युक्रेन युद्धात रशियाच्या सुमारे 5 लाख सैनिकांचा मृत्यू

युक्रेन युद्धात रशियाच्या तब्बल 5 लाख सैनिकांचा मृत्यू
    • Author, ओल्गा इव्शिना
    • Role, बीबीसी रशियन
    • Author, यारोस्लोवा किर्युखिना
    • Role, बीबीसी रशियन
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

2022 मध्ये युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून किमान 4,90,334 रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, रशियन सरकारी आकडेवारीचं बीबीसीनं केलेल्या विश्लेषणातून समोर आलंय.

रोसस्टॅटच्या लीक झालेल्या आकडेवारीतून युक्रेनवरील पूर्ण क्षमतेच्या आक्रमणामुळे रशियातील मृत्यूदराच्या स्वरूपात मूलभूत बदल कसे झाले आहेत, हे उघड झालंय.

तसंच, व्लादिमीर पुतिन यांनी अवघ्या काही दिवसांत संपेल असे गृहीत धरलेल्या, पण आता जवळपास पाच वर्षे सुरू असलेल्या युद्धासाठी मानवी जीवांच्या रूपात किती मोठी किंमत मोजावी लागली आहे, हेही यातून दिसून येतं.

बेलारूसमधील सायबर पार्टिझन्स बीवाय आणि युक्रेनच्या सायलेंट क्रो या गटांनी केलेल्या हॅकिंगनंतर बीबीसी रशियनला 2021 ते सप्टेंबर 2026 या कालावधीतील 11 दशलक्षांहून अधिक मृत्यूच्या नोंदी उपलब्ध झाल्या आहेत.

रशियाच्या सांख्यिकी संस्थेनं सायबर हल्ला झाल्याची कबुली दिली, मात्र कोणतीही संरक्षित माहिती लीक झाल्याचे फेटाळले.

स्वतंत्र रशियन वृत्तसंस्था मीडियाझोनाच्या सहकार्याने बीबीसी रशियननं रोसस्टॅटच्या आकडेवारीची तुलना आक्रमण सुरू झाल्यापासून खुल्या स्रोतांमधून गोळा केलेल्या आणि पुष्टी केलेल्या लष्करी मृत्यूंच्या स्वतःच्या यादीशी केली. या तुलनेत 90% नोंदी जुळल्याचं आढळलं.

या नोंदींनुसार, 2025 मध्ये रशियातील 18 ते 24 वयोगटातील मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी 65% जणांचा युद्धात मृत्यू झाला. 25-34 वयोगटासाठी हे प्रमाण 59% होते. केवळ 45 ते 54 वयोगटात हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमुळे युद्धापेक्षा अधिक रशियन नागरिकांचा मृत्यू झाला.

युक्रेनमधील विशिष्ट भागांमध्ये प्राण गमावणाऱ्यांचं प्रमाणही या आकडेवारीतून समोर येतं. युद्धापूर्वी 12,000 लोकसंख्या असलेल्या युक्रेनमधील 10 गावांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लढताना सुमारे 20,000 रशियन सैनिकांचा मृत्यू झाला.

डोनेत्स्क प्रदेशातील बाखमुत शहराच्या दक्षिणेला असलेल्या आंद्रियिव्का नावाच्या एका छोट्या गावासाठी झालेल्या लढाईत 1,122 रशियन नागरिकांचा मृत्यू झाला. युद्धापूर्वी या गावात 74 लोक राहत होते.

फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून प्राण गमावलेल्यांची सार्वजनिक आकडेवारी रशिया जाहीर करत नाही. तसेच, दोन वर्षांपूर्वी रोसस्टॅटनं अनैसर्गिक कारणांमुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी प्रसिद्ध करणं बंद केलं. लष्करी नुकसानीचं प्रमाण मोजण्यासाठी या आकडेवारीचा वापर केला जात होता.

उदाहरणार्थ, पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुहान्स्क या रशियाने व्यापलेल्या प्रदेशांतील आणि रशियन सैन्यात लढलेल्या सैनिकांच्या आम्ही निश्चित केलेल्या मृत्यूंपैकी केवळ 70% मृत्यूंची नोंद रोसस्टॅटच्या फाइल्समध्ये आढळली.

हा आकडा कसा मिळाला?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रोसस्टॅटच्या डेटासेटमध्ये नावं नाहीत. मात्र वय, राहण्याचं ठिकाण, मृत्यूचे ठिकाण आणि मृत्यूची परिस्थिती यांचा समावेश आहे.

आम्ही सर्वप्रथम ठिकाणाच्या आधारे नोंदींची छाननी केली आणि त्यात केवळ युक्रेन तसेच युक्रेनच्या सैन्याने घुसखोरी केलेल्या रशियाच्या सीमावर्ती प्रदेशांचा समावेश ठेवला.

त्यानंतर, लष्करी कारवाईदरम्यान झालेल्या स्फोटांमुळे किंवा शेलच्या तुकड्यांमुळे झालेल्या मृत्यूसारखे, मृत्यूचं लष्करी कारवाईशी संबंधित कारण स्पष्टपणे दर्शवणाऱ्या 4,25,174 नोंदी आम्ही तपासल्या.

