'मतचोरी करणाऱ्यांना सोडणार नाही, कायदेशीर कारवाई करू'; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

फोटो स्रोत, @INCIndia
दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित इंडिया अलायन्सच्या 'मत वाचवा, देश वाचवा'रॅलीत सहभागी लोकांना संबोधित करतानाकाँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.
ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शाह केंद्रीय गृहमंत्री झालेच नसते, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, "गेल्या अनेक वर्षांपासून देशात मतांची चोरी होत आहे. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही मतांची चोरी झाली आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करून, मतदार यादीतून लोकांची नावे वगळून तसेच अनेकांची नावे नव्याने समाविष्ट करून मतांची चोरी करण्यात आली आहे."
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 13 कोटींहून अधिक मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
"देशातील परिस्थिती सुरळीत करण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणजे ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणं. अमित शाह म्हणतात की नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्हालाही आणि नरेंद्र मोदींना कुठेही जाऊ दिले जाणार नाही. ज्ञानेश कुमार यांच्यानंतर आम्ही तुमच्यासमोर उभे राहू. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल", असं राहुल गांधी म्हणाले.

फोटो स्रोत, @INCIndia
राहुल गांधी पुढे म्हणाले, "तुम्ही शिवाच्या वरातीबद्दल ऐकलं असेलच. त्यात कोणीही सहभागी होऊ शकतो. त्या तांडवात कोणीही नाचू शकतो. आम्हाला असाच भारत हवा आहे, जिथे प्रत्येकाला संधी मिळेल. एखादा शेतकरी मेहनत करत असेल, तर त्याला त्याची स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे. एखादा विद्यार्थी 18 तास अभ्यास करत असेल, तर त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे. आम्हाला काही केवळ मूठभर लोकांसाठी असलेला देश नको आहे."
मतचोरीचा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले, "ही काही साधीसुधी चोरी नाही. साधी चोरी म्हणजे एखाद्याने दुकानातून काहीतरी चोरणे. मात्र, ही प्रत्येक व्यक्तीच्या आवाजाची चोरी आहे. याला देशद्रोह म्हणतात. ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते आणि अमित शाह गृहमंत्री झाले नसते."
रामलीला मैदानावरील मंचावर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटलं की, "जनतेचा आवाज सांगत आहे की, आम्ही देशात लोकशाही संपुष्टात येऊ देणार नाही. तुम्ही स्वतःला मोठे समजू शकता, तुमच्याकडे पैसा असू शकतो; पण तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही. संविधान तुमच्यापेक्षा मोठे आहे."
'ज्ञानेश कुमार पायउतार होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार' - मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया अलायन्सच्या 'मत वाचवा, देश वाचवा' या रॅलीत सहभागी झालेल्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले.
जाहीर सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी तरुण, महिला आणि दलितांची मते हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविरोधात आम्ही सर्वजण येथे एकत्र आलो आहोत."
"पंतप्रधान मोदी आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला पदावर बसवून आज सर्वांची मते फोडण्याचे आणि त्यात फेरफार करण्याचे काम करत आहेत. त्या ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठीच आम्ही आज येथे आलो आहोत. जोपर्यंत त्यांना हटवले जात नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही."

फोटो स्रोत, ANI
आपल्या भाषणात खर्गे म्हणाले, "ज्ञानेश कुमार भूमिगत जरी झाले तरी त्यांना शोधून बाहेर काढू. पंतप्रधान मोदीजी, तुम्ही सीबीआय आणि ईडीचा वापर करून लोकांना घाबरवता. तपास यंत्रणांचा वापर करून तुम्ही जे दहशतीचे वातावरण निर्माण करत आहात, त्याला आम्ही घाबरणार नाही."
पंतप्रधान मोदींवर आरोप करताना खर्गे म्हणाले, "पंतप्रधान जनतेमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. आणि मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते जनतेने निवडून दिलेले पंतप्रधान नाहीत."
भाजप सरकारला 'चोरीचे सरकार' संबोधत ते म्हणाले, "बिहार असो वा उत्तर प्रदेश, ही सर्व सरकारे चोरी करूनच स्थापन झाली आहेत. मोदींना हटवले तरच लोकशाही वाचेल. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, आपण एकजुटीने लढू आणि संविधानाचे रक्षण करू."

