1977 मध्ये रिलायन्समुळे असा बदलला भारतीय शेअर बाजार; धीरूभाई अंबानी कसे बनले गुंतवणूकदारांचे 'सुपरस्टार'?

Photo caption- धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या रिलायन्सच्या आयपीओची चर्चा आजही केली जाते.
फोटो कॅप्शन, धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या रिलायन्सच्या आयपीओची चर्चा आजही केली जाते.
    • Author, अजित गढवी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

रिलायन्स ग्रुपची टेलिकॉम कंपनी 'जिओ प्लॅटफॉर्म्स'च्या मेगा आयपीओची सध्या देश-विदेशात जोरदार चर्चा सुरू आहे.

कंपनीने तब्बल 30,213 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला आहे.

दरम्यान जिओ प्लॅटफॉर्म्सचा हा आयपीओ एकामागून एक नवे रेकॉर्ड रचत चालला आहे. शुक्रवार 23 ऑक्टोबर हा या आयपीओसाठी पेमेंट करण्याचा शेवटचा दिवस होता. 'मनीकंट्रोल डॉट कॉम'च्या माहितीनुसार, कंपनीने विक्रीस काढलेल्या शेअर्सना तब्बल 22.19 पट अधिक मागणी मिळाली आहे.

'पीटीआय' या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या या मेगा आयपीओला तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज आले असून असा विक्रम करणारा हा जगातील पहिलाच आयपीओ ठरला आहे.

रिलायन्स ग्रुपचा पहिला आयपीओ

रिलायन्स जिओच्या आयपीओची सध्या इतकी चर्चा सुरू असताना, 49 वर्षांपूर्वी जेव्हा रिलायन्स ग्रुपने आपला पहिला आयपीओ आणला होता, तेव्हा नेमकं वातावरण कसं होतं आणि त्यातून गुंतवणूकदारांनी किती नफा कमावला, हे जाणून घेणं नक्कीच रंजक ठरेल.

उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी 'रिलायन्स ग्रुप'ची पायाभरणी केली. 1977 मध्ये जेव्हा या समूहाचा पहिलावहिला आयपीओ बाजारात आला तेव्हा कंपनीचं नाव होतं 'रिलायन्स टेक्स्टाइल इंडस्ट्रीज'.

Photo caption - 1985 मध्ये मुकेश अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात पाहुण्यांसोबत धीरूभाई अंबानी.
फोटो कॅप्शन, 1985 मध्ये मुकेश अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात पाहुण्यांसोबत धीरूभाई अंबानी.

इतिहासाची पानं चाळली तर लक्षात येतं की, 15 ते 17 नोव्हेंबर 1977 या अवघ्या तीन दिवसांत कंपनीने आयपीओच्या माध्यमातून तब्बल 2.80 कोटी रुपये उभे केले होते. पुढे जाऊन 23 जानेवारी 1978 रोजी रिलायन्स टेक्स्टाइलचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि अहमदाबाद स्टॉक एक्सचेंजमध्ये दिमाखात लिस्ट झाले.

रिलायन्स जिओच्या बहुचर्चित आयपीओच्या पार्श्वभूमीवर, 49 वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक क्षणाचा आढावा घेणं खरंच रंजक ठरतं.

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1977 मधला तो काळ भारतीय शेअर बाजारासाठी आजच्यासारखा नव्हता. तेव्हा सामान्य माणसासाठी शेअर बाजार म्हणजे निव्वळ 'सट्टा' समजला जायचा आणि केवळ मूठभर गुजराती किंवा पारशी उच्चभ्रू उद्योगपतीच या बाजारावर नियंत्रण ठेवून होते. अशा काळात धीरूभाई अंबानी यांनी जे केलं, त्याने भारतीय भांडवली बाजाराचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकला.

'फॉर्च्युन इंडिया'च्या एका रिपोर्टनुसार, रिलायन्स टेक्स्टाइल इंडस्ट्रीजने 10 रुपये प्रति शेअर या भावाने 28.2 लाख शेअर्स बाजारात आणले होते. या शेअर्सना गुंतवणूकदारांकडून तब्बल 7.19 पट मागणी मिळाली होती.

