रवपदार्थ घेण्यास नकार दिला असल्याचं रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी जारी केलेल्या बुलेटिनमधून सांगण्यात आलं.
सफदरजंग रुग्णालयाने म्हटलं की, सोनम वांगचूक यांची नाडी, रक्तदाब आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी (ऑक्सिजन सॅच्युरेशन) स्थिर आहे. मात्र, त्यांच्या शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्याची (डिहायड्रेशन) लक्षणं आढळून आली आहेत.
त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवलं जात असून त्यांना योग्य वैद्यकीय समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
सोनम वांगचूक यांना जंतरमंतर येथून हलवून सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपण उपोषणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणा केली आहे.
'मी या क्षणापासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करत आहे', असं त्यांनी एक्सवर जाहीर केलं.
दरम्यान, जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनस्थळावरून आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
दुपारी अभिजीत दिपके यांच्यावर एका महिलेने शाई फेकल्याने आंदोलनस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अभिजीत दिपके उपस्थितांसमोर बोलत असताना अचानक ही घटना घडली.
शाई फेकल्यानंतर दिपके यांचे समर्थक तातडीने मंचाकडे धावले. त्यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळ आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्यावर निळ्या रंगाची शाई फेकण्यात आली होती.

फोटो स्रोत, Video Grab
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, या घटनेनंतर जंतर-मंतरवरील कार्यक्रम काही काळासाठी थांबवण्यात आला.
या प्रकारानंतर अभिजीत दिपके यांनी निळ्या शाईला उद्देशून एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "निळा हा माझा रंग आहे, जय भीम!"
सोनम वांगचूक यांना जंतरमंतर येथून हटवल्यावर राहुल गांधी काय म्हणाले?
या प्रकरणावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, "मोदी सरकारच्या मुख्य तत्त्वांमध्ये असत्य आणि हिंसा यांचा समावेश आहे. सोनम वांगचूक जी अहिंसक उपोषणावर असताना त्यांना जंतरमंतरवरून हटवणे चुकीचे आहे."

फोटो स्रोत, Reuters/Rahul Gandhi
"पेपर लीक, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्यासाठी गंभीर प्रश्न आहेत. कोणतीही शक्ती भारताच्या विद्यार्थ्यांना आणि आपल्यापैकी जे त्यांच्यावर प्रेम करतात व त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना हे मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखू शकत नाही. दडपशाहीने प्रश्न मिटणार नाहीत," असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.
'कोर्टाच्या आदेशात हॉस्पिटलाईझ करा असं म्हटलेलं नाही'
दरम्यान, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत आणि तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार वांगचूक यांना रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "कोर्टाने आदेशात म्हटलं होतं की, दररोज वांगचूक यांच्या प्रकृतीची देखरेख करावी आणि ती ढासळू नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे काही वैद्यकीय उपचार आवश्यक असतील ते करावे."
"यात हॉस्पिटलाईझ करा असं म्हटलेलं नाहीय, पण 'आवश्यक ते' याचा अर्थ हवा तसा काढता येतो. तसाच तो काढून त्यांना हॉस्पिटलाईझ केलं गेलंय," असा आरोप विजय कुंभार यांनी केला.
' सोनम वांगचूक यांचं उपोषण सुरुच आहे'
सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली जे अंगमो यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या पतीचं उपोषण अद्याप सुरू आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारच्या साखरेचं सेवन केलेलं नाही
गीतांजली यांनी सांगितलं की, वांगचूक फक्त तेच मीठ घातलेलं पाणी घेत आहेत, हे ते यापूर्वीही पीत होते.

