विठ्ठल रामजी शिंदे कोण होते, ज्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नावर थेट महात्मा गांधींना सुनावले होते?

    • Author, प्रविण सिंधू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 13 मिनिटे

"प्रिय महात्माजी, खादी आपल्या मनात पहिल्या क्रमांकावर, हिंदू-मुस्लीम ऐक्य दुसऱ्या क्रमांकावर आणि अस्पृश्यता कदाचित तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण माझ्या दृष्टीने अस्पृश्यता पहिल्या क्रमांकावर आहे."

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हे असं स्पष्टपणे सांगणारी व्यक्ती आहेत विठ्ठल रामजी शिंदे.

इतकंच नाही, तर "तुमच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या घोषणांमध्ये आणि प्रत्यक्ष कृतीत या दुर्दैवी अस्पृश्यांबाबत (तथाकथित हिंदू) किती तफावत आहे हे आपल्याला माहिती आहे", असंही पुढे ते नमूद करतात.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर महात्मा गांधींचा प्रचंड प्रभाव होता. असं असतानाही त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या मुद्द्यावर गांधींना हे सगळं सुनावलं होतं.

आज (23 एप्रिल) वि. रा. शिंदे यांचा जन्मदिन.

त्यानिमित्ताने तत्कालीन जमखंडी संस्थानच्या गावात (सध्या कर्नाटक राज्यात) 1873 मध्ये जन्म झालेल्या वि. रा. शिंदे यांची जडणघडण कशी झाली होती? त्यांच्यावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव होता, ते कसे बदलत गेले, त्यांची मुल्यव्यवस्था काय होती आणि आयुष्यभर त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर काम केलं? हे समजून घेऊयात.

वि. रा. शिंदे यांची जडणघडण कशी झाली?

वि. रा. शिंदे यांचा जन्म एका मराठा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई. त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला.

घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते. ते पंढरपूरचे वारकरी होते. घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे होते. त्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनावर घरातील वारकरी सांप्रदायिक वातावरणाचा प्रभाव झाला.

त्यांना मराठी व कानडी या भाषा चांगल्या अवगत होत्या. पुढे ते संस्कृत, पाली, इंग्रजी व इतर प्राकृत भाषा शिकले.

शिंदे हे जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून 1891 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 1893 मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले.

शिंदे यांची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळे विठ्ठरल रामजी शिंदेंनी तिलाही पुण्याला आणून हुजूरपागा शाळेत घातले.

पुण्यात फर्ग्युसनमध्ये शिकत असताना त्यांना डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. 1898 साली ते बी. ए. झाले आणि एल्‌. एल्‌. बी.च्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला.

पुढे बडोदे संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर सयाजीराव महाराजांनी त्यांना दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली.

1892 मध्ये ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला गेले. तेथे मिल्, स्पेन्सर आणि आगरकर यांच्या 'नास्तिकवादा'कडे ते काही काळ आकर्षित झाले. काही काळाने त्यांच्या दृष्टिकोनात पुन्हा बदल झाला.

1895 मध्ये रेव्ह. जी. टी. संडरलँड या अमेरिकन युनिटेरियन धर्मनिष्ठाने व्याख्यान ऐकून व त्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर युरोपातील युनिटेरियन या उदार धर्ममताशी त्यांची ओळख झाली. तसेच वैचारिकदृष्ट्या वारकरी संप्रदायाशी व युनिटेरियन धर्मप्रणालीशी जुळणाऱ्या प्रार्थनासमाजाकडे ते वळले.

आपल्यातील बदलावर स्वतः विठ्ठल रामजी शिंदे यांनी 'माझ्या आठवणी व अनुभव' यात म्हटलं, "मिलस्पेन्सरच्या विचारामुळे जो बंडखोरपणा माझ्या मनात व भोवताली माजला होता त्यांत माझ्या आत्म्याची भूक शमविण्याची शक्ती नव्हती. नास्तिकपणाच्या वाळवंटात मनाची तहान भागणे शक्य नव्हते."