या आयपीओमुळे कंपनीला जवळपास 58 हजार नवीन शेअरहोल्डर्स मिळाले. ट्रेडिंगच्या पहिल्याच दिवशी हा शेअर 17 ते 18 रुपये प्रति शेअर या भावाने विकला गेला. म्हणजेच काय तर गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी चक्क 70 ते 80 टक्क्यांचा घसघशीत नफा पदरात पडला.

विशेष म्हणजे, हा काही कोणताही नवीन फंड गोळा करण्यासाठी आणलेला 'फ्रेश इश्यू' नव्हता. तर कंपनीचे प्रमोटर धीरूभाई अंबानी आणि त्यांचे बंधू नटवरलाल अंबानी यांनी स्वतःची वैयक्तिक हिस्सेदारी विकली होती. पुढे जाऊन 1985 मध्ये याच 'रिलायन्स टेक्स्टाइल्स'चे नाव बदलून 'रिलायन्स इंडस्ट्रीज' करण्यात आले.

कंपनीच्या 1976-1977 च्या वार्षिक अहवालानुसार, आयपीओनंतर कंपनीकडे एकूण 57,949 शेअरहोल्डर्स नोंदवले गेले. यातल्या 56,129 जणांकडे 200 पर्यंत शेअर्स होते. 1,647 लोकांकडे 225 ते 1,000 शेअर्स, तर 125 लोकांकडे 1,050 ते 5,000 शेअर्स होते. फक्त 48 गुंतवणूकदार असे होते, ज्यांच्याकडे 5,000 हून जास्त शेअर्स होते.

मूळ किंमत अवघी 10 रुपये असताना 17 ते 18 रुपयांवर लिस्ट झालेला हा शेअर त्याच वर्षात थेट 50 रुपयांवर गेला. तिथून पुढे अवघ्या 2 वर्षांत या शेअरने 104 रुपयांची पातळी गाठली. तर 4 वर्षांत हा भाव थेट 186 रुपयांवर जाऊन पोहोचला.

गुंतवणूकदारांनी किती नफा कमावला?

'फॉर्च्यून इंडिया'च्या एका रिपोर्टनुसार, 1977 मध्ये रिलायन्सच्या आयपीओमध्ये तुम्ही जर अवघे 1,000 रुपये गुंतवून 100 शेअर्स घेतले असते तर मिळालेले बोनस शेअर्स आणि वाढलेली शेअरची किंमत मिळून आज तुमच्या त्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 50 लाख रुपयांच्या घरात पोहोचले असते.

photo caption- वडील धीरूभाई अंबानी आपले ज्येष्ठ सुपुत्र मुकेश अंबानी यांच्याबरोबर, जे सध्या 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड'चे अध्यक्ष आहेत.
फोटो कॅप्शन, वडील धीरूभाई अंबानी आपले ज्येष्ठ सुपुत्र मुकेश अंबानी यांच्याबरोबर, जे सध्या 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड'चे अध्यक्ष आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कंपनीने या सर्व वर्षांत वेळोवेळी जो घसघशीत लाभांश (डिव्हिडंड) वाटला, त्याची भलीमोठी रक्कम तर या 50 लाखांपेक्षा अगदी वेगळीच.

अलीकडेच 'जिओ'च्या एका कार्यक्रमात बोलताना कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी रिलायन्सच्या त्या पहिल्या आयपीओच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "1977 मध्ये मी अवघ्या 18 वर्षांचा होतो. त्यावेळी रिलायन्स टेक्स्टाइल्सच्या जोरदार जाहिरातींसाठी मुंबईची गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्ह अक्षरशः सजवण्यात आली होती. माझ्यासाठी तो खरोखरच एक जादुई क्षण होता!"

दुसरीकडे, एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे संचालक आणि सीईओ अजय गर्ग यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, रिलायन्स टेक्स्टाइल्स इंडस्ट्रीजच्या आयपीओमुळेच देशात पहिल्यांदा असं घडलं, जिथे अगदी छोट्या-छोट्या शहरांमधील आणि खेड्यापाड्यातील सामान्य लोकांनीही शेअर बाजारात पैसे गुंतवायला सुरुवात केली होती.