फोटो स्रोत, Getty Images
माध्यमांशी बोलताना गीतांजली म्हणाल्या, "उच्च न्यायालयाच्या आदेशात कुठेही सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले नव्हते. आदेशात केवळ व्यक्तीच्या आरोग्याला प्राधान्य देण्याबाबत आणि नियमित देखरेख ठेवण्याबाबत म्हटलं होतं."
त्या पुढे म्हणाल्या, "जे काही घडलं, ते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही. सध्या कोणताही उपचार सुरू नाही. फक्त देखरेख आणि तपासण्या केल्या जात आहेत. आम्ही बाहेरील प्रयोगशाळेतूनही तपासण्या करून घेणार आहोत, कारण आम्ही मागितलेले अहवाल आम्हाला उपलब्ध करून दिले जात नाहीत."
त्या म्हणाल्या की, कोणत्याही प्रकारचं औषध देण्यापूर्वी त्या त्या अहवालांची तपासणी दुसऱ्या प्रयोगशाळेकडून करून घेऊ इच्छितात.
सकाळी सफदरजंग रुग्णालयात गेल्यावर गीतांजली जे अंगमो यांनी त्यांच्या संमतीशिवाय तोंडावाटे किंवा शिरांमधून कोणतेही औषध अथवा द्रवपदार्थ देऊ नये, असं म्हटलं होतं.
त्या म्हणाल्या होत्या, "मी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आहे, इथे सोनम वांगचूक यांना दाखल करण्यात आले आहे. गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारे त्यांचे डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय आणि माझी संमती घेतल्याशिवाय त्यांना तोंडावाटे किंवा शिरांमधून (इंट्राव्हेनस) कोणतेही औषध किंवा द्रवपदार्थ देऊ नये."
पोलिसांनी माझ्यावर हल्ला केला- अभिजीत दिपके
पोलिसांच्या या कृतीनंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके म्हणाले, "सकाळी 7 वाजता मी फ्रेश होण्यासाठी बाहेर पडलो असताना पोलीस गुंड येथे आले. त्यांनी सोनम सरांना शिवीगाळ करत जबरदस्तीने ओढत नेले.
60 वर्षांची एक व्यक्ती, जी गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत होती आणि ज्यांनी अन्नाचा एक घासही खाल्ला नव्हता, त्यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन नेले. त्यांना कुठे नेले आहे याची आम्हाला काहीच माहिती नाही.

फोटो स्रोत, Reuters
मला ही बातमी मिळाल्यानंतर मी माझ्या मित्राच्या घरून जंतर-मंतरकडे निघालो होतो. तेव्हाही पोलिसांनी माझ्यावर हल्ला केला... हे पोलीस अधिकारी नाहीत, तर आरएसएसचे गुंड आहेत. मी परदेशातून माझ्या देशात परतलो आहे; मी काही गुन्हेगार आहे का? हे पोलीस नाहीत, तर आरएसएसचे गुंड आहेत."
"नरेंद्र मोदी हुकुमशहा आहेत, त्यांच्या हुकुमशाहीला उत्तर दिलं पाहिजे. ही हुकुमशाही आम्ही सहन करणार नाही. देशातल्या लोकांनी आज सर्वत्र शांततामय मार्गानं आंदोलन करावं असं मी आवाहन करतो."
आजच्या जंतरमंतरवरील घडामोडींचे सर्व फोटो पाहण्यासाठी क्लिक करा- पोलिसांची कारवाई ते अभिजीत दिपकेंचे उपोषण, पाहा जंतरमंतरवरील सकाळपासूनची परिस्थिती