वि. रा. शिंदेंवर एकेश्वरवादी प्रार्थनासमाजातील न्या. रानडे, रा. गो. भांडारकर, का. बा. मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा प्रभाव पडला. 1898 मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. त्याच वर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईला गेले.

मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर 'ब्रिटिश ॲण्ड फॉरिन असोसिएशन'ने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली.

1901 ते 1903 ही 2 वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेज येथे तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. समाजाचा, समाजशास्त्राचा आणि अस्पृश्यतेसह अनेक सामाजिक समस्यांचा त्यांनी शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास केला.

वि. रा. शिंदे यांच्या साहित्याचे अभ्यासक गो. मा. पवार यांच्यामते, असा अभ्यास करणारे ते भारतातील पहिले शास्त्रज्ञ - अभ्यासक मानले जातात.

शिंदे भारतात येण्यापूर्वी सप्टेंबर 1903 मध्ये ॲमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. येथे त्यांनी 'हिदुस्थानातील उदारधर्म' या विषयावरील निबंध सादर केला.

ते ऑक्टोबर 1903 मध्ये मुंबईला परत आले. 1903 च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. साधारणपणे 1903 ते 1910 या काळात त्यांनी एकेश्वरवादी तत्त्वज्ञानाचा प्रचार करत प्रार्थना समाजाचे कार्य केले.

पुढे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापन करून धडाडीने चालविलेले काम आणि त्यांची राजकारणाविषयी जहाल मते मुंबई प्रार्थनासमाजातील धुरीणांना पसंत नसल्याने प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध अखेर 1910 मध्ये संपुष्टात आला. त्यानंतरदेखील त्यांचे धर्मकार्य चालूच राहिले.

त्यांनी 1923 मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले. 1928 मध्ये त्यांनी पुण्यात कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले. 1933 पासून ते वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कामात सहभागी होत राहिले.

वि. रा. शिंदे आणि अस्पृश्यता निवारणाचे काम

शिंदे यांनी 1901 च्या खानेसुमारीचा आधार घेऊन भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याची मांडणी केली. त्यांनी ही भूमिका लेख आणि व्याख्यानाच्या माध्यमातूनही मांडली. तसेच अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचंही म्हटलं.

त्याप्रमाणे त्यांनी 16 ऑक्टोबर 1906 मध्ये न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली 'ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी स्वतः या संस्थेचे सेक्रेटरी राहून काम केले.

गो. मा. पवार यांच्या मते, "शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरविल्यामुळे या वर्गाला निकृष्ठपणा प्राप्त झाला. तो नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवायला हवे. दुसरीकडे उच्चवर्णियांच्या मनातील अस्पृश्यताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणेही महत्त्वाचे आहे", अशी शिंदे यांची भूमिका होती.

शिंदे यांनी 'ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या स्थापनेनंतर लगेच मुंबईत परळ, देवनार, कामाठीपुरा यांसारख्या भागांत अस्पृश्यांसाठी मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या.

निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवासदन सुरू केले. शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई-वडिल हे या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले.

मुंबईबाहेर पुणे, मनमाड, अकोला, अमरावती, नागपूर, महाबळेश्वर तसेच भावनगर, हुबळी, धारवाड, बंगलोर, चेन्नई इत्यादी ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या.

मिशनच्या स्थापनेनंतर 6 वर्षांतच शिंदे यांनी एकूण 14 ठिकाणी 23 शाळा, 55 शिक्षक, 1 हजार 100 मुले, 5 वसतिगृहे, अन्य 12 संस्था व 7 आजीव प्रचारक एवढा मिशनच्या कामाचा व्याप वाढवला. इतकंच नाही, तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील 7 प्रांतांत हे काम वाढविले.

1905 मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी रात्रशाळाही उघडली. 1912 मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्याला हलवले.

1908 मध्ये वि. रा. शिंदेंनी सयाजीराव गायकवाड यांच्या सूचनेवरून बडोदा येथे महाराजांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यवर्गाच्या स्थितीसंबंदी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले व ते लगेच 'बहिष्कृत भारत' या शीर्षकाखाली मासिक मनोरंजनात आणि नंतर पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाले.