1977 च्या काळात भारतामधला मध्यमवर्ग प्रामुख्याने सोनं, जमीनजुमला किंवा बँकेतली एफडी यांमध्येच पैसे गुंतवणे सुरक्षित मानायचा. शेअर बाजार म्हणजे केवळ मुंबईतले काही बडे दलाल आणि श्रीमंत लोकांपुरतंच मर्यादित विश्व, असाच लोकांचा समज होता. पण धीरूभाईंनी हा संपूर्ण प्रवाहच बदलून टाकला. त्यांनी थेट गुजरातसह देशभरातल्या कानाकोपऱ्यात, लहान-लहान शहरांमध्ये आपले एजंट्स पाठवून सर्वसामान्यांच्या घराघरांपर्यंत शेअर बाजाराची ओळख करून दिली.

जेव्हा धीरूभाई गुंतवणूकदारांचे 'सुपरस्टार' बनले

ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि लेखक हॅमिश मॅकडोनाल्ड यांनी धीरूभाई अंबानी यांच्या वादळी जीवनप्रवासावर एक चरित्र लिहिलं… नाव होतं, "द पॉलिस्टर प्रिन्स: द राइज ऑफ धीरूभाई अंबानी".

1998 मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकातल्या 'गुरू ऑफ द इक्विटी कल्ट' म्हणजे शेअर बाजाराच्या संस्कृतीचे गुरू या खास प्रकरणात त्यांनी रिलायन्स टेक्स्टाइल्सच्या 1977 मधल्या त्या ऐतिहासिक आयपीओची अतिशय रंजक चर्चा केली आहे.

Photo caption- धीरूभाईंच्या नेतृत्वाखाली, रिलायन्स 'फॉर्च्यून 500' च्या यादीत स्थान मिळवणारी भारताची पहिली खाजगी कंपनी ठरली.
फोटो कॅप्शन, धीरूभाईंच्या नेतृत्वाखाली, रिलायन्स 'फॉर्च्यून 500' च्या यादीत स्थान मिळवणारी भारताची पहिली खाजगी कंपनी ठरली.

ते लिहितात, "पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींची दुसरी टर्म धीरूभाई अंबानींसाठी अक्षरशः सुवर्णकाळ ठरली. वार्षिक विक्रीचा विचार केला, तर 1979 मध्ये त्यांची कंपनी भारताच्या पहिल्या 50 कंपन्यांमध्येही नव्हती. पण 1984 उजाडेपर्यंत रिलायन्सने देशातल्या पहिल्या 5 कंपन्यांमध्ये दिमाखात स्थान पटकावलं होतं. धीरूभाई स्वतः भारतात इतके मोठे आणि लोकप्रिय नाव बनले होते की, त्यांचे चाहते त्यांना एखाद्या साध्या व्यावसायिकासारखं नाही, तर थेट एखादा स्टार क्रिकेटर किंवा बॉलिवूड अभिनेत्यासारखं डोक्यावर घ्यायचे!"

पुस्तकात पुढे असं सांगितलं आहे की, "1970 च्या दशकात धीरूभाईंनी व्यवसायाचा विस्तार करण्याची क्षमता प्रचंड वाढवून घेतली होती आणि आता ते मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारण्याच्या तयारीत होते. धीरूभाईंनी कर्नाटकमध्ये 'मायनायलॉन लिमिटेड' (Mynylon Limited) नावाची एक कंपनी सुरू केली. पुढे 1975 मध्ये त्यांनी कर्नाटक आणि बॉम्बे उच्च न्यायालयांची रीतसर मंजुरी घेऊन रिलायन्स आणि मायनायलॉनचं एकत्रिकरण घडवून आणलं.

यातली सर्वात चकित करणारी बाब म्हणजे, अवघं 11,000 रुपये पेड-अप कॅपिटल असणाऱ्या मायनायलॉन कंपनीने, तब्बल 6 कोटी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या रिलायन्सची सर्व मालमत्ता आणि देणी आपल्या ताब्यात घेतली."