फोटो स्रोत, Getty Images
मी करणार मोर्चाचं नेतृत्व- गीतांजली जे अंगमो
सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "आम्हाला सांगितलं जात आहे की सोनम वांगचूक यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी झाली आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. काल पोटॅशियमची पातळी 4.3 होती, जी आता 2.9 वर आली आहे. इथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
त्या पुढे म्हणाल्या, "सोनम वांगचूक यांना जंतर-मंतरवरून येथे (सफदरजंग रुग्णालयात) आणण्यात आलं. याबाबत ना त्यांना माहिती देण्यात आली होती, ना मला. काल संध्याकाळीच सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती आणि त्यांच्या आरोग्याचे सर्व संकेत सामान्य होते."
गीतांजली म्हणाल्या, "जर सोनम वांगचूक या मोर्चात सहभागी होऊ शकणार नसतील, तर त्यांच्या जागी मी या मोर्चाचं नेतृत्व करेन. हा मोर्चा सोमवारी आधीच ठरलेल्या योजनेनुसार होणार आहे. केवळ सोनम यांना जबरदस्तीने येथे आणलं आहे, याचा अर्थ असा नाही की हा मोर्चा थांबवला जाऊ शकतो."
पोलिसांनी काय म्हटलं?
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या न्यू दिल्ली विभागाचे पोलीस उपायुक्त (DCP) यांनी एक्सवरील पोस्टमध्ये ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी केल्याचं म्हटलं आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत आणि तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार, सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे."

फोटो स्रोत, PTI
"उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत असताना काही आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे किरकोळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
मात्र, पोलिसांनी अत्यंत संयम बाळगत ही कारवाई सुरक्षितपणे पूर्ण केली. जंतर-मंतर येथील आंदोलकांनी शांततेने आणि शक्य तितक्या लवकर हे ठिकाण रिकामं करावं, अशी आमची विनंती आहे."
सफदरजंग रुग्णालयानं काय माहिती दिली?
सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या तब्येतीची माहिती रुग्णालयानं दिली आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, दीर्घकाळ उपवास केल्यामुळे त्यांना सौम्य अशक्तपणा आणि शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) जाणवत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून इतर सर्व आरोग्यविषयक निकष सामान्य आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. चारू बांबा यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले, "सोनम वांगचूक आज सकाळी सुमारे 7.40 वाजता आमच्या रुग्णालयात दाखल झाले. दीर्घकाळ उपवास केल्यामुळे त्यांना थोडासा अशक्तपणा आला आहे आणि शरीरात पाण्याची सौम्य कमतरता आहे."
डॉ. चारू यांच्या मते, "वांगचूक यांचे सर्व महत्त्वाचे आरोग्यविषयक निकष (वाइटल पॅरामीटर्स) सामान्य आहेत. त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम आपत्कालीन औषधोपचार विभागाने त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर त्यांना मेडिसिन विभागात दाखल करण्यात आले."
रुग्णालय प्रशासनाने सांगितले, "वांगचूक यांच्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या इलेक्ट्रोलाइटच्या पातळीवर परिणाम झाल्याची चिन्हे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांना काही काळ रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. प्रथम ही समस्या दूर करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची पुन्हा तपासणी करण्यात येईल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पोलिसांच्या कृतीवर काय प्रतिक्रिया उमटल्या?
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दिल्ली पोलिसांच्या या कृतीवर टीका केली आहे. संजय सिंह यांनी एक्सवर लिहिले आहे, "ही काय गुंडगिरी सुरू आहे? मोदीजी, सत्तेचा हा अहंकार फार काळ टिकत नाही. ज्या तरुणावर तुम्ही लाठ्या चालवत आहात, हाच तुमचे तख्त उखडून फेकेल. सोनम वांगचूक गेल्या 21 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत. त्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले."
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनीही सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेण्यास विरोध केला आहे.
डिंपल यादव म्हणाल्या, "सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने हटवणे ही केवळ एक कारवाई नाही, तर लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली आहे. भाजप सरकारला आता शांततापूर्ण आंदोलनही सहन होत नाही. ही हुकूमशाही आहे."
जंतर-मंतरवर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले, "पहाटेच त्यांनी डॉक्टरांचे पथक असल्याचे सांगून 10 पोलिसांना आत पाठवले. ते डॉक्टरांसारखे दिसत नव्हते, त्यामुळे आम्हाला समजले होते की ते कदाचित पोलीसच आहेत."
"त्यांनी सर्व स्वयंसेवकांना ही जागा रिकामी करण्यास सांगितले. स्वयंसेवकांनी सांगितले की सकाळी पावणे नऊ वाजता सोनमजींची तपासणी होते, तेव्हा या. पण अचानक त्यांनी उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगायला सुरुवात केली आणि सोनमजींना घेऊन जावे लागेल असे म्हटले."