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज आयोजित इंडिया अलायन्सच्या सभेला मोठ्या संख्येने लोकं उपस्थित झाले आहेत. विविध पक्षांचे नेतेदेखील या रॅलीसाठी दाखल झाले आहेत.
रामलीला मैदानाच्या परिसरात मोठा सुरक्षा दल तैनात करण्यात आला असून, विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती वाढत आहे.
दुसरीकडे, या मोर्चावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जेपी नड्डा यांनी टीका केली आहे.
जेपी नड्डा पत्रकार परिषदेत म्हणाले की, "आज रामलीला मैदानावर जे काही घडत आहे, तो लोकशाहीचा आदर नसून लोकशाहीच्या नावाखाली प्रजासत्ताकाला अराजकतेच्या हवाली करण्याचा एक हेतुपुरस्सर रचलेला कट आहे. हे पराभूत झालेल्या आणि जनतेने वारंवार नाकारलेल्या लोकांचे एक रचलेले नाटक आहे."
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन रविवारी हरियाणातील रोहतक इथं 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' मोर्चा काढणार आहेत.

फोटो स्रोत, INCIndia
दिल्लीतील रामलीला मैदानावर आज 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी दहा लाख लोक राजधानीत पोहोचतील, असा दावा करण्यात आला आहे.
हा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपा) खासदार जॉन ब्रिटास यांनी केला आहे.
कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)नंही या रॅलीला पाठिंबा जाहीर केला आहे.
सीजेपीनं 28 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात विशेष सखोल तपासणी (SIR) प्रक्रियेदरम्यान पात्र मतदारांची नावं मतदार याद्यांमधून वगळली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रामलीला मैदानावर सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरूवात केली.
दुपारच्या सुमारास रॅलीस्थळी वेगवेगळी दृश्यं दिसून आली.
यात काही कार्यकर्ते एसआयआर (विशेष सखोल पुनरीक्षण) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांचे बॅनर छापून ते घेऊन आंदोलनस्थळी पोहोचत आहेत.
कर्नाटक काँग्रेसचे माजी सोशल मीडिया प्रमुख श्रीवत्स यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं, "एकट्या एका राज्यात लाखो लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. कार्यकर्ते या लोकांची नावे बॅनरवर छापून ते घेऊन रामलीला मैदानावर पोहोचत आहेत."
1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी देशभरातून 10 लाख लोक राजधानीत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इंडिया आघाडीच्या रॅलीत सहभागी झालेल्या नेत्यांनी काय म्हटलं?
वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, "लोकशाही वाचवण्यासाठी आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आतापर्यंत लाखो लोक येथे पोहोचले आहेत."
राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं, "2016 नंतरच्या त्यांच्या भ्रष्टाचाराचा इतिहास आम्ही सांगणार आहोत. त्यांनी कशा प्रकारे अराजकता निर्माण केली आहे, हेही सांगणार आहोत. त्यांनी संविधानानुसार काम केले असते, तर आज अशी परिस्थिती निर्माण झाली नसती."

फोटो स्रोत, ANI
या रॅलीत सहभागी झालेले काँग्रेस खासदार शशी थरूर पीटीआयशी बोलताना म्हणाले, "जनता आमच्यासोबत आहे. आम्ही अराजकतेबद्दल बोलत नाही, तर संविधानाबद्दल बोलत आहोत. जर लोकांनी संविधानावर हल्ला केला नाही, तर देशात अराजकता पसरणार नाही. मतदारांना त्यांचे राजकीय भवितव्य ठरवण्याचा जो घटनात्मक अधिकार आहे, तो सुरक्षित राहावा, अशी आमची इच्छा आहे."
दरम्यान, रॅलीत सहभागी झालेले राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत म्हणाले, "भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. जनता हे सर्व पाहत आहे आणि ते भाजपला माफ करणार नाही."
1984 च्या शीखविरोधी दंगलींवरून दिल्लीत भाजपचा काँग्रेसविरोधात मोर्चा
1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींच्या मुद्द्यावरून भाजपनंदेखील आज रविवारी 1 नोव्हेंबररोजी पश्चिम दिल्लीमध्ये काँग्रेसविरोधात मोर्चाचं आवाहन केलं आहे.
हा मोर्चा हरिनगर येथील डीटीसी बस डेपोमधून सुरू होऊन तिलक नगर मेट्रो स्टेशनपर्यंत काढण्यात येत आहे.
या मोर्चात शीख समुदायातील नागरिकांसह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत.
बीबीसी प्रतिनिधी शुभ राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री सरदार हरदीप सिंह पुरी या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा आणि दिल्ली सरकारमधील मंत्री सरदार मनजिंदर सिंह सिरसा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आहेत.