मार्च 1977 मध्ये कंपनी बंगळुरूहून पुन्हा मुंबईत परतली आणि तिचे नाव बदलून 'रिलायन्स टेक्स्टाइल्स इंडस्ट्रीज' असे करण्यात आले.

यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर 1977 च्या सुमारास रिलायन्सने बाजारात आपला पहिलावहिला ऐतिहासिक आयपीओ आणला. यात धीरूभाई आणि त्यांचे धाकटे बंधू नथुभाई (नटवरलाल) यांच्या वाट्याचे शेअर्स विकण्यात आले होते.

ऑक्टोबर-नोव्हेंबर 1977 मध्ये रिलायन्सने आपला पहिला आयपीओ आणला, ज्यामध्ये धीरूभाई आणि त्यांचे धाकटे बंधू नथुभाई (नटवरलाल) यांच्या वाट्याचे शेअर्स विकण्यात आले. यानंतर रिलायन्सने ठराविक अंतराने राइट्स आणि बोनस इश्यूच्या माध्यमातून आपला इक्विटी बेस वाढवला. पुढे सप्टेंबर 1979 मध्ये वित्तीय संस्थांनी आपल्या कर्जांपैकी 20 टक्के कर्जाचं रूपांतर इक्विटीमध्ये केलं.

या पुस्तकानुसार, "1980 मध्ये भारतातल्या भागधारकांची (शेअरहोल्डर्सची) संख्या 10 लाखांपेक्षाही कमी होती. पण 1985 पर्यंत हीच संख्या वाढून चक्क 40 लाखांवर पोहोचली. यापैकी एकट्या रिलायन्सचेच 10 लाखांहून अधिक शेअरहोल्डर्स होते. म्हणजे देशातील दर चार शेअरहोल्डर्सपैकी एकाकडे तरी रिलायन्सचे शेअर्स होतेच.. विशेषतः गुजरातमध्ये तर धीरूभाईंना एखाद्या 'हिरो'चा दर्जा मिळाला होता."

शेअर बाजारात पाऊल टाकत मध्यमवर्गाची झालेली भरभराट

भारतातले लहान-सहान गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे आकर्षित होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे धीरूभाई अंबानी. कारण त्यांनी अत्यंत छोट्या पातळीवरून सुरुवात करून एवढं मोठं उद्योग साम्राज्य उभं केलं होतं.

रिलायन्स ग्रुपच्या वेबसाइटनुसार धीरूभाईंनी जेव्हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्यांच्या खिशात फक्त 14 हजार रुपये होते. पण पुढच्या साडेतीन दशकांत त्यांनी रिलायन्सचा कारभार थेट 60 हजार कोटी रुपयांवर नेऊन ठेवला आणि 'फॉर्च्युन 500' च्या जागतिक यादीत झळकणारी ही भारताची पहिली खाजगी कंपनी ठरली.

photo caption- 1986 मध्ये मुंबईच्या क्रॉस मैदानावर पार पडलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (AGM) 35,000 हून अधिक लोक उपस्थित होते. खुल्या मैदानात आपली एजीएम आयोजित करणारी ही भारताच्या खाजगी क्षेत्रातील पहिलीच कंपनी ठरली होती.
फोटो कॅप्शन, 1986 मध्ये मुंबईच्या क्रॉस मैदानावर पार पडलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (AGM) 35,000 हून अधिक लोक उपस्थित होते. खुल्या मैदानात आपली एजीएम आयोजित करणारी ही भारताच्या खाजगी क्षेत्रातील पहिलीच कंपनी ठरली होती.

रिलायन्समुळे सामान्य माणसाला शेअर बाजाराची गोडी लागली..पण त्याआधी भारतीय बाजारात फक्त मोजकेच श्रीमंत आणि बडे लोक गुंतवणूक करत असत.

रिलायन्स ग्रुपच्या वेबसाइटवरील धीरूभाई अंबानींच्या प्रोफाइलनुसार त्यांचा जन्म 1932 मध्ये गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड गावात झाला होता.

