जगातील सर्वात वेदनादायक डंख कुणाचा? 'या' शास्त्रज्ञानं स्वतःवरच भयानक डंख का मारून घेतले?

जपानी जायंट हॉर्नेटचा डंख ज्याला "मर्डर हॉर्नेट" म्हणूनही ओळखले जाते. याचे कोयोटी पीटरसन यांनी "माईक टायसनने चेहऱ्यावर मारलेल्या जोरात पंच" सारखे वर्णन केले आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जपानी जायंट हॉर्नेटचा डंख ज्याला "मर्डर हॉर्नेट" म्हणूनही ओळखले जाते. याचे कोयोटी पीटरसन यांनी "माईक टायसनने चेहऱ्यावर मारलेल्या जोरात पंच" सारखे वर्णन केले आहे
    • Author, एलिझाबेथ अ‍ॅन ब्राउन
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

जगातील सर्वात भयंकर डंख मारणाऱ्या जीवांमध्ये बुलेट अँट्स (जमिनीवर वावरणारी मोठी मुंगी), वॉरियर वास्प (हवेत झेपावणारी भयानक गांधीमाशी) आणि छोट्या जेलीफिशचा समावेश होतो.

यांपैकी सर्वात वेदनादायक डंख कोणाचा आहे हे शोधण्यासाठी काही धाडसी तज्ज्ञांनी स्वतःला डंख मारून घेण्यात आपले आयुष्य घालवले आहे.

तुम्हाला बॉक्सर माईक टायसनचा जोरदार पंच खावासा वाटेल की किडनीवर जॅकहॅमर चालवून घ्यायला? जगातील दोन सर्वात जास्त वेदना देणाऱ्या डंखांची तुलना नेमकी याच शब्दांत केली जाते. पण यापैकी कोणता डंख सर्वात वाईट आहे हे पूर्णपणे तुमच्या सहनशक्तीवर आणि निवडीवर अवलंबून आहे.

आपल्या अंगणात फिरणारे छोटे कीटक असोत किंवा समुद्रातील विचित्र जीव हे सर्व स्वतःचे रक्षण करण्यासाठी किंवा शिकार पकडण्यासाठी न्यूरोटॉक्सिन आणि सूज आणणाऱ्या रसायनांचा वापर करतात.

कोळी किंवा सापासारखे प्राणी दंश करण्यासाठी त्यांच्या दातांचा वापर करतात. पण डंख मारणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत मात्र तुम्हाला त्यांच्या शरीराच्या दुसऱ्या टोकापासून म्हणजेच नांगीपासून सावध राहण्याची गरज आहे.

प्राण्यांच्या विश्वात सर्वात जास्त वेदना देणारे डंख कोणाचे आहेत हे आम्ही तज्ज्ञांना विचारले. यामध्ये तो डंख किती जीवघेणा आहे हे बाजूला ठेवून केवळ त्याच्या वेदनांचा विचार केला आहे. तज्ज्ञांच्या मते त्यांचा क्रम खालीलप्रमाणे आहे :

डंख मारणारे कीटक - वास्प (मधमाशीसारखी दिसणारी गांधीमाशी, मुंग्या आणि मधमाश्या

ॲरिझोनाचे हे कीटकशास्त्रज्ञ इतके धाडसी होते की, त्यांनी मधमाश्या, गांधीमाश्या, वास्प आणि मुंग्या अशा किमान 96 प्रजातींच्या कीटकांकडून स्वतःला डंख मारून घेतले जेणेकरून ते त्यांच्या वेदनांचा अभ्यास करू शकतील.

या वेदना किती तीव्र आहेत यानुसार त्यांनी या वेदनांचे 4 स्तरांमध्ये वर्गीकरण केले आणि प्रत्येक वेदनेचे वर्णन एखाद्या कवीसारखे अतिशय रंजक भाषेत केले आहे. सुदैवाने, श्मिट हे फक्त एक शास्त्रज्ञच नव्हते तर त्यांच्यात एक असा कवी दडला होता जो मृत्यूच्या दारातील वेदनांनाही शब्दांत मांडू शकला.

