डीआर काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक, WHO ने जाहीर केली जागतिक आणीबाणी

इबोला

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक झाला आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने काँगोमधील इबोलाचा उद्रेक ही जागतिक आणीबाणी आणि चिंतेचा विषय असल्याचं जाहीर केलं आहे.

डीआर काँगोच्या पूर्वेकडील इतुरी भागामध्ये इबोलाची सुमारे 246 संशयित प्रकरणं आढळली आहेत, तर 80 मृत्यूंची नोंद झाली असल्याचं डबल्यूएचओनं म्हटलं आहे.

त्याचवेळी हा उद्रेक जागतिक साथीच्या आणीबाणीच्या निकषांमध्ये बसत नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

पण माहिती समोर येत आहे त्यापेक्षा हा उद्रेक खूप मोठा असण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं आहे.

स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर हा आजार पसरण्याचा मोठा धोका असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

इबोलाचा सध्या पसरणारा प्रकार किंवा व्हेरियंट हा बुंदीबुग्यो नावाच्या विषाणूमुळे होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. तसंच त्यावर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही, असं सांगण्यात आलं आहे.

या आजाराच्या प्राथमिक लक्षणांमध्ये ताप, स्नायूदुखी, थकवा, डोकेदुखी आणि घसादुखी यांचा समावेश आहे. त्यानंतर उलट्या, जुलाब, पुरळ आणि रक्तस्त्राव अशी लक्षणं वाढत जातात.

कसा झाला उद्रेक?

इबोलाची पहिली ज्ञात रुग्ण ही एक नर्स होती. तिच्यात 24 एप्रिल रोजी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर, साथीचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी होण्यासाठी तीन आठवडे लागले आहेत.

"गेले अनेक आठवडे संसर्ग सुरू आहे आणि या साथीचा शोध खूप उशिरा लागला आहे, ही चिंतेची बाब आहे," असं लंडनमधील इम्पीरियल कॉलेजच्या डॉ. अॅन कोरी म्हणाल्या.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, सध्या प्रयोगशाळेत नमुने तपासणीनंतर आठ रुग्णांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

त्याशिवाय इतुरी प्रांताची राजधानी बुनिया आणि सोन्याच्या खाणी असलेल्या मोंगवालू आणि रवामपारा या शहरांसह एकूण तीन आरोग्य क्षेत्रांमध्ये इतर संशयित रुग्ण आणि मृत्यूंची नोंद झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

राजधानी किंशासामध्ये या विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळल्याची पुष्टी झाली आहे. हा रुग्ण इतुरीहून आलेला असण्याची शक्यता आहे.

इबोला

फोटो स्रोत, AFP via Getty Images

जागतिक आरोग्य संघटनेनं हा विषाणू काँगोच्या बाहेरही पसरला असल्याचं सांगितलं आहे. शेजारच्या युगांडामध्ये याच्या दोन रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी मृत्यू झालेल्या एका 59 वर्षीय व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती, युगांडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मृत्या झालेला रुग्ण काँगोचा नागरिक होता आणि त्याचा मृतदेह आधीच डीआर काँगोला परत पाठवण्यात आला आहे, असं युगांडा सरकारनं एका निवेदनात म्हटलं आहे.

सध्या एम23 बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या पूर्वेकडील गोमा शहरातही एका रुग्णाला इबोलाची लागण झाल्याचं प्रयोगशाळेनं स्पष्ट केलं असल्याचं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेनं रविवारी दिलं.

इतर देशांत संसर्गाचा धोका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डीआर काँगोमध्ये किमान सहा अमेरिकन नागरिक इबोलाच्या संपर्कात आले असून, त्यापैकी एकामध्ये लक्षणं आढळ्याचीही माहिती मिळाली आहे. मात्र, अद्याप कोणालाही संसर्ग झाल्याची पुष्टी झालेली नाही, असं वृत्त बीबीसीची अमेरिकन सहयोगी संस्था सीबीएसनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

अमेरिकन सरकार त्यांना देशाबाहेर, शक्यतो जर्मनीतील लष्करी तळावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं STAT न्यूजच्या वृत्तात म्हटलं आहे.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) डीआर काँगो आणि युगांडामध्ये अधिक कर्मचारी पाठवण्याची योजना असल्याचं म्हटलं आहे.

तर डीआर काँगोमधील अमेरिकन दूतावासानं नागरिकांना इतुरी प्रांतात प्रवास करू नये, याबाबतचा आरोग्यविषयक इशारा जाहीर केला आहे.

बीबीसीनं या प्रकरणी प्रतिक्रियेसाठी सीडीसीशी संपर्क साधला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं काँगोमधील परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे.

डीआर काँगोमधील सध्याची सुरक्षेसंदर्भातील स्थिती, त्याठिकाणी निर्माण झालेलं मानवाधिकाराबाबतचं संकट, प्रचंड लोकसंख्या, हॉटस्पॉटचे केंद्र असलेला शहरी भाग आणि मोठ्या संख्येनं असलेल्या अनौपचारिक आरोग्य सुविधांमुळे प्रसाराचा धोका वाढला असल्याचंही डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे.

व्यापार आणि प्रवासाच्या दृष्टीनं डीआर काँगोला लागून असलेल्या देशातही धोका असल्याचं म्हटलं जात आहे.