वि. रा. शिंदे यांचा 'बहिष्कृत भारत'

भारतामध्ये पाळली जाणारी अस्पृश्यता म्हणजे एक भयंकर स्वरुपाचा बहिष्कार आहे. एकूण लोकसंख्येच्या सहावा हिस्सा असणाऱ्या अस्पृश्यवर्गाचे वर्णन त्यांनी 'बहिष्कृत भारत' असे केले.

"शिंदे यांनी केलेला हा 'बहिष्कृत भारत' शब्दप्रयोग डॉ. आंबेडकरांच्या मनाला इतका भावला की, त्यांनी पुढे सुरू केलेल्या आपल्या वृत्तपत्राचे नाव बहिष्कृत भारत असे ठेवले.", असेही मत अभ्यासक व्यक्त करतात.

शिंदे यांनी लिहिलेल्या 'बहिष्कृत भारत' लेखातील पहिलेच वाक्य आहे, "या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातीच्या इतिहासात जर कोठे, कधी, कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यात आला असेल आणि तो पुरातन काळापासून चालत येऊन आजू पूर्णदशेला पोहोचला असेल तर तो या भरतखंडातील नीच मानिलेल्या जातीवरचा भयंकर बहिष्कारच होय!"

अस्पृश्यतेचे वर्णन त्यांनी बहिष्कार या भेदक शब्दाने करून अस्पृश्यतेचे भयंकर, विदारक स्वरुप प्रकट केले आहे. यापुढील वाक्यात ते आवाहन करतात, "भारतवासीयांनो, स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरुन हा घातकी, पातळी आत्मबहिष्कार नाहीसा करा."

महात्मा फुले यांनी भोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती, ती जागा शिंदेंनी नगरपालिकेकडून संपादित केली. तसेच तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक साहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी 'अहल्याश्रम' ही इमारत बांधली.

त्यांच्या याच कामाची दखल घेत गो. म. पवार म्हणतात, "अस्पृश्यता निवारणकार्याचे 1920 पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले, तर विठठ्ल रामजी शिंदे हे या पर्वाचे प्रवर्तक ठरतात. पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत."

1923 मध्ये मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनिधीच्या स्वाधीन करून शिंदे मिशनबाहेर पडले. त्यानंतरही पर्वती मंदिरप्रवेश सत्याग्रह, अस्पृश्यांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघाची योजना इत्यादी बाबतींत ते अस्पृश्यवर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते. अस्पृश्यता निवारणकार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती, असं पवार सांगतात.

"अस्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले, त्याबद्दल त्यांचा 'कर्मवीर' आणि 'महर्षी' या उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो, असंही ते नमूद करतात.

वि. रा. शिंदे आणि महात्मा गांधी पत्रव्यवहार

विठ्ठल रामजी शिंदे यांनी 'अस्पृश्योद्धाराचा कार्यक्रम व तो पार पाडण्याची पद्धती' यावर महात्मा गांधी यांना एक टिपण पाठवलं होती. ते त्यांनी पटाडे यांच्या मार्फत गांधींकडे पाठवलं. मात्र, गांधींनी त्या चिट्ठीवर 'अत्यंत वाईट' अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर शिंदेंनी गांधींना पत्र लिहित ही चिट्ठी त्यांना 'अत्यंत वाईट' का वाटली अशी विचारणा करत गांधींच्या प्राधान्यक्रमावर भाष्य केलं.

या पत्रात ते म्हणतात, "तुमच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या घोषणांमध्ये आणि प्रत्यक्ष कृतीत या दुर्दैवी अस्पृश्यांबाबत (तथाकथित हिंदू) किती तफावत आहे हे आपल्याला माहिती आहे. नागपूर काँग्रेसच्या विषय समितीत मी सहभागी झालो, पण त्याचा काही उपयोग झाला नाही; अर्थात मी नेता नाही."