लेव्हल 3 मध्ये सात अशा प्रजाती आहेत ज्या श्मिट यांना खऱ्या छळाचा अनुभव देतात. यात 'डॅसिमुटिला क्लुगी' (Dasymutilla klugii) बद्दल ते म्हणतात, "हा डंख अतिशय स्फोटक आणि बराच काळ टिकणारा आहे, याच्या वेदनेने तुम्ही वेड्यासारखे ओरडाल. जणू काही कढईतील उकळते तेल तुमच्या संपूर्ण हातावर सांडले आहे."

संपूर्ण अभ्यासात फक्त 3 प्रजाती अशा होत्या, ज्यांना श्मिट यांनी सर्वात वरची म्हणजे लेव्हल 4 ची श्रेणी दिली.

पहिला स्तर अगदी सामान्य वेदनांचा आहे. उदाहरणार्थ, 'अँथोफोरीड' मधमाशीचा डंख जो श्मिट यांच्या मते अगदी सुखद असतो जणू काही तुमच्या प्रिय व्यक्तीने तुमच्या कानाच्या पाळीला थोडं जोरात चावा घेतला आहे.

डंख

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुसऱ्या स्तरावर मात्र काही भयानक डंख आहेत. जसे की 'हनी वास्प'चा डंख हा अतिशय तिखट आणि फोड आणणारा. जणू काही हॅबनेरो मिरचीच्या म्हणजे जी जगातील सर्वात तिखट मिरच्यांपैकी एक मानली जाते तिच्या सॉसमध्ये बुडवलेला कापसाचा बोळा कोणीतरी तुमच्या नाकात खुपसला आहे.

त्यानंतर येते 'ब्लॅक पॉलिबिया' वास्प- याचा डंख म्हणजे जणू काही जुन्या चर्चमधील गॅस दिवा पेटवताना त्याचा तुमच्या तोंडावरच स्फोट झाला आहे.

लेव्हल 3 मध्ये सात अशा प्रजाती आहेत ज्या श्मिट यांना खऱ्या वेदनेचा अनुभव देतात. यात 'डॅसिमुटिला क्लुगी' (Dasymutilla klugii) बद्दल ते म्हणतात की, "हा डंख अतिशय स्फोटक आणि बराच काळ टिकणारा आहे. याच्या वेदनेने तुम्ही वेड्यासारखे ओरडाल. जणू काही कढईतील उकळते तेल तुमच्या संपूर्ण हातावर सांडले आहे. संपूर्ण अभ्यासात फक्त 3 प्रजाती अशा होत्या ज्यांना श्मिट यांनी सर्वात वरची म्हणजे लेव्हल 4 ची श्रेणी दिली.

श्मिट यांच्या यादीत लेव्हल 4 वर असणारा पहिला जीव म्हणजे 'बुलेट अँट' (Bullet Ant). मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात आढळणारी ही एक इंच लांब मुंगी आहे. हिचा डंख इतका भयानक असतो की त्याचा त्रास पूर्ण 24 तास टिकतो. म्हणून हिला 'ट्वेंटी फोर अवर अँट' (24 तासांची मुंगी) म्हणतात. श्मिट या वेदनेचे वर्णन करताना म्हणतात की "ही वेदना अतिशय तीव्र आणि प्रखर असते. जणू काही टाचेत 3 इंच लांब खिळा आरपार घुसावा आणि तशाच अवस्थेत तुम्ही धगधगत्या कोळशावरून चालत जावे."

यानंतर क्रमांक लागतो 'टेरँटुला हॉक' (Tarantula Hawk) या वास्पचा. हा कोळ्यांची शिकार करणारा वास्प एका गोल्फ टी (Golf tee) च्या आकाराचा असतो आणि तो जगभरात आढळतो. याच्या डंखाबद्दल श्मिट लिहितात, "हा डंख डोळे दिपवणारा, भयंकर आणि एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा असतो. जणू काही तुमच्या गरम पाण्याच्या बाथटबमध्ये चालू असलेला हेअर ड्रायर पडला आहे. विशेष म्हणजे या डंखाचा परिणाम फक्त काही मिनिटेच टिकतो."