फोटो स्रोत, Getty Images
सोनम वांगचूक यांच्या आरोग्याबाबत दररोज माहिती दिली जात होती. डॉ. सतीश लांबा यांनी उपोषणाच्या 19 व्या दिवसाचं आरोग्यविषयक बुलेटिन जारी केलं होतं.
डॉ. लांबा यांनी सांगितलं होतं की, सोनम वांगचूक यांचं उपोषणाच्या 19 व्या दिवसापर्यंत 9 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन कमी झालं होतं. तरीही, त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण (हायड्रेशन पातळी) सामान्य होतं आणि ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सतर्क होते.
आरोग्य बुलेटिननुसार, वांगचूक यांची रक्तातील साखरेची पातळी 80 मिग्रॅ/डेसिलिटर इतकी नोंदवण्यात आली होती, तर त्यांच्या नाडीचे ठोके प्रति मिनिट 72 इतके होते.

फोटो स्रोत, X/@Wangchuk66
यापूर्वी, बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या एका व्हीडिओ संदेशात सोनम वांगचूक यांनी सांगितलं होतं की, 18 दिवसांचं उपोषण पूर्ण करूनही त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष सामान्य होते.
एका व्हीडिओ संदेशाद्वारे वांगचूक यांनी 'चलो संसद' मोहिमेअंतर्गत संसद भवनाकडे आयोजित शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचं आवाहनही लोकांना केलं होतं.
15 जुलै रोजी सोनम वांगचूक यांनी रात्री उशीरा एक व्हीडिओ पोस्ट करत, "माझ्या तब्येतीची काळजी करण्याऐवजी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी 20 जुलै रोजी मोठ्या संख्येनं या," असं आवाहन केलं होतं.
"हजारो लोकांचे असे मेसेज येत होते की, मी हे उपोषण सोडावं. काहीजणांनी न्यायालयालाही अपील केली होती की, सरकारनं मला जबरदस्ती खायला घालावं. मी काही खाल्लं तरी काय फरक पडणार? यातून सरकारला हाच मेसेज जाईल, की उत्तरदायित्व काही गरजेचं नाही. असे लोक उपोषणाला बसतात आणि निघून जातात," असं 15 जुलै रोजी ते म्हणाले होते.
"माझी अवस्था इतकीही वाईट नव्हती की, मी दोन-चार दिवसांत मरेन. अनेक टेस्ट्स केल्या जात होत्या. रिझल्ट्स बरेचसे नॉर्मल होते. त्या दिवशी ईसीजी झाला होता. तो नॉर्मल होता. त्यामुळे मी अनेक दिवस चालू शकतो अजून. कमकुवतपणा नक्कीच होता, पण माझं मन अद्यापही शाबूत होतं," असंही त्यांनी सांगितलं होतं.
कोर्टानं सरकारकडून मागितलं होतं उत्तर
दिल्ली हायकोर्टाने बुधवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा 'जीव वाचवण्यासाठी सरकारकडून तातडीनं दखल' घेण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितलं होतं.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचूक दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले होते.