"त्यानंतर आपण आणि राजगोपालाचार्य यांच्याशिवाय कुठल्याही महत्त्वाच्या नेत्याने या लोकांच्या तक्रारींकडे लक्ष दिले नाही. दक्षिण भारतातील सत्याग्रहाचा मी स्वतः प्रत्यक्ष अभ्यास केला. आपण असूनही आपल्या (काँग्रेस) नेत्यांकडून तो सत्याग्रह दुर्लक्षित राहिला आहे. आपण वायकोमला जाऊ शकला नाहीत आणि पंडित मालवीयजीही गेले नाहीत."

"केवळ परंपरावादीच नव्हे, तर स्वतःला उदारमतवादी म्हणवणारे लोक, तसेच 'रचनात्मक' कामाचे आश्वासन देणारे गट, या प्रश्नावर अजूनही गंभीरपणे विचार करत नाहीत. कोणतीही देशी किंवा परदेशी संघटना/संस्था वंचित वर्गाला अजूनही राजकीय शक्ती म्हणून मान्यता देण्यास तयार नाही."

"पाटदे यांनी सांगितले की, त्यांनी मुंबईत उपस्थित असलेल्या देशातील सुमारे डझनभर मोठ्या नेत्यांना बेळगाव येथील आगामी अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली, पण सर्वांनी नकार दिला. आपण नागपूरमध्ये या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होता, हे आपल्याला आठवत असेल. पण आता इतक्या वर्षांच्या सहानुभूतीपूर्ण चर्चेनंतरही जवळजवळ सर्वजण या 'तिसऱ्या दर्जाच्या' प्रश्नासाठी वेळ काढू शकत नाहीत", असंही शिंदेंनी स्पष्टपणे लिहिलं.

शिंदेंच्या या पत्राला उत्तर देताना गांधी म्हणाले, "मी तुमची आधीची चिठ्ठी 'खूप वाईट' असे म्हटले कारण त्यात धमकीचा सूर होता. तुम्हीही याच क्षेत्रात काम करणारे आहात, हे माहीत असल्याने मी तसे बोललो. तुम्ही असे म्हणता की, माझ्या मनात अस्पृश्यतेला तिसरे स्थान आहे, ते चुकीचे आहे. अस्पृश्यतेचा विषय इतर मुद्द्यांइतकाच महत्त्वाचा आहे. या बाबतीत तुम्ही श्रेष्ठ आहात, कारण तुमच्यासाठी तोच एकमेव प्रश्न आहे."

दारूबंदीची चळवळ

अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याच्या मुख्य विषयाशिवाय वि. रा. शिंदे यांनी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या इतर चवळवळीही केल्या. मुलींसाठी सक्तीचे शिक्षण असावे याविषयी त्यांना जशी आस्था होती. तशीच मद्यपानाच्या व्यसनाचे दुष्परिणाम त्यांनी बघितलेले असल्यामुळे या सुधारणेकडेही त्यांनी लक्ष दिले.

प्रार्थनासमाजातील आपले एक सहकारी व विल्सन हायस्कुलातील नामांकित शिक्षक वामनराव सोहोनी यांना घेऊन ते 1906 सालच्या होळीच्या दिवशी परळ भागातील अस्पृश्यांची स्थिती समजून घेण्यासाठी गेले. तेथे दिसलेल्या दृश्यांचा त्यांच्या मनावर कोणते परिणाम झाले हे सांगताना वामनराव सोहोनी यांनी म्हटले, "आमच्या नजरेस जे करुणामय देखावे पडले त्यांची विस्मृती होणे शक्य नाही."

दारूच्या व्यसनाने खेडेगावातील असो की शहरातील असो, गरीब लोकांची पराकोटीची दुर्दशा होत होती. व्यसनाधीन माणसं किती वाईट वर्तन करतात, हे त्यांनी मांडलं. तसेच होळीच्या दिवसात तर या व्यसनाचा नीचतम स्वरूपाचा परिणाम दिसून येतो, असंही नमूद केलं.

1906-07 या काळात शिंदेंनी मद्यपानबंदीच्या चळवळीकडे लक्ष दिले. त्यावेळी पुण्यात टिळकांनी मद्यपाननिषेधाची चळवळ सुरू केली होती. या चळवळीमध्ये डॉ. भांडारकर यांच्यासारखे पुढारीसुद्धा सहभागी होत होते. शिंदेंनीही टिळकांच्या बरोबर या चळवळीत भाग घेतला. त्यांच्याबरोबर सभेमध्ये जाऊन व्याख्यानेही दिली.