डंख

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सांकेतिक फोटो

या यादीतील शेवटचा आणि भयानक जीव म्हणजे 'वॉरियर वास्प', जो मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलात समूहाने आढळतो. याच्या वेदनेचे वर्णन करताना श्मिट लिहितात की, "हा निव्वळ छळ केल्यासारखा आहे. जणू काही तुम्हाला साखळदंडाने बांधून धगधगत्या ज्वालामुखीच्या लाव्हा रसात फेकून दिले आहे. या वेदना अनुभवताना मला प्रश्न पडला की, मी हा शोध घेण्याचा प्रयत्नच का केला?

पार्किन्सनच्या आजारामुळे 2023 मध्ये श्मिट यांचे निधन झाले पण त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम कोयोटी पीटरसन (Coyote Peterson) करत आहेत. कोयोटी हे युट्यूबवरील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांनी स्वतःला अशा अनेक कीटकांकडून डंख मारून घेतले आहेत ज्यांचा श्मिट यांनी कधीच अभ्यास केला नव्हता. कोयोटी यांच्याकडे श्मिट यांच्यासारखे शास्त्रीय शिक्षण नसले तरी लाखो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि शिक्षणासाठी ते स्वतःच्या डाव्या हाताचा त्याग करायला नेहमी तयार असतात. त्यांच्या 'ब्रेव्ह वाइल्डरनेस' (Brave Wilderness) चॅनेलवर त्यांना वेदनेने तळमळताना आणि ओरडताना लाखो लोक पाहतात.

कोयोटी पीटरसन यांच्यासाठी श्मिट यांचा 'पेन इंडेक्स' एखाद्या दिशादर्शकासारखा होता. श्मिट यांच्या 2016 मध्ये आलेल्या 'स्टिंग ऑफ द वाइल्ड' या पुस्तकाची जणू "फिल्मी आवृत्ती" तयार करण्याचा त्यांचा उद्देश होता. ते म्हणतात, "आपण 1 ते 4 या स्केलचा आदर करूया पण जगात लेव्हल 4 वर येणारे आणखी कोणते जीव आहेत, याचा शोध घेऊया."

जगभरातील 30 वेगवेगळ्या कीटकांचे डंख सोसल्यानंतर, पीटरसन यांनी लेव्हल 4 साठी आणखी दोन नावांची शिफारस केली आहे. यात 2020 मध्ये 'मर्डर हॉर्नेट' (Murder Hornet) म्हणून गाजलेल्या 'जॅपनीज जायंट हॉर्नेट'चा आणि 'एक्झिक्यूशनर वास्प'चा (Executioner Wasp) समावेश होतो.

पीटरसन म्हणतात, "जपानच्या जायंट हॉर्नेटचा डंख हा निःसंशयपणे सर्वात भयानक होता जणू काही माईक टायसनने तुमच्या तोंडावर जोरात पंच मारला आहे. तो इतका वेगवान आणि स्फोटक होता की माझ्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधारी आली."

मुळचा आशियातील असलेला हा हॉर्नेट 2019 ते 2024 दरम्यान अमेरिकेच्या पॅसिफिक नॉर्थवेस्ट भागात चांगलाच चर्चेत राहिला होता.

कोयोटी पीटरसनच्या मते 'एक्झिक्यूशनर वास्प' हा आजवरचा सर्वात भयानक कीटक आहे. ते म्हणतात, "त्याच्या डंखाच्या वेदना साधारण 12 तास टिकल्या." मात्र केवळ वेदनाच नाही तर त्या विषाचे जे दुष्परिणाम झाले त्या डंखाच्या खुणा त्याच्या शरीरावर कायमच्या कोरल्या गेल्या.

पीटरसन सांगतात, "या विषात पेशी मारून टाकण्याचे असे काही गुणधर्म होते की ज्यामुळे माझ्या हातावरील त्वचा कुजली आणि तिथे एक खोल खड्डा पडला. हा एकमेव असा डंख होता ज्याने माझे मांस अक्षरशः पोखरून काढले. आजही माझ्या हातावर एखाद्या सिगारेटच्या चटक्यासारखा व्रण आहे."