पुढे 1949 मध्ये, वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ते पोटापाण्याच्या शोधात एडनला (सध्याचे येमेन) गेले. तिथे त्यांनी एका कंपनीत डिस्पॅच क्लर्क म्हणून काम सुरू केले. कालांतराने त्यांच्यावर एडन बंदरावरील एका पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली.

1958 मध्ये ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न उराशी बाळगून भारतात परतले आणि त्यांनी मसाल्यांच्या व्यापारासाठी 'रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन' नावाची कंपनी स्थापन केली. पुढे 1962 मध्ये त्यांना धाग्याच्या व्यवसायात एक मोठी संधी दिसली. यानंतर 1965 मध्ये त्यांनी कंपनीचे नाव बदलून 'रिलायन्स टेक्स्टाइल्स इंडस्ट्रीज' असे केले.

photo caption- जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती.
फोटो कॅप्शन, जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती.

1966 मध्ये त्यांनी अहमदाबादजवळच्या नरोडा भागात जमीन घेऊन एक कापड गिरणी सुरू केली. पुढे 1975 मध्ये थेट वर्ल्ड बँकेच्या एका तांत्रिक पथकाने या नरोडा मिलला देशातील सर्वात उत्तम 'कंपोझिट कापड गिरणी'चा दर्जा दिला.

यानंतर 1977 मध्ये रिलायन्स टेक्स्टाइल्सचा आयपीओ बाजारात आला आणि त्यानंतर जे घडले, तो एक इतिहास आहे…

या काळात बहुतांश लोक शेअर बाजारापासून चार हात लांबच राहायचे आणि त्याला जुगार समजायचे. अशा वेळी भांडवल उभारणीसाठी बँकांकडून कर्ज घेण्याऐवजी थेट आयपीओ आणण्याचा धीरूभाईंचा निर्णय हा अत्यंत धाडसी मानला जातो.

रिलायन्स टेक्स्टाइल्सच्या आयपीओच्या वेळी धीरूभाई मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना आपल्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार केले. यानंतर त्यांनी रिलायन्सच्या AGM मध्ये थेट सर्वसामान्यांना सामावून घेण्यास सुरुवात केली जिथे हजारो गुंतवणूकदार स्वतः उपस्थित राहायचे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 1986 मध्ये जेव्हा मुंबईच्या क्रॉस मैदानावर रिलायन्सची वार्षिक एजीएम पार पडली तेव्हा तिथे सुमारे 35,000 भागधारक उपस्थित होते.

धीरूभाई यांचे वयाच्या 69 व्या वर्षी, 6 जुलै 2002 रोजी मुंबईत निधन झाले.

photo caption- गुजरातच्या जामनगरजवळ असलेली रिलायन्स इंडस्ट्रीजची तेल शुद्धीकरण गिरणी (रिफायनरी)
फोटो कॅप्शन, गुजरातच्या जामनगरजवळ असलेली रिलायन्स इंडस्ट्रीजची तेल शुद्धीकरण गिरणी (रिफायनरी)

यापूर्वी 1999 मध्ये रिलायन्सने जामनगर येथे आपली तेल रिफायनरी सुरू केली होती. हा भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जातो. अलीकडेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या प्रकल्पाला भेट दिली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर, 'रिलायन्स पॉवर'ने 2008 मध्ये आणि 'रिलायन्स निप्पॉन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट'ने 2017 मध्ये आपला आयपीओ आणला होता. मात्र या दोन्ही कंपन्या मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या मालकीच्या होत्या.

धीरूभाईंच्या नेतृत्वाखाली 49 वर्षांपूर्वी शेअर बाजारात पाऊल ठेवणाऱ्या रिलायन्स समूहामध्ये आज आमूलाग्र बदल झाला आहे. एकेकाळी निव्वळ एक कापड कंपनी म्हणून सुरू झालेली 'रिलायन्स इंडस्ट्रीज' आज पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग, ऊर्जा, दूरसंचार (टेलिकॉम), किरकोळ विक्री (रिटेल), डिजिटल सेवा आणि प्रसारमाध्यमे यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भक्कमपणे पाय रोवून उभी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)