1920 नंतर गांधींनी काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये मद्यपाननिषेधाच्या कार्यक्रमाला स्थान दिले आणि असहकारितेच्या चळवळीच्या काळात 'दारू पीना हराम है' अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. शिंदे यांनीही अशा चळवळीत भाग घेतला. 1930 च्या कायदेभंगातसुद्धा सत्याग्रह करताना अन्य घोषणांबरोबर मद्यपाननिषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या.

मुलींच्या सक्तीच्या शिक्षणासाठी चळवळ

तत्कालीन पुणे म्युनिसिपालटीने मुलींच्या सक्तीच्या शिक्षणाबाबत चालढकल चालवली होती. त्यासाठी आर्थिक अडचणीचं कारण पुढे करण्यात आलं. पुणे शहरात या चळवळीचा झालेला परिणाम म्हणून मुंबई कायदेकौन्सिलातही मुंबई इलाख्यासाठी मुले आणि मुली या दोघांसाठी सक्तीचे शिक्षण सुरू करण्यासंबंधी बिल आणण्याचा प्रयत्न चालला होता.

रँ. र. पु. परांजपे हे त्या वेळी शिक्षणमंत्री होते व ते सक्तीच्या शिक्षणाला अनुकूल होते. त्यांच्याच प्रयत्नाने हे बिल आणण्याचे प्रयत्न चालू होते. परंतु सरकार मात्र आर्थिक कारण पुढे करत होतं. त्यावेळी लोकांकडून सक्तीचे शिक्षण व मद्यपानवंदी या दोन्ही मागण्या पुढे केल्या जायच्या.

त्यावर सक्तीचे शिक्षण सुरू करावयाचे तर दारूबंदी करता येणार नाही. दारू दुकानाचे परवाने आणि अबकारी करापासून मिळणारे उत्पन्न सरकारला सोडता येणार नाही, असा पेच सरकारच्या वतीने टाकण्यात आला.

सरकारच्या या भूमिकेवर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मद्यपानबंदीबाबत आपली आग्रही भूमिका मांडली. 1922 मध्ये वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ह्या प्रश्नावर 'दारूचा व्यापर, सरकार आणि बहुजन समाज' ह्या विषयावर एक व्याख्यान दिले. यात त्यांनी सरकारच्या दुटप्पी आणि दांभिक भूमिकेवर परखड शब्दांत टीका केली.

आपल्या भाषणात ते म्हणाले, "सुशिक्षित वर्ग, भांडवलवाले वगैरे आपल्या हिताची काळजी घेण्यास समर्थ आहेत. या विषयाचा बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टीने आपल्याला विचार करावयाचा आहे. पुढारलेल्या वर्गात दारू पिणाऱ्या काही अपवादात्मक व्यक्ती असू शकतात. उलटपक्षी बहुजन समाजात अशा कित्येक जाती आढळतील की या प्रकारची सक्ती केल्याशिवाय त्यांची दारूच्या व्यसनातून मुक्तता होणार नाही."

"दारूसारख्या निषिद्ध वस्तूचा उघड्या छातीने व्यापार चालविण्याचा अधिकार सरकारला आहे की नाही, असा माझा मुख्य मुद्दा आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दारूचे दुकान उघडण्याच अधिकार जसा कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला नाही तसाच तो सरकारलाही नाही. कारण सरकार ही केवळ एक मानवी संस्था आहे."

"एकाच्या दारूबाजीचा फायदा दुसऱ्याने घेणे हे उघड उघड अनीतीचे आहे, तर ही अनीती राजकारणासाठी सरकारलाही आचरण्याचा अधिकार नाही व असू नये", असं मत त्यांनी व्यक्त केलं.

आधुनिक राजकारणात दारूच्या व्यापाराचा व्यभिचार शिरला आहे. हल्ली दारूचे दुकान उघड मांडून त्याच्या बळावर सरकार दरबारात सरदारी पटवणारे लोकच सरकारचे मुख्य आश्रयदाते झाले आहेत."