फोटो स्रोत, Shubh Rana
1984 च्या शीखविरोधी दंगलींमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावलेली अनेक कुटुंबेही या मोर्चात सहभागी झाली आहेत.
यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्याचं दिसून आलं.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना रेखा गुप्ता म्हणाल्या, "लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसला आज शीख समाज विचारत आहे की, 1984 मध्ये जे घडले, ती लोकशाहीची हत्या नव्हती का?"
त्या पुढे म्हणाल्या, "आज ते देशात अराजकता पसरवण्याचे काम करत आहेत. या मोर्चात सहभागी झालेले हजारो शीख बांधव काँग्रेसला जाब विचारत आहेत की, त्यांना न्याय कधी मिळणार?"
राहुल गांधींचा भाजपवर निशाणा; व्यापाऱ्यांचे नुकसान केल्याचा आरोप
रामलीला मैदानावर विरोधी पक्षनेत्यांच्या सभेपूर्वी राहुल गांधी यांनी भाजपवर आरोप केला की, कनॉट प्लेसमधील सर्व दुकाने भाजपने जबरदस्तीने बंद करायला लावली आहेत.
एका ओपन जीपमधून राहुल गांधी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत रामलीला मैदानाकडे जात होते. याचदरम्यान त्यांनी 'एक्स'वर एक व्हीडिओ पोस्ट केला. त्यात ते म्हणाले, "आम्ही सर्वांना सांगितलं होतं की, तुम्ही मोर्चा आणि महारॅलीसाठी येथे याल, तेव्हा काही वस्तू विकत घ्याल, खरेदी कराल. मात्र, कनॉट प्लेसमधून जात असताना आम्हाला समजलं की, भाजपने येथील सर्व दुकाने जबरदस्तीने बंद करायला लावली आहेत."
राहुल गांधी पुढे म्हणाले, "त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान कोण आणि कशाप्रकारे करत आहे, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे."

फोटो स्रोत, X/@RahulGandhi
दरम्यान, दिल्लीतील चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) ने 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले होते.
या पत्रात रॅलीमुळे दिल्लीतील प्रमुख बाजारपेठांमधील व्यापारावर मोठा परिणाम होण्याची भीती सीटीआय ने व्यक्त केली होती.
सीटीआय ने म्हटलं की, "रामलीला मैदानाच्या आसपासच्या पाच किमीच्या परिसरात असलेल्या सुमारे 3 लाख दुकानांपैकी जवळपास 2.5 लाख दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. याचा सुमारे 80 टक्के व्यापारावर परिणाम होऊ शकतो."
योगी आदित्यनाथ यांनीही रामलीला मैदानात यावं - अखिलेश यादव
रामलीला मैदानावर विरोधी पक्षांच्या 'महारॅली'च्या अगदी आधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.
अखिलेश यादव यांनी दावा केला आहे की, "1 कोटी 27 लाख मते कमी झाली हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. तेही विधान परिषदेची निवडणूक हरल्यावर त्यांना आठवलं आहे. जे लोक डबल इंजिनबद्दल बोलायचे, तेच आता तिथे डबल झिरो झाले आहेत."