शास्त्रज्ञांना अजूनही या 'एक्झिक्यूशनर'च्या विषाचे नेमके घटक शोधता आलेले नाहीत परंतु याच्याशी संबंधित इतर काही कीटक अशा एन्झाइम्सचा (Enzymes) वापर करतात जे शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवतात.

जेलीफिश - स्पर्शाला मऊ असले, तरी डंख मात्र जीवघेणा

जेलीफिश दिसायला बुळबुळीत असले तरी जेलीफिशच्या शरीरात 'नेमॅटोसिस्ट्स' नावाच्या छोट्या पेशी असतात ज्यांची रचना एखाद्या भाल्यासारखी असते. या पेशींतून ते अत्यंत वेदनादायक विष समोरच्या जीवाच्या शरीरात सोडतात. यात सर्वात भयानक अनुभव येतो तो 'इरुकांजी जेलीफिश' (Irukandji jellyfish) मुळे. हा जेलीफिश आकाराने अतिशय लहान असतो पण त्याचे तंतू मात्र 1 मीटरपर्यंत लांब असू शकतात. याच्या संपर्कात आल्यास 'इरुकांजी सिंड्रोम' नावाचा त्रास होतो जो एखाद्या मध्ययुगातील क्रूर छळासारखा वाटतो.

जेलीफिश संशोधक लिसा-अॅन गर्शविन यांच्या मते, या जेलीफिशचा डंख सुरुवातीला अजिबात जाणवत नाही. अनेक लोकांना तर डंख मारल्याचे लक्षातही येत नाही. लक्षणे दिसायला वेळ लागत असल्यामुळे अनेक दशके डॉक्टरांना हेच समजत नव्हते की समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांना इतका भयानक त्रास का होत आहे. अखेर जॅक बार्न्स नावाच्या स्थानिक डॉक्टरांनी 4 वर्षे या छोट्या जीवाचा शोध घेतला. 1961 मध्ये त्यांनी स्वतःला त्यांच्या 10 वर्षांच्या मुलाला आणि एका लाइफगार्डला हा डंख मारून घेतला आणि या गूढ प्रकरणाचा छडा लावला.

इरुकांजी या चिमुकल्या जेलीफिशचा डंख इतका भयानक असतो की, त्यामुळे होणाऱ्या मरणयातना कित्येक दशके टिकू शकतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इरुकांजी या चिमुकल्या जेलीफिशचा डंख इतका भयानक असतो की, त्यामुळे होणाऱ्या मरणयातना कित्येक दशके टिकू शकतात

गर्शविन सांगतात की, त्यांनी 'इरुकांजी सिंड्रोम'चे निदान झालेल्या 50 पेक्षा जास्त लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि किमान 100 ऐतिहासिक केस रिपोर्ट्सचा अभ्यास केला आहे. जरी प्रत्येक डंखाचे रूपांतर या भयानक सिंड्रोममध्ये होत नाही आणि प्रत्येक व्यक्तीचा अनुभव खूप वेगळा असू शकतो. तरीही या आजाराची सर्वसाधारण लक्षणे कशी दिसतात याचे वर्णन त्यांनी केले आहे.

डंख मारल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी पहिले लक्षण जाणवते ते म्हणजे प्रचंड थकवा किंवा अस्वस्थता. त्यानंतर लगेचच मूत्रपिंडावर कोणीतरी जॅकहॅमरने प्रहार करत असल्यासारख्या तीव्र वेदना सुरू होतात ज्या साधारण 12 तासांपर्यंत टिकतात. मग सुरू होतो लक्षणांचा एक न संपणारा प्रवास ज्यात तासाभरात बेडशीट पूर्णपणे भिजेल इतका प्रचंड घाम येतो आणि पुढच्या 24 तासांपर्यंत दर काही मिनिटांनी न थांबणाऱ्या उलट्या होतात.

गर्शविन यांच्या मते, हे सर्व तर केवळ पूर्ण 'इरुकांजी सिंड्रोम'च्या आधीची सुरुवात असते. यानंतर त्या व्यक्तीला मरणयातनांच्या एकामागून एक येणाऱ्या लाटांचा सामना करावा लागतो. संपूर्ण शरीरात प्रचंड पेटके येतात आणि स्नायू आकुंचन पावतात. या वेदना जसजशा वाढत जातात तसतशी वेदनेची व्याख्याच बदलत जाते असे त्या स्पष्ट करतात.