या संख्येत नागरिकांचाही समावेश असण्याची शक्यता असल्यानं, आम्ही महिलांच्या तसेच 18-65 वयोगटाबाहेरील पुरुषांच्या नोंदी वगळल्या. तसंच, एखादी व्यक्ती रशियानं व्यापलेल्या युक्रेनच्या चार प्रदेशांमध्ये राहत होती आणि तिथेच तिचा मृत्यू झाला असेल, तर तिच्या नोंदीसोबत लष्करी सेवेची नोंद जोडलेली नसल्यास आम्ही तिला संभाव्य नागरिक मानून वगळलं.

रोजगाराच्या नोंदी तपासून आणखी 14,093 नोंदी ओळखण्यात आल्या, तर 51,067 व्यक्तींची डेटाबेसमध्ये न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे मृत घोषित केल्याची नोंद होती. एखादा सैनिक लढाईच्या क्षेत्रात सहा महिन्यांहून अधिक काळ बेपत्ता राहतो आणि त्याचा मृतदेह सापडत नाही, तेव्हा असं अनेकदा घडतं.

पुन्हा एकदा, युक्रेन आणि रशियामधील युद्धक्षेत्रांतील मृत्यूंचीच गणना करून आम्ही नागरिकांना वगळलं.

बीबीसी रशियनच्या स्वतःच्या रशियाकडून प्राण गमावलेल्यांची तपशीलवार नोंदींची संख्या 2,90,012 वर पोहोचली आहे. अधिकृत अहवाल, सोशल मीडिया, नवीन स्मारके आणि कबरी यांच्या आधारे मीडियाझोनाच्या सहकार्याने या मृत्यूंची पडताळणी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मृतांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे, कारण सर्व मृत्यूंची सार्वजनिकरीत्या नोंद केली जात नाही.

एकूणच, रोसस्टॅटचा डेटासेट आम्ही आमच्या स्वतःच्या मोजणीतून पाहिलेल्या कलांना पुष्टी देतो.

लीक झालेल्या फाइल्सच्या बीबीसी रशियनच्या विश्लेषणानुसार, युद्धाच्या पहिल्या वर्षात मृत्यू झालेल्यांचे सरासरी वय 34 होते. 2025 पर्यंत, कैदी आणि कंत्राटी सैनिक सैन्यात दाखल झाल्यामुळे हे वय वाढून 40 झाले (आमच्या स्वतःच्या यादीनुसार 38).

पूर्व सायबेरियातील रशियाच्या काही सर्वात गरीब प्रदेशांचा एकूण नुकसानीत असमान प्रमाणात मोठा वाटा आहे. टायव्हा, बुरियातिया आणि झाबायकाल्स्की क्राय येथील पुरुषांचा युद्धात मृत्यू होण्याची शक्यता मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग या सर्वात मोठ्या शहरांतील रहिवाशांच्या तुलनेत 20-25 पट अधिक आहे.

बहुतेक प्रदेशांमध्ये, रोसस्टॅटच्या आकडेवारीवर आधारित मृत्यूंचे वितरण आणि बीबीसीच्या यादीतील वितरण यांमध्ये केवळ काही दशांश टक्क्यांचा फरक आहे.

रोसस्टॅटच्या फाइल्सच्या आमच्या विश्लेषणानुसार, रशियासाठी लढताना मृत्यू झालेल्यांमध्ये किमान 5,017 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यात 1,031 उझबेक आणि 720 ताजिक नागरिक आहेत. नागरिकांचा समावेश होऊ नये म्हणून आम्ही या मोजणीत युक्रेनियन नागरिकांना वगळले आहे.

हा एक मर्यादित किंवा प्राथमिक म्हणावा असा अंदाज आहे, कारण दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींची डेटाबेसमध्ये रशियन म्हणून नोंद आहे. तसेच, 2024 मध्ये युक्रेननं रशियात केलेली घुसखोरी परतवून लावताना मृत्यू झालेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांचा यात कोणताही उल्लेख नाही.

प्योंगयांगमध्ये नव्याने बांधलेल्या स्मारकाच्या उपग्रह प्रतिमा आणि अधिकृत छायाचित्रांचं विश्लेषण करून बीबीसीनं तिथं मृत्यू झालेल्या 2,304 उत्तर कोरियन सैनिकांची ओळख पटवली.

लीक झालेली रशियन आकडेवारी कदाचित पूर्ण नसली, तरी बीबीसी रशियनननं स्वतः केलेल्या कामासोबत तिचा विचार केल्यास ती महत्त्वपूर्ण ठरते. लष्करी तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, खुल्या स्रोतांमधून मिळालेला बीबीसीचा 2,90,012 हा आकडा प्रत्यक्ष मृतांच्या संख्येच्या 45-55% इतका असू शकतो, म्हणजेच प्रत्यक्ष मृतांची संख्या 5,27,295 ते 6,44,471 दरम्यान असू शकते.

चार वर्षं आणि 10 महिने चाललेल्या युद्धाच्या संदर्भात पाहता, 1989 मध्ये संपलेल्या अफगाणिस्तानमधील सोव्हिएत युद्धाशी तुलना करता, रशियासाठी हे आकडे खूप मोठे आहेत.

युक्रेनच्या नुकसानीचा शेवटचा अंदाज जुलै 2026 मध्ये राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सुमारे 50,000 इतका व्यक्त केला होता. मात्र, अनामिक अशा UA Losses या वेबसाइटनं खुल्या स्रोतांवर आधारित तयार केलेल्या दुसऱ्या यादीत हा आकडा 1,15,952 असल्याचे नमूद केलंय.

(इल्या बाराबानोव्ह यांचे अतिरिक्त वृत्तांकन.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)