या प्रश्नाची आर्थिक बाजू स्पष्ट करताना चालू बजेटाचा आधार घेत शिंदे म्हणाले, "मुंबई इलाख्याची लोकसंख्या आदमासे 2 कोटी आहे हे लक्षात घेतले तर दरमाणशी शेतकीचा कर अडीच रुपये, तर दारूबाजीबद्दल दरमाणशी 2 रुपये आहे. तरी सरकारी माहिती खात्याकडून मुंबई इलाखा 'दारूबाज' नाही अशी आरोळी ठोकण्यात येते."

"दारू पिऊन जे गुन्हे केल्याचे कोष्टक 1920-21 सालच्या अबकारी खात्याच्या रिपोर्टात सरकारने प्रसिद्ध केले आहे, त्यात कुलाबा जिल्ह्यात 37, पुणे जिल्ह्यात 1208 गुन्हे घडून त्यांना शिक्षाही ठोठावण्यात आल्याचे नमूद केले आहे."

मुंबई सरकारचे जाहीर निवेदन आणि आकडेवारी यातील विसंगती लक्षात आणून देत शिंदेंनी म्हटले, "सरकारने शेतकी सोडून दारूबाजी ही सर्वात अधिक उत्पन्नाची बाब करून ठेवली आहे."

सरकारने दारूची निर्मिती बंद करावी म्हणजे विक्रीचा प्रश्नच राहात नाही. केवळ औषधोपचारासाठी लायन्सस देऊन इतर विषाप्रमाणे दारूला विष समजून औषधापुरता त्याचा खप सरकारने चालू ठेवावा, असेही शिंदेंनी सुचवले.

शिमग्यातील अनिष्ट प्रथा

शिंदेंनी शिमग्याच्या दिवसात रूढीच्या नावाखाली होणारा अनाचार, अत्याचार आणि होळीच्या दिवशी अभद्र, अश्लील बोलण्याला व ओंगळपणाची घाणेरडी कृत्ये करण्याला जोरदार विरोध केला.

विठ्ठल रामजी लहान असताना जमखंडीसारख्या गावी शिमग्याच्या दिवसांत इतर मुलांसमवेत या गोंधळामध्ये सहभागी होत असत. त्याबाबतचा एक प्रसंगही त्यांनी आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात नमूद केला आहे. तेच विठ्ठल रामजी शिंदे मोठेपणी शिमग्यातले अनाचार व अत्याचार बंद करून त्या दिवसाला महाराष्ट्रभर होलिका संमेलनाचे स्वरूप देणारे सुधारक ठरले.

1907 मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य वस्तीतील ग्लोब मिलच्या मैदानात पहिले होलिको संमेलन भरविले. त्यासाठी सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले. यावेळी मुलांमध्ये खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि इतर मनोरंजक कार्यक्रम घडवून आणले गेले.

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने सोशल सर्व्हिस लीग ही संस्था स्थापन करून सुप्रसिद्ध कामगार पुढारी नारायण मल्हार जोशी यांच्यामार्फत ही चळवळ चालविली. 1913 पासून म्हणजे शिंदे पुण्यात आल्यापासून त्यांनी या चळवळीकडे जास्त लक्ष दिले.

यावर्षी पुण्याला किर्लोस्कर थिएटरमध्ये मिरजेचे अधिपती बाळासाहेब पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मोठी सभा भरवण्यात आली. फर्ग्युसन व शेतकी कॉलेजातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी प्रामुख्याने या सभेत भाग घेतला.

पुढे दरवर्षी शिंदे यांनी हा प्रयत्न चालूच ठेवला आणि महाराष्ट्रात होळीच्या दिवशी ओंगळ प्रकार करण्याचे बंद करून त्याला अधिक चांगल्या कार्यक्रमाचे स्वरूप मिळावे यासाठी महाराष्ट्रभर चळवळ चालवली.

