'धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार', पोलिसांकडून 2 जणांना अटक

फोटो स्रोत, ANI
धावत्या बसमध्ये एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी बस चालक आणि वाहकाला अटक केली आहे.
उत्तर दिल्लीच्या डीसीपी निहारिका भट्ट यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, घटनेच्या दिवशी तिमारपूर भागातील पार्किंग परिसरातून चालक कुलदीप आणि वाहक संदीप यांना अटक करण्यात आली.
अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
माध्यमांच्यानी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी बस जप्त करून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे.
दरम्यान, या प्रकरणी राजकीय प्रतिक्रियाही येत आहेत. काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि सीपीआयने या प्रकरणानंतर पोलीस आणि केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यानंतर भाजपने म्हटले की, दिल्ली पोलीस जलद कारवाई करत आहे. तसेच गुन्हेगारी नियंत्रणावरही काम करत आहे.
ही घटना कुठे घडली?
पोलिसांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील इयत्ता 11वीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीचा काही कारणावरून तिच्या कुटुंबासोबत वाद झाला होता.
यानंतर ती अल्पवयीन मुलगी नोएडाच्या सेक्टर 63 मधील एका नातेवाईकाला भेटण्यासाठी घरातून कोणालाही न कळवता निघून गेली.
वेगवेगळ्या वृत्तांनुसार, 4 ऑगस्टच्या रात्री पाऊस आणि अंधारामुळे ती अल्पवयीन मुलगी चुकून नोएडातील परी चौकात उतरली होती.
त्यानंतर पडदे असलेली एक स्लीपर बस तिच्याजवळ थांबली. बसमध्ये एकही प्रवासी नव्हता आणि वाहकाने तिला कथितपणे नोएडा सेक्टर 63 येथे सोडतो, असं सांगितलं.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, सूरजपूर येथील एका वर्कशॉपमधून दुरुस्तीनंतर स्लीपर बस रिकामी परत येत होती. सर्वायव्हर मुलीने आरोप केला आहे की, बस सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात कंडक्टरने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
या वृत्तात दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि प्रतिकार केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर आरोपी या मुलीला काश्मिरी गेटजवळ रिंग रोडवर सोडून फरार झाले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने पोलिसांशी संपर्क साधला.
परी चौक ते काश्मिरी गेट हे अंतर 40 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या काळात ही मुलगी आरोपींसोबत बसमध्ये होती.
बस कंपनीचा मॅनेजर काय म्हणाला?
बस ट्रॅव्हल कंपनीचे व्यवस्थापक मोनू गुप्ता यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, बस 27 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत दुरुस्तीसाठी सूरजपूर हिमगिरी येथे उभी करण्यात आली होती.
मोनू गुप्ता म्हणाले, "सेन्सर उपलब्ध नसल्यामुळे ते वाहन तिथे खराब अवस्थेत उभे होते. 4 ऑगस्टला बसची दुरुस्ती झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता तिथून निघाली, पण मध्येच थांबली. यानंतर रात्री 9 वाजता बस नेण्यात आली."

फोटो स्रोत, ANI
"आम्ही त्यांना गाडीची काही किरकोळ कामे करून घेण्यासाठी तिमारपूरला जायला सांगितले. यानंतर ते तिमारपूरच्या दिशेने निघाले. आम्हाला वाटले की गाडी तिमारपूरला पोहोचली आहे, पण सकाळी दिल्ली प्रशासनाकडून आम्हाला फोन आला की तुमची गाडी जप्त करण्यात आली आहे आणि चालक व वाहकाने केलेल्या कृत्यांमुळे ते तुरुंगात आहेत."
"वाहक-चालक 'कानपूर देहात'चे रहिवासी असून गेल्या 2 वर्षांपासून आमच्याकडे काम करत होते," अशी माहिती बस कंपनीचे मॅनेजर मोनू गुप्ता यांनी दिली.
राजकीय पक्षांकडून दिल्ली पोलीस लक्ष्य
या घटनेनंतर काँग्रेसपासून ते सीपीआयपर्यंत सर्वजण केंद्र सरकार आणि त्यांच्या नियंत्रणाखालील दिल्ली पोलिसांचा निषेध करत आहेत.
काँग्रेसने सोशल मीडियावर लिहिले, "धावत्या बसमध्ये एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. धावत्या बसमध्ये सुमारे 50 किलोमीटरपर्यंत हा अत्याचार सुरू होता, पण 2 राज्यांचे पोलीस कानात बोळे घालून झोपून राहिले."
"ना गस्त, ना तपासणी. ही घटना केवळ महिलांच्या सुरक्षेच्या दाव्यांनाच उघडे पाडत नाही, तर गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटत नाही हेही दाखवून देते. सत्य हे आहे की, 'डबल इंजिन' सरकारांच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे."
"आज गुन्हेगार निर्भयपणे गुन्हे करत आहेत आणि भाजप सरकार निराधार दावे करण्यात व्यग्र आहे, त्यांना जनतेच्या सुरक्षेची पर्वा नाही."

फोटो स्रोत, ANI
दिल्लीतील 3 गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता थेट जबाबदार आहेत.
ते म्हणाले, "रेखा गुप्ता यांच्याइतकी असंवेदनशील महिला मुख्यमंत्री मी कधीही पाहिली नाही. भाजपने बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्या अशा हलकट इन्फ्लुएन्सर्सना मोकळे सोडले आहे."
सीपीआय नेत्या ॲनी राजा एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, दिल्लीतील लोकांच्या जीविताचे आणि उपजीविकेचे रक्षण करणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. असं असताना दिल्ली पोलिसांना त्याऐवजी इतर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
ते म्हणाले, "आता त्यांचा (दिल्ली पोलिसांचा) वापर इतर कामांसाठी केला जात आहे. संपूर्ण जबाबदारी आणि लक्ष असे गुन्हे रोखण्यावर केंद्रित असले पाहिजे. राज्य सरकार आणि गृह मंत्रालय या दोघांनीही ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे."
दरम्यान, भाजप नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री प्रवेश वर्मा दिल्ली पोलिसांचा बचाव करत म्हणाले की, गुन्हेगारीसोबतच दिल्ली पोलीस किती वेगाने कारवाई करत आहे, हेदेखील पाहिले पाहिजे.
ते म्हणाले, "दिल्ली पोलीस गुन्हेगारी नियंत्रणाचे काम करते. पण मी जनतेलाही सतर्क राहण्याचे आवाहन करू इच्छितो. तुमच्या परिसरात किंवा वस्तीत अशी कोणतीही घटना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा, जेणेकरून ती घडण्यापूर्वीच थांबवता येईल."
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा लता गुप्ता यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बस चालक आणि वाहकाला त्वरित अटक केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