इबोला

फोटो स्रोत, Reuters

खबरदारीचा उपाय म्हणून रवांडानं डीआर काँगोसोबतच्या सीमेवर तपासणी अधिक कडक करणार असल्याचं म्हटलं आहे.

निगराणी यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली असून, लवकर निदान आणि गरज पडल्यास त्वरित प्रतिसादासाठी आरोग्य पथकं सतर्क असल्याचं रवांडाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं डीआर काँगो आणि युगांडाला संसर्गाचा शोध आणि प्रतिबंधक उपायांची तातजीनं अंमलबजावणी करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.

इबोलाचा प्रसार कमी करण्यासाठी, निदान झालेल्या रुग्णांना तात्काळ विलगीकरणात ठेवावं आणि किमान 48 तासांच्या अंतरानं बुंदीबुग्यो विषाणूशी संबंधिक दोन विशिष्ट चाचण्या नकारात्मक येईपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

ज्या भागांमध्ये सीमांवर रुग्ण आढळले आहेत, त्या देशांच्या सरकारांनी देखरेख आणि आरोग्यविषयक माहिती देण्याची यंत्रणा अधिक मजबूत करायला हवी.

बाधित क्षेत्राबाहेरील देशांनी सीमा बंद करू नयेत किंवा प्रवास आणि व्यापारावर निर्बंध घालू नयेत, कारण असे उपाय भीतीपोटी लागू केले जातात आणि त्यांना विज्ञानाचा कोणताही आधार नसतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

सध्या या साथीचा संसर्ग असलेल्या व्यक्तींच्या खऱ्या संख्येबद्दल आणि भौगोलिक प्रसाराबद्दल मोठी अनिश्चितता असल्याचा इशारा, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रायसस यांनी दिला आहे.

इबोला म्हणजे काय? तो कसा पसरतो?

या संसर्गाचे कारण काय?

इबोला हा विषाणूमुळे होणारा एक आजार आहे. हा दुर्मिळ, पण गंभीर आणि अनेकदा प्राणघातकही असतो. इबोला विषाणूच्या तीन प्रजाती आहेत त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव होतो आणि सध्या समोर आलेल्या विषाणूची प्रजाती बुंदीबुग्यो नावाने ओळखली जाते.

इबोलाचा प्रसार कसा होतो?

रक्त आणि उलटी यांसारख्या संक्रमित शारीरिक द्रव्यांमधून हा विषाणू इतरांमध्ये पसरतो.

हा विषाणू किती प्राणघातक आहे?

बुंदीबुग्यो इबोला विषाणूच्या यापूर्वीच्या संसर्गाचा विचार करता, सुमारे 30% लोकांचा मृत्यू झाला आहे.

रोग उद्भवण्याचा कालावधी किती असतो?

संसर्ग झाल्यानंतर अंदाजे दोन ते 21 दिवसांच्या दरम्यान याची लक्षणं दिसू लागतात.

लक्षणे काय आहेत?

याची सुरुवातीची लक्षणे अचानक दिसतात. ती फ्लू सारखी असतात. त्यात ताप, डोकेदुखी आणि थकवा यांचा समावेश असतो.

आजार जसजसा वाढत जातो, तसतसा उलट्या आणि जुलाब असा त्रास सुरू होतो आणि शरीराच्या अवयवांचे कार्य मंदावते. काही रुग्णांमध्ये अंतर्गत आणि बाह्य रक्तस्त्रावही होऊ शकतो.

इबोला कुठून येतो?

एखाद्या व्यक्तीला फळं खाणाऱ्या वटवाघळांसारख्या संक्रमित प्राण्यांकडून इबोलाची लागण होते, तेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो.

लस आहे का?

इबोलाच्या झाईर प्रजातीसाठी लस आहे, पण बुंदीबुग्योसाठी सध्या लस नाही.

काँगोमधील इबोलाची 17 वी साथ

इबोलाचा सर्वात आधी शोध 1976 मध्ये सध्याच्या डीआर काँगोमध्ये लागल्याचं समोर आलं. त्याचा प्रसार वटवाघळांपासून झाला असावा असं मानलं जातं. काँगोमध्ये सध्या आलेली साथ देशातील या प्राणघातक विषाणूजन्य रोगाची ही 17 वी साथ आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, इबोलावर कोणताही उपचार नसून त्याचा सरासरी मृत्यूदर सुमारे 50% आहे.

आफ्रिका सीडीसीनं यापूर्वी रवामपारा आणि बुनिया या शहरी भागांमुळं आणि मोंगवालूमधील खाणकामामुळे पुढे प्रसार होण्याचा अधिक धोका असल्यानं त्यांना चिंता आहे, असं म्हटलं होतं.

इबोला

फोटो स्रोत, AFP via Getty Images

आरोग्य संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. जीन कासेया यांनी, बाधित भाग आणि शेजारील देशांदरम्यान होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येच्या स्थलांतरामुळं त्यांच्यात प्रादेशिक समन्वय देखील अत्यावश्यक आहे.

गेल्या 50 वर्षांत आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूमुळे सुमारे 15,000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

डीआर काँगोमधील सर्वात प्राणघातक उद्रेक 2018 ते 2020 दरम्यान झाला होत. त्यावेळी जवळपास 2300 लोकांचा मृत्यू झाला होता.

गेल्या वर्षी एका दुर्गम भागात साथीचा रोग पसरल्यानंतर 45 लोकांचा मृत्यू झाला होता.

(जेम्स गॅलाघर यांचे अतिरिक्त वृत्तांकन)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.