फोटो स्रोत, Deepak Gupta/Hindustan Times via Getty Images
ते म्हणाले की, "त्यांनी एकदा पराभव मान्य केला नाही. त्यांनी निवडणूक आयोगाला भेटून पुन्हा मतमोजणी करून घेतली. डबल इंजिन सरकारला त्याच निवडणुकीत दुहेरी पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर त्यांना आता काय लक्षात येतंय की, 1 कोटी 27 लाख मतं हिंदूंची नाहीत. हा डेटा कोणी दिला?"
अखिलेश यादव म्हणाले, "सरकारचा आरोप आहे की लाखो लाभार्थ्यांकडे मतंच नाहीयेत. याचा अर्थ त्यांनीही रामलीला मैदानावर यायला हवं."
काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, राज्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीत उत्तर प्रदेशच्या मतदार यादीतून 1 कोटी 27 लाख हिंदूंची नावे गायब असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ', भाजपचा मोर्चा
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन रविवारी हरियाणातील रोहतक इथं 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' मोर्चा काढणार आहेत.
विरोधी पक्षांविरोधात भाजपच्या देशव्यापी मोहिमेचा एक भाग म्हणून हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे .
एकीकडे, विरोधी आघाडी 'इंडिया' एसआयआर आणि कथित मतचोरीच्या निषेधार्थ दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅली काढणार आहे.

फोटो स्रोत, Sakib Ali/Hindustan Times via Getty Images
त्याच वेळी, भाजपने विरोधी पक्षांवर 'दिशाभूल करणारी माहिती, अपप्रचार पसरवून आणि पूर्वनियोजित पद्धतीने राजकीय अराजकता निर्माण केल्याचा' आरोप केला आहे.
भाजपने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही पदयात्रा रोहतक येथील छोटू राम पॉलिटेक्निक मैदानापासून सुरू होऊन मॉडेल टाउनमधील डी-पार्कपर्यंत जाईल.
या पदयात्रेत हरियाणा भाजप अध्यक्षा अर्चना गुप्ता, पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील ठाण्यातही सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटानंही अशाच प्रकारचा मोर्चा काढला आहे.
रॅलीसाठी जमत आहेत लोक
इंडिया आघाडीच्या रॅलीला पाठिंबा देण्यासाठी देशाच्या विविध भागांतील विरोधी पक्षांचे समर्थक रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर जमू लागले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी आणि एसआयआरच्या विरोधात ही रॅली काढण्यात येत आहे.
एकीकडे इंडिया ब्लॉक या रॅलीला मोठ्या बदलाचं चिन्ह म्हणत आहे, तर दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की 'इंडिया' आघाडी आहेच कुठे? ते तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात.

फोटो स्रोत, REUTERS/Anushree Fadnavis
दिल्ली वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, रामलीला मैदानाकडे मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यता असून, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पश्चिम दिल्लीच्या अनेक भागांमध्ये वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे किंवा वळवण्यात आली आहे.

बीबीसीचे वार्ताहर शाद मिधात यांच्या माहितीनुसार, राहुल गांधींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मिंटो रोडवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेसचे कार्यकर्तेही जमू लागले आहेत.

इंडिया आघाडीनं या रॅलीला 'मत वाचवा, देश वाचवा' असं नाव दिलं आहे. रामलीला मार्च कनॉट प्लेस इथून सुरू होऊन अजमेरी गेटमार्गे रामलीला मैदानावर पोहोचेल.
इंडिया ब्लॉक रॅलीत बोलताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "या रॅलीत लाखो लोक येत आहेत आणि त्यांना रोखण्याचे मोठे प्रयत्न केले जात आहेत, पण ते जितके जास्त रोखण्याचा प्रयत्न करतील, तितकी संख्या वाढेल. लोक सर्व अडथळे तोडतील. त्यांना बदल हवा आहे. त्यांना हे सरकार नको आहे. आज आम्ही जी शक्ती दाखवणार आहोत, ती देशाची शक्ती आहे, ती केवळ एक-दोन पक्षांची शक्ती नाही."

फोटो स्रोत, ANI
उत्तर प्रदेशचे मंत्री नरेंद्र कश्यप म्हणाले, "इंडिया आघाडीची भूमिका काय आहे? ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात आणि एकमेकांविरुद्ध बोलतात. दिल्लीतील सभांसंदर्भातील पूर्वीच्या अनुभवांमुळे केवळ दिल्लीतील लोकांचा छळच झाला आहे."
रामलीला मैदानावर सध्या काय आहे परिस्थिती?
दरम्यान, रॅलीच्या ठिकाणी सुरक्षा दलांची तैनाती आणि तयारीची छायाचित्रेही समोर आली आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो स्रोत, ANI

