ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर हल्ला, 3 जण अजूनही बेपत्ता; नेमकं काय घडलं?

सेंटकॉमने जहाजाच्या इंजिन रूमवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे असल्याचा दावा करत त्याचे व्हिडीओ फुटेज पोस्ट केले.

फोटो स्रोत, Centcom

फोटो कॅप्शन, सेंटकॉमने जहाजाच्या इंजिन रूमवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे असल्याचा दावा करत त्याचे व्हिडीओ फुटेज पोस्ट केले.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

ओमानच्या किनाऱ्याजवळ बुधवारी (10 जून) एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर 24 भारतीय कर्मचारी (क्रू मेंबर्स) होते, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

या 24 भारतीयांपैकी आतापर्यंत 21 जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले असून 3 भारतीय बेपत्ता आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.

हल्ला झालेल्या जहाजाचे नाव 'सेट्टेबेलो' असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जेव्हा पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल यांच्यातील लष्करी तणावामुळे परिस्थिती आधीच तणावपूर्ण आहे, अशा स्थितीत हा हल्ला झाला आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितले?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (10 जून) उशिरा रात्री निवेदन जारी करत या हल्ल्याचा निषेध केला.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, "ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाज 'सेट्टेबेलो'वर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजावर असलेल्या 24 भारतीयांपैकी 21 जणांना वाचवण्यात आले असून 3 जण बेपत्ता आहेत."

"ओमानमधील आमचा दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि ओमानी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेत सक्रियपणे सहकार्य करत आहे."

मंत्रालयाने पुढे म्हटले की, या प्रदेशात जहाजांवर होत असलेले सततचे हल्ले चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आहेत.

निवेदनात म्हटले आहे, "आम्ही पुन्हा एकदा तणाव तात्काळ कमी करण्याचे आणि सुरू असलेल्या चर्चांना कूटनीतिक तोडग्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करतो, जेणेकरून या भागात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल."

"व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे या प्रदेशातील समुद्री मार्गांवर निर्बंधमुक्त वाहतूक आणि व्यापार लवकरात लवकर पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे."

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

फोटो स्रोत, Raj K Raj/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

या निवेदनापूर्वी ओमानमधील भारतीय दूतावासानेही या घटनेची माहिती दिली होती, मात्र ती अत्यंत संक्षिप्त होती.

दूतावासाने म्हटले होते, "ओमानच्या किनाऱ्याजवळ एका जहाजाशी संबंधित घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. लवकरच अधिक माहिती दिली जाईल."

दोन दिवसांपूर्वीही झालेला एका जहाजावर हल्ला

याआधी सोमवारी, म्हणजे 8 जून रोजीही एका जहाजावर हल्ला झाला होता. त्या जहाजावर 24 भारतीय खलाशी होते. मात्र, नंतर सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आली. ओमानमधील भारतीय दूतावासाने याला दुजोरा दिला होता.

त्यावेळी फॉरवर्ड सीमन्स युनियन ऑफ इंडिया (एफएसयूआय) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या घटनेची माहिती दिली होती. एफएसयूआयने खलाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी आवाहन केले होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Maryorin Mendez / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

यानंतर ओमानमधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते, "भारतीय खलाशी असलेल्या एका जहाजाशी संबंधित घटनेची माहिती दूतावासाला आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि बचावासाठी आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत."

त्यानंतरच्या एका पोस्टमध्ये दूतावासाने आणखी माहिती देताना म्हटले, "एमटी मॅरिवेक्सवरील सर्व 24 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कारवाई केल्याबद्दल आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभारी आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)