त्यांनी मुंबई इलाख्याचे विद्याधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांच्यामार्फत खेड्यापाड्यांतील शाळेतील शिक्षकांपर्यंत ही चळवळ पोहोचवली. त्यामुळे शिमग्याच्या सणाच्या वेळी मुलांमार्फत सभा भरवून, त्यात भाषणे व संवाद घडवून आणले. तसेच खेळाच्या स्पर्धा आयोजित करून शिमग्याच्या सणाला चांगले स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू झाला.

शाळाशाळांमधून अशा प्रकारच्या प्रयत्नांचा परिणाम मोठ्या माणसांवरही चांगल्या प्रकारे दिसला आणि शिमग्याच्या या अनिष्ट चालीला क्रमशः आळा बसत गेला.

दुष्काळातील कार्य

1920-21 मध्ये अहमदनगर व पुणे जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 1 हजार मांग मंडळी पुण्याच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचा आश्रय मिळावा यासाठी तेथे आली आणि मिशनच्या पटागंणात थांबली. ते कडक हिवाळ्याचे दिवस होते. तेथे आलेले लोक भुकेपोटी होते आणि अंगावर कपडेही नव्हते.

ही परिस्थिती पाहून शिंदेंनी प्रथम जी. जी. ठकार यांच्यासह सर्व कुटुंबांची पाहणी करून मिशनतर्फे मदत देण्यास सुरुवात केली. तेवढ्याने प्रश्न सुटणार नाही हे ओळखून पुणे शहर म्युनिसिपालटीच्या दिवाणखान्यात म्युनिसिपालटीचे अध्यक्ष ल. गो. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली 'दुष्काळ आपत्ती निवारक कमिटी' स्थापना करण्यात आली.

या कमिटीच्या वतीने गरजुंसाठी धान्य, कपडे व पैसे जमविण्यात आले. मदत गोळा करण्यासाठी 6 केंद्रे निश्चित करण्यात आली. दुष्काळग्रस्तांना राहण्यासाठी एक कच्चा विटांची झोपडीवजा चाळ बांधण्यात आली आणि भला मोठा मंडपही उभारण्यात आला.

पुण्याचे कलेक्टर हडसन यांनी मामलेदारांना सूचना देऊन त्या दष्काळग्रस्तांना तांदूळ, जोंधळे, डाळ वगैरे देण्याची सोय करून दिली. स्वयंसेवकांकडून गोळा करण्यात आलेले कपडे दुष्काळग्रस्तांना वाटण्यात येऊ लागले. कामाला सक्षम माणसांसाठी मिशनच्या पटांगणात घातलेल्या मांडवात तागाच्या आणि वाखाच्या दोऱ्या वळण्याचे काम सुरू करण्यात आले.

वृद्ध माणसांना ज्वारी, बाजरी, तांदूळ मोफत पुरविण्यात आले; तर अपंग-अनाथांना स्वयंपाक करून अन्न पुरवण्यात येऊ लागले. आजारी दुष्काळग्रस्तांसाठी औषधपाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. या कमिटीचे काम 15 मार्च 1921 पर्यंत चालले आणि मग जाहीर सभा घेऊन कमिटीचा अहवाल सादर करत कमिटी बरखास्त करण्यात आली.

वि. रा. शिंदे यांचे इतर काम

शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील 1930 च्या कायदेभंगाच्या चळवळीतही भाग घेतला. त्याबद्दल त्यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली.

1907 मध्ये देवाच्या नावावर मुलींना अनीतीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था स्थापन करण्यात आली. त्या संस्थेचे एक कार्यवाह म्हणून शिंदेंनी काम केले.

1911 मध्ये मुंबईत एक 'मुरळी प्रतिबंधक परिषद'ही भरविली. 1918 च्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे, यासाठीही त्यांनी चळवळ केली.

पुणे येथे 1928 मध्ये भरलेल्या 'मुंबई इलाखा शेतकरी परिषदे'चे नेतृत्व शिंदे यांनी केले. अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली.

1926 ते 1932 या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडणी करताना शेतकऱ्यांनी एकी दाखवावी, कामगारांसोबत एकजूट करावी आणि उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे, अशी भूमिका मांडली.

समाजसुधारणेच्या कामातही आवर्जून केलेलं संशोधन-अभ्यास

विठ्ठल रामजी शिंदे जसे समाजसुधारक होते, तसे ते अभ्यासक-संशोधकही होते. त्यामुळेच त्यांनी सामाजिक कामाच्या धावपळीतही वेळ काढून संशोधनपर, वैचारिक व ललित स्वरूपाचे महत्त्वपूर्ण लेखन केले.

अस्पृश्यताविषयक संशोधन हा त्यांच्या प्रमुख आस्थेच्या विषयांपैकी एक होता. अस्पृश्यवर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबधी 1905 मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मरमध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला.

त्यांनी 1908 मध्ये 'बहिष्कृत भारत', 1922 मध्ये 'अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास', 1927 मध्ये 'ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग'असे लेख लिहिले. याशिवाय 1933 मध्ये 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा समाजशास्त्रीय प्रबंधही लिहिला.

त्यांच्या या प्रबंधात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास, बुद्धपूर्वकाळापासून वर्तमानकाळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे, त्यांचा इतिहास, धर्म, सामाजिक स्थिती, राजकारण इत्यादी विषयांचे विवेचन केले. तसेच अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते व धर्माने ते बौद्ध होते हे मत त्यांनी विविध प्रकारचे पुरावे व आधार देऊन मांडले.

त्यांनी बडोदे येथील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यवर्गाच्या स्थितीबद्दल अभ्यासपूर्ण व्याख्यानही दिले. ते 'बहिष्कृत भारत' या पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध झाले.

त्यांनी कानडी आणि मराठी या भाषांमधील संबंधांचा सविस्तर अभ्यास केला. तसेच कानडीचा शब्दसंग्रह व व्याकरण यांचा मराठीवर मोठा प्रभाव पडला आहे, हे त्यांनी दाखवले.

'भागवत धर्माचा विकास' या लेखमालेमध्ये भक्ती या तत्त्वाचा विकास प्राचीन काळापासून वर्तमानकाळापर्यंत कसकसा होत गेला, यावर त्यांनी मांडणी केली.

बी. बी. केसकर यांनी 'विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश' (1912) हे पुस्तक प्रकाशित केलं. त्यात प्राधान्याने प्रार्थनासमाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेसाठी त्यांनी इंग्लंडहून लिहून पाठविलेले लेख, नंतर भारतात आल्यावर प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद पत्करल्यानंतर त्यांनी वेळोवेळी दिलेली व्याख्याने, कौटुंबिक उपासनेच्या वेळी तसेच सार्वजनिक नित्य आणि नैमित्तिक उपासनेच्या वेळी केलेले उपदेश असे एकंदर 86 लेख आहेत.

तसेच 'शिंदे लेखसंग्रह' (1963) या पुस्तकात पुढील कार्यकाळातील अनेकविध सामाजिक, शैक्षणिक व संशोधनपर विषयांवरील लेख आहेत.

त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवासवर्णनपर, व्यक्तिविषयक व अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन 'धर्म, जीवन व तत्त्वज्ञान' (1979) या ग्रंथात एकत्रित करण्यात आले आहेत.

शिंदे यांनी 1901-1903 या काळात इंग्लंडमध्ये असताना आणि 1930 मध्ये येरवड्याच्या तुरुंगात असताना रोजनिशी लिहिली. त्याचे प्रकाशन 1979 मध्ये झाले. 'माझ्या आठवणी व अनुभव' या त्यांच्या आत्मपर पुस्तकाचे प्रकाशन 1943 मध्ये झाले.

या लेखनातून त्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण, तरल संवेदनशीलता, सूक्ष्म सौंदर्यदृष्टी आणि प्रसन्न विनोदवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष प्रत्ययाला येतात, असं निरिक्षण पवार नोंदवतात.

त्यांचे पुणे येथे निधन झाले.

संदर्भ -

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र साहित्य - गो. मा. पवार
  • विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव
  • विठ्ठल रामजी शिंदे, शिंदे लेखनसंग्रह
  • मराठी विश्वकोष

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)