केवळ शारीरिक मरणयातनाच नाही तर इरुकांजी जेलीफिश मानसिक छळही करतात. त्यांच्या विषाचा परिणाम असा होतो की, रुग्णाला प्रचंड भीती आणि आपला मृत्यू आता निश्चित आहे अशी तीव्र जाणीव होऊ लागते. गर्शविन सांगतात की, हे लक्षण इतर शारीरिक वेदनांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. रुग्ण अक्षरशः डॉक्टरांकडे स्वतःला मारून टाकण्याची मागणी करतात कारण त्यांना खात्री असते की ते मरणारच आहेत. त्यांना फक्त तो जीवघेणा प्रसंग लवकरात लवकर संपवायचा असतो."

जेलीफिश

फोटो स्रोत, Getty Images

गर्शविन सांगतात की, या विषात नेमके काय आहे किंवा ते 'इरुकांजी सिंड्रोम' नेमके कसे घडवून आणते याचे पूर्ण ज्ञान अजून आपल्याला मिळालेले नाही पण काही महत्त्वाचे धागेदोरे आपल्या हाती लागले आहेत. जेलीफिशच्या विषात 'पोरिन्स' नावाचे घटक असतात. हे पोरिन्स पेशींच्या आवरणाला छिद्रे पाडतात. यामुळे पेशी नष्ट होतात आणि शरीरातील महत्त्वाचे रेणू अचानक बाहेर पडल्यामुळे शरीराच्या जैवरासायनिक कार्यात मोठा गोंधळ उडतो.

इरुकांजी सिंड्रोमचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना असा संशय आहे की, या जेलीफिशचे विष मज्जासंस्थेतील 'सोडिअम चॅनेल्स'वर परिणाम करते. यामुळे शरीरात ॲड्रेनालाईन (adrenaline), नॉरइपिनेफ्रिन (norepinephrine) आणि डोपामाईन (dopamine) या संप्रेरकांचे प्रमाण वाढते. हीच प्रक्रिया बहुधा रुग्णामध्ये दिसणाऱ्या मानसिक भीतीला आणि हृदयाशी संबंधित गंभीर लक्षणांना कारणीभूत ठरते.

ज्याप्रमाणे रुग्णांना आपला मृत्यू जवळ आल्याची तीव्र भीती वाटते त्याच्या अगदी उलट परिस्थिती असते. कारण बहुतेक लोक यातून पूर्णपणे बरे होतात. यावरील उपचार प्रामुख्याने वेदनाशामक औषधांवर आधारित असतात. वेदनेच्या त्या भयानक लाटा सहन करण्यासाठी रुग्णाला 'मॉर्फिन' सारखी अत्यंत कडक आणि शक्तिशाली पेनकिलर्स दिली जातात.

स्टोनफिश अनेकदा खडक आणि कपारींमध्ये स्वतःला लपवून बसतो ज्यामुळे तिथे वावरणाऱ्या पर्यटकांचा पाय त्यावर सहजपणे पडू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टोनफिश अनेकदा खडक आणि कपारींमध्ये स्वतःला लपवून बसतो ज्यामुळे तिथे वावरणाऱ्या पर्यटकांचा पाय त्यावर सहजपणे पडू शकतो.

समुद्रातील डंख मारणाऱ्या जीवांमध्ये 'ऑस्ट्रेलियन बॉक्स जेलीफिश' (Australian box jellyfish) हा सर्वात तगडा स्पर्धक मानला जातो. हा जगातील सर्वात प्राणघातक जेलीफिश आहे. याचे तंतू 3 मीटर (9.8 फूट) पर्यंत लांब असू शकतात. जे शिकार किंवा मानवाच्या शरीरावर लांब पट्टे सोडून जातात. याबद्दल संशोधक म्हणतात, "तुमच्या त्वचेवर अशा खुणा उमटतात जणू काही तुम्हाला एका नऊ पदर असलेल्या चाबूकने मारले आहे."