फोटो स्रोत, Getty Images
कायदेशीर बातम्या आणि विश्लेषणाचे वार्तांकन करणाऱ्या 'बार अँड बेंच' (Bar & Bench) या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी ही जनहित याचिका (PIL) दाखल केली होती.
सैनी यांनी म्हटलं होतं की, "एक सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ता आपल्या मूलभूत अधिकारांचा वापर करत, सरकारच्या अत्यंत अलोकप्रिय आणि सर्वत्र टीका होत असलेल्या निर्णयांच्या विरोधात आंदोलन करत आहे. एका अर्थाने, तो संपूर्ण राष्ट्रासमोर स्वतःचे प्राण पणाला लावत आहे."
न्यायालयानं सांगितलं होतं की, या प्रकरणाचं गांभीर्य आणि तातडीने सुनावणीची आवश्यकता लक्षात घेऊन, या याचिकेवर गुरुवार, 16 जुलै रोजी सुनावणी केली जाईल.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलं होतं की, "केंद्र सरकारच्या वतीने कुणीही उपस्थित नाही. आम्ही या याचिकेवर सुनावणी करत आहोत. आम्ही हे प्रकरण उद्यासाठी सूचीबद्ध करू आणि केंद्र सरकारकडून सूचना मागवू."
'मी शरीराने अशक्त वाटत असलो, तरी मनाने खूप खंबीर आहे'
बीबीसी न्यूजने जेव्हा सोनम वांगचूक यांना सोमवारी (13 जुलै) भेट दिली होती, तेव्हा त्यांनी हे सांगितलं होतं. उपोषणाच्या 16 व्या दिवशी त्यांनी बीबीसी न्यूजला मुलाखत दिली तेव्हा त्यांनी आंदोलनाबाबतचा निर्धार व्यक्त केला होता.
मंगळवारी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, वांगचूक यांचं वजन तब्बल 8.5 किलोने कमी झालं होतं. त्यांचं ब्लडप्रेशरही (रक्तदाब) 109/70 इतकं होतं.
त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. हजारो लोकांनी त्यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलं होतं.
परंतु, 59 वर्षीय वांगचूक आपल्या निर्णयावर ठाम होते. "मी सुरू केलेलं काम त्याच्या शेवटापर्यंत नेणार आहे," असं ते म्हणाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेलं हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) सुरू केलं होतं. ही संघटना भारतातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करत होती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी केली होती.
त्यांचं म्हणणं होतं की, मे महिन्याच्या सुरुवातीला मेडिकल प्रवेश परीक्षेचे (नीट) पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्याची नैतिक जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे.
परंतु, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. तसेच सीजेपी आणि त्यांच्या समर्थकांना त्यांनी 'देशात गोंधळ माजवणाऱ्या (विघातक) शक्तींची बी-टीम' म्हटलं होतं. देशाच्या प्रगतीवर त्यांचा विश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी केली होती.
लडाखचे अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक 28 जूनपासून या आंदोलनात सहभागी झाले होते. तेव्हापासून ते बेमुदत उपोषणावर होते.
स्वतःला महात्मा गांधींचे अनुयायी मानणारे सोनम वांगचूक म्हणाले होते की, त्यांचा गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाच्या विचारांवर विश्वास आहे. उपोषणाच्या माध्यमातून सरकारची सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्याचा ते प्रयत्न करत होते.
कोण आहेत सोनम वांगचूक?
'सोनम सर' म्हणून ओळखले जाणारे सोनम वांगचूक हे लडाखमधील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कामाचं कौतुक केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातही झालं आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या सोनम वांगचूक यांनी लडाखला हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करता यावा, यासाठी अनेक उपाय सुचवले आणि विकसित केले.
सोनम वांगचूक 'आइस स्तूप' या संकल्पनेसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. हा बौद्ध स्तूपापासून प्रेरित शंकूच्या आकाराचा कृत्रिम बर्फाचा स्तूप आहे. हिवाळ्यात तो पाणी साठवतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला गरज असताना तेच पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो.

फोटो स्रोत, Getty Images
सोनम वांगचूक यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात 2018 मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्काराचाही समावेश आहे. हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
2009 मध्ये आलेल्या सुपरहिट 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील मुख्य पात्राची प्रेरणा सोनम वांगचूक हेच होते. 2017 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातही ते विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमध्ये आंदोलन भडकवल्याचा आरोप करत सरकारने सोनम वांगचूक यांना अटक केली होती. परंतु, त्यांनी हे आरोप फेटाळले होते. सुमारे 170 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सरकारने त्यांच्यावरील आरोप मागे घेतले होते आणि त्यांची सुटका केली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