फोटो स्रोत, ANI
कॉक्रोच जनता पार्टीचाही पाठिंबा
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीदेखील एक्सवर या रॅलीला पाठिंबा जाहीर केला. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संघटनांना आपण पाठिंबा देत राहू, असं संघटनेचं म्हणणं आहे.
मात्र, या रॅलीला दिलेला पाठिंबा म्हणजे काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची घोषणा किंवा काँग्रेसच्या संपूर्ण राजकीय कार्यक्रमाशी सहमती दर्शवणं नव्हे, असंही संघटनेने स्पष्ट केलं आहे.
रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सांकेतिक संसद भरवण्यात आली. या कार्यक्रमात मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं की, जनतेचा आवाज संसदेत पोहोचू दिला जात नाही. त्यामुळेच विरोधकांना संसदेबाहेर एकत्र येऊन आपली भूमिका मांडावी लागत आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावरील रॅलीला येणाऱ्या लोकांना दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून खरेदी करून त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
राहुल गांधी यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियावर एक व्हीडिओ जारी करत ही विनंती केली.
ते म्हणाले, "उद्या लाखो लोक रामलीला मार्चसाठी दिल्लीत येत आहेत. सध्या सणांचा हंगाम आहे. दिवाळी, छठ आणि भाऊबिजेचा काळ आहे. बाहेरून दिल्लीत येणाऱ्या लोकांनी इथल्या व्यापाऱ्यांना मदत करावी, अशी माझी इच्छा आहे."
ते पुढे म्हणाले, "आंदोलन करा, मोर्चात आणि रॅलीत सहभागी व्हा; पण त्याचबरोबर थोडी खरेदीही करा. त्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल. मला माहिती आहे की या रॅलीमुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही. भाजप घाबरला आहे, म्हणून अफवा पसरवत आहे."
राहुल गांधी म्हणाले, "ही दोन्ही कामं एकत्र होऊ शकतात. उद्या मोर्चा आणि रॅली होईल, तसेच लाखो लोक आपल्या व्यापाऱ्यांच्या छोट्या-छोट्या दुकानांतून खरेदीही करतील."
दरम्यान, दिल्लीच्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) या व्यापारी संघटनेने राहुल गांधी यांना 1 नोव्हेंबर 2026 रोजी रामलीला मैदानावर होणारी इंडिया आघाडीची रॅली पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
सणासुदीच्या काळात ही रॅली दिवाळीनंतर, म्हणजे 10 नोव्हेंबरनंतर आयोजित करावी, अशी विनंती या संघटनेने केली होती.
प्रतिसंसदेत काय झालं?
काल 31 ऑक्टोबर रोजी विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आरोप प्रतिसंसदेत मांडले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी भूषवलं. समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद आणि तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांनी उपाध्यक्ष म्हणून भूमिका बजावली.
खर्गे यांनी ठराव मांडताना मुख्य निवडणूक आयुक्तांवर मतदार याद्यांमधील कथित गोंधळ आणि निष्पक्षपणे काम न करण्यासह सहा आरोप केले. या कार्यक्रमाला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह खासदार तसेच सामाजिक आणि युवा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
समारोपाच्या भाषणात राहुल गांधी यांनी संसदेत जनतेचा आवाज पोहोचू दिला जात नसल्याचा आरोप केला.

फोटो स्रोत, Fb/Rahul Gandhi
ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई यांच्या मते, हा प्रकार विरोधाच्या जुन्या सांकेतिक पद्धतींचाच एक भाग आहे. ते डाव्या संघटनांच्या पथनाट्यांचा आणि बोफोर्स प्रकरणाच्या काळातील निदर्शनांचा दाखला देतात. बोफोर्स प्रकरण राजीव गांधी सरकारच्या काळातील असून, 1986 मधील तोफ खरेदी करारात कथित लाचखोरीचे आरोप एप्रिल 1987 मध्ये समोर आले होते.
किदवई यांच्या या तुलनेतून सांकेतिक कार्यक्रमांचा वापर जनतेपर्यंत मुद्दे पोहोचवण्यासाठी कसा केला जातो, हे समजण्यास मदत होते. काँग्रेस आणि तिचे सहयोगी पक्षही मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आपले आरोप अशाच पद्धतीने जनतेसमोर मांडू इच्छित असून, त्यावर व्यापक चर्चा व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)





