'फायरवर्म' हा दिसायला एखाद्या केसाळ अळीसारखा असलेला आणि त्याच्या नावाप्रमाणेच आग लावणारा समुद्री कीडा आहे. स्वतःच्या रक्षणासाठी तो त्याच्या शरीरावरील 'अर्टिकेटिंग हेअर्स'चा म्हणजेच विषारी संरक्षक केसांचा वापर करतो. हे केसांसारखे दिसणारे अतिशय सूक्ष्म काटे स्पर्श होताच शरीरापासून वेगळे होतात आणि शत्रूच्या त्वचेत घुसून तिथेच अडकून राहतात. (काही पाण्याखालचे शोधक याला 'फायबरग्लास वर्म' असेही म्हणतात). शास्त्रज्ञांच्या मते, या काट्यांची टोकदार रचना आणि त्यातील विष या दोन्हीमुळे तासनतास टिकणारी प्रचंड आग आणि असह्य वेदना होतात.

स्टोनफिश' (Stonefish) हा मासा वाळूची उथळ ठिकाणे किंवा समुद्रातील खडकांमध्ये स्वतःला अशा प्रकारे लपवून ठेवतो की तो मासा नसून एखादा दगडच आहे असे वाटते.

अनवाणी चालणारे पर्यटक नकळत या माशावर पाय देतात आणि त्याच्या पाठीवरील टोकदार काट्यांमधून गडद निळ्या रंगाच्या विषाचा मोठा साठा शरीरात सोडला जातो. या डंखाच्या वेदना इतक्या तीव्र असतात की त्या सुमारे 48 तास टिकतात आणि डंख मारलेल्या जागी मोठी सूज येते.

युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाच्या मते, त्या विषाचा परिणाम म्हणून शरीराचा तो भाग सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे अशा समस्या पुढील काही आठवड्यांपर्यंत राहू शकतात.

सर्वात भयानक कोण?

जमीन, हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणचा 'डंख मारणारा राजा' नेमका कोण आहे हे ठरवण्यासाठी एखाद्या साहसी माणसाला दोन्ही क्षेत्रांतील म्हणजेच सर्वात भयानक कीटक आणि समुद्री जीव दोन्हींचा अनुभव घ्यावा लागेल. पण पीटरसन म्हणतात की, तो माणूस नक्कीच ते असणार नाहीत. त्यांच्या मते, जेलीफिश हे अत्यंत धोकादायक असतात आणि त्यांच्या डंखात मृत्यूचा खरा धोका असतो. काही प्रजाती तर इतक्या भयानक असतात की त्यांच्या वाटेला जाणे कधीही परवडणारे नसते असे ते स्पष्ट करतात.

गर्शविन आणि पीटरसन या दोघांचेही यावर एकमत आहे की, इरुकांजी जेलीफिशचा डंख मुद्दामहून अंगावर ओढवून घेणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे ठरेल. कारण याच्या काही प्रजातींमुळे शरीरात जीवघेणी प्रतिक्रिया उमटू शकते ज्यामध्ये मेंदूत रक्तस्राव होणे आणि हृदय निकामी होणे यांसारख्या गंभीर धोक्यांचा समावेश आहे.

डंख

फोटो स्रोत, Getty Images

मग सर्वात भयानक कोण, हे रहस्य कधीच उलगडणार नाही का? याचं उत्तर शोधण्यासाठी कदाचित एकच मार्ग उरतो. ज्या व्यक्तीने 'इरुकांजी'चा जीवघेणा डंख आधीच सोसला आहे, अशाच एका धाडसी माणसाला जगाच्या सफरीवर पाठवणे.

तिथे त्या व्यक्तीला श्मिटच्या सर्वात भीषण म्हणजेच 'लेव्हल 4' श्रेणीतील कीटकांच्या डंखांचा अनुभव घ्यावा लागेल. ही कल्पना ऐकायलाच एखाद्या थरारक माहितीपटाच्या कथेसारखी वाटते, जणू काही 'BBC Earth' चा एखादा नवीन शोच सुरू